Thursday, June 27, 2019

Editors view published in 0nline Lokmat on 27 June, 2019

नात्यांचा बंध का होतोय सैल?

किरण अग्रवाल

नात्यांना एक गंध असतो. नाते जितके गहिरे, तितका त्याचा सुगंध अधिक. त्यामुळे नाती ही फुलांसारखी जपावी, असे नेहमी सांगितले जाते. नात्यांमधले नाजुकपण यात सामावलेले असल्याचे लक्षात यावे. नात्यांची वीण घट्टच असावी. ती उसवू न देण्याची सर्वांची अपेक्षा असते व तसा प्रयत्नही केला जातो; परंतु अपवादात्मक संज्ञेत मोडणाऱ्या का होईना, काही घटना अवतीभोवती घडताना दिसून येतात तेव्हा एकूणच समाजव्यवस्थेला तर हादरे बसतातच शिवाय नात्यांमधल्या असुरक्षिततेचा, हिंसेचा मुद्दा उपस्थित होऊन त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणे गरजेचे ठरून जाते.

मुंबईतील वडाळा पोलिसांकडे सासूची हत्या करणाऱ्या सुनेविरुद्ध गुन्हा नोंदविला जाऊन तिला अटकही करण्यात आली आहे. नाशकात मामीनेच आपल्या नवविवाहित भाचीला पैशांसाठी विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पैशांकरिताच मुलाने आपल्या आईचा खून केल्याची घटनाही उघडकीस आली आहे. मनमाडमध्ये चौथे लग्न करत संबंधित नवरदेवासह त्याच्या कुटुंबीयांची फसवणूक करू पाहणाऱ्या लातूरच्या एका टोळीलाच पकडण्यात आले आहे... या झाल्या अगदी आज-कालमधील घटना; पण त्या प्रातिनिधिक ठराव्यात, कारण अशी अनेक प्रकरणे अधूनमधून समोर येत असतात. अगदी वासनांध पित्याकडून आपल्याच मुलीवर अत्याचार केले गेल्याचेही प्रकार समोर आले आहेत. नात्यांना काळिमा फासणारे हे प्रकार आहेत; पण याचसोबत हुंड्यासाठी होणा-या छळाचे प्रकारही कमी होताना दिसत नाहीत आणि विशेष म्हणजे, हुंडाबळीच्या प्रकरणात महिलाच महिलेच्या शत्रू ठरलेल्याही दिसून येतात. अर्थात, हे अपवादात्मक असले तरी या अशा घटना समाजमनावर परिणाम करणा-या ठरतात. नात्यांमधला संशय अगर अविश्वास वाढीस लावू पाहणाऱ्या या घटनांबद्दल कायद्याच्या कक्षेत जो न्यायनिवाडा वा शिक्षा व्हायची ती होईल व होतेही; परंतु समाजशास्रींनीही याकडे लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.



मागे, म्हणजे २००५च्या नॅशनल फॅमिली एण्ड हेल्थ सर्व्हेची जी आकडेवारी हाती आली होती त्यानुसार आपल्याकडे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण ३३.५ टक्के आढळून आले होते, तर १५ ते ४९ वयोगटातील महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण ८.५ टक्के असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. समाजातील लोकलज्जा, भीती व कौटुंबिक पुरुष प्रधानकी आदि कारणांमुळे असंख्य महिला पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत, हा भाग वेगळाच. कुटुंबात पतीने पत्नीवर हात उगारणे किंवा कसल्या का कारणातून होईना अवमानजनक बोलणे हा तर अधिकारच समजला जाऊन पोलिसांकडे गेले तरी ते गुन्हा न नोंदवता घरी पाठवून देताना दिसतात. हुंडा प्रतिबंधक व कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा यासारखे कायदे असतानाही हे घडून येते. वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, अशी मानसिकता बाळगणाऱ्यांकडून मुलाऐवजी मुलगी जन्मास आल्यानंतर होणारा ‘ती’चा छळ अगर उपेक्षा हादेखील यातील चिंतेचा विषय ठरावा. या सर्वच बाबतीत नातेच पणास लागते, म्हणूनच नात्यांमधील आपलेपणाचे, विश्वासाचे, मर्यादांचे-ममत्वाचे बंध सैल होताहेत का, हा प्रश्नच पडावा.

