Thursday, May 30, 2019

Editors View published in Online Lokmat on 30 May, 2019

संवेदनशीलतेचाच दुष्काळ!

किरण अग्रवाल

अस्मानी संकटाला जेव्हा सुलतानी व्यवस्थेच्या निर्मम व निदर्यतेची साथ लाभून जाते, तेव्हा त्याची झळ अधिक तीव्र ठरून जाणे स्वाभाविक बनते. दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार एकीकडे शक्य ते सर्व प्रयत्न करू पाहत असताना, यंत्रणेत मात्र त्याबाबत फारसे गांभीर्य आढळत नसल्याची बाब म्हणूनच चिंतेत भर घालणारी आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे धरण पूर्णपणे कोरडेठाक पडून नागरिकांकडून पाण्यासाठी टाहो फोडेपर्यंत तेथील नगरपालिकेतील यंत्रणेकडून ना काही नियोजन केले गेले, की याबाबतची स्थिती जिल्हा प्रशासनाला कळवून मार्गदर्शन घेण्याची तसदी घेतली गेली; ही बाबदेखील यंत्रणेची बेफिकिरी व कर्तव्यातील कसूर दर्शवून देणारीच म्हणता यावी.


यंदा उन्हाच्या चटक्याने साऱ्यांनाच घामाघूम करून सोडले आहे. त्यात मान्सूनही लांबण्याचे अंदाज आहेत, त्यामुळे आहे तो पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ आली आहे. राज्यातील धरणांमध्ये दहा ते बारा टक्केच जलसाठा असून, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रतिदिनी टँकर्सची मागणी वाढत आहे व त्यास मंजुरीही देण्यात येत आहे; परंतु टँकर्स तरी कोठून व किती भरून मिळणार, असा प्रश्न आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणुकांचा माहोल होता म्हणून निर्णयकर्ते व यंत्रणाही त्यात अडकलेल्या होत्या. गावपातळीवरचे लोकप्रतिनिधीही प्रचारात मश्गुल होते, म्हणून दुष्काळी स्थितीकडे फारसे लक्ष दिले गेलेले दिसून आले नाही. जनता जनार्दनाच्या जीवन-मरणाच्या पाणीप्रश्नी आपण काही आवाज उठवला तर तो आचारसंहितेच्या कात्रीत अडकेल की काय, अशा क्षुल्लक भीतीपोटी अनेकांची बोलती बंद होती. आता निवडणुकीचा निकाल लागून आचारसंहितेचा कथित अडसर दूर झाल्यावर तुंबलेल्या मोरीचा बोळा निघावा तसे सारे लोकप्रतिनिधी जागरूक व सक्रिय झाले आहेत. ठिकठिकाणी टंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठका होत असून, विशेष म्हणजे अद्याप शपथ न घेतलेले खासदारही याकडे लक्ष पुरवताना दिसत आहेत. ही सक्रियता भलेही उद्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने असेल; पण ग्रामीण भागातील जनतेचा आवाज जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचणे त्यामुळे शक्य होतेय हे नक्की!



पण, असे असले तरी यंत्रणेतील सुस्तता व स्वस्थताच यासंबंधीच्या उपाययोजनांतील मुख्य अडचणीचा मुद्दा ठरताना दिसतेय. नाशिक जिल्ह्याातील मनमाडच्या बाबतीत तेच स्पष्ट होऊन गेले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या मनमाडमध्ये अनेक रेल्वेत पाणी भरले जाते. पण तेथे ठणठणाट झाल्यावर याकडे लक्ष वेधले गेले. शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण संपूर्णपणे कोरडेठाक पडले, तरी नगरपालिका प्रशासनाने त्यासंबंधीची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनाला दिली नाही. कधीकाळी दीड-दीड महिना पाणी येत नव्हते, आता तर अवघे वीस दिवसांनी पाणी येते; म्हणजे पूर्वीपेक्षा चांगलीच स्थिती आहे, अशी निर्ढावलेली मखलाशी करून ही यंत्रणा अंग झटकताना दिसून आली. जनतेचा सरकार नामक व्यवस्थेवरील विश्वास उडण्यासाठी ही अशीच उदाहरणे पुरेशी ठरतात. त्यामुळे यंत्रणेतील ही ‘चलता है’ मानसिकता बदलण्याची मुळात गरज आहे. अर्थात, आता या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देऊन तात्काळ उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविल्या हे बरेच झाले. पण, मनमाडचे हे प्रातिनिधिक उदाहरण ठरावे. अन्यत्र कमी-अधिक प्रमाणात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. ती स्थिती तेव्हाच बदलू शकेल, जेव्हा यंत्रणा संवेदनशीलतेने कामास लागतील. पण तेच अवघड आहे.

