Friday, July 28, 2017

Editor's View published on 27 July, 2017 in Lokmat Online

आमदार कडू यांची बखेडा बहाद्दरकी!

किरण अग्रवाल

सदानकदा झगडण्याचीच सवय जडलेल्या व्यक्तींना साधे प्रश्नही सामोपचाराने अगर झगडण्याखेरीज सोडविता येत नाहीत. वाद वा झगडा हाच त्यांचा स्थायिभाव बनलेला असतो आणि अशी वादग्रस्तता जेव्हा प्रसिद्धीही देऊन जाताना दिसते, तेव्हा संबंधितांकडून ती प्रतिमा जपण्याचाच प्रयत्न आवर्जून केला जाणे स्वाभाविक असते. विदर्भातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी नाशकात महापालिका आयुक्तांवर हात उगारण्याचा जो अगोचरपणा केला, तोही त्यांच्या आक्रमक प्रतिमा जपणुकीतूनच ओढवलेला असून, सदर प्रकार आजवरच्या त्यांच्या ‘बखेडा बहाद्दरकी’ला साजेसाच म्हणायला हवा.

‘बदनाम हुए तो क्या हुवा, ‘नाम’ तो हुवा’ या भूमिकेतून काम करणारे अनेकजण हल्ली अनेक क्षेत्रात व ठिकठिकाणी आढळून येतात. येनकेन प्रकारे प्रसिद्धीचा झोत आपल्यावर ओढवून घ्यायचा, एवढाच अशांचा हेतू असतो. अर्थात, कार्यकर्