Thursday, October 26, 2017

Editor's View published in Lokmat Online on 26 oct, 2017


मुहूर्त लाभला, हक्काचे काय?

किरण अग्रवाल

वर्षानुवर्षे मंजुरीच्या व अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेले प्रश्न जेव्हा सत्तांतरानंतर प्राथमिकतेने सोडविले जातात तेव्हा त्यातून सत्ताधा-यांच्या लोकाभिमुखतेचा प्रत्यय येतो हे खरे; परंतु अशा निर्णयांमागील विशेष कार्यकारणभाव जेव्हा लक्षात येतो तेव्हा त्याबाबत सावध भूमिका घेणे क्रमप्राप्त ठरून जाते. महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील नदीजोड प्रकल्पांना मिळालेल्या मान्यतांकडेही याच दृष्टिकोनातून बघितले जावयास हवे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंधरवड्यापूर्वी नवी दिल्लीत भारत जल सप्ताहाचे उद्घाटन झाले त्यावेळी देशातील नदीजोडच्या ३० प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचे केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवून संबंधित परिसरातील पाण्याची समस्या दूर होण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे नदीजोडच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एकदाचा मुहूर्त लाभल्याचे समाधानही नक्कीच व्यक्त करता येणारे आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पार-तापी-नर्मदा व दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पांचा यात समावेश असून, येत्या तीन महिन्यांत ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास येणार आहे. पण, एकीकडे याबाबत समाधानाची प्रतिक्रिया असतानाच त्यात महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा आजवरचा जो छुपा अजेंडा होता, तो उघड झाल्याने नदीजोडच्या या सत्कर्माकडेही संशयाने पाहिले जाणे स्वाभाविक ठरून गेले आहे.


पार-तापी-नर्मदा लिंक योजनेत सुधारणा करून नार-गिरणा तसेच पार-गोदावरीचा, तर दमणगंगा-पिंजाळ लिंकमध्ये एकदरे-गंगापूरचा समावेश करण्यात आल्याने त्याचा लाभ खान्देश व गिरणा खोºयाला आणि शिर्डी-नगर-सिन्नरला होण्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठीही पाणी उपलब्ध होणार असून, विकासास चालना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु या नदीजोड लिंक प्रकल्पांमुळे महाराष्ट्राला व त्यातील कोणत्या खोºयाला अगर क्षेत्राला नेमके किती पाणी मिळणार याची निश्चित आकडेवारी समोर येत नसल्याने संभ्रमात भर पडून गेली आहे. यासंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरीला १२, तर गिरणा खोºयाला ३० टीएमसी पाणी मिळेल असे सांगितले आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्याची घोषणा केली आहे. पण राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दिवाळीपूर्वी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या मुंबईतील बैठकीत महाराष्ट्राला २७ टीएमसी पाणी मिळेल असे सांगितले आहे. तिकडे दिल्लीत गडकरी यांनी महाराष्ट्राला ५० टीएमसी पाणी मिळेल असे सांगितले आहे. ही वेगवेगळी आकडेवारीच अनेक शंकांना जन्म देणारी असून, याखेरीज गुजरातला जे पाणी वळविले जाणार आहे तो आक्षेपाचा वा कळीचा मुद्दा आहे.

नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्र सरकार ९० टक्के खर्च करणार आहे. त्याकरिता अर्थसंकल्पात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी नांदेडमधील धानोरा रोड भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सांगितले. म्हणजे राज्यावर केवळ १० टक्के खर्चाचाच भार येणार आहे. पण असे असले तरी, महाराष्ट्रातील पाणी अडवून व वळवून ते गुजरातला देण्याला जलसाक्षरतेच्या क्षेत्रात काम करणाºया संस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी तर दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प हा थेट ‘लिंकिंग आॅफ करप्शन’ असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील पाणीवाटप करार हा तसा काँग्रेसच्या काळात झालेला असला तरी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही नार-पारचे पाणी गुजरातला देऊ नका, असे आता सुचविले आहे. नाशकातील माजी आमदार नितीन भोसले यांनी हा विषय राज ठाकरे यांच्याकडे सोपवून दिवाळीनंतर ‘मनसे’ला या प्रकरणी मैदानात उतरवणार असल्याचे सांगितले होते. आता दिवाळी आटोपली असून, हाती अन्य राजकीय मुद्दे नाहीत. शिवाय, राज यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याने तसेच विषय महाराष्टच्या हक्काचा असल्याने नदीजोड अंतर्गत राज्यातील प्रकल्पांना मुहूर्त लाभला असला तरी पाण्याच्या हक्काच्या विषयावरून आता फटाके फुटणे स्वाभाविक ठरले आहे.

