Thursday, September 28, 2017

Editor's View published on 28 Sept, 2017 in Lokmat Online

वैचारिक मन्वंतराचे दक्षिणायन !
  
किरण अग्रवाल
 
आजची तरुण पिढी बाकी सारे सोडून मोबाइलमध्ये डोके घालून बसली आहे, अशी तक्रार पालकांकडून होत असताना आणि त्यात बरेचशे तथ्य दिसत असतानाही समाज व देशासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील तब्बल पाच सातशे तरुण एकत्र येतात व आपला एक जाहीरनामा तयार करून त्यासाठी कृतसंकल्प होतात ही बाब साधी नाही. आजची ही ठिणगी उद्या मशालीचे रूप धारण करून समोर येण्याचा शुभसंकेत तर यातून मिळावाच, शिवाय सारेच काही संपलेले नाही; समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाचा विचार करणारी एक फळी घडतेय याचा आशादायी सांगावाही त्यातून मिळावा.
 
सध्या सुरू असलेला नवरात्रोत्सव म्हणजे तरुणाईच्या जल्लोषाचा उत्सव. अलीकडे सणावारांच्या संकल्पनाही बदलून गेल्याने, जसजसा सूर्य मावळतीकडे जाताना दिसतो तसतसे तरुणांचे घोळके हाती टिपºया घेऊन दांडिया मैदानाकडे लोटताना दिसून येतात. पण अशा या माहौलातही राज्याच्या कानाकोपºयातील निवडक तरुण ‘दक्षिणायन’च्या माध्यमातून नाशकात जमले होते. ‘डिझायनिंग द फ्यूचर’ अशी संकल्पना घेऊन त्यांनी आपल्या स्वत:समोरीलच नव्हे तर समाज व देशासमोरीलही विविध आव्हानांवर जीव तोडून चर्चा केली. काही प्रश्न उपस्थित केले, तर काही प्रश्नांची उत्तरेही स्वत:च शोधलीत. दोन दिवसांच्या या युवा संमेलनात शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण, क्षीण झालेली जातिअंताची लढाई, लैंगिक शिक्षण अशा गहन वा गंभीर विषयांवर खल झाला. महाराष्ट्र शाासनाने २०१२ मध्ये दहा वर्षांसाठी तययार केलेल्या युवा धोरणास पाच वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबाबतचा आढावाही यात घेण्यात आला.  केवळ आपसात चर्चा करून हे तरुण थांबले नाहीत, त्यांनी गटागटाने नाशकातील विविध शाळा-महाविद्यालयांत जाऊन सर्वांची मते अभ्यासली. अर्थातच, तरुणाईच्या या चळवळयुक्त मोहिमेला वैचारिक अधिष्ठान लाभले होते ते दक्षिणायन अभियानाचे प्रणेते व आंतरराष्ट्रीय भापातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ पत्रकार विद्या बाळ, कुमार केतकर, समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, साहित्यिक प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, कामगार नेते भालचंद्र कानगो, शमसुद्दीन तांबोळी, उल्का महाजन, नंदा खेर आदी मान्यवरांचे.
 
 
महत्त्वाचे म्हणजे तरुणांबद्दल बोलताना अगदी सरधोपटपणे बोलले जाते की, त्यांना समाजाशी काही देणे-घेणे उरलेले नाही किंवा प्रारंभी उल्लेखिल्याप्रमाणे ते मोबाइल-व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गुंतून पडल्याचेही सांगितले जाते. परंतु डॉ. गणेश देवी यांनी जो विचार यासंदर्भात मांडला त्याची प्रचिती याच संमेलनात येऊन गेली. डॉ. देवी म्हणाले, आजच्या वर्तमान अवस्थेत युवकांना अभिव्यक्तच होता येत नाही. त्यामुळे त्यांना प्रथम अभिव्यक्त होऊ द्या. त्यातून काय निष्पन्न होईल व त्याचा समाजासाठी कसा वापर करून घेता येईल ते नंतर पाहू, आणि खरेही आहे ते. आपला देश सर्वाधिक तरुणांचा देश म्हणवला जातो, नव्हे तसे आहेच. परंतु तरुणांना समजून न घेताच साºयांचे सारे काही चालू असलेले दिसते. त्याला जमेतच धरले जात नाही. यासंदर्भात प्रा. कसबे यांचे प्रतिपादन अधिक बोलके आहे. ते म्हणाले, ‘विचारांचे स्वातंत्र्य हे मानवाचे व लोकशाहीचेही वैशिष्ट्य आहे, परंतु तरुणाईने विचार करू नये अशीच व्यवस्था निर्माण केली जात आहे’. तेव्हा ही व्यवस्था भेदून पुढे येण्याचा व आपले, समाजाचे आणि देशाचेही ‘फ्यूचर’ डिझाइन करण्याचा प्रयत्न या युवा संमेलनाद्वारे केला गेल्याचे दिसून आले.
 
