फार आदिम जमान्यातील गोष्ठ नाही, ४०/४५ वर्षांपूर्वी पर्यंत रावेर रेल्वे
स्टेशनवरून गावात यायचे तर जंगलातून आल्यासारखे वाटे. दोन्ही बाजूंनी हिरव्यागार
केळीच्या बागा होत्या. रस्त्याच्या कडेला जवळ जवळ लावलेली निंबाची भली मोठ्ठाली
झाडे होती. या गर्द झाडीतून वाट काढीत कुचकुचत टांगे चालत. घोड्याच्या टापेचा टप टप
आवाज आणि टांगे चालकाचे हाकारे शांततेला भेदत. टांग्यातून उतरून घरात आले की जणू
खूप मोठा पल्ला गाठल्याचे वाटे. पण एक नक्की होते, रेल्वे प्रवासात कितीही त्रास
अथवा दगदग झालेली असली तरी हा स्टेशन ते गावापर्यंतच्या प्रवासातील निसर्गाचा सहवास
सारा क्षीण संपवून टाके.
आजही स्टेशन व गावातले अंतर तेवढेच असले तरी त्यातील 'लांबी' व निसर्गाचे
दान मात्र संपल्यात जमा आहे. पूर्वी प्यासेंजर धरायची तर टांगेवाल्याकडून लोकेशन
घेऊन तासभर आधीच स्टेशनावर जाऊन बसावे लागे. त्यात तिला उशीर झा ला तर तेथेच
डबा खाऊन झाडाखाली ताणून देण्याची वेळ येई. गावात येतांना उजव्याकडेने पंपिंग
स्टेशन नंतर शनि मंदिर, तहसील / पोलिस कचेरी, सरदार जी जी हाईस्कूल, बारभाई जीन तर
डाव्या बाजूने थेट जुन्या सावदा रोडच्या कोपऱ्यावर म्हणजे तहसील कचेरीसमोर
पालिकेचा जकात नाका, आजच्या बस स्थानकासमोर सरकारी दवाखाना आदी मोजकीच ठिकाणे होती.
देवी मंदिरासमोर टांगे थांबत. भुसावळ, जळगावकडे रस्तामार्गे जायला तेथूनच वाहन
भेटे. या मंदिरापुढील चौकातुनच आजच्या पोस्टा समोरच्या रस्त्याने बऱ्हाणपूरकडे जाता
येई. थोडक्यात रावेर गाव त्या देवी मंदिरापासून सुरु होई.
आज स्टेशन गावाजवळ आल्यासारखे वाटते. कारण स्टेशन ते देवी मंदिरादरम्यान
न्यायालयाची इमारत, गोपाल नगर, रामचंद्र नगर, शिक्षक कालनी, यशवंत कालेज, मार्केट
कमिटी, एम जे मार्केट, भाऊसाहेब देशमुख यांचे मुक्तद्वार वाचनालय, नवे बस स्थानक,
विविध बँका अशी किती तरी नवीन वसाहती, दुकाने व ठिकाणे आकारास आली आहेत. निर्मनुष्य
राहणारा हा परिसर आता इमारतींनी, माणसांनी व त्यांच्या वाहनांनी पार भरून गेला
आहे. पूर्वी बस स्थानक रस्त्यालगतच होते. आता ते काहीसे पाठीमागे गेले आहे. देवी
मंदिरासमोरचे टांगा स्टेन्ड बस स्थानकासमोर आले आहे, पण ते आता टांग्यासाठी न राहता
आटो रिक्शा स्टेन्ड बनले आहे. टांगेच मुळात कमी कमी होत चालले आहेत. कारण एक तर
रिक्शा आल्या आणि दुसरे म्हणजे टांगे चालकांची नवी पिढीही अन्य व्यवसायाकडे वळली
आहे. तहसील कचेरी समोरील जकात नाका मध्यंतरी वाचनालयाजवळ आला होता, आता तोही
राहिलेला नाही. पूर्वी बसेस कचेरी समोरील म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील
रस्त्याने सावदा, भुसावळकडे जात. आता त्यासाठी डॉ आंबेडकर चौकातून रस्ता झाला
आहे.
डॉ आंबेडकर चौक आज जेथे आहे तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोल नाला होता.
स्टेशन ते गावाला जोडणारा एकच रस्ता व त्याला सरकारी दवाखान्यापासून देवी
मंदिरापर्यंत लोखंडी कठडे होते. या कठड्याला रेलून वा त्यावर बसून अनेकजण बिड्या
फुकत. हा नाला ६० च्या दशकात भराव टाकून बुजविण्यात आला. कुणी मुल्लाजीनी त्याचा
ठेका घेतला होता. तामसवाडीच्या खदानीतून बैल गाड्यांद्वारे डबर माती आणून हे काम
केले गेले. आमच्याही दोन बैल गाड्या त्यासाठी प्रति दिनी प्रत्येकी ५ रुपये भाडे
दराने कामावर जात होत्या म्हणे. तिन्ही बाजूनी रस्ते करून मध्यभागी उरलेला खड्डा
तर अलीकडे म्हणजे ८० च्या दशकात बुजवला गेला. त्याच सपाटीकरणावर आज महामानव डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा आहे. श्री बबनलाल भिकुलाल अग्रवाल रावेरचे
नगराध्यक्ष असताना दि. ९ एप्रिल १९७९ रोजी ज्येष्ट नेते श्री. रा. सु. गवई यांच्या हस्ते व श्री. मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या
पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. स्टेशन / अजंदा / निंभोरा, सावदा /
भुसावळ, बऱ्हाणपूर / खंडवा व रावेर गाव अशा चहु बाजूंना जोडणारा चौक म्हणून आज तो
रावेरचा मुख्य चौक ठरला आहे. … (क्रमश:)
No comments:
Post a Comment