Saraunsh not Published on 22 Oct, due to Holiday

Saraunsh not published 0n 22 Oct, 2017 due to Dipawli Padwa Holiday.

Thursday, October 19, 2017

Editor's View Published in Lokmat Online on 19 Oct, 2017

एक करंजी भुकेल्यांसाठी !
 
किरण अग्रवाल
 
दिवाळीच्या दीपोत्सवाने अवघा आसमंत उजळून निघाला आहे. अंधकाराला दूर सारणाऱ्या प्रकाशाचाच हा उत्सव असल्याने सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे मंगलमयी वातावरण आहे. हा उत्साह वा आनंद आपल्यासमवेत इतरांच्याही चेहऱ्यावर पाहण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था-संघटना हल्ली धडपडताना दिसत आहेत. सामाजिक भान टिकून असल्याचा व ते जपण्यासाठी अनेक हात पुढे सरसावताना दिसण्याचा आशादायी प्रत्यय यातून येत असून, तोच खरा निराशेची काजळी दूर सारणाराही आहे; पण हा आनंद वा उत्साह प्रासंगिक दिवाळीच्या सणापुरता न राहता या मागील भावना बारमाही स्वरूपात कशी टिकू शकेल याचा विचार होण्याची गरज आहे. विशेषत: दिवाळीच्या निमित्ताने एकीकडे गोडधोड फराळाचे ‘शेअरिंग’होत असताना दुसरीकडे भुकेच्या समस्येत आपला देश चक्क शंभराव्या स्थानी आल्याची वार्ता पाहता, भूकमुक्त भारत साकारण्यासाठी प्रयत्न होण्याची निकड अधोरेखित व्हावी.
 
यंदा तसा पाऊस समाधानकारक झाला. अलीकडच्या काही दिवसात काही ठिकाणी परतीच्या पावसाने नुकसान घडवून आणले; पण त्याखेरीज पावसाने बऱ्यापैकी हात दिला. सर्वच ठिकाणची धरणो त्यामुळे ओसंडून वाहिली. गेल्यावर्षीच्या नोटाबंदीच्या तडाख्यातून जनता अजून पुरेशी सावरलेली नसताना ‘जीएसटी’नेही त्यात भर घातली. त्यातच कर्जबारीपणामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या घडून आल्या. त्यामुळे काहीसे नैराश्याचे व चिंतेचे वातावरण होते. पण ऋण काढून सण साजरा करण्याची भारतीय मानसिकता असल्याने दिवाळीच्या निमित्ताने बाजारात तेजी आल्याचे दिसून आले. अडीअडचणी व चिंतांना दूर सारत प्रत्येकजण आपापल्या परीने आशेचे दीप लावताना दिसून येत असून, सारे वातावरण चैतन्याने भारले आहे. दीपोत्सवाचे हेच तर विशेष असते की, अवघा समाज या चैतन्यपर्वाच्या आनंदात न्हाऊन निघतो. विशेष म्हणजे, हा आनंद वा उत्सव व्यक्तिगत आपल्यापुरता किंवा आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता तो इष्टमित्रांसमवेतच वंचितांबरोबर साजरा करण्याची भावना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुके आदिवासीबहुल आहेत. सरकार या क्षेत्रासाठी अनेकविध विकास योजना आखत असते; पण त्या पूर्णाशाने आदिवासी घटकांपर्यंत पोहचत नसतात. त्यामुळे हा घटक अजूनही विकासापासून वंचितच असल्याचे दिसून येते. या वंचितांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना आदिवासी वाडय़ापाडय़ांवर धाव घेत असतात. काही वर्षापूर्वी ‘एक करंजी मोलाची’असे उपक्रम राबविले जात असत. याबाबतीत नाशिक जिल्ह्यातील येवला येथील धडपड मंचचे नाव आवर्जून घ्यायला हवे. या मंचचे सदस्य प्रतिवर्षी असा उपक्रम राबवून वंचितांसोबत दिवाळी साजरी करत असतात. त्याचप्रमाणो गेल्या काही वर्षापासून अनेक संस्थाही यासाठी पुढे सरसावलेल्या दिसत आहेत. यंदा नाशकातील आकार फाउण्डेशन, सोशल नेटवर्किग फोरम, युवा अस्तित्व फाउण्डेशन, यश फाउण्डेशन, अवेकनिंग जागृती संस्था, स्पार्टन हेल्प सेंटर, मानवधन, माणुसकी व सावली बहुउद्देशीय संस्था, पूर्वाचल विकास समिती, वात्सल्य संस्था, हास्ययोग क्लब यांसारख्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱयांनी व सदस्यांनी आदिवासी वाडय़ापाडय़ांवर जाऊन दिवाळी साजरी केली. सामाजिक समतेचा, कर्तव्याचा व उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ यातून घडून येत आहे. पण सणावाराच्या निमित्ताने हे जे घडून येते ते कायम दिसून येत नाही. या वंचित घटकाचे दिवाळीचे दोन पाच दिवस आनंदात जात असले तरी, त्यांचा उर्वरित काळ परिस्थितीशी झगडण्यातच जातो. यातून आदिवासी बालकांच्या कुपोषणासह त्यांचे व मातामृत्यूंचे प्रमाणही वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
 
