मनोरंजनाचे समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय महत्व आधुनिक काळातही मान्य
झालेले असल्याचे मराठी विश्व कोषात म्हटले आहे, पण त्यासाठीच्या
साधनांच्या उपलब्धतेविषयीची परिस्थिती संशोधनाचाच विषय ठरावी. मनोरंजन वा
करमणुकीच्या अनेक साधनांपैकीच एक व महत्वाचे साधन म्हणजे चित्रपट. आज
घराघरांत टीव्ही संचांच्या माध्यमातून मनोरंजनाचे साधन उपलब्ध झालेले असले
तरी सार्वजनिक स्वरूपाच्या व सामुहिकपणे रंजनाचा आनंद घेता येणाऱ्या
चित्रपटगृह अगर नाट्यगृहासारख्या माध्यमांची उणीव त्यामुळे भरून काढता
येणारी नाही. घरात कुटुंबियांसमवेत बसून टीव्हीवर एखादा चित्रपट बघणे वेगळे
आणि बाहेर चित्रपटगृहात मित्र मंडळींसमवेत कुण्या चित्रपटाचा आस्वाद घेणे
त्याहून कितीतरी वेगळे. रावेरकर आज तरी या आनंदाला पारखे आहेत. तालुक्याचे
गाव असून आणि नगर परिषदेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असूनही
रावेरात आज घडीला एकही चित्रपटगृह चालू नाही की. पालिकेचे नाट्यगृह.
स्वातंत्र्यपूर्व काळात रावेरमध्ये कोष्टी वाड्यात 'सरस्वती थिएटर'
होते. रावेरातले ते पहिले थिएटर. रामभाऊ कमेटीवाले (वाणी) यांनी उभारलेल्या
या थिएटरात मूकपट दाखविले जात. पडद्यावर चित्र बघायचे आणि लाउड स्पीकरवर
त्या संबंधी वर्णनाची कामेंट्री ऐकायची, असे त्याचे स्वरूप सांगितले जाते.
कालांतराने ते बंद पडले. त्याच सुमारास १९३५/३८ च्या काळात आताच्या गांधी
चौकात श्रीमंत सेठ गोपालदास शिवलाल अग्रवाल यांनी तत्कालीन महत्वाकांशी
प्रकल्प म्हणून भव्य असे चित्रपटगृह बांधले होते. मुंबई नंतरचे ते त्याकाळी
एकमात्र बांधीव व आकर्षक थिएटर ठरले असते, पण या चित्रपटगृहाच्या पायऱ्या/
जिना थेट रस्त्यावर उतरत असल्याने तेव्हाच्या
ब्रिटीश सरकारने थिएटरला परवनगी च दिली नाही. त्यामुळे ते तसेच पडून
राहिले. बांधकाम विषयक नियमांचे पालन तेव्हा कसे कसोशीने केले जाई याचे हे
उत्तम उदाहरण ठरावे. पुढे पुढे त्यात रामलीलेचे कार्यक्रम होत तर
नंतर तेथे हातमाग वगैरे कापडांची प्रदर्शने भरत.
दरम्यान रावेरचे एकेकाळी नगराध्यक्ष राहिलेल्या विठ्ठलराव शंकरराव
नाईक यांनी बऱ्हाणपूर रोडवरील आपल्या एका माल गुदामाचे रुपांतर थिएटरात
करून 'स्वस्तिक टाकीज' सुरु केली. आता आतापर्यंत ती सुरु होती. नंतर आठवडे
बाजाराच्या टोकाला चंपालाल देवलालसेठ लोहार यांचे ओपन थिएटर 'लक्ष्मी' सुरु
झाले. तेव्हा धार्मिक चित्रपटांच्या भरीचा काळ होता. 'जय संतोषी माता' या
चित्रपटाने लक्ष्मी ओपन थिएटरचा प्रवास सुरु झाला. त्याकाळी तब्बल दोन
महिने हा चित्रपट चालल्याची आठवण चंपालाल सेठ सांगतात. शेजारच्या
पंचक्रोशीतून बैल गाड्यांनी व ट्रक्टर भरून बाया बापड्या यायच्या. त्यानंतर
हेच ओपन थिएटर लोहारांच्या स्वमालकीच्या जागेत म्हणजे आजच्या सावदा रोडलगत
स्थलांतरित झाले. 'जय हनुमान', 'भक्त प्रह्लाद' सारखे चित्रपट तेथे
हाउसफुल्ल चालल्याचे अनेकांना स्मरते. कालांतराने तेही बंद पडले.
