Wednesday, November 6, 2013

Raverayan - 2



अंगणासारखी प्रशस्त व स्वतंत्र पार्किंगची जागा असूनही आमच्या श्रुती / कृतीने दिवाळीची रांगोळी कडप्प्यावर घातली कारण पेव्हर ब्लॉक्सवर ती घालणे शक्यच नव्हते. नाही तरी अगोदर जेव्हा आम्ही पंचवटीतील साईकृती अपार्टमेंटमधल्या तिसऱ्या मजल्यावर राहात तेव्हा दाराशी रांगोळी घालायला लॉबीत इतकीही जागा नसे.  तेथे तर हाताचे दोन्ही अंगठे जोडून पंजे विस्तारल्यावर करंगळ्यात जेव्हढी जागा बसेल तितक्याच आकाराची रांगोळी घालावी लागे. तरी घरात शिरणार्याला ती चुकवताना पायाचे पंजे डोक्यावर घेण्याची वेळ येई. त्या तुलनेने स्वतःच्या पार्किंगमध्ये अंमळ  जरा जास्तीचीच जागा मिळते. जागेच्या या मारामारीवरून आठवली ती गावाकडील घराच्या पटांगणातील भली मोठ्ठी रांगोळी आणि तेथील दिवाळीही.
 
रावेरला आमच्या घरात बाहेरच्या भिंतीच्या आत मोठे पटांगण आहे, तेच आमचे अंगण. दिवाळीच्या एक दिवस आधीच आई ते शेणाने सारवून ठेवी. दिवाळीच्या दिवशी दुपारचे जेवण आटोपले की या अंगणात रांगोळी घालायची घाई होई. आम्ही लहानच होतो त्यामुळे घरात  तोवर नात सुना आलेल्या नव्हत्या. आई सुशीला आणि काकु प्रमिला याच घरातल्या सुना, त्यामुळे त्याच रांगोळी घालत. अर्थात आमच्या लहान लता आत्याचे लग्न झालेले नव्हते तेव्हा. त्यामुळे आई आणि काकु पेक्षा तिचेच अधिक चाले. ती जास्तीत जास्त ठिपक्यांची रांगोळी काढे. आई आणि काकू ते ठिपके रेषांनी जोडू लागत. ते एकदाचे झाले की त्या तिघी लाल, हरा… असा हुकुम सोडत आणि आम्ही त्यांच्या  हाती त्या त्या रंगाच्या डब्या सोपवित असु, रांगोळीत रंग भरण्यासाठी.  पाठीमागे आजी पाराबाई बसलेली असे, हेडमास्तराच्या भुमिकेत. कुटुंबातील परस्परांच्या स्नेहाचे, तीन पिढ्यांचे ते बंध किती घट्ट होते?  शेजारच्या दिनानाथशेठ अकोले, लक्ष्मणराव लोंढे, मंगलसेठ मारवाडी, पुनमचंद दलाल, भोगीलाल शाह, बच्चू डॉक्टर, अनंता डॉक्टर अकोले अश्या प्रत्येकाच्याच दारासमोर तेव्हा थोड्या फार फरकाने असेच चित्र दिसे. या बहुतेक घरांतील हेड मास्तराच्या भूमिकेतील पिढी राहिलेली नसली तरी आजही रावेरातल्या भोकरीकर गल्ली, अफु गल्ली, बावीशे गल्ली, रथ गल्ली, बारी वाडा, भोई वाड्यात रांगोळ्यांचे जणू प्रदर्शन भरलेले दिसून येते. त्या एकेक रांगोळ्या पाहात गल्ल्या न गल्ल्या पालथ्या घालण्यातला आनंद कसा वर्णावा? येथे त्याची सर येणे शक्यच नाही.
 
सायंकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजाही मोठ्ठी मांडली जाई. वडील म्हणजे शेठच म्हणवत. त्यामुळे अख्या कुटुंबीयांसह शेतावरचे सालदार, घरगडी, कामकरी व त्यांच्याही घरची मंडळी उपस्थित असत. आरतीच्या वेळी दिवाकर महाराज पूजेच्या तांब्यात आचमनी वाजवत जो नाद करायचे आणि नाकातून आरतीचा जो स्वर काढायचे… अहाहाss, तो आनंद काही औरच! पूजे नंतर नमस्कार केल्यावर 'ऑ हॉs बच्चू' म्हणत पाठीत जो धपाटा ते घालायचे तसा धपाटा घालणारे आता कुणी उरले नाही, ही सल आयुष्यभर बोचत राहणारी आहे. लहानच होतो आम्ही.  आम्हाला पूजा आटोपण्याची घाई असे, कारण दोनच. एक म्हणजे पूजे नंतर जेव्हा आम्ही वडीलधार्याना नमस्कार करत, आशीर्वाद स्वरुपात टोकन म्हणून दहा ते  एकच्या नोटांची बक्षिशी त्यांच्याकडून मिळे.  आणि दुसरे म्हणजे फटाके फोडायची घाई. आमचे अनेक रॉकेट त्यावेळी शेजारच्या मस्जिदित जाऊन पडायचे, फटाक्यांचे आवाजही होत, पण त्यावेळी कुणाच्या भावना दुखावल्याचे आठवत नाही. उलट याकुब भाई वगैरे आम्हाला फटाके फोडू लागत. नंतर २/४ दिवस आणखी आमची चंगळ असे. गावात गोपालदास शिवलाल, किसनलाल कुंजलाल, शिवप्रसाद देविदास, भिकुलाल दुल्लभदास या त्या वेळच्या अतिशय नामी पेढ्या.  त्यांच्याकडे दिवाळीच्या फराळाचे आमंत्रण असे. वडील आणि काकांबरोबर आम्ही जात असू.
या आठवणीनी गलबलून आले म्हणून व दिवाळीचे टेलीफोनिक आशिर्वाद घ्यायला काका ब्रिजलालजी तथा भैयाजी यांना रावेरला फोन केला. बोलता बोलता ते त्यांच्या काळातील एक आठवण सांगताना खूपच हळवे झाले. १९४२ च्या दरम्यानची ती गोष्ठ. ते सांगत होते- 'वडील (म्हणजे आमचे आजोबा) जयकिसन व काका बालकिसन शेठ यांच्या वाटण्या दिवाळीपूर्वी झाल्या होत्या. लागलीच वडिलांना घराबाहेर काढले गेले. त्यावेळी त्यांचे घनिष्ठ मित्र रहेमान खां यांनी त्यांच्या हिश्यावर आलेल्या वाड्यात राहायला जायचा सल्ला दिला. हा वाडा मुस्लिम मोहोल्ल्यात (इमाम बाडा) होता. त्यावेळी त्याचे काहीही  वाटले नाही पण तो राहण्यायोग्य नव्हता. गुरे ढोरे तेथे बांधली  जात  व  शेती औजारे ठेवण्यासाठी एक खोली तेव्हढी होती. रहेमानखा चाचाने आपल्या मुलांना कामाला लावून रात्रीतून त्या वाड्यातील खोलीची साफ सफाई करविली. खोली सारविली आणि जयकिसन शेठचे सामान तेथे नेवून टाकले. दोनच दिवसांनी दिवाळी होती. ती कशी साजरी करायची असा प्रश्न होता. पण रहमान खा सह  मोहोल्यातील सांडू मिया, मुसे खा, बिस्मिल्ला खा, सय्यद धाबेवाले, गनी उमर कुलूपवाले आदीं मिठाई घेवून वाड्यावर आले, पाठोपाठ त्यांची मुले फटाके घेवून आलीत. बाबा (आमचे वडील) मी व बहिणींनी ती मनसोक्त उडविलीत. आम्ही सर्वांनी मिळून वाड्याच्या चारी बाजूला पणत्यांची रासच्या रास लावली. त्यात अख्खा वाडा उजळून निघाला. "मुस्लिम मोहोल्ले मे  हिंदु परिवार के  घर मुस्लिम भाईयो ने मनाया  दिवालीका वो अनोखा जश्न था". पान सुपारी झाली.  चाचा लोक त्यांच्या घरी परतायला उठले. वडिलांच्या डोळयाला धारा लागल्या होत्या. रहेमान खा  व वडिलांनी गळा भेट घेतली. कितीतरी वेळ ते बिलगून होते. रकताचे लोक परके झाले होते पण माणुसकी, मित्रता व धर्मनिरपेक्षतेने  खऱ्या अर्थाने तिचा परिचय घडविला होता. त्या आसवांची किंमत करणारी आणि मैत्रीचे मोल जाणणारी माणसं आता कमी कमी होत चालली आहेत ….'  काकां बोलत होते. त्यांचा स्वर जड झाला होता. स्वाभाविकच डोळेही भरून आले असावेत. मीही सुन्न झालो होतो. शेवटी मीच थांबवले त्यांना.  (क्रमश:)

No comments:

Post a Comment