 
महत्त्वाचे म्हणजे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्थथेने आपला जो अहवाल जारी केला आहे त्यात भारतातील भुकेची समस्या आपल्यापेक्षा लहान व गरीब असलेल्या शेजारील देशांपेक्षा गंभीर असल्याचे नोंदविले आहे. अगदी नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, इराक व उत्तर कोरियापेक्षाही आपल्याकडील भुकेची समस्या गंभीर आहे. ११९ विकसनशील देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक तब्बल शंभरावा आहे, यावरून ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज बांधता यावा. आपल्याकडे मुलांमधील कुपोषणाची समस्या मोठी असून, त्यामुळेच या यादीत भारताचे स्थान खूप खाली घसरले आहे. भारतात पाच वर्षाच्या आतील एकपंचमांश मुलांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत कमी असते, हा कुपोषणाचा परिणाम असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१४ मध्ये भारताचा क्रमांक या यादीत ५५ वा होता, तर गेल्या वर्षी ९७ वा होता. यंदा त्याहूनही खाली घसरण झाली आहे. ही बाब केवळ चिंतादायक नसून संवेदनशील मनाला चिंतन करावयास लावणारीदेखील आहे. आपल्या सामाजिक संस्था, संघटना दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी पाडय़ांवर जाऊन त्यांचे काही दिवस गोड जरूर करून देतात; परंतु त्याने परिस्थिती सुधारणारी नाही. कुपोषणासारखे प्रकार टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी यंत्रणांच्या झारीतील शुक्राचार्यामुळे त्यात पुरेसे यश येत नाही. यासंदर्भात सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन ग्रामीण व आदिवासी भागातील सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सजग राहणे अपेक्षित आहे.
 
भूकमुक्ती हा तसा गंभीर विषय आहे. एकीकडे समाजात आपले मोठेपण मिरवण्यासाठी लग्नांमध्ये अनेकविध जिन्नसांचा समावेश असलेल्या मोठमोठय़ा पंगती उठत असताना व मोठय़ा प्रमाणात अन्नाची नासाडीही होत असताना दुसरीकडे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेला वर्गही आपल्याकडे आहे. पण त्याबाबत कोणालाच काही वाटत नसल्याचे चित्र आहे. लग्न-समारंभानिमित्त होणाऱ्या अन्नाच्या या नासाडीबद्दल ‘उतनाही लो थाली में, व्यर्थ ना जाये नाली में’ अशी जाणीव जागृती करणारी मोहीम हाती घेण्याची वेळ अनेक ज्ञाती संस्थांवर आली आहे, त्याचा बऱ्यापैकी परिणामही होताना दिसत आहे. पण तरीही भुकेला घटक भुकेपासून मुक्त होऊ शकलेला नाही. सामाजिक समतेचा उच्चार अनेकांकडून अनेक ठिकाणीी केला जातो, परंतु जिथे भुकेच्या पातळीवर समता साकारता येत नाहही तिथे अन्य बाबतीतली अपेक्षा काय करता यावी? मनाला कमालीचे विषण्ण करणारी ही वेदनादायी परिस्थिती आहे. तेव्हा दिवाळीचा आनंद साजरा करताना भुकेला सामोरे जावे लागत असलेल्या घटकासाठीही संवेदनांची व सहकार्याची एक पणती आपण लावूया.. ही मिणमिणती पणतीच भुकेचा अंधार दूर करू शकेल. आमचे सहकारी पत्रकार, कवी संजय वाघ यांनीही तेच तर म्हटले आहे,
 
‘लोकशाहीच्या मुळावर रोजच बसे येथे घाव,
 
त्या अंधारलेल्या वाटेवर एक तरी पणती लाव’.