दक्षिणायन युवा संमेलनातील चर्चेअंती आपल्या सामूहिक कृतीचा एक भाग म्हणून तरुणाईने आपला एक जाहीरनामा तयार केला आहे. ‘महाराष्ट्रा तू असावास जात पात मुक्त, धर्मांधता मुक्त, दलितांच्या रोज रोज होणाºया अवहेलनेपासून मुक्त, अज्ञान, अंधश्रद्धा, अविवेक मुक्त, भूक मुक्त, बेकारी मुक्त, लाचलुचपत मुक्त, निराशा मुक्त, शेतकºयांच्या हत्या आणि आदिवासींचे विस्थापन यापासून मुक्त, स्त्रियांवरच्या बेसुमार वाढलेल्या अत्याचारापासून मुक्त, भोंदूगिरी, दादागिरी, बुवाबाजी यातून मुक्त, भयमुक्त’ अशा विविध सामाजिक व्याधींपासूनची मुक्ती मागणारा व ज्या स्वार्थाच्या, द्वेषाच्या, निराशेच्या, खोट्या प्रचाराच्या-गोंगाटाच्या वातावरणात आपण वाढत आहोत ते वातावरण संपूर्ण बदलण्याचा निर्धार व्यक्त करून एल्गार पुकारणारा हा जाहीरनामा आहे. येत्या दि. १ आॅक्टो. २०१७ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद व यवतमाळ या शहरांमध्ये एकाचवेळी तर त्यापुढील दहा दिवसांत राज्यातील अन्य शहरांत तरुणांद्वारे या जजाहीरनाम्याचे वाचन करून अन्य तरुण मने जागविली जाणार आहेत. त्यामुळे नाशकात पडलेली नवरात्रातील ही वैचारिक जागराची ठिणगी नवा प्रकाश पेरण्याची अपेक्षा नक्कीच करता येणारी आहे. त्यासाठी या युवा संमेलनाचे संयोजन करणाºया डॉ. मिलिंद वाघ, रसिका सावळे, विराज देवांग, श्यामला चव्हाण, डॉ. रोहित कसबे व कल्याणी आहिरे या धडपड्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

Friday, September 22, 2017

Editor's View published on 21 Sept, 2017 in Lokmat Online

उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना...

किरण अग्रवाल

नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव. चैतन्याने भारलेल्या या पर्वकाळात शक्ती, भक्तीचे प्रतीक असलेल्या देवींची उपासना केली जाते. ‘या देवी सर्व भुतेषु, स्त्री रूपेण संस्थिता’ असा विचार व त्यावर श्रद्धा ठेवणारा आपला समाज असल्याने स्त्री किंवा नारी शक्तीचा मोठा जागर या काळात घडून येतो. या जागरातून लाभणारी सकारात्मक ऊर्जा स्त्रीशक्तीच्या विकासाला नक्कीच चालना देणारी असते हे खरेच; परंतु एकीकडे हे होत असताना दुसरीकडे यासंदर्भातील अडथळ्यांच्या शर्यती संपताना दिसत नसून, महिला-भगिनींवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंताजनक ठरत आहे.
 
