Showing posts with label Family Events. Show all posts
Showing posts with label Family Events. Show all posts

Sunday, February 8, 2026

नूतन वर्षाभिनंदन 2026...

नूतन वर्षाभिनंदन 2026... बघता बघता 2025 हे वर्षही सरले. अनेक कटू गोड आठवणी ठेवून ते गेले. अनेक चांगल्या बाबी घडल्या, काही बिघडल्याही. चांगले ते सोबत घेऊया, जे बिघडले त्यातून शिकूया. महत्त्वाचे म्हणजे, मानवी बुद्धीवर आक्रमण करणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा काळ आला आहे. यात सावधपणे वाटचाल करावी लागणार आहे. डिजिटलायझेशन वाढून गेले आहे, सर्वांचा स्क्रीन टाईमही वाढला आहे. ते गरजेचे असले, तरी त्याचा अनावश्यक वापर व अतिरेक टाळायला हवा. व्हर्चुअलिटी वाढलेल्या या काळात यंत्रावरचा विश्वास वाढला, पण माणसाचा माणसावरील विश्वास कमी होत चालला आहे. 'आभासी' दुनियेत आपण सारे वावरत आहोत. कुणीतरी खूप छान म्हटले आहे, कभी पड़ोसी भी घर का हिस्सा हुआ करते थे... आज एक ही घर में ना जाने कितने पड़ोसी हैं ।। आपण घरात असून घरच्यांशी संवाद हरवून बसलो आहोत. अबोला वाढीस लागला आहे. 'स्व'मग्नता ओढविली आहे. पूर्वी पोस्ट कार्डावरील शब्दांनी भावनांचे आदान प्रदान होऊन जाई, मन गलबलून येई; आता तासनतास मोबाईलला बिलगुनही आणि व्हाट्सअप व्हिडीओ कॉल करूनही ती 'ओल' काही जाणवत नाही. नवीन वर्षात पाऊल ठेवून त्याचे स्वागत करताना हा 'दुरावा' कमी करण्याचा प्रयत्न करूया, मनातून डोळ्यात उतरणारी ती ओल जपुया... संवेदना ही आपल्या जगण्याची प्रेरणा आहे. मानवी मूल्याचा तो अतूट धागा आहे. AIचे भूत मानगुटीवर असले तरी मानवी बुद्धिमत्ता व संवेदनांना ते हरवू , बायपास करू शकणार नाही. नववर्षातच नव्हे, आगामी काळात या संवेदना जपूया, माणूस होऊया... नव्या विश्वासाने, उमेदीने व आश्वासकतेने मांगल्याचे तोरण बांधत, प्रसन्नतेने नववर्ष 2026चे स्वागत करूया.... Happy New Year मित्रांनो Kiran Agrawal #KiranAgrawal

Tuesday, December 30, 2025

Pencil sketch... Kiran Agrawal

जळगावचे पेन्सिल स्केच आर्टिस्ट मित्रवर्य अनिल पाटील यांनी रेखाटून दिलेली छबी.. धन्यवाद अनिलराव! आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पुनश्च धन्यवाद!

Thursday, November 13, 2025

जयगावमा गैरी थंडी ...

11 Nov 2025 जयगावमा गैरी थंडी वाजी राह्यनी ना भो!
राज्यातील सर्वात कमी, म्हणजे महाबळेश्वर पेक्षाही कमी 10अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान येथे आहे... Kiran Agrawal #GoodMorningJalgaon #LoveYouJalgaon

आनंदाचे डोही आनंद तरंग...