Wednesday, October 18, 2017

Saraunsh Published in Lokmat on 15 Oct, 2017


Editor's View Published in Lokmat Online on 12 Oct, 2017


प्रामाणिकताही देते अस्वस्थताच !
 
किरण अग्रवाल
 
स्वस्थता व अस्वस्थता ही वृत्तीशी व पर्यायाने मनाशी निगडित असल्याने ती इतकी व्यापक बाब बनली आहे की, कोणत्याही व्यक्तीला कशाने स्वस्थता लाभेल, अगर ती कशाने अस्वस्थ होईल ते सांगता येऊ नये. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, अमुक-तमुक असा कसलाही भेदाभेद न ठेवता सर्वांमध्ये आढळून येणारी ती बाब आहे. अर्थातच एखाद्याला ज्यामुळे स्वस्थता लाभते, तीच बाब दुसऱ्यासाठी अस्वस्थतादायक ठरू शकते हेही खरे. कारण एकाच बाबीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो; पण यातही नि:संशय गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रामाणिकतेतूनही जेव्हा स्वस्थता, समाधानाऐवजी अस्वस्थता वाट्यास आलेली दिसून येते तेव्हा मनाच्या आरशातील संवेदनांचे प्रतिबिंब अधिक आखीव-रेखीव, पारदर्शी तसेच स्वच्छ वा नितळ उमटल्याची ती पावती ठरते.
 
मनाच्या अस्वस्थतेचे हे प्रास्ताविक यासाठी की, प्रामाणिक व पापभीरू व्यक्तीला तिच्या या सद्गुणांपायी कशा अस्वस्थतेला व मनाच्या उलाघालीला सामोरे जाण्याची वेळ येते, याचा एक अनुभव नुकताच येऊन गेला. त्याचे झाले असे की, आमच्या रेणुवहिनींना त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर पडलेली एक नोटांची पुरचुंडी आढळून आली. उचलून पाहता, पंतप्रधान मोदी यांनी एका आदेशान्वये चलनातून बाद केलेल्या त्या नोटा नव्हत्या तर नव्या चलनातले दोन हजार रुपये होते ते. त्यांच्या अस्वस्थतेचा प्रवास सुरू झाला तो तेथूनच. कारण, कुणाचे असावेत ते पैसे, कसे पडले असावेत अशा प्रश्नांनी डोके खाजवून खाजवून त्यांच्या केसांचा अंबाडा कधी सुटून गेला हे त्यांनाही कळले नाही. कुणाचे का असेना, आपल्याला काय त्याचे; आपली तर दिवाळी साजरी झाली असा सामान्य विचार करून स्वस्थता न अनुभवता, त्यांच्या डोळ्यासमोर त्या रस्त्यावर हाती लागलेल्या बेवारस नोटांवरील गांधीजींच्या चित्राच्या जागी अनामिक, अज्ञात चेहऱ्याची आकृती भिरभिरू लागली. ज्याचे कुणाचे असतील हे पैसे, त्याचा जीव किती टांगणीला लागला असेल? कुणा विद्यार्थ्याच्या शाळेच्या फीचे असतील हे पैसे तर त्याचे बिचाऱ्याचे काय झाले असेल? कुणा मोलमजुरी करणाऱ्याचे पडले असतील तर त्याला गरिबाला जेवण गेले असेल का, अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांचे काहुर रेणुवहिनींच्या डोक्यात उठले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातील साफ-सफाईचे काम त्यांनी दोन-चार दिवसांपासून हाती घेतले होते, तेही आज बाजूला ठेवून त्या याच चिंतेत अस्वस्थ होत्या की, कुणाचे असतील हे पैसे आणि कसे शोधून द्यायचे त्याला त्याचे पैसे? शिवाय, नाहीच सापडला तो तर आपण काय करायचे या पैशांचे?
\
 