मुळात, संस्कारांत कमतरता राहिली तर हे प्रकार घडून येतात, हेच याचे उत्तर देता यावे. कौटुंबिक विभक्तपणातून आजची पिढी एकटी होत चालली आहे. जरा काही चुकले तर तिचा कान धरणारा कुणी उरला नाही. आजी-आजोबा गावात आणि मुलं नोकरी-व्यवसायासाठी शहरात येऊन राहणा-या मम्मी-डॅडींसोबत. आई-वडिलांनाही मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यात सोशल माध्यमांचे फॅड व त्यातील प्रत्येकाचेच गुंतणे इतके वाढले आहे, की एकाच घरात, छताखाली सोबत राहूनदेखील मुले पालकांपासून व पालक हे मुलांपासून विभक्त झाल्यासारखे वागताना-राहताना दिसून येतात. अशातून कसे वा कोणते व्हावेत संस्कार, हा प्रश्न आपसूक निर्माण होतो. नोकरी व करिअर मागे धावणा-या पालकांना वेळ कुठे आहे संस्कारांचे धडे द्यायला? फिल्मी कॉन्सर्ट्सना गर्दी वाढत चालली आहे, तर कीर्तन-प्रवचनांना येणारी संख्या रोडावत, हे आजचे चित्र आहे. यातील सारेच चुकीचे, चिंतेचे आहे अशातला भाग मुळीच नाही; पण कुटुंबातल्या घटकांचे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होते आहे व जिथे असे होते आहे तिथे नात्यांचे बंध सैल होत जाताना दिसतात. चिंतेचा, समस्येचा, काळजीचा किंवा विचाराचा मुद्दा तो आहे. हे सैल होऊ पाहणारे बंध घट्ट कसे करता अगर राखता यावेत? जगण्यासाठी धावण्याच्या स्पर्धेमागे न लागता कुटुंबीयांसाठी वेळ दिला गेला तर त्यातून नात्यांची वीण नक्कीच मजबूत होऊ शकेल. मुलांचे एकारलेपण घालवून त्यांना कुटुंबीयांच्या नात्यासोबत उमलू दिले, तर त्यातून हे बंध बळकट होतील. प्रत्येक कुटुंबातील पालकांनी व समाजात पुढारपण करणा-या नेत्यांनी, समाजशास्त्रींनी याकडे गांभीर्याने बघायला हवे इतकेच यानिमित्ताने. 


Web Title: increasing number of crime in relation creating danger in society

Thursday, June 20, 2019

Editors View published in Online Lokmat on 20 June, 2019

पाऊले चालती पंढरीची वाट - श्रद्धेचा सागर, भक्तीचा जागर...

किरण अग्रवाल

या हृदयाची त्या हृदयाशी तार जुळली की, परस्पर भेटीची ओढ लागते. ती केवळ ओढ नसते, आस असते तृषार्त व सश्रद्ध मनाच्या भेटीची. त्यात नाद असतो भावभक्तीचा. ईश्वरप्राप्तीच्या अनामिक आसक्तीचा. अशात, श्रद्धेची वीणा झंकारली, ईश्वरनिष्ठेच्या मांदियाळीचा मृदंग वाजला आणि एकरूप भावाच्या टाळा-चिपळ्यांचा नाद जोडीस लाभला, की ब्रह्मानंदी टाळी लागणे टळूच शकत नाही. हा आनंद अवर्णनीय अनुभूती देणारा असतो. तो एक ठेका असतो. परमार्थिक लय साधणारा. मनाच्या डोहात डोकावणारा. एकदा त्यात डोकावले की षड्रिपू गळून पडतात आणि विकाराच्या जागी परमतत्त्व व ईश्वर स्वरूप आकार घेताना दिसून येतात. आनंदाचे रूपांतरण परमानंदात होते ते याच अवस्थेत. भौतिक व्यवस्थेची अपेक्षा व मर्यादा मग आपसूकच कोलमडून पडते. जगण्यातील व्यर्थतेच्या जाणिवा निरपेक्ष भक्तीच्या व यथार्थतेच्या मार्गाकडे ओढून नेतात, आणि पाऊले चालू लागतात.. मार्गस्थ होतात. हे मार्गक्रमण वा वाटचाल म्हणजेच तर वारी. ते केवळ चालणे नसते, तो एक जीवनानुभव असतो, अनामिक आस लाभलेला. हृदयंगमाने ओथंबलेला, भारलेला आणि ईश्वर दर्शनाकडे नेणारा. त्यासाठीची आस मनी व ध्यानी घेऊनच हजारो वारकरी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीसह विठू माउलीच्या भेटीस निघाले आहेत.