महत्त्वाचे म्हणजे, यंदाचे संकट हे भीषण आहे. पुन्हा जूनमध्येही पुरेशा पावसाचे अंदाज नाहीत. याचा अर्थ पावसाळा सुरू झाला की संकटातून मुक्ती, असे होणार नाही. त्याकरिता नियोजनपूर्वक पाऊले उचलावी लागतील. काळजी घ्यावी लागेल. कारण, पुरवठा एवढाच विषय नाही, तर आरोग्याचा प्रश्नही त्याच्याशी निगडित आहे. आज टँकरने पाणीपुरवठा होतो आहे; परंतु अनेक ठिकाणी तो दूषित स्वरूपाचा असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून अनारोग्याला निमंत्रण मिळून जाणारे आहे. तेव्हा त्याहीबाबतीत यंत्रणांना सजग राहायला हवे. ही सजगता भविष्यकालीन तजवीजच्याही दृष्टीने हवी. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून जलशिवारची कामे केली आहेत. त्यात ‘पाणी मुरले’ असेलच; पण लोकसहभाग लाभून ही कामे अधिक वेगाने पूर्णत्वास नेली गेली तर येणाºया पावसाळ्यातील पाणी अडवून उद्याची अडचण टाळता येऊ शकेल. गेल्यावेळीच ‘टँकरमुक्ती’च्या घोषणा केल्या गेल्या असताना यंदा कधी नव्हे ते एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे एक हजारपेक्षा अधिक गावे व वाड्या-पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. निसर्ग अशा पद्धतीने डोळे वटारत असल्याचे पाहता, किमान आपण म्हणजे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून पाणी बचतीचे, साठवणुकीचे प्रयत्न करायला हवेत. ते एकट्या शासनाचे काम नाही. यंत्रणांनीही नोकरीचे काम म्हणून त्याकडे न बघता माणुसकीच्या कळवळ्यातून व संवेदनेतून समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग शोधला पाहिजे. तो तसा शोधला जात नाही, कारण संवेदनशीलतेचाच दुष्काळ आहे!


Web Title: water scarcity and Drought of sensitivity

Friday, May 24, 2019

Loksabh Election Dist. Analysis published in Lokmat on 24 May, 2019


Loksabha Election North Maha Analysis published in Online Lokmat on 23 May, 2019

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019:
उत्तर महाराष्ट्रात आघाडी निरुत्तर !

किरण अग्रवाल

नाशिक : तीन ठिकाणी उमेदवार बदलूनही भाजप-शिवसेना युतीने नगरसह उत्तर महाराष्ट्रात यंदा पुन्हा शत-प्रतिशत जागा राखण्याच्या दिशेने घोडदौड चालविल्याने विरोधकांची विकलांगता स्पष्ट होऊन गेली आहे. विशेषत: नाशिकमध्ये ‘मनसे फॅक्टर’ राष्ट्रवादीसाठी उपयोगी ठरू शकला नाही, तर दिंडोरी लोकसभा मतदार-संघातील भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातही भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. ही बाब राष्ट्रवादीसाठी धोक्याची सूचना ठरू शकणारी आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या चार जागा काँग्रेसकडे असूनही तेथे या पक्षाला यशापर्यंत पोहोचता आले नाही. या बाबी आगामी विधानसभा निवडणुकीतही परिणामकारक ठरण्याची चिन्हे नाकारता येऊ नये.




गेल्या २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेच्या बळावर नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी सहा जागा भाजपने तर दोन जागा शिवसेनेने काबीज केल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळेसारखी मोदी लाट नसल्याचे अंदाज बांधले गेल्याने किमान दोन ते तीन जागा तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदरात येतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती; परंतु युतीने पुन्हा नाशिक विभागातील आपले शत-प्रतिशत वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसून आले आहे. विशेषत: अहमदनगरची जागा आघाडीअंतर्गत राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील भाजपकडे गेले व विजयीही झाले. परंतु राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप ही जागा मिळवू शकले नाहीत. वस्तुत: येथे खासदारकीची हॅट्ट्रिक केलेल्या दिलीप गांधी यांची उमेदवारी कापण्यात आली होती.

सुजय यांच्यासाठी त्यांचे पिताश्री व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे प्रचार केला. त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्व अस्मितेची लढाई ठरली होती व अखेर त्यांनी यशही मिळविले. विखे यांना शह देण्यासाठी जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने बळ दिले. थोरात यांच्याच संगमनेरला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा शेवटच्या चरणात घेण्यात आली तरी ती नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप किंवा शिर्डीतील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना लाभदायी ठरू शकली नाही. शिर्डीत दुसऱ्यांदा शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयाच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे चार आमदार असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराची दाणादाण उडाली ही बाब उद्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी धोक्याचा संकेत देणारीच म्हणता यावी.