 
झाले, नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग खालावतो आहे किंवा रहिवासी भागात फटाके विक्रीस न्यायालयाने बंदी घातल्यासारखे अनेक महत्त्वाचे विषय असताना त्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र न जमणाऱ्या शेजार-पाजारणींची गल्लीत सापडलेल्या पैशाचे काय करायचे, या विषयावर तातडीची बैठक झाली. सुदैवाने, या पैशांची पार्टी करून टाकू आणि विषय संपवू, असे एकीचेही मत नसल्याने पैसे हरविलेल्याचा शोध घेण्याचे ठरले, आणि तेथून सुरू झाला पुन्हा वेगळ्याच अस्वस्थतेचा प्रवास. कारण, या शोधातून एकापेक्षा अनेक दावेदार पुढे आले तर त्यातील खरा कोण, हे कसे पडताळायचे, असा प्रश्न यातून पुढे आला. नोटा किती होत्या, त्यांचे वर्गीकरण कसे आदी प्रश्न करून ते नंतर ठरविता येईल म्हणून अगोदर विषयबाधिताचा शोध सुरू करून ही अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न केला गेला; पण हा शोधही काही सोपा-सहज नव्हताच. त्यासाठी घरातील एका रुग्णाची खोली बदलून त्याला रस्त्यालगतच्या खिडकीजवळ शिफ्ट केले गेले. बिछान्यावर पडल्या-पडल्या किंवा खुर्चीवर बसून रस्त्यावर लक्ष ठेवायचे, की कुणी पैसे हरविलेला शोधाशोध करीत असल्याचे आढळून येते का, असे एकमेव उद्दिष्ट त्याला दिले गेले. त्यापोटी त्याला बसल्याजागी म्हणजे खिडकीजवळच चहापाण्यापासून जेवणापर्यंतच्या साऱ्या सोयी-सुविधांची तजवीज केली गेली. घरातील अन्य सदस्यांनी उजळणी केली की सकाळपासून कोण कोण या रस्त्याने आले-गेले, त्यातील ओळखीचे किती व अनोळखी किती? मग त्यातील ओळखीच्या लोकांना थेट काही न सांगता कडेकडेने चाचपून बघितले गेले की, त्यांचे तर काही हरवले नाही ना? अशात संपूर्ण दिवस निघून गेला; पण हाती काही लागले नाही. सूर्य मावळतीला जाऊ लागला तसतशा आशा धूसर झाल्या आणि रेणुवहिनींच्या अस्वस्थतेत भर पडत गेली. आपला संबंध व अधिकार नसलेल्या या पैशांचे आता करायचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. संध्याकाळ झाली, रात्रही सरली; पण विषय मार्गी लागला नाही.
 
दुसऱ्या दिवशी सहकारिणींसमवेत पुन्हा चर्चेची फेरी झाली. कुणी म्हटले एखाद्या मंदिरात दानपेटीत अर्पण करून द्यावे हे पैसे. पण जे आपले नाही ते दान तरी कसे करावे देवाला? म्हणून प्रस्ताव खारीज केला गेला. अन्यही काही पर्यायांवर चर्चा झाली. अखेर जेवढे पैसे सापडलेत, तेवढेच त्यात स्वत:चे टाकून मिठाई आदी घेण्याचे व अनाथ, निराधार बालकांना ती वाटून त्यांची दिवाळी आनंददायी करण्यावर एकमत झाले, आणि या विषयावरून सुरू झालेला अस्वस्थतेचा प्रवास संपुष्टात आला. एका वेगळ्या कारणातून उद्भवलेली अस्वस्थता सामाजिक जाणिवेचा हुंकार घडविण्यास कारणीभूत ठरली, ही यातील समाधानाची बाब. परंतु कसल्या का होईना, दु:खाने, विवंचनेने अगर उणिवेने आकारास येणारी अस्वस्थता नैतिकतेच्या विचारभानातूनही प्रत्ययास येऊ शकते. त्यातून मनाच्या पप्रामाणिकतेचे, हळुवारतेचे व संवेदनांचे जे स्पंदन घडून येतात ते सारेच काही संपले नसल्याची द्वाही देतात, असेच म्हणायला हवे. दिवाळीच्या दीपोत्सवात या संवेदनांच्या अशा पणत्याच सर्वांच्या मनाचे अंगण उजळून काढो, एवढेच यानिमित्ताने!

Saraunsh Published in Lokmat on 08 Oct, 2017


Friday, October 6, 2017

Editor's view published in lokmat Online on 05 Oct, 2017

माणूस का वैतागतो?
 
किरण अग्रवाल 
 
खरे तर हा प्रश्न व्यक्ती व परिस्थिती सापेक्ष आहे. कारण प्रत्येकच व्यक्तीच्या त्रासा अगर त्राग्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. तो कोणत्या परिस्थितीला सामोरे जातो आहे त्यावरही त्याचे वैतागणे अवलंबून असते. पण, हे सर्व समजून घेत असताना व समाजशास्त्राच्या चौकटीतून त्याकडे पहात असताना जिवाच्या अंतानंतरही जेव्हा गेलेल्या व्यक्तीबद्दलच्या नसत्या प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ त्याच्या आप्तेष्टांवर येते, तेव्हा येणारा वैताग हा स्वत:सोबतच यंत्रणांबद्दलही चीड, संताप व मनस्ताप देणारा ठरल्याखेरीज राहात नाही. हे सारे काय असते ते अनुभवण्यासाठी नाशिक अमरधाममध्ये जायला हवे !
 