22 Oct, 2025 आनंदाचे डोही आनंद तरंग...
दिवाळीच्या प्रकाश पर्वात सारे वातावरण सप्तरंगात न्हाऊन निघाले आहे. सर्वत्र आनंदाची व मांगल्याची बरसात होते आहे. लख्ख उजेड उधळणाऱ्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला आहे... घरात लक्ष्मीपूजन आटोपल्यावर लगतचे मित्र व ज्येष्ठांच्या भेटी व त्यांचे आशीर्वाद घेऊन गच्चीवर गेलो, आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे होणारा रंगोत्सव बघायला... **** पाठोपाठ धाकटी कन्या कृतिका सोबत सौ.ही आली. काहीशी शांत, निवांत होती. विचारले, एवढा उत्साहाचा हा उत्सव; तुला काय झाले? म्हटली, आज श्रुती येथे नाही... लग्नानंतरची तिची पहिली दिवाळी. तिच्या सासरी ती आहे. मनात कालवाकालव जरूर झाली, कारण गेल्या 28 वर्षात फक्त एकदाच, ती नोकरीला लागल्याच्या पहिल्या वर्षी सुटी न मिळाल्याने पुण्यात अडकली होती; म्हणून दिवाळीला सोबत नव्हती. तेवढा अपवाद वगळता कायम ती सोबत असे. पण आता तर यापुढे असेच होणार. लग्न झालेय तिचे. म्हटले, अरे आपल्या पणतीने आपण तिच्या सासरचे अंगण उजळले; हा किती मोठा आनंद! नाते संबंधाची नवी चादर शिवून मायेची मधुर उब तिला लाभलीय.. आयुष्याचा सहचर आणि आणखी एका मम्मी पप्पांच्या, दिदीच्या सहवासाने तिच आयुष्यच सुगंधी झालंय... आमच्या या दिवाळीलाही लाभलाय तिचा तो सुगंधी दरवळ. ****
हे खरं, की ती असायची तर.., असू द्या, खूप आठवणी आहेत. जागा नाही पुरणार लिहायला. वेळ नाही तितका... आमच्या वेलीवर आलेली ती एक चिमणी, भुर्रकन उडून गेली नव्या कुटुंब कबिल्यात. लेकीचं असंच असतं, इतका जीव लावलेला असतो त्यांनी आपल्याला.. कधी आईसारखा, कधी बहिणीसारखा, प्रसंगी मैत्रिणीसारखा; की त्यांचं घरातलं असणं एखाद्या अत्तरासारखं बनून जातं. सासरीच काय, लग्नापूर्वी ती नोकरीसाठी म्हणून घर सोडून पुण्यात गेली होती तर घर कसं रीतं रित वाटे आताच्या या रितेपणात मात्र एक भरलेपण आहे, कारण पंखात बळ आलेली चिमण पाखरं आपला खोपा विणतातच ना.. तिलाही लाभला असाच खोपा अन एक जोडीदार चिमणा. कसं असतं ना आयुष्य, बदलते प्रसंग आणि परिस्थितीच्या हिंदोळ्यावर झुलणारं.. त्यातच तर आहेत भाव भावनांचे सप्तरंग अन आठवणींचे कल्लोळ ****
आकाशातही फटाक्यांचा कल्लोळ उठला आहे, रंग उधळले जात आहेत, पण या गजबजाटात आम्ही कुठे तरी हरवून बसलो होतो स्वतःला. एवढ्यात व्हिडिओ कॉलची बेल वाजली... कॉल एक्सेप्ट करताच एका सुरात नाद गुंजला... हॅप्पी दिवाली ! श्रुती, जावई तुषार, चंचल, व्याही - विहिण बाई सारे कुटुंब स्क्रीनवर होते... त्यांच्याकडे यंदा साक्षात लक्ष्मी आल्याचा भाव आणि आनंद त्यांच्या बोलण्यात ओसंडून वाहताना दिसला. सारे घर आनंदात न्हाऊन निघालेले... आणखी काय हवे, कुणाही लेकीच्या बापाला आणि कुटुंबाला? त्या आनंदाच्या प्रकाश प्रवाहात आम्हीही डुंबतो, वाहतो आहोत आता... #KiranAgrawal #HappyDipawli #ShruTu.

दिवे लागले रे दिवे लागले...

18 Oct, 2025 दिवे लागले रे दिवे लागले...
आज धनत्रयोदशी. धन्वंतरीचे पूजनाचा दिवस... पणत्या तेवल्या, आकाश कंदील लागले; दीपोत्सव होतोय... या दीपोत्सवाच्या प्रकाशात चैतन्याची व मांगल्याची बरसात होतेय. इवल्या इवल्याशा पणत्या अवघा आसमंत उजळून काढताहेत. आपणही आपल्या एखाद्या इवल्याशा प्रयत्नांनी इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरण्याचा व तमाच्या तळाशी दिवे लावण्याचा प्रयत्न करूया... ।। शुभ दीपावली ।। Kiran Agrawal #KiranAgrawal #HappyDiwali

वाघेश्वरी टेकडीवर...