नवरात्र पर्वात अलीकडे दांडिया, गरबा आदी प्रकारांना अधिक उधाण आलेले दिसत असले तरी त्यामागील मूळ प्रेरणा स्त्रीशक्तीच्या आनंदाची, पूजनाची राहिली आहे. गरबातील टाळ्यांच्या नादातून तेजाची निर्मिती संकल्पिली गेली असून, आदिशक्ती-आदिमायेचे आवाहन त्यातून घडून येते. शिवाय, स्त्रीला देवता मानून पूजणारी आपली संस्कृती आहे. त्यासंदर्भात ‘स्त्रयै देव: स्त्रयै प्राण:’ असे शास्त्रात म्हटले गेले आहे. स्त्री हीच देवता असून, तीच जीवनाची प्राणतत्त्व आहे, असे त्यातून सांगितले गेले आहे. इतकेच नव्हे तर, वेदातही नारीच्या गौरवाचा उल्लेख असून, तिच्या शक्तीचे गुणगाण आहे.यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता’ म्हणजे, जेथे नारीची पूजा होते, तिचा आदर केला जातो, तिथे देवतांचा निवास असतो, इतक्या आदरार्थाने नारीचे वर्णन केले गेले आहे. शास्त्रात वा वेदात तरी डोकावायचे कशाला, साधे घरातले आपल्या समोरचे, आपल्याला दिसणारे उदाहरण घ्या; घराला घरपण मिळवून देणाºया स्त्रीचा ज्या घरात सन्मान राखला जातो ते घर जणू गोकुळाची अनुभूती देणारे ठरते. पण, जेथे ते नसते, तेथे काय दिसते हे न लिहिलेले बरे. त्या अर्थाने स्त्री ही घरातली, समाजातली प्राणतत्त्व आहे, चेतना आहे, ऊर्जा आहे. रूपे विविध असली तरी, घराला बांधून ठेवणारा तो ममत्वाचा धागा आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने याच ऊर्जेची आराधना केली जाते. देवीची पूजा करतानाच समाजातील सेवाभावी, चळवळी महिलांचा; पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर, काही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा काकणभर पुढेच राहात आपल्या कर्तव्याची, क्षमतेची पताका फडकविणाºया नवदुर्गांचा गौरव केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेही तसे घडून येते. त्यातून शक्ती, सामर्थ्याचा, संस्काराचा आदर्श इतरांसमोर ठेवला जातो. अवघ्या नारीशक्तीला बळ देणाºयाच या बाबी आहेत. पण, नारीला देवीसमान मानून पुजण्याचे हे उत्सव एकीकडे होत असताना दुसरीकडे तिच्यावरील अन्यायाच्या घटना थांबताना दिसत नाहीत. उलट, त्यात वाढच होत आहे. स्त्रियांबद्दलच्या आदरभावाची जपणूक व रुजवणूक अधिक प्रभावीपणे होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित व्हावी.

यासंदर्भात नाशिकपुरतेच बोलायचे झाल्यास, चालू वर्षातील गेल्या आठ महिन्यात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बलात्काराच्या १९, तर विनयभंगाच्या ८० पेक्षा अधिक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. याखेरीज एकतर्फी प्रेमातून शालेय बस अडवून विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकारही घडून गेला आहे. चालू महिन्यात पिंपळगाव (ब.) नजीकच्या चिंचखेड येथील एका विवाहितेच्या लग्नाला अवघे एक वर्षही पूर्ण झालेले नसताना संशयास्पदरीत्या तिचा मृतदेह आढळून आला. मूलबाळ होत नाही या कारणातून छळले गेल्याने नाशकातील इंदिरानगरमधील एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेतल्याची, तर नेपाळमधून प्रेमविवाह करून आणलेल्या एका १९वर्षीय विवाहितेचा चारित्र्याच्या संशयातून खून केला गेल्याची तक्रारही पोलीस ठाण्यांमध्ये गुदरण्यात आली आहे. अशी आणखीही काही उदाहरणे देता येणारी आहेत, ज्याकडे केवळ गुन्हेगारी घटना म्हणून पाहता येऊ नये, तर त्यातून बुरसटलेल्या पुरुषी मानसिकेतेचे प्रत्यंतर यावे. स्त्रीकडे बघण्याची, तिच्या सोबतच्या वर्तनाची अहंकारी वृत्ती या घटनांतून डोकावल्याखेरीज राहात नाही.
 
विशेष म्हणजे, याच आठवड्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या एका प्रकरणात एकाला जन्मठेप, तर दुसºया प्रकरणात एकाला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तेव्हा, कायदा त्याचे काम चोखपणे करतोच आहे. संबंधिताना काय शिक्षा व्हायची ती होत आहे व यापुढेही होणार आहे. पण एकूणच महिलांप्रतिची अवमानजनक किंवा अनादरयुक्त मानसिकता बदलल्याखेरीज या अशा गुन्हेगारी घटनांना आळा बसणार नाही. नारीशक्तीचा जागर व तिच्या सन्मानाच्या चळवळी, उपक्रमांना बळ देऊन हा बदल साकारता येणारा आहे. नवरात्रोत्सवात या शक्तीची पूजा बांधतानाही हेच काम घडून यावे, उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना स्त्री सन्मानाचा, आदराचा प्रेरणादायी जागरही घडून यावा, एवढेच यानिमित्ताने...