जळगावमध्येही यंदा भाजपने उमेदवारी बदलली. त्यातही अगोदर आमदार स्मिता वाघ यांना घोषित केलेली उमेदवारी नंतर चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना देण्यात आली. यावरून अमळनेरच्या सभेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तेथील आमदारांना धक्काबुक्की केली गेल्याची घटनाही घडून आली; पण तरी पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अर्थात, यात जळगावमधील शिवसेनेचे मातब्बर नेते सुरेशदादा जैन व अन्य शिवसेना नेत्यांनी भरभक्कम पाठबळ पाटील यांच्या पाठीशी उभे केल्याने जळगावमध्ये भाजपला मताधिक्य राखता आले. तेथे राष्ट्रवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली होती; परंतु ते यशस्वी ठरू शकले नाही. रावेरमध्ये भाजपच्याच रक्षा खडसे दुसऱ्यांदा खासदारकीच्या उंबरठ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या दोन-अडीच वर्षापासून सत्तेबाहेर असले तरी या मतदारसंघावरील त्यांची पकड व प्रभाव यानिमित्ताने स्पष्ट व्हावा. या जागेवर यंदा दहा वर्षांनंतर काँग्रेसला उमेदवारी करायची संधी लाभली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पुरेपूर प्रयत्नही केला; परंतु प्रचारासाठी वेळ कमी पडल्याने की काय, ते विजयाप्रत पोहोचू शकले नाहीत.

धुळे व नंदुरबार या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारास बंडखोरांना सामोरे जावे लागले. धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी अपक्ष उमेदवारी केली तर नंदुरबारमध्ये पक्षातर्फे यापूर्वी दोनदा निवडणूक लढलेल्या सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली तरी डॉ. सुभाष भामरे व डॉ. हीना गावित दुस-यांदा लोकसभेची पायरी चढणार आहेत. नंदुरबारमध्ये काँग्रेसने तब्बल तीस वर्षांनंतर उमेदवार बदलून आमदार के.सी. पाडवी यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते; परंतु शिरपूर व साक्री विधानसभा मतदारसंघाने गावित यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. धुळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीची साथही त्यांना लाभली; परंतु डॉ. भामरे यांना मोदी यांच्या प्रतिमेचाही लाभ झाल्याने कुणाल पाटील मागे पडले.



नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी सलग दुस-यांदा लोकसभा गाठून अपवाद वगळता खासदार रिपीट न करण्याचा नाशिककरांचा पायंडा मोडीत काढला. येथे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याऐवजी त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. गत पाच वर्षातील गोडसे यांचा जनसंपर्क, त्यास मोदी फॅक्टरची लाभलेली जोड यामुळे ते पुन्हा विजय मिळवून गेले. नाशकात राज ठाकरे यांनी सभा घेतल्याने मनसे फॅक्टर भुजबळांना उपयोगी ठरण्याचे आडाखे बांधले जात होते; पण तसेही घडले नाही त्यामुळे यापुढील काळात मनसेलाही नाशकात आशावादी राहता येऊ नये. दिंडोरीतही भाजपने हॅट्ट्रिक केलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी बदलली.

राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने रिंगणात उतरविले तर शिवसेनेतून आलेले धनराज महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परंतु या लोकसभा मतदारसंघातील चांदवड - देवळा, येवला, नांदगाव व निफाड मतदारसंघातील मताधिक्याच्या बळावर डॉ. पवार यांनी बाजी मारली. यात उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ प्रतिनिधित्व करत असलेल्या येवला व त्यांचे पुत्र पंकज आमदार असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातही भाजपला मताधिक्य लाभल्याने यापुढील विधानसभेसाठीच्या वाटा अवघड बनल्याचे संकेत घेता यावेत. नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे व दिंडोरीत माकपा उमेदवार जे.पी. गावित यांना फार मजल गाठता आली नाही. त्यामुळेही गोडसे व डॉ. पवार यांचा मार्ग सुकर झाला.

एकूणच नाशिक विभागातील युतीचा वरचष्मा या निकालाने स्पष्ट झाला असून, त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेऊन व पक्षाचे बळ एकवटूनही या पक्षाला एकही जागा मिळविता आली नाही. नगर जिल्ह्यात विखेंचाच दबदबा सिद्ध झाला तर थोरात मागे पडले, जळगाव जिल्ह्यात व नाशिकचे पालकमंत्री असल्याने नाशिक जिल्ह्यातही गिरीश महाजन यांचे नेतृत्व उजळून निघाले. विभागात उमेदवारी केलेल्या सातपैकी एकमेव आमदार उन्मेश पाटील यांना विधानसभेतून लोकसभेत जाण्याची संधी लाभली. त्यामुळे चाळीसगावच्या जागेवर दुस-या व्यक्तीला संधीची कवाडे उघडणार आहे. एकूणच भाजप व शिवसेनेसाठी हे यश आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा उत्साह वाढविणारेच ठरले आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तसेच त्यांना साथ देणारी मनसे निरुत्तर झाली आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2019: North Maharashtra lead no answer!

