समाजाच्या बेभानपणाचे
बळी!
किरण अग्रवाल
किरण अग्रवाल
आपल्या हातून काही चुकले अगर काही वेडे-वाकडे, अप्रिय प्रकारात मोडणारे कृत्य घडले तर कुणीतरी आहे कान धरणारा; अशी व्यवस्था कुटुंबात आणि समाजातही होती तोपर्यंत बरेच काही सुरळीत चालत असे, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. ज्याचा धाक बाळगावा असे फारसे कुणी उरले नाही. कायदेशीरदृष्ट्या ज्यांचा धाक बाळगावा त्या पोलिसांची भीती हल्ली कुणी बाळगेनासे झाले म्हटल्यावर इतरांची चर्चा काय करायची? त्यामुळे अनिर्बंधता वाढलेली दिसणे स्वाभाविक ठरले आहे.
पूर्वी शाळेतल्या गुरुजींचा किती धाक होता ! त्यांनी सांगितलेला गृहपाठ केला नसेल तर दुसऱ्या दिवशी शाळेत जायचीच हिंमत होईना, कारण एक तर वर्गातल्या बाकावर उभे राहायच्या शिक्षेची किंवा गुरुजींच्या हातातील छडीची भीती वाटे. ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ असे त्यामुळेच म्हटले जाई. खरेही होते ते. गुरुजींचा तो धाक आयुष्याला वळण लावणारा ठरे. तो धाक आणि त्याचबरोबरचा गुरुजींबद्दलचा आदर आज वर्गात मोडून पडलेल्या खुर्चीसारखाच ठरला आहे. अर्थात, त्याला कारणेही अनेक आहेत. त्यातील प्रमुख एक म्हणजे, विद्यार्थी व पालकांना लाभलेले कायद्याचे कवच. आज विद्यार्थी गृहपाठ करून येवो अगर न येवो, त्याला छडीने मारण्याचे काय; ती साधे उगारण्याचेही धारिष्ट्य शिक्षक करू शकत नाही. कारण कायदे असे काही आहेत की, कोण विद्यार्थी अथवा त्याचा पालक शालेय शिक्षेला ‘छळा’च्या व्याख्येत बसवून गुरुजींना किंवा त्यांच्या शाळेला कोर्टात खेचेल याचा नेम नाही. म्हणजे हादेखील धाकच आहे, पण जरा वेगळा. विद्यार्थ्यांना नव्हे शिक्षकांना तो वाटतो, इतकेच. केंद्र सरकारने सन २000 मध्ये सुधारित बालहक्क कायदा मंजूर केला होता. त्यानंतर २००६ आणि २०११ मध्ये त्यात दुरुस्तीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची किंवा बालकांची छळवणूक अगर त्यांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक कायद्याच्या कचाट्यात आल्याने यासंबंधीच्या घटना निश्चितच घटल्या आहेत, हेही खरे; परंतु कायद्याच्या जंजाळात नको अडकायला म्हणून शिक्षकवर्गही हातात छडी घेण्ययाऐवजी हाताची घडी घालून राहू लागला आहे. परिणामी प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे ‘धाक’ नावाचा प्रकारच अस्तंगत होऊ पाहतोय. शाळेत ना शिक्षकांचा धाक, घरात ना वडीलधाऱ्यांचा धाक व समाजात ना समाजधुरीणींचा धाक, अशी ही मोठी विचित्र स्थिती आहे.
महत्त्वाचे म्हणजे, धाक ओसरतोय हे जितके खरे त्यापेक्षा अधिक गंभीर म्हणजे संवेदनशीलताही क्षीण होत चालली आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्यात आपण घरात किंवा नोकरीच्या ठिकाणी कुलरसमोर किंवा पंख्याखाली बसून घाम न येण्याची काळजी घेत असताना असंख्य बालके मात्र तप्त उन्हात वीटभट्ट्यांवर पोटाचा चिमटा करून राबताना दिसतात, पण आपल्यातील बहुसंख्यांना त्याबाबत साधी हळहळ वाटत नाही. ‘सिग्नल’वर पायात चप्पल न घालता डांबरी रस्त्याचा चटका सोसत व दोन्ही हातांचा कटोरा करीत आशाळभूतपणे आपल्याकडे नजर लावणाऱ्या बालकांना पाहून अनेकजण साधी आपल्या चारचाकी वाहनाची काच खाली करण्याची तसदीही घेत नाहीत, तेव्हा संवेदनांचा गळा घोटला जात असल्याचीच जाणीव झाल्याखेरीज राहात नाही. अशा अनेक घटना, प्रसंगांची येथे जंत्री देता येऊ शकेल, ज्यातून संवेदना बोथट होत चालल्याचेच दिसून यावे. अर्थात, सारे तसेच आहेत आणि कुणीही माणुसकी दाखवत नाही, अशातला भाग नाही. काही उजेडाचे दिवे नक्कीच आहेत, ते त्यांच्यापरीने लुकलुकत असतातच; पण अंधकारलेला भाग अधिक जागा व्यापून आहे हेदेखील खरे.
ही सारी चर्चा येथे यासाठी की, साधी चकली चोरून खाल्ल्याच्या संशयातून दोन अल्पवयीन मुलांचे मुंडण करून त्यांची नग्नावस्थेत धिंड काढली गेल्याचा प्रकार उल्हासनगरात नुकताच घडला आहे. पोटातल्या भुकेने या बालकांना चोरीस उद्युक्त केले असावे, पण माणुसकी इतकी निष्ठूर व्हावी? संवेदना इतक्या रसातळाला जाव्यात की, त्याची शिक्षा गळ्यात चपालांची माळ घालून नग्न धिंड काढण्यापर्यंतच्या अघोरी पद्धतीने दिली जावी? खरेच समाजमन हेलावून सोडणारा हा प्रश्न आहे. पै-पैशांत वा रुपयांत आम्ही व्यवहारातील यशाचे मापदंड मोजू पाहतो, पण भुकेल्या बालकाने चोरून का होईना खाल्लेल्या चकलीतून त्याच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या समाधानाला कसे मोजणार? चोरीचे समर्थन करता येऊ नये, परंतु खाण्याच्या पदार्थासाठी तशी वेळ त्या बालकांवर यावी यात दोष कुणाचा, कशाचा; हेही कधी तपासले जाणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. उल्हासनगरातील या घटनेपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक वेगळी घटना घडली. घरालगतच्या शेतात खेळावयास गेलेल्या एका चिमुरडीने आंब्याच्या झाडाखाली पडलेल्या कैऱ्या कुणालाही न विचारता उचलून घेतल्या म्हणून संबंधित शेतमालकाने तिला झिंज्या धरून बदडून काढल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. म्हटले तर बालसुलभतेतून घडलेला हा प्रकार. पण कोणत्या अमानवीयतेच्या परिणामापर्यंत पोहोचला? या घटनांप्रकरणी कायदेशीर काय कारवाई व्हायची ती होईलच, परंतु यामागील कारणांबद्दल समाजानेही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. समाजातील वाढत्या बेभानपणामुळे बालकांचे बालपण कसे हरवत चालले आहे, याची वेगळ्या पद्धतीने जाणीव करून देणाऱ्या या घटना आहेत.
No comments:
Post a Comment