Thursday, September 14, 2017

Editor'e View Published on 14 Sept, 2017 in Lokmat Online

पायजाम्याची नाडी शोधता येईना, आणि म्हणे...

किरण अग्रवाल

स्वप्नात हरवणे कुणाला आवडत नाही? राजा असो की रंक, प्रत्येकालाच ते आवडते. अट केवळ एकच ते स्वप्न ‘गोड’ असावे, भयावह नसावे. अर्थात, आता त्याबद्दलही भीती बाळगण्याची गरज राहिलेली नाही. कारण रात्रीच्या गाढ झोपेत स्वप्ने बघण्याऐवजी दिवसाढवळ्या जागतेपणीच ती बघता येण्याची सोय झाली आहे. शिवाय, स्वप्न कसे बघायचे, त्याचा ‘कन्टेन्ट’ काय असावा, हेदेखील आपल्यालाच निश्चित करता येऊ लागले आहे. त्यामुळे स्वप्नात रंगणे वा कल्पनाविलासात विलसणे हे प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहे. मोबाइल क्रांतीने जग जसे मुठीत आणले आहे, तसे ‘सोशल मीडिया’ने स्वप्ने फुकट केली आहेत. परिणामी असंख्य नेट यूजर्स ‘लगे रहो मुन्नाभाई’प्रमाणे कुठे व कशात तरी हरवलेले राहू लागले आहेत.

उपरोक्त प्रास्ताविकाचे कारण असे की, माझा एक मित्र जो एरव्ही कायम त्याच्या त्याच्या कोशात ‘गुमनाम'सा राहात असे, तो परवापासून अगदी आनंदी दिसू लागला आहे. त्याच्या या आनंदीपणाचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी इतरांकडे चौकशी केली असता जे कळले, त्याने मलाही आनंदानुभव लाभला. त्याचे झाले असे की, फेसबुक या सोशल माध्यमाने आपल्या ‘यूजर्स’च्या मनोरंजनासाठी जे निरनिराळे फंडे अवलंबिले आहेत, त्यात आपला चेहरा कुणासारखा दिसतो, हे पाहण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सदर माध्यम हाताळणारा कुणीही या प्रश्नाशी संबंधित ‘लिंक’वर गेला तर त्याला आपल्या चेहºयाशी साधर्म्य असणाºया मान्यवर वा सेलिब्रेटीशी तुलना केलेले दर्शविले जाते. याच प्रकारात आमच्या मित्राचा चेहरा अभिनेता हृतिक रोशनसारखा दर्शविला गेला. तेव्हा, मध्यंतरीच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवर दाखविल्या जाणाºया चंद्रकांता मालिकेतील क्रूरसिंगसारखा चेहरा असणाºयाला थेट हृतिकशी जोडले गेले म्हटल्यावर त्याच्या आनंदाला भरते येणे स्वाभाविकच होते. दुसरा एक प्रकार असा की, तुमचा प्रेमी तुम्हाला कुठे भेटेल हे जाणून घेण्यासाठी एक लिंक आली होती. त्याद्वारे ते ठिकाण जाणून घेऊन खुशीची गाजरे खात आमचा एक सहकारी आठवडाभरापासून रोज सकाळ-संध्याकाळी तेथे आपले कामधंदे टाळून स्वप्नांच्या फलश्रुतीकरिता पायपीट करतो आहे. पण अद्याप त्याला त्याचे प्रेम गवसलेले नाही. याच प्रश्नाच्या उत्तरात मुंबईतील एका तरुणीला तिचा प्रेमी सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी भेटेल असे सांगण्यात आले होते. पण दोन वर्षापासून मी त्याच परिसरात राहते, रोज मंदिरात दर्शनाला जाते; पण ‘तो’ भेटला नसल्याची खंत तिनेच सोशली व्हायरल केली आहे.
थोडक्यात, दिवसा उजेडी अशी स्वप्ने बघून क्षणिक आनंदामागे धावण्याचे आणि करमणूक करून घेण्याचे प्रकार कमालीचे वाढलेले दिसत आहेत. त्यात गैर अगर वावगे काही नाहीच. ‘आप पती-पत्नी में किसकी जादा चलेंगी?’, आप उग्र हो या शांत? Which celebrity you look like?, What is your Perfect nickname?, What will your career be like? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेत विरंगुळा शोधणे वेगळे. पण, असा आनंदानुभव घेताना विज्ञाननिष्ठ म्हणवणारे व प्रत्येकच बाबीचा कार्यकारणभाव तर्काच्या कसोटीवर तपासून पाहणारेही त्यात सहभागी होताना आणि विवेकाचे गाठोडे खुंटीवर टांगून ठेवताना दिसून येतात तेव्हा खरे आश्चर्य वाटून जाते. ‘आपका भाग्य क्या है’ आणि ‘कौनसे राशी के आदमी से आपकी शादी होंगी’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरे कुतूहलापोटी शोधणेही ठीक; पण How and When will you Die या सारख्या प्रश्नाच्या ‘लिंक’वर जाऊन जेव्हा आपल्याच मरणाची तारीख जाणून घेण्यासाठीही उत्सुकता दाखविली जाते, तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याखेरीज गत्यंतर उरत नाही.
 