Thursday, May 23, 2019

Editors view published in Online Lokmat on 23 May, 2019

...हे कसे विसरता यावे ?

किरण अग्रवाल

लोकशाहीच्या उत्सवाची भैरवी ज्याला म्हणता यावे, ती मतमोजणी आज होत असल्याने संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेस पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सत्तेचा हा कौल असल्याने त्याकडे जगभराचे लक्ष लागून असणेही स्वाभाविक आहे. विविधतेत एकता व सर्वसमावेशकता जपून असलेल्या आपल्या देशाच्या या वैभवाला सुदृढ व संपन्नतेचा साज चढविला आहे तो या लोकशाही प्रक्रियेने, म्हणूनच देशाच्या सर्वोच्च सदनात जाऊन निर्णयकर्ते होण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचे महत्त्व व मोल अनन्यसाधारण आहे. आज याच निवडणुकीचा निकाल येऊ घातला आहे, जो जनता जनार्दनाचा विश्वास तर व्यक्त करणारा असेलच; शिवाय देशाच्या यापुढील वाटचालीची दिशा काय असेल हे दर्शवून देणाराही ठरेल.


निवडणूक कोणतीही असो, त्यात एकमेकांसमोर उभे ठाकणारे किमान दोन पक्ष वा बाजू असतातच. त्यांच्यात प्रचाराच्या निमित्ताने परस्परांबद्दलच्या योग्य-अयोग्यतेचे रण माजते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात व अखेर मतदार आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून त्यात कोण योग्य, याचा मताधिकाराद्वारे फैसला करतात. ही संपूर्ण प्रक्रिया घडून गेल्यानंतर पुन्हा उभय पक्ष निवडणूक प्रचारकाळात झालेले आरोप-प्रत्यारोप विसरून विकासासाठी हातात हात घालून लोकसेवेस लागतात. आजवर तसेच होत आले आहे व यापुढेही तेच होणे अपेक्षित आहे खरे; परंतु यंदाच्या या निवडणूक निकालानंतर होईल का तसे, याबद्दल शंकाच बाळगता यावी. कारण प्रश्न केवळ विकासाचा न राहता विचारांचाही बनून उभा ठाकतो तेव्हा प्रचारातील संघर्ष त्यापुढील वाटचालीतही टिकून राहण्याचीच शक्यता बळावते. मतभेद मिटवता येण्यासारखे असतात; मनभेद कसे दूर होणार? यासारखाच काहीसा हा प्रश्न आहे. पण सद्यस्थितीत तो अटळ ठरण्याचीच लक्षणे आहेत. यंदाची निवडणूक ज्या अहमहमिकेने लढली गेली व विजयासाठी ‘वाट्टेल ते’ या प्रकारात मोडणारा जो प्रचार केला गेलेला दिसून आला, त्यातून सदरचा प्रश्न अधिक तीव्रतेने उपस्थित होणारा आहे. म्हणूनच निकालानंतर प्रचारकाळातील काय काय विसरता यावे, असा प्रश्नही अगदी स्वाभाविक ठरून गेला आहे.



सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या या निवडणुकीत यंदा सात टप्प्यात मतदान घेण्यात आले, ज्याकरिता तब्बल दोन महिने प्रक्रिया चालली व प्रचाराची रणधुमाळी उडाली. या रणधुमाळीत टोकाचे रण माजलेले दिसून आले. पंतप्रधानांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ म्हणण्यापासून ते ‘हिटलर’, ‘जल्लाद’, ‘दुर्याेधन’ आदी उपमा देण्यापर्यंत पातळी गाठली गेली. काँग्रेस अध्यक्षांची ‘पप्पू’ म्हणून अगोदरपासून खिल्ली उडवली जात होतीच, शिवाय  काही नेत्यांना ‘पाळीव कुत्रे’ म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. इतकेच नव्हे तर ‘नीच’सारखे शब्द वापरून शिव्या देण्यापर्यंतचीही हद्द गाठली गेली. इतक्या खालच्या स्तरावर प्रचाराची पातळी खालावलेली ही पहिलीच निवडणूक असावी. मतदारांमधील राष्ट्रवाद चेतवताना लष्करी कारवायांचे जसे भांडवल केले गेले, तसे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी दिवंगत नेत्यांवर आरोप करण्यातही कसर बाकी ठेवली गेली नाही. पक्ष राहिले बाजूला, व्यक्तिगत स्वरूपातच एकमेकांना जणू एखाद्या ‘दुष्मना’सारखे समजले गेले. अशा अतिशय टोकाच्या, हीन, असभ्य व व्यक्तिगत निंदा-नालस्तीच्या पातळीवर पोहोचलेल्या यंदाच्या प्रचारातले काय काय विसरता यावे, हा प्रश्न म्हणूनही महत्त्वाचा ठरणारा आहे.