वारकरी सांप्रदायाचे आद्यप्रवर्तक, संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज हे श्री ज्ञानोबारायांचे ज्येष्ठ बंधू. सुमारे ३५०पेक्षा अधिक अभंगांची रचना करणाऱ्या श्री निवृत्तिनाथांनी वारकरी सांप्रदायाची प्रेरणा दिली व श्री ज्ञानोबा माउलींनी त्याचा पाया रचला. म्हणूनच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचे आपले वेगळे महत्त्व आहे. पंढरीच्या विठोबा माउलीस भेटायला जाणा-या या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात. ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे’, असा भाव घेऊन हे वारकरी चालत असतात. पंढरीच्या या वारीचा इतिहास पाहिला तर अगदी तेराव्या शतकात तिचा उल्लेख आढळतो. सर्वच संतांनी या प्रथेचे जतन केले असून, नवीन पिढीही यात हिरिरीने सहभाग घेताना दिसत आहे. आजही राज्यातील अनेक गावांमधून लहान-मोठ्या दिंड्या व हजारो वारकरी विठ्ठलभेटीच्या ओढीने वारी करतात, संत निवृत्तिनाथांच्या पालखीलाही शतकांची परंपरा लाभली आहे. श्रद्धेचा हा सागर असतो; जो भक्तीचा जागर घडवित विठुनामाचा गजर करीत पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, ‘‘पंढरपुरा नेईन गुढी, माझिया जिवेची आवडी।’’ माउलींच्या जिवाची म्हणजे मनाची आवड काय, तर सात्त्विकतेची गुढी. जी पंढरपुरी आहे. म्हणूनच भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत, वैराग्य व शांतीचा संदेश देत दिंडी निघाली आहे.



त्र्यंबकेश्वरी ज्या कुशावर्त कुंडात सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुसंतांचे पुण्यस्नान होते, गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्याच तीर्थावर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घालून व त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अभंग सेवा रुजू करून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. विशेष म्हणजे, वारकरी बांधवांनी संस्थानच्या पुढाकारातून लोकवर्गणी करीत सुमारे एक कोटी रुपयांचा चांदीचा रथ तयार करविला असून, त्यात संतश्रेष्ठ निघाले आहेत. यंदा या पालखी सोहळ्यातील दिंड्यांची संख्याही वाढली असून, अगदी ४० वर्षांपासून खंड पडू न देता वारी करणारे तसेच नव्याने यंदा सहभागी झालेले असे दोन ते तीन पिढ्यांचे अनेक प्रतिनिधी यात आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यात झोपण्याची वगैरे सोय नसली तरी चेह-यावर थकवा अथवा कसलाही त्राण जाणवू न देता आबालवृद्ध निघाले आहेत, पंढरीच्या दिशेने. त्यांच्यातील उत्साह, श्रद्धा कुठेही-कशानेही कमी होताना दिसत नाही. कसल्या अडचणीने डळमळताना दिसत नाही. २४ दिवसांमध्ये ४५० किलोमीटरचा प्रवास या वारीत घडणार असून,
‘धन्य धन्य निवृत्ती देवा। काय महिमा वर्णावा।।
शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन।।
असा महिमा गात, आनंदाने नाचत-गात, भावभक्तीने नामस्मरण करीत दिंडी निघाली आहे. जगण्यातले अध्यात्म काय असते, निरंकार, निरपेक्ष भाव कसा असतो; प्रत्येक पावलागणिकचा व टाळ-मृदंगाच्या तालाचा परमार्थिक, अलौकिक भाव कसा असतो आणि त्यातून कसले जीवनदर्शन घडून येते याचा प्रत्यय घेण्यासाठीच तर ‘वारी ही अनुभवावी’ लागते.

महत्त्वाचे म्हणजे, वारी ही एक चालण्याची वा प्रवासाची क्रिया नाही, तर जगण्याचे भान देणारी प्रक्रिया आहे. त्यात श्रद्धेचे संचित आहे, अध्यात्मही आहेच; पण अखिल विश्वातील यच्चयावत जिवांचे, प्राणिमात्रांचे कल्याण चिंतणाºया पसायदानाची सर्वस्पर्शी व्यापकताही त्यात आहे. ‘अवघे विश्वची माझे घर’ मानणारा व समजावून सांगणारा भावार्थ त्यामागे आहे. त्यामुळेच काळाशी सुसंगत असा विचार करीत केवळ मुखी हरिनाम घेऊन न थांबता यंदा पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी ‘हरित वारी’चा संकल्प केला आहे. ज्या मार्गावरून व ज्या ज्या गावातून हा पालखी सोहळा जाणार आहे, त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश वारकऱ्यांकडून दिला जाणार आहे. भविष्याची चिंता बाळगत व वर्तमानाचे भान ठेवत केली जात असलेली ही वारी म्हणूनच वेगळा जीवनानुभव घडविणारी तर आहेच, शिवाय मोक्ष पंढरीचा आत्माविठ्ठलही यातून प्रकटल्याखेरीज राहाणार नाही. त्यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पंडितराव कोल्हे, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, पालखी सोहळ्याचे प्रमुख पुंडलिकराव थेटे, ह.भ.प. त्र्यंबकराव गायकवाड, मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी आदी धुरिणांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. तेव्हा त्यांच्या रंगात रंगून आपणही म्हणूया...

‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय!’’
श्री निवृत्तिनाथ महाराज की जय!! 


Web Title: The path of Pandharvi walking on foot - the ocean of devotion, devotional jagar ...

Thursday, June 13, 2019

Editors view published in Online Lokmat on 13 June, 2019

अशाने कसे लाभणार स्मार्टपण?

किरण अग्रवाल

सरकारी यंत्रणेवर लोकांचा आता तितकासा विश्वास उरला नाही, कारण ही यंत्रणा निकडीचा विचार न करता तिच्या गतीने काम करते; आणि दुसरे म्हणजे तिच्याशी संबंधितानाही विश्वासात न घेता कामे रेटण्याचा उद्दामपणा करते. अनेकदा, अनेक बाबतीत कामे चांगली असूनही ती वादात अडकतात अगर त्याबाबत संशयाचे मळभ दाटून येते ते त्यामुळेच. नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ करावयास निघालेल्या कंपनीच्या कामाबद्दलही संशयाची आणि तिच्या संचालकांमध्येच अविश्वासाची स्थिती निर्माण होण्यामागे अशीच कारणे राहिल्याचे दिसून येत आहे.

विकासाच्या वाटेवर असणाऱ्या शहरांना मदतीचा हात देऊन अधिक गतीने ‘स्मार्ट’ करण्यासाठी देशात केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ योजना आणली. त्यासाठी विविध निकषांच्या आधारे शहरांची निवड करून विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे; परंतु जिथे निधी आला, तिथे गोंधळ-गडबडीची ठिणगी पडून गेल्याशिवाय राहात नाही हा आजवरचा अनुभव असल्याने ‘स्मार्ट’पणाकडे होऊ घातलेल्या वाटचालीतही त्याचे प्रत्यंतर येऊ पाहात आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गोंधळी कामकाजाचा या ‘स्मार्ट’ वाटचालीवर परिणाम होऊ नये किंवा पारंपरिक दप्तर दिरंगाईच्या मानसिकतेचा फटका बसू नये म्हणून महापालिकांना काहीसे बाजूला सारत स्वतंत्रपणे पर्यायी यंत्रणा ठरणारी कंपनी स्थापन करण्यात आली. या समांतर व्यवस्थेला प्रारंभी बहुतेक सर्वच ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून विरोधही झाला, परंतु लोकभावना लक्षात घेता अखेर कंपनी स्वीकारली गेली आणि त्यात स्वतंत्र तज्ज्ञ संचालकांखेरीज महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले गेले. पण असे असले तरी या कंपनीचा कारभारही काही महापालिकेपेक्षा वेगळा ठरताना दिसत नाही. या कंपनीद्वारे करण्यात येत असलेली कामे व त्यासाठी राबविण्यात येणारी निविदा प्रक्रिया संशयास्पद ठरू लागल्याने ‘स्मार्ट सिटी’च्या वाटेतील अडचणी वाढून गेल्या आहेत.