नवीन पिढीच्या गरजा लक्षात घेऊन शारंगधर व भगवान रामलाल लोहार यांनी
आठवडे बाजाराच्या अलीकडे चर्मकार वाड्याजवळ 'तिरुपती चित्र मंदिर' उभारले
आहे. रावेरच काय पण, संपूर्ण जिल्ह्यात ते सर्वात आकर्षक व
प्रशस्त चित्रपटगृह असावे. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाने या
चित्रपटगृहाचा प्रारंभ झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्धापनदिनाला तेथे
हाच चित्रपट लावला जाई. पण नंतर तेही बंद पडले. आता आता पर्यंत त्याचा वापर
मंगल कार्यालय म्हणूनच केला जात होता. पण आता त्याचे पुनरुज्जीवन केले
जाणार असल्याचे शुभ वर्तमान आहे.
या चित्रपटगृहात लागणाऱ्या चित्रपटांचे जाहिरात फलक गांधी चौकातील
निंबाचे झाड व नाव्हेल्टी जनरल स्टोर्सवर तसेच बस स्थानकासमोरील तांगा
स्टयंडवर लागत. तेथून येता जाताना ते चटकन नजरेस पडत. आज ती झाडे ओकीबोकी
वाटतात.
पूर्वीच्या काळी गावाबाहेर असलेल्या बाहेरपुरयात 'हैदरी' चालत.
कलावन्तिणींचे कला केंद्रे चालत. आणे-दोन आण्याचे तिकीट त्यासाठी आकारले
जाई. गावातल्या बाहेरख्याली गुलछबुंचा तेथे रात्र रात्रभर राबता असे.
अख्खाजीच्या म्हणजे अक्षयतृतीयेच्या दिवशी बारागाड्या ओढल्या जाण्यापूर्वी
याच बाहेरपुरयातून कलावंतीणींचे तकतराव निघत. नंतर शिवाजी चौक, लेंडी पुरा व
बैठक या भागात तमाशांचे फड लागत. आता ती प्रथाही बंद पडली आहे. सुमारे दहा
बारा वर्षांपूर्वीपर्यंत गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात नाटकं / आर्केष्ट्रा
आणले जात असत. स्टेशन रोडवरील स्टेट बैंकेच्या गणेशोत्सवात मेलडी मेकर्स
आर्केष्ट्रा व बालकराम वरळीकर यांचा कार्यक्रम आलेला आम्ही पहिला आहे,
त्यासाठी पटांगणभरून गर्दी होई. आता गणेशोत्सवाचेच स्वरूप बदलले आहे. विविध
दर्ग्यावरच्या उरुसानिमित्त पहाटेपर्यंत कव्वालींचे मुकाबले पूर्वी होत.
पण आता ते दिवसही गेलेत.
मध्यंतरी नगर पालिकेने आठवडे बाजारातच पावर हाउसलगत एक नाट्यगृह
बांधले. तेथे नाटके आल्याचे आठवत नाही, पण सुरुवातीला तेथे कुस्त्या
झाल्याचे आणि नंतर त्याचेही मंगल कार्यालय करून टाकले गेल्याचे दिसून आले.
आज तर तेथे अशी काही झाडे झुडपे झाली आहेत की त्यामुळे रसिकांऐवजी
चतुष्पादांचा वावर राहणे स्वाभाविक ठरले आहे. थोडक्यात काय तर, गावात
मनोरंजनाची सार्वजनिक केंद्रेच उरलेली नाहीत. खेड्या पाड्यातीलच नव्हे
तर तालुक्याच्या गावातीलही नवीन पिढी जिल्ह्यस्तरीय शहराकडे का निघाली आहे,
त्यामागे हे देखील एक कारण असावे.
No comments:
Post a Comment