मृत्यू हा अटळ आहे. तो टळत नसतो हे खरेच; पण मृत्यूनंतरही पुन्हा तो यंत्रणेकडून ओढवल्याचे अनुभव अलीकडे अनेकांना येत असतात. अर्थात, गेलेल्या व्यक्तीच्या विचाराच्या वा आचरणाच्या विरुद्ध जेव्हा घडते तेव्हा त्या व्यक्तीचा पुन्हा मृत्यू ओढवल्याचे म्हटले अगर मानले जातेच; परंतु मृत व्यक्तीच्या मृत्यूबद्दल जेव्हा संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून ती खरेच आपल्यात नाही हे सरकार दरबारी पटवून देण्याची वेळ येते, तेव्हाचे संबंधितांचे वैतागणे याला तोड नसते. कारण, गेलेल्याच्या रितेपणाची बोच मनी घेऊन ते सिद्ध करून द्यावे लागण्यासारखे कष्ट वा वेदनादायी अन्य काही असू शकत नाही.
 
 
नाशिक महापालिकेने यात आणखी काहीशी भर घालून जगण्याला नव्हे तर, मरणालाही छळण्याचाच प्रयत्न चालविल्याचा अनुभव हल्ली नाशिककर घेत आहेत. मृत्यू दाखला देण्यासाठी उपयोगी ठरणारी माहिती अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासमयी भरून घेत असताना आता मृत व्यक्तीच्या व्यसनांबद्दलची माहितीही विचारून अर्जात भरून घेतली जात आहे. यात मृताला सिगारेट, विडी किंवा तंबाखूचे व्यसन होते काय? सुपारी, पानमसाला, दारू अथवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे व्यसन होते काय, अशी प्रश्ने आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे जिवंतपणी सहजासहजी प्रामाणिकपणे दिली जात नाहीत, ती ही प्रश्ने आहेत. त्यामुळे मृत्युपश्चात कोोण आपल्या व्यक्तीचे रेकॉर्ड स्वत:हून खराब करून ठेवणार, असा प्रश्न त्यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
 
मुळात, अशी माहिती संकलित करून तिचे करणार काय, हा यासंदर्भातील प्रश्न आहे. व्यसन अगर जे काही असेल ते संबंधिताबरोबर गेले असताना कागदपत्रांमध्ये ते नोंदवून ठेवण्यात हशील काय? आज व्यसन होते काय, हे विचारले जाणार व उद्या ते नव्हते म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायला लावण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशी भीतीही त्यातून उपस्थित होणारी आहे. व्यवस्था ही वैतागाला कारणीभूत ठरण्यासंदर्भातले यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण शोधून सापडू नये.
 
आप्तेष्टाच्या निधनाने हबकलेले, उणेपणाच्या भावनेने व्याकुळलेले कुटुंबीय मृताच्या व्यसनाची यानिमित्ताने उजळणी करून व महापालिकेच्या दप्तरी त्याची नोंद करून कोणत्या आठवणी जपल्या जाणार हा प्रश्नच असताना दुसरीकडे अमरधाममध्ये दिल्या जाणाºया सुविधांबद्दल मात्र महापालिका गंभीर नाही. नाशकातील एकूण ११ अमरधामपैकी केवळ दोनच ठिकाणी मोफत अंत्यविधीशी संबंधित व्यवस्था होताना दिसते. त्यामुळे ‘मरणानंतरचेही मरण’ अनुभवास आल्याखेरीज राहात नाही. त्यातही आता मृत पावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीत अडचणीत वाढ झाली आहे. अपघातातील मृत, बेवारस मृतांच्या बाबतीत तर अधिकच त्रासदायी अशी ही अट आहे. व्यवस्थांबद्दलच्या वैतागलेपणात भर पडून जाते ती या अशा नियम-निकषांमुळेच. जगणे सोपे होत नाही; पण मृत्यूही सोपा-सुलभ राहिला नाही, हेच वास्तव यातून समोर यावे.

Saraunsh published in Lokmat On 01 Oct, 2017