नाशिकचाही ‘स्मार्ट सिटी’ योजनेत नंबर लागला म्हणून नाशिककरांना मोठा आनंद झाला होता; पण ज्या पद्धतीने त्या अंतर्गतची कामे होताना दिसत आहेत, सदरचा आनंद टिकू शकलेला नाही. एक तर या योजनेअंतर्गत शहराचा चेहरा-मोहरा बदलणे व काळाच्या गरजेनुसार नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरलेल्या दिसून येणे अपेक्षित असताना जुन्याच कामांची डागडुजी होताना दिसते आहे. यातही उदाहरणच द्यायचे तर कोट्यवधी रुपये खर्चून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण केले गेले, परंतु तेथील पोषाखी स्वरूप वगळता ध्वनी व प्रकाशयोजनेबाबतच्या तक्रारी कायमच असल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. मग कोट्यवधींचा खर्च केला कशावर, असा प्रश्न आपसूकच उपस्थित व्हावा. महात्मा फुले कलादालनाचे असेच नूतनीकरण केले गेले; पण त्याच्या छताचा काही भाग लगेच कोसळल्याचे पाहावयास मिळाले, त्यावरून ही कामे कोणत्या दर्जाची अगर गुणवत्तेची होत आहेत याचा अंदाज बांधता यावा. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या अवघ्या एक-दीड कि.मी. रस्त्याचे काम हाती घेऊन दीड-दोन वर्षे होत आहेत. नाशकातील सर्वाधिक रहदारीचा हा मुख्य रस्ता उखडून पडला आहे, पण काम संपायचे नावच घेत नाही. शिवाय त्याचा खर्च किती तर तब्बल १७ कोटी. त्यामुळे या रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी काय चांदीची बाके टाकणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अत्याधुनिक पद्धतीने जलमापन करण्यासाठी सुमारे दोन हजार घरांत पाणी मीटर बसवण्याकरिता तब्बल २८० कोटी रुपयांची मीटर खरेदी करण्यात येणार असून, त्यातील अनागोंदी आता चव्हाट्यावर येऊन गेली आहे. दोनदा मुदतवाढ मिळालेल्या निविदा प्रक्रियेत अंतिमक्षणी केले गेलेले फेरबदल संशयास्पद ठरले असून, कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडेच संशयाची सुई सरकवून दिली आहे. त्यामुळे कुंटे हे अतिशय सरळमार्गी व प्रामाणिक अधिकारी असल्याचा लौकिक असला तरी, खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याच संकेतामुळे संचालक मंडळच बुचकळ्यात पडले असून, अधिकाºयांना असा परस्पर धोरण बदलाचा अधिकार कुणी दिला, असा मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमदाराच्या तक्रारीवरून निविदा रद्द केल्या जात असताना व ‘सीईओ’ची गच्छंती होऊ घातली असताना त्यांनी थेट अध्यक्षांच्याच संमतीने निविदेत बदल झाल्याचे म्हटल्याने या विषयाला वेगळे वळण लाभून गेले आहे. यात कंपनीच्या संचालकांनाच विश्वासात न घेता निविदा रेटण्यात आल्याचे समोर येत आहे. अर्थात, विश्वासात घेणे म्हणजे काय असते; याचीदेखील वेगळी चर्चा होत असते हा भाग वेगळा. परंतु अधिकाऱ्यांमधीलच दुभंगामुळे संचालकांना त्यांची नाराजी दर्शविणे सोयीचे होऊन गेले आहे. या एकूणच संशयाच्या परिणामी कामांमध्ये खोडा उत्पन्न होणे स्वाभाविक ठरले आहे. तेव्हा स्मार्ट सिटीच्या कामांची कुर्मगती व जी कामे हाती घेतली गेली आहेत त्याबद्दलची संशयास्पदता पाहता महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीत मग फरक तो काय उरला, असाही प्रश्न उपस्थित होऊन जाणे क्रमप्राप्त ठरले आहे. 


Web Title: Editorial View On Nashik Municipal Corporation Smart City

Thursday, June 6, 2019

Editors view published in Online Lokmat on 06 June, 2019

..हे हृदय कसे आईचे?

किरण अग्रवाल

काळाच्या बदलाचा वेग कितीतरी पटीने वाढला आहे, असे आपण म्हणतो व ते खरेही आहे. परंतु या बदलात पारंपरिक किंवा बुरसटलेल्या संज्ञेत मोडणाऱ्या विचारांचा बदल कितपत होताना दिसतोय असा प्रश्न केला तर त्याचे मात्र समाधानकारक उत्तर देता येऊ नये. कारण, बदलाच्या ओघात भौतिक गरजांच्या अनुषंगाने साधन-सुविधा स्वीकारल्या गेल्या; परंतु वैचारिक उन्नयन तितकेसे घडवता आले नसावे म्हणूनच की काय, तिसरेही अपत्य स्री जातीचे जन्मास आल्याने मातेनेच पोटच्या गोळ्याचे जगणे हिरावून घेण्यासारखे प्रकार समाजात घडताना दिसत आहेत. अशा घटनांमधून माणुसकीच्या भावनेला तर नख लागतेच; पण माया-ममतेच्या दृष्टीने सर्वोच्च कोटीच्या ठरणाºया मातृत्वाच्या भूमिकेलाही आच बसून गेल्याखेरीज राहात नाही.

वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे. या घटनेकडे प्रातिनिधिक म्हणून बघता यावे, कारण अपवादात्मक असल्या तरी मातृत्वाच्या नात्याला कलंक ठरणा-या अशा मातांची प्रकरणे इतरत्रही अधून मधून समोर येतच असतात. अनिच्छेने जन्मास येणा-या ‘नकोशीं’चा प्रश्न व त्यासंदर्भातील बुरसटलेली विचारधारा किती गंभीर आहे, हेच यावरून लक्षात यावे. बरे, हे काही कुठे आदिवासी वाड्या-पाड्यावर, खेड्यात घडले आहे असे नाही, तर नाशिकसारख्या शहरात व शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीच्या घरात घडलेला प्रकार आहे हा; त्यामुळे काळाच्या किंवा बदलाच्या चक्रापासून अनभिज्ञ असलेल्यांकडून असे घडल्याचे म्हणण्याची सोय नाही. ‘नकोशी’ ठरलेल्या मुलींबाबत दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१७-१८ मधील आर्थिक सर्वेक्षणात प्रथमच लक्ष वेधण्यात आले होते व देशात अशा नकोशा मुलींची संख्या तब्बल दोन कोटींवर असल्याचे त्यात नोंदविण्यात आले होते. तेव्हा, जन्मत:च नकोशीला यमसदनी धाडण्याचा प्रकार तर गंभीर ठरावाच; परंतु अनिच्छेने स्वीकारलेल्या मुलींच्या वाट्याला कसले जीणे आले असावे, यासंबंधीच्या चिंतेनेच संवेदनशील मन गहीवरून यावे.



महत्त्वाचे म्हणजे, समाजात स्री-पुरुष समानतेची चर्चा नेहमी झडत असते, महिला वा मातृदिनानिमित्त नारीशक्तीच्या गौरवाचे पाट वाहताना दिसतात; त्याचा परिणामही होतो खरे; पण काही घटना अशा घडून जातात की त्या एकूणच समाजमनावर गहिरा परिणाम करून जाणा-या ठरतात. मागे एका प्रियकराच्या नादात लागलेल्या मातेने आपल्या लहानग्याला कपडे धुण्याच्या धुपाटण्याने इतके बदडले होते की त्याला जिवास मुकावे लागले होते. चालू वर्षात, म्हणजे जानेवारी ते आतापर्यंतच्या पाच महिन्यात नाशकातील कचराकुंडीवर अथवा अन्यत्र बेवारसपणे टाकून दिलेली तीन अर्भके आढळून आली आहेत. भलेही अनैतिक संबंधातून ती जन्मास आलेली असावीत, परंतु पोटच्या गोळ्याला असे कचराकुंडीत टाकून देणा-या किंवा अलीकडील घटनेनुसार त्याचा थेट जीवच घेणा-या मातेच्या निर्दयतेला काय म्हणावे? ‘स्वामी तिन्ही जागाचा, आईविना भिकारी’ असे एकीकडे म्हणतानाच ‘माता न तु वैरिणी’ असे म्हणण्याचीही वेळ जेव्हा ओढवते, तेव्हा हे हृदय कसे आईचे, असा प्रश्नही उपस्थित होऊन गेल्याशिवाय राहात नाही.

अर्थात, विचारांच्या मागासलेपणातूनच असे घडून येत असल्याने विवेकाचा जागर हाच त्यावरील प्रभावी उपाय ठरावा. शिवाय, कायद्याची बेडी अधिक कडक केली जाणे गरजेचे आहे. आपल्याकडे गर्भलिंग निदान कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्याचे प्रकार वेळोवेळी उघडकीस येतात, यातील दोषींना जरब बसेल अशी शिक्षा झाल्यास गर्भातच कळ्यांना खुडण्याच्या प्रकारास चाप बसेल. तिस-या मुलीचा गळा घोटण्याचा प्रकार उघडकीस येत असताना नाशकातच एका डॉक्टरला गर्भलिंग निदान कायदा उल्लंघनाबाबत दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जरब बसावयास मदत होईल. मुलगा व मुलगी यातील भेदाचे जळमट दूर करतानाच नकोशींबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी कन्या जन्माचे स्वागत करण्याची धारणा रुजवावी लागेल. ते केवळ शासनाच्या प्रयत्नांनी होणार नाही तर समाजातील विचारीवर्गाने त्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. 


Web Title: Editorial on mother kill herself daughter after continues third child