गंमत म्हणजे, याच सोशल माध्यमावर शंभर वर्षांपूर्वी तुम्ही कोण होता, हे जाणून घेणाºया प्रश्नाच्या लिंकवरही उड्या पडताना दिसत आहेत. खरे तर याबाबतची उत्सुकता दर्शविणे म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे आले. शिवाय, पुनर्जन्म स्वीकारताना शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही मनुष्ययोनीतच होतात व यंदाही मनुष्यजन्मच लाभला, हेही स्वीकारणे आले; जे तर्काच्या, विज्ञानाच्या वा विवेकाच्या कसोटीवर प्रमाणित ठरणारे नाहीच. पण या प्रश्नाला अगदी ‘यूके’चे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिलपासून ते अब्राहम लिंकन व हिटलरपर्यंतची उत्तरे अनेकांना लाभलेली दिसून येतात. ही उत्तरे गंमत म्हणून स्वीकारायची म्हटलीत तरी अतार्किकतेचे इतके वा असे अध:पतन व्हावे?. माझ्या एका सहकाºयाला याच म्हणजे १०० वर्षांपूर्वी तो कोण होता या प्रश्नाच्या उत्तरात जागतिक कीर्तीचे संशोधक अल्बर्ट आइनस्टाईन असे उत्तर लाभले. संशोधनाच्या ‘स’शी ज्याचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही, घरात वडिलांच्या पायजाम्याचा नाडा शोधायचा तर त्याची पंचाईत होते असे त्याच्या कुटुंबीयांचेच म्हणणे; तरी तो पूर्वजन्मीचा म्हणे अल्बर्ट आइनस्टाईन ! व्वा !! स्वप्ने ही स्वप्नेच असलीत तरी ती किती फसवी असू शकतात, हेच यातून दिसून येणारे असले तरी; आपल्या ‘यूजर्स’ना आनंदाचे डोही क्षणिक आनंद तरंग अनुभवण्याची संधी यातून मिळवून दिली जाते आहे, हे मात्र नक्की !

Thursday, September 7, 2017

Editor's View Published on 07 Sept, 2017 in Lokmat Online

पाण्याच्या हक्कासाठी लढाईचे रणशिंग !

किरण अग्रवाल
 
नाशिक, नगर व मराठवाड्यात पाणी प्रश्नावरून कायम तंटे होत आले असले तरी, आता पश्चिमवाहिनी नद्यांच्या गुजरातेत जाणाºया पाण्यावर आपला हक्क सांगत या परिसरातील जलतज्ज्ञ एकवटले आहेत. जलसंस्कृती मंडळाच्या पुढाकाराने नाशिकसह खान्देश व मराठवाड्यातील मान्यवरांच्या नाशकात झालेल्या पहिल्याच जलपरिषदेने यासंदर्भात जनजागरण करीत शासनावर दबाव वाढविण्याचा श्रीगणेशा केल्याने या भागातले पाणी नव्याने पेटणार आहे.