निवडणुकीच्या प्रचार काळातले द्वंद विसरायला तशी निकोपता व पर-मताबद्दलच्या आदराची, सन्मानाची भावना असावी लागते; पण यंदा तीच पणास लागलेली दिसून आली. त्यामुळेच निवडणुकीचे निकाल काय लागतात हे पाहून कुणाला जेलमध्ये टाकण्याची, तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या राज्यातली सरकारे उलथवण्याचीही तयारी केली जात असल्याच्या वार्ता आहेत. हा खरे तर लोकशाहीचाच अनादर ठरावा; पण त्या टोकाला स्थिती पोहोचू पाहते आहे हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने फेसबुकवर अलीकडेच एक पोस्ट केली आहे, यात देशप्रेमाला नेताप्रेम केलेल्यांपासून सावध राहण्याची गरज प्रतिपादित करताना, ‘मतभेदाला गुन्हा किंवा अपमान मानण्याची मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते, म्हणून निवडणुकीत जे व्हायचे ते होईल; पण येणाऱ्या काळात समाजात द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे आहे’, असे म्हटले आहे. अतिशय स्पष्ट व परखड मुद्दा आहे हा. परंतु हेतुत:च जिथे असे केले गेलेले दिसते, तिथे लोकशाहीचा संकोच घडून येण्यापासून बचावणे कठीण ठरते. अर्थात, तरीही लोकशाहीच्या परिपक्वतेवर व प्रगल्भतेत विश्वास असल्याने, ‘झाले गेले ते गंगेला मिळो’ म्हणत भविष्यात चांगलेच घडून येण्याकरिता आशादायी राहूया.

Web Title: How can I forget this?

Saturday, May 18, 2019

Editors view published in Online Lokmat on 16 May, 2019

सुविधेसोबतच समस्याही ठरतोय मोबाइल

किरण अग्रवाल

विज्ञानाने प्रगती साधली की अधोगती, हा तसा वादविषय; पण या प्रगतीची काही साधने ही समस्यांची कारणे ठरून गेल्याचे नाकारता येऊ नये. या समस्या म्हणजे काळाने दिलेली देणगीच म्हणता याव्यात. मोबाइलचे वेड, ही अशीच सर्वांना भेडसावणारी समस्या. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या वेडाने ग्रस्त असून, त्याचा इलाज कसा करावा किंवा यासंबंधीच्या नादातून मुलांना कसे परावृत्त करावे, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. उपयोगी असूनही समस्या म्हणून मोबाइलकडे पाहिले जाऊ लागले आहे ते त्यामुळेच.


‘अति तिथे माती’ अशी एक म्हण आहे. कोणत्याही गोष्टीचा अगर कसल्याही बाबतीत अतिरेक केला गेला तर त्यातून समस्येला निमंत्रण मिळून गेल्याखेरीज राहत नाही. मोबाइलचे तसेच झाले आहे. संपर्क व संवादाचे सुलभ साधन म्हणून आजच्या काळात मोबाइल ही गरजेची वस्तू बनली आहे हे खरे; परंतु या मोबाइलच्या नादात तरुण मुले इतकी वा अशी काही स्वत:लाच हरवून बसली आहे की, त्यांना इतर कशाचे भानच राहताना दिसत नाही. मोबाइलच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया हाताळायला मिळत असल्याने ही पिढी ‘सोशल’ झाल्याचा युक्तिवाद केला जातो, पण मोबाइलमध्येच डोके व मनही गुंतवून बसलेली ही पिढी खरेच सोशल झाली आहे की, त्यांच्यातले एकाकी एकारलेपण वाढीस लागते आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मोबाइलमुळे जणू जग हातात आले आहे त्यांच्या, त्यामुळे ते त्या जगातच स्वत:ला गुंतवून घेतात. परिणामी नातेसंबंधातील नैसर्गिक संवाद अगर कुटुंबातील सर्वव्यापी सहभागीता घटत चालली आहे. अलीकडेच ‘मदर्स डे’ आपण साजरा केला, या घराघरांतील मदर्सची मुलांमुळे होणाऱ्या दमछाकची चिकित्सा करायची झाल्यास किमान काही वाक्ये प्रत्येक घरात ‘कॉमन’ आढळून येतील ती म्हणजे, ‘मोबाइल नंतर बघ, अगोदर जेवून घे’ किंवा ‘मोबाइलमधून डोकं काढ आणि झोप आता...!’ कारण प्रत्येकच घरातील आयांना आपल्या मुलांच्या दिनक्रमात मोबाइलचा अडथळा निदर्शनास पडू लागला आहे.




महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलवर निरनिराळे ‘अ‍ॅप’ आल्याने विविध बिलांचा भरणा सोयीचा झाला हे जितके आनंददायी, तितकेच मोबाइलवरून ऑर्डर देऊन केली जाणारी खरेदी वेदनादायी ठरत असल्याची अनेकांची भावना आहे. यात असे करण्यातून कधीकधी होणारी फसवणूक वगैरे भाग वेगळा, परंतु सहकुटुंब चिल्ल्यापिल्ल्यांचे बोट धरून त्यांना सांभाळत बाजारातील गल्ल्या धुंडाळण्याची तसेच सोबतच्या सर्वांच्याच आवडी-निवडी जोखत जिन्नस खरेदीतली मजाच हरविल्याचे नाकारता येऊ नये. कुठल्याही खरेदीतला सामूहिकपणाचा व पर्यायाने सर्वमान्यतेचा धागा यामुळे तुटू पाहतो आहे, तर मोबाइलवर कपडे अगर वस्तू मागवून व ती न पटल्यास परतवून देण्याचा कोरडेपणा आकारास आला आहे. बदलत्या काळानुसार व व्यक्तींच्या व्यस्ततेस अनुलक्षून अशा ऑनलाइन शॉपिंगचे समर्थन करणारे करतीलही व ते गैरही ठरविता येऊ नये; पण घरबसल्या उपलब्ध झालेल्या या सुविधेमुळे किमान खरेदीच्या बहाण्याने अनेकांचे कुटुंब कबिल्यासह बाहेर पडणे कमी झाले हेदेखील दुर्लक्षिता येऊ नये. अर्थात, सदरची बाब जे अनुभवत आहेत, तेच यासंबंधातील बोच जाणू शकतील.

पण, याही संदर्भातला खरा मुद्दा वेगळाच असून, तोच मोबाइल वेडाची किंवा त्याच्या अतिवापराची समस्या अधोरेखित करणारा आहे. अमेरिकेतील प्रख्यात अशा फेअरफिल्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार मोबाइलचा अतिवापर करणाºया व्यक्ती अनावश्यक खरेदी करीत असल्याची बाब समोर आली आहे. म्हणजे, मोबाइलचे वेड खरेदीतला खर्च वाढविण्यासही कारणीभूत ठरत आहे. तसेही, आपल्याकडे सवलतींना भुलून खरेदी करणारा वर्ग मोठा आहे. त्यात हे नवे संशोधन पुढे आले आहे. याकरिता मोबाइलचा कमी आणि जास्त वापर करणा-या अशा दोन्ही गटांतील लोकांचा व मोबाइल वापराचा त्यांच्यावर होणाºया परिणामांचा अभ्यास करण्यात आला. यात मोबाइलचा अतिवापर करणारे अनावश्यक खरेदी करतात असे तर आढळून आलेच, शिवाय मोबाइलवर गाणी ऐकत ऐकत शॉपिंग करणारे लोक आवश्यकता नसलेल्या वस्तूंचीही खरेदी करतात, असेही आढळून आले म्हणे. तात्पर्य असे की, मोबाइल जेवढा उपयोगी; अथवा सुविधेचा, तेवढाच तो समस्यांना निमंत्रण देणाराही ठरू पाहतोय. तेव्हा, त्याचा अति आणि अनावश्यकरीत्या केला जाणारा वापर टाळलेलाच बरा! 


Web Title: smartphone is helpful but also dangerous to health

Thursday, May 9, 2019

Editors view published in Online Lokmat on 09 May, 2019

प्रचाराची घसरती पातळी चिंतादायीच!

किरण अग्रवाल

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे टप्पे जसजसे उत्तरार्धाकडे जात आहेत, तसतशी प्रचाराची पातळी घसरत असून, ती विकासाऐवजी व्यक्तिकेंद्री होत आहे. तसेही व्हायला एकवेळ हरकत नाही; परंतु व्यक्तिगत विखार त्यातून प्रदर्शित होऊ लागल्याने, अशातून खरेच लोकशाहीचे बळकटीकरण घडून येणार आहे का, हा प्रश्न उपस्थित व्हावा. सुदृढ व परिपक्व लोकशाहीचे गोडवे आपण गात असताना त्याच लोकशाहीचा उत्सव म्हणवणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात देशापुढील प्रश्नांची चर्चा घडून येण्याऐवजी प्रचाराची पातळी व्यक्तिगत निंदा-नालस्तीच्या वळणावर येऊन पोहोचणार असेल तर ती एकाचवेळी चिंता आणि चिंतनाचीही बाब ठरावी.

सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून, अखेरच्या दोन चरणातील ११८ जागांसाठीचे मतदान होणे अद्याप बाकी आहे, त्यामुळे देशातील निवडणुकीचा प्रचार अगदी चरणसीमेवर पोहोचला आहे. अर्थात, प्रचार म्हटला की, त्यात आरोप-प्रत्यारोप होतच असतात; पण यंदा त्यात अधिकचीच भर पडली असून, पक्ष व त्यांची धोरणे किंवा विकास आदी मुद्दे बाजूला पडून व्यक्तिकेंद्री आरोपांचे प्रमाण टोकाला गेले आहे. इतिहासातील दुर्योधन, अफजल खान, औरंगजेब आदी व्यक्तिरेखांशी तुलना करीत हे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांना वेगळी धार प्राप्त होऊन गेली आहे. या टोकदार प्रचारात स्वाभाविकच अन्य मुद्दे हरवून गेले आहेत. विशेष म्हणजे, स्वबळावर दोन अंकी जागा प्राप्त करू शकणा-या व त्रिशंकू स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या नेत्यांनी प्रचाराला अधिक टोकदार केले असून, यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनजी यांचे नाव अग्रणी असल्याचे दिसून येत आहे.



आजवर डाव्यांचा गड म्हणून ओळखल्या गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांप्रमाणेच दंडेलशाही करून ममतादीदींनी त्यांचे राजकारण चालविले आहे. त्यामुळे तेथे खरा सामना ममता व मोदी यांच्यातच होत आहे. परिणामी डावे घरातल्याच अंगणात संकोचले आहेत. ‘आज के दिनेर सीपीएम देर कोनो कोथाही नेई, सुदू म्हात्रो मोमोता दिदीर आर नरेंद्र मोदीर कोथा होच्चे!’... म्हणजे, कम्युनिस्टांची कुठेही चर्चा होताना दिसत नाही, ममतादीदी व नरेंद्र मोदी यांचाच सर्वत्र बोलबाला आहे. परिणामी या दोघांत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडून गेली आहे. मोदी यांनी बंगाली जनतेला आपलेसे करण्यासाठी ‘फणी’ वादळग्रस्तांच्या मदतीत ममता बॅनर्जी अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे, तर ममतांनी ‘एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या पंतप्रधानांशी आपण बोलणार नसल्याचे’ सांगून मोदींवर निशाणा साधला आहे. या दोन्ही नेत्यांमधील टोकाचा प्रचार पाहता स्थानिक कार्यकर्त्यांतही वाद होत असून, पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या मतदानात आसनसोल, बराकपोर आदी ठिकाणी हिंसाचार व गडबडी घडून आल्याचे दिसून आले आहे.

या टोकाच्या प्रचाराला संदर्भत आहे तो अर्थातच आपापले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या हेतूचा. कारण, पश्चिम बंगालमध्ये मोदी यांना समाधानकारक यश मिळवता आलेले नाही. गेल्यावेळी २०१४ मध्ये अवघ्या दोनच जागांवर त्यांना समाधान मानावे लागले होते. यंदा उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणी घटू शकणा-या जागांची कसर ते बंगालमध्ये काढू पाहात आहेत, त्यामुळे ममतादीदी रागावल्या आहेत. दुसरे म्हणजे, जर केंद्रात त्रिशंकू अवस्था आकारास आलीच, तर त्या स्थितीत ममतादीदींची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. यापूर्वी ज्योती बसू यांना चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी डाव्यांनी घालवून मोठी चूक केली, आता पुन्हा बंगालच्या बेटीला ती संधी आल्याचे तृणमूलचे नेते सांगत आहेत. यावरून मोदी व ममतांमधील टोकाच्या प्रचाराचे कारण स्पष्ट व्हावे; पण तसे असले तरी, ज्या टोकाला जाऊन निवडणुकीचे रण लढले जात आहे, त्यासाठी व्यक्तिगत आरोपांचा धुरळा उडत आहे व त्यातूनच कार्यकर्ते-समर्थकांत धुमश्चक्री उडत आहे, ते अवघे समाजमन गढूळ आणि भयभीत करणारेही ठरत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दलची नकारात्मकता वाढीस लागण्याची भीती नाकारता येऊ नये. प्रचारातील घसरत्या पातळीबद्दल चिंता वाटणे म्हणूनच स्वाभाविक ठरले आहे. 