02 Sept 2025 वाघेश्वरी टेकडीवर...
दूरचे डोंगर साजरे दिसतात हेच खरे. आपल्या जवळ जे असते त्याची आपल्याला फारशी किंमत नसते, किंवा आकर्षणही नसते. कधी काही निमित्ताने जेव्हा जवळचेही पाहिले जाते तेव्हा आपल्याला आपलेच दुर्लक्ष बोचायला लागते. आज नंदुरबार दौऱ्यानिमित्त तेच अनुभवयास मिळाले. नुकताच आम्ही लंडन दौरा केला. तेथे स्टोनहेज म्हणून युनेस्कोचा हेरिटेज दर्जा लाभलेली दगडी शिल्पांची साईट बघितली. तेथे दौऱ्यात सोबत असलेल्या रमाकांत पाटील यांनी येथे आल्यावर म्हटले, तुम्हाला आमच्या येथील अशा दगडी शिळा दाखवतो; आणि आणले नंदुरबारच्या वाघेश्वरी टेकडीवर. तुलना करता येऊ नये, पण येथेही भल्या मोठ्या शिळा बघायला मिळाल्या. या शिलांवर बसून शहर निहाळण्याचा निवांतपणा वेगळाच आनंद देऊन जाणारा व भान हरपायला लावणारा आहे हे नक्की. (छाया सौजन्य: मनोज शेलार) #KiranAgrawal #WagheshwariNandurbar

Wednesday, November 12, 2025

London Tour 5

'थेम्स'च्या तीरावर...
नद्या कुठल्याही असोत, त्यांचा प्रवाह काठावरील जनजीवनाला संपन्न आणि समृद्धही करीत असतो. जल हे जीवन असते, त्यामुळे या जलाच्या प्रवाहातून संस्कृतीचेही पोषण होत असते. आपल्याकडे गंगा, गोदावरी, कृष्णा - कोयनेचे काठ या संपन्नतेची साक्ष ठरले आहेत, तसे लंडनच्या 'थेम्स'चेही आहे. गोदावरी जशी नाशिकच्या मध्यातून वाहते, तशीच थेम्स लंडनच्या मध्यातून. या थेम्सच्या तीरावर अलीकडे व पलीकडे वसलेले लंडन शहर हे ब्रिटिश साम्राज्याच्या उद्योग, कला, साहित्य, शिक्षण आदी सर्व क्षेत्रीय वैभवशाली वारशाची जपणूक करून आहे. विविध ऐतिहासिक संग्रहालये, मनोरंजनाची व पर्यटकीय ठिकाणे येथे आहेत. एकेक इमारती व त्यांची वास्तुकला अशी की फक्त बघतच राहावे. टापटीप व शिस्तशिरपणात ब्रिटिशांचा हात कुणी धरू नये. लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्वेंशनच्या निमित्ताने साहेबांच्या देशात फिरणे झाले. या दौऱ्यातीलच ही काही आठवण चित्रे...
#LokmatGlobalEconomicConventionLondon2025 #KiranAgrawal #LondonTour #KATourDiary #Thames

योगाशिवाय योग नाही हेच खरं...

25 August 2025 योगाशिवाय योग नाही हेच खरं...
तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून नाशकात राहतोय. नाशकातील ड्युटी दरम्यान अनेकदा झोडगे येथे येऊन गेलो. पण प्रत्येक वेळी बघू पुढच्या वेळी म्हणून तेथील हेमाडपंथी शिव मंदिराचे दर्शन राहिलेच होते. मित्रवर्य कवी कमलाकर आबा देसले यांनी अनेकदा निमंत्रण दिले, पण तेही राहिलेच. आता आबा पण नाहीत. काल धुळे लोकमत कार्यालयाच्या वर्धापन दिनासाठी नाशिक येथून धुळ्याकडे निघालो असता वेळेचा अंदाज घेऊन या मंदिराकडे वळलो. क्षणभर विसावलो व पुढे मार्गस्थ झालो. 'त्या' क्षेत्रात ड्युटीवर असतांना जे राहून गेले ते असे अवचित घडले.. म्हणूनच, हा योगायोग! #KiranAgrawal