पाणीप्रश्न हा आजवर अनेक पातळ्यांवर निवडणुकांसाठी उपयोगी ठरत आला आहे, मात्र कोणत्याही सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविलेले नाही आणि जेव्हा केव्हा अगर जिथे कुठे त्याबाबत लक्ष दिले गेले तिथे समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येताना दिसला आहे. नाशिक-नगरमधील पाणी वाटपाचा मुद्दाही त्यास अपवाद ठरलेला नाही. दुष्काळाची परिस्थिती ओढवते किंवा पिण्याच्या पाण््याकरिता अगर पिकांसाठी आवर्तन सोडण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा त्याबाबत खल होतो. प्रसंगी धरणांवर जाऊन समूह शक्तीच्या बळावर पाटचाºयांना पाणी सोडून घेण्याचे प्रकार घडतात, त्यातून प्रादेशिक अस्मितेचे मुद्दे अधिक घट्ट होत जातात पण कायमस्वरूपी व सर्वमान्य तोडगा निघत नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. प्रतिवर्षीचा नाशिक, नगर व मराठवाड्यातील हा जलतंटा सोडवतानाच खान्देश परिसरातील पाण्याची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गिरणा, गोदा व तापी खोºयात वळविण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होते आहे. त्याबाबत वेळोवेळी सर्वेक्षणे झाली असून, मांजरपाडा प्रकल्पांतर्गत एका वळण बंधाºयाचे कामही हाती घेतले गेले आहे. छगन भुजबळ सत्तेत असताना हाती घेतले गेलेले व वादग्रस्तही ठरलेले सदर काम नंतर निधिअभावी रेंगाळलेच, हा भाग वेगळा. परंतु ते होत असताना महाराष्टÑातील पाणी गुजरातेत नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानेच या पाण्यावर महाराष्टÑाचा हक्क सांगण्यासाठी नाशकातील जलपरिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा रणशिंग फुंकले गेले आहे.
 
 
नार, पार, पिंजाळ तसेच दमणगंगा या पश्चिमवाहिनी नद्यांचे सुमारे सव्वाशे ते दोनशे टीएमसी पाणी गिरणा, गोदावरी व तापी खोºयात वळविल्यास तेथील पाणीप्रश्न सुटणार आहे. त्यातल्या त्यात गिरणा व गोदा खोरे हे कायम तुटीचे खोरे राहिले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्टÑातील ज्या ५४ टक्के भागासाठी केवळ २४ टक्केच पाणी उपलब्ध असते, त्यात मराठवाड्याचा समावेश आहे. राज्य शासनाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समितीचा जो अहवाल फार पूर्वीच स्वीकारला आहे, त्यात गोदावरी खोºयात ६६ तर गिरणा खोºयात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले होते. परंतु गेल्या १८ वर्षांत त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. परिणामी नाशिकसह जळगाव खान्देशातील व नगरसह मराठवाड्यातील पाण्याची तूट कायम असताना केंद्राच्या दबावातून सदरचे पाणी गुजरातेतील मधुबन धरणात नेण्याचे घाटत आहे. त्यामुळेच महाराष्टÑाच्या हक्काचे पाणी गुजरातेत न जाऊ देण्यासाठी जलसंस्कृती व जलचिंतन या संस्थांसह सूर्यकांत रहाळकर, ‘मेरी’चे माजी महासंचालक डॉ. दि.मा. मोरे, माजी आमदार नितीन भोसले, राजेंद्र जाधव, सरोजिनी तारापूरकर, देवांग जानी, प्राजक्ता बस्ते, औरंगाबादच्या वैधानिक जलविकास मंडळाचे एस.ए. नागरे, ई. बी. जोगदंड, नगरचे जयप्रकाश संचेती, अरुण घाडगे आदी विविध मान्यवर सरसावले आहेत.

चितळे अहवालाची अंमलबजावणी रखडली असल्याने व कोणत्या खोºयात किती पाणी आहे, याची वेगवेगळी आकडेवारी देण्यात येत असल्याने सर्वप्रथम या खोºयांमध्ये नेमके किती पाणी आहे, त्याची निश्चिती करण्याची मागणी नाशकातील जलपरिषदेत केली गेली आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांची मिळून एक समिती नेमण्याची किंवा स्वतंत्र लवाद नेमण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील जनता तृषार्त असताना येथले पाणी गुजरातकडे वळविण्याबद्दल व त्यासाठी केंद्रासह महाराष्टÑ आणि गुजरातेत असलेल्या एकपक्षीय सरकारमुळे दडपण-दबाव येत असल्याबद्दल या बैठकीत तीव्र रोष व्यक्त करण्यात आला असून नाशिक, खान्देश-मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमध्ये जनजागरण करीत पाण्यासाठी लोकलढा उभारण्याचा आणि केवळ तितकेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या धर्तीवर चळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ व जायकवाडीतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर असतानाही पाणी पेटणे स्वाभाविक ठरून गेले आहे.