Web Title: Editorial on elections campaign downfall on personal allegations

Thursday, May 2, 2019

Editors View published in Online Lokmat on 02 May, 2019

मतदानवाढीचा फायदा-तोटा कुणास?

किरण अग्रवाल

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चारही टप्पे संपल्याने आता उमेदवारांच्याच गोटात नव्हे तर चौका-चौकात व गावांच्या पारा-पारावर सारे आकडेमोडीत दंग आहेत. विशेषत: शेवटच्या चरणात बहुतेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याने ही वाढ सत्तांतराला किंवा परिवर्तनाला कौल देणारी असल्याचे आडाखे बांधले जात आहेत. परंतु मतदानात वाढ झाली म्हणजे ती सरसकटपणे प्रस्थापितांच्या विरोधासाठीच झाली असे समजणेही भाबडेपणाचेच म्हणता यावे. मतदारांना आता गृहीत धरता येत नाही, त्याप्रमाणे पारंपरिक समजांवर आधारित गृहीतकेही यशापयशाची खात्री देणारी ठरू नयेत.



राज्यात पार पडलेल्या मतदानाच्या शेवटच्या चरणातील नाशिक, दिंडोरी, भिवंडी, कल्याण, पालघरसह मुंबईतील सर्व जागा तसेच नंदुरबार याठिकाणी यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. काही ठिकाणी दीड ते दोन टक्क्यांनी, तर उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक ७ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. मतदानातील अशी वाढ ही परिवर्तनास पूरक मानली जाते. ‘टक्का’ वाढला याचा अर्थ मतदार प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी घराबाहेर पडले, असा संकेत घेतला जातो. अनेकदा अनेक ठिकाणी तसे निकाल लागलेलेही दिसून येतात. अर्थात त्याच त्या उमेदवाराबद्दलची नकारात्मकता, राजकीय लाट किंवा अन्य समीकरणांमुळेही मतदान वाढून बदल घडून आले आहेत. गेल्या २०१४च्या निवडणुकीतच असे मोठ्या प्रमाणात घडले होते. मोदी फॅक्टरमुळे अनेकांचे नशीब उजळले होते. पण म्हणून प्रत्येकवेळी तसेच होणे अपेक्षित धरता येऊ नये. कारण, मोदींमुळे मतदानाचा टक्का वाढून ‘युती’चे काही उमेदवार निवडून येताना काही ठिकाणी टक्का वाढूनही प्रस्थापितांचे पाय घट्ट रोवलेलेच राहिल्याचे दिसून आले होते. यंदा तर मोदी लाट नसतानाही टक्का वाढला, ही वाढ मतदानाप्रतिच्या जागरूकतेतून झाली. त्यामुळे ती परिवर्तनच घडवेल, असे समजता येऊ नये.

आज जागोजागी जी आकडेमोड चाललेली दिसून येते आहे, ती मतदानवाढीचा लाभ विरोधकांना होतो या पारंपरिक समजावर आधारित आहे. वस्तुत: जो काही टक्का वाढला आहे तो काही फार मोठ्या अंतराचा अगर फरकाचा आहे, असेही नाही. कालमानानुसारची नैसर्गिक वाढ म्हणून त्याकडे बघता यावे. त्यामुळे त्यातून नकारात्मकतेचा संकेत घेता येऊ नये. सत्ताधाऱ्यांची चुकीची वा फसलेली धोरणे, जनतेचा भ्रमनिरास आदी कारणांतून जो परिणाम व्हायचा तो मतदानाचा टक्का जिथे वाढला नाही तिथेही झाला असेलच. परंतु सरसकटपणे तशा गृहीतकावर आकडेमोड करता येऊ नये. येथे आणखी एक बाब लक्षात घेता येणारी आहे ती म्हणजे, रिंगणात दोन बलाढ्य उमेदवारांसोबत अन्य अतिशय कमकुवत उमेदवार असतात तेव्हा थेट नफा-नुकसानीचे गणित मांडणे तुलनेने सोपे असते. यंदा मते खाण्याची क्षमता असणारे अनेक ठिकाणी रिंगणात होते. काही तर हेतुत: तेवढ्याकरिताच उमेदवारी दिली गेलेले होते. त्यामुळे मतदानवाढीने कुणाची गणिते घडण्याचा अंदाज बांधताना, विभाजित होणाऱ्या मतांमुळे जी समीकरणे बिघडणार आहेत ती अधिक महत्त्वाची ठरावीत. तात्पर्य इतकेच की, मतदानाचा टक्का वाढलेल्या सर्वच ठिकाणी परिवर्तनाच्या अपेक्षा करता येऊ नयेत. 


Web Title: What is the advantage of the increase of voting?