London Tour 4

दगडी शिल्पांचा जागतिक वारसा...
इंग्लंडच्या विल्टशायरमध्ये अजस्त्र अश्या दगडांची वर्तुळाकार मांडणी केलेले प्रागैतिहासिक स्मारक आहे, ज्याचे नाव स्टोनहेंज. UK लंडनमध्ये गेलेले पर्यटक युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या या स्टोनहेंजला आवर्जून भेट देतात म्हणून आम्हीही ते बघायला गेलो. नवाश्मयुगीन काळातील 2 ते तब्बल 25 टन वजनांचे सुमारे 10/10 मीटर व्यासाचे अवाढव्य दगड येथे वर्तुळाकार व अद्वितीय पद्धतीने रचून ठेवण्यात आले आहेत. तब्बल दीड हजार वर्षात टप्प्याटप्प्याने ही मांडणी केली गेल्याचे सांगितले जाते. ई.स. पूर्व 3000 मध्ये म्हणजे सुमारे 5000 वर्षांपूर्वी सूर्याच्या रेषेत हे शिल्प बनवले गेले असल्याचा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र ते नेमके कुणी व कशासाठी बनविले असावे, हे अजून अस्पष्ट आहे. संशोधकांचे वेगवेगळे दावे त्याबाबत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दळणवळणाची कुठलीही सुविधा किंवा 'क्रेन'सारखी प्रगत साधने उपलब्ध नसताना त्याकाळी एवढे प्रचंड मोठे दगड या 'सॅलीसबरी'च्या पठारावर कसे आणले गेले असतील आणि विशिष्ट पद्धतीने कसे रचले गेले असावेत याचेच मोठे कुतूहल हे बघताना जाणवते. त्याचे वेगवेगळे तर्क येथे दिले जातात, ते ऐकून व डोकं खाजवूनही ते काम करत नसल्याने आम्हीही विस्मयकारकपणेच येथून बाहेर पडलो ... #LokmatGlobalEconomicConventionLondon2025 #KiranAgrawal #LondonTour #KATourDiary #Stonehenge

London Tour 3

लंडनमध्ये भारतीय मान्यवरांची मांदियाळी...
लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन लंडन 2025 च्या निमित्ताने भारतीय उद्योगपती, धोरणकर्ते राजकीय नेते आदी मान्यवरांची मांदियाळीच बघायला मिळाली. या कन्व्हेन्शनमध्ये भारतीय अर्थव्यवस्था व इन्फ्रास्ट्रक्चर मधील प्रगतीमुळे विदेशी उद्योगांसाठी भारत कसे प्रवेशद्वार ठरले आहे, आदी विषयांवर विचारप्रवर्तक मंथन झाले.
लोकमत एडिटोरीअल बोर्डाचे चेअरमन डॉ विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ राजेन्द्र बाबूजी दर्डा, संपादकीय संचालक ऋषीबाबूजी दर्डा यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमानिमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, पंकजाताई मुंडे, माधुरीताई मिसाळ, संजय शिरसाठ, खा. गोपीचंद गोपछडे, आमदार हेमंत पाटील, प्रा. देवयानीताई फरांदे, मंगेश चव्हाण, प्रशांत बंब, राजेश पाडवी, छत्रपती मालोजीराजे आदी मान्यवरांसोबत भेट व चर्चा घडून आली. समूह संपादक विजय बाविस्कर सरांसोबत सर्व संपादक मित्र समवेत होते..
#LokmatGlobalEconomicConventionLondon2025 #KiranAgrawal #LondonTour #KATourDiary

London Tour 2 ; 2025

शाही निवासाचा थाटच न्यारा..!
ब्रिटिश राजघराण्याचे शाही निवासस्थान असलेले विंडसर कॅसल बघून आपल्याकडील विशेषता राजस्थानमधील तसेच म्हैसूर, कोलकात्यातील राजे महाराजांचे पॅलेस डोळ्यासमोर येतात. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर तब्बल 13 एकर परिसरात ब्रिटिश राजघराण्याचे वैभव दर्शविणारे हे भव्य आणि देखणे निवासस्थान आहे. परकीय आक्रमणापासून लंडनचे रक्षण करण्यासाठी विल्यम द कॉन्करर यांनी 11व्या शतकात हा किल्ला बांधला व पुढे त्याचे निवासस्थान व राजवाड्यात रूपांतर झाले. अप्रतिम वास्तुकलेचे दर्शन येथे घडते. रॉयल फॅमिली, प्रिन्स व राणी एलिझाबेथ यांचे हे अधिकृत निवासस्थान. राजा राणीच्या वापरातील मौल्यवान चीज वस्तू येथे संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आपल्याकडे राष्ट्रपती भवनात होतात तसे विविध सरकारी समारंभ येथे होतात. लंडनमध्ये येणारा कोणीही पर्यटक हे ठिकाण पाहिल्याशिवाय लंडन सोडत नाही. डोळे दिपावेत असे हे साम्राज्य आहे. #LokmatGlobalEconomicConventionLondon2025 #KiranAgrawal #LondonTour #KATourDiary #WindsorCastle

London Tour 2025

16 August 2025 साहेबांच्या देशात...
कधीकाळी भारतावर राज्य केलेल्या साहेबांचा देश व त्यांचे हेडक्वार्टर लंडन म्हणजे युरोपियन संघातले सर्वात मोठे महानगर. महात्मा गांधी या लंडनमधून बॅरिस्टर झाले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इकॉनॉमिक्स व कायद्याचे शिक्षण येथे घेतले, नेताजी सुभाषबाबुंनीही सिव्हिल सेवेची परीक्षा येथेच दिली. क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना येथे फाशी दिली गेली. सावरकरांना लंडनमध्येच पकडून भारताकडे नेले जात असताना त्यांनी मार्सेलीस बंदराजवळ समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली होती. अशा इतरही महापुरुषांचा उल्लेख करता येईल ज्यांचा लंडनशी महत्त्वाचा संबंध राहिला आहे. ........... डिक्शनरी म्हटली की 'ऑक्सफर्ड' आणि शाळा म्हटली की 'केम्ब्रिज स्कुल' असे गणित आजही कायम आहे. आपल्या मराठी साहित्यावर ज्यांचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो व ज्यांना 'फादर ऑफ ड्रामा' म्हटले जाते ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार विल्यम्स शेक्सपियर येथलेच. सर्वात मौल्यवान म्हटला गेलेला आपला कोहिनुर हिरा येथेच आहे.
क्रिकेटचे सामने पाहताना 'लॉर्ड्स'चे मैदान आपण बघत असतो, 'शेरलॉक होम्स'च्या कथा आपण वाचलेल्या असतात; असे बरेच काही लंडनचे. बर्बेरी, मलबेरी, कॅडबरी, बार्कलेज बँक, बीबीसी, कोक्स एन्ड किंग्ज, थॉमस कुक, युनिलिव्हर अशी अनेक प्रख्यात, आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची नावे आपल्या अंगवळणी पडली आहेत. यातील काही ब्रँडसची उत्पादने आपल्या वापरातही येतात. ही सुद्धा येथलीच, त्यामुळे अशा या लंडनचे कुतूहल मनी घेऊन साहेबांच्या या देशात पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी या भूमीवर पाय ठेवले आणि इथल्या चौकातच तिरंगा उंचावून जय हिंद चा घोष केला. अर्थातच निमित्त आहे, थेम्सच्या तीरावर होत असलेल्या #LokmatGlobalEconomicConventionLondon2025 चे. लोकमत समूहाने दिलेल्या संधीमुळे हे शक्य होत आहे. Thanks to my #Lokmat
#KiranAgrawal #LondonTour #KATourDiary

आठवणी सरता सरेनात...

01 August 2025 आठवणी सरता सरेनात...
आज बरोबर तीन महिने होत आहेत, लेकीचे म्हणजे आमच्या श्रुतीचे हात पिवळे करून. तिच्याशी आणि तिच्या लग्न कार्याशी संबंधित आठवणींचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. श्रावण सरींनी निसर्गात हर्ष दाटला आहे, तसा तो मन व्यापून आहे... अशीच एक बाब आठवणीत राहण्यासारखी... त्याचे झाले असे, की लग्नात कोणत्या कार्यक्रमात कोणते कपडे परिधान करायचे हे ठरलेलं होतं. अश्यात माझं कबर्ड धुंडाळताना पुतण्या डॉ. आदर्शच्या नजरेत माझा एक जुना थ्री पीस पडला. तो होता माझ्या लग्नातला, म्हणजे तब्बल 30 वर्ष जुना. माझ्या लग्नानंतर मेहुणीच्या व भाच्यांच्या, म्हणजे फार फार तर दोन-तीनदाच तो वापरला गेला असेल. नंतर राहिला कपाटातच पडून. त्याला निकाली काढायचीही मनाची तयारी झाली नाही आजवर कधी. लग्नाच्या साऱ्या बारीक-सारीक गोष्टी जपून ठेवण्याची सवय असतेच सर्वांना. अशा चीज वस्तूंना भावनेचे काठपदर असतात, गंध असतो वेगळा. त्यामुळे अडगळीत, पण जपून ठेवलेला होता हा सूट. मी म्हटले, जुना झालाय तो. पण कोणी ऐकलं नाही. म्हणाले, त्याचीच फॅशन आता पुन्हा आलीय. आताच्या सर्वांच्या ब्लेझर्सपेक्षा वेगळं वाटेल. पत्रकारितेत इतरांपेक्षा वेगळी बातमी देण्याची सवय असल्याने मलाही ते पटलं. आश्चर्य म्हणजे तो पूर्वीसारखाच मापात बसला आणि लगेच ड्रायक्लीनला पाठवला गेला. संगीत संध्येच्या कार्यक्रमात हाच सूट वापरला. माझ्या लग्नाचा कोट मी मुलीच्या लग्नातही वापरला, आणि जुन्या आठवणींना नवे संदर्भ लाभुन मन आणखी सुगंधित होऊन गेलं. 'त्या' आठवणींचा या आठवणींशी उत्कट मिलाफ ! स्मृतिपटलावर चिरंतन रेंगाळणारा... काळ बदलला, ठिकाण व पात्रे बदलली; पण प्रसंग व भावना त्याच आणि तशाच. गोष्ट तशी इवलीशी, पण ढीगभर आनंद देणारी ठरली. शिवाय, 30 वर्षे झालीत तरी आपलं 'माप' तसंच; याचं समाधान वेगळं. जूनं ते सोनं... हेच खरं! संलग्न: 'त्या' सूट मधील तेव्हाची व आताची छबी. #ShruTu #ShrutuWedding #AgrawalGadodiya #ShrutiTushar

माझी सजवणूक...

12 June 2025 माझी सजवणूक...
हो सजवणूकच म्हणायला हवे, कारण एरव्ही कधी ठरवून किंवा नियोजनपूर्वक कपडे परिधान करायची सवयच नाही मला. जेव्हा जे उपलब्ध, ते नसायचे आणि वेळ साजरी करायचा आजवरचा माझा शिरस्ता. पण, कन्येच्या लग्नात खुद्द नवरीनेच आग्रह धरल्याने नाईलाज झाला आणि मुकाट्याने नटून घेतले घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे. आज सहज फोटो चाळता चाळता सोबतचे फोटो समोर आले आणि स्वतःच स्वतःला न्याहाळत बसलो... घराबाहेर पावसाचे कोसळणे सुरू असताना मनात मांगल्याच्या क्षणांची बरसात अनुभवायची तेवढीच एक संधी.. यानिमित्ताने! #ShruTu #ShruTuWedding #ShrutikaTushar #AgrawalGadodiya #KiranAgrawal

मुली पटपट मोठ्या होतात आणि रडवून जातात...

13 May 2025 मुली पटपट मोठ्या होतात आणि रडवून जातात...
आमच्या श्रुतीचंही तसच झालं. इवली इवलीशी श्रुती कधी मोठ्ठी झाली ते कळलच नाही. बेताच्या आमच्या परिस्थितीत तिनं कधी कशासाठी हट्ट केल्याचं आठवत नाही. आईच्या ओढणीची साडी करून नेसणारी व हौस भागवणारी ही पोर. ती लहान होती तेव्हा शासनाच्या हॅन्डलूम क्राफ्ट प्रदर्शनात आलेल्या व स्नेह जुळलेल्या लखनऊ येथील लल्ला भैय्याने तिला खास मातीची एक डोली खेळायला दिली होती. तिनं ती जपून ठेवली. त्या डोलीसोबत खेळतच तिनं स्वप्न बघितलं आणि अखेर तिच्या स्वप्नातील राजकुमार डोली घेऊन आला व त्यात बसून ती नव्या प्रवासाला निघाली. हसत हसत आणि रडत रडतही. रडणं यासाठी, की माझ्यात तर तिचा खूपच जीव. मला आठवतं, नाशिकवरून माझी अकोल्यात बदली झाली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा तब्बल महिनाभर तिला सोडून राहिलो होतो. नंतर घरी आलो तर दारातच अशी बिलगली की किती तरी वेळ बिलगूनच राहिली. सकाळी भल्या पहाटे मी येईन म्हणून रात्रभर जागत बसून होती म्हणे खिडकीजवळ. एका बापाची, म्हणजे माझी खास मैत्रीण, बहीण, आई असे अनेकविध रोल निभावणारी पोरगी.. घराला आणि मनालाही रीतं करून गेली, पण या रितेपणातही एक आनंद, जबाबदारीच्या मुक्तीचं भरलेपण आहे हेही खरं. पोरींचं सासरी जाणं व्याकुळ करून जातं खरं, पण यासमयीच्या आनंद अश्रूंच्या निथळण्याला आशीर्वादाचे सुस्कारे लाभलेले असतात. अशा वेळी मन गातं, बाबूल की दुवाये लेती जा... Kiran Agrawal
#ShruTu #ShrutuWedding #AgrawalGadodiya #ShrutiTushar

बाबूल की दुवाए लेती जा...

01 May 2025 बाबूल की दुवाए लेती जा...
ईवल्या ईवल्या पावलांनी आमच्या आयुष्यात आलेली श्रुती ही गाडोदिया कुटुंबियांची सून म्हणून बोहल्यावर चढली हा सर्वोच्च आनंदाचा मंगल क्षण. श्रुती म्हणजे आमच्या कुटुंबातील नितळ नदीचा झुळझुळता व खळखळता प्रवाह. ती म्हणजे आमच्या सनईची मंगल शहनाई, सतारीचा बेमीसाल सूर, तबल्याचा अवखळ नाद, बासुरीची धून आहे... श्वासाची लय आहे. त्यामुळे तिचे हात पिवळे करतांना मन चिंब झालंय. मुंबईतील रिअल इस्टेटच्या क्षेत्रात कार्यरत CA तुषार सोबत श्रुतीने तिच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला आरंभ केला आहे. आपलेही आशिर्वाद त्यांच्या पाठीशी असुद्या ...
#Shrutu #STWedding #AgrawalGadodiya

Friday, October 3, 2025

नव वर्षाचे स्नेहील शुभचिंतन ... 2025

01 Jan, 2025 नव वर्षाचे स्नेहील शुभचिंतन ...
ना किसी को नाराज कर के जियो, ना किसी से नाराज होकर जियो ! जिंदगी बस कुछ पलों की हैं, सब को खुश रखों और सब से खुश होकर जियो..!! ज्याने कुणी हे सांगितले आहे, ते अगदी खरे आहे. चला, नवीन वर्षात हाच प्रयत्न करूया... आनंद पेरूया, आनंद वाटुया.. Kiran Agrawal Happy new year 2025 #KiranAgrawal

Happy Diwali 2024

Happy Diwali 2024

Monday, July 15, 2024

आनंदाच्या शोधात...

July 14, 2024 आनंदाच्या शोधात...
आनंदाच्या शोधात लासूरच्या श्री आनंदेश्वर मंदिरात... #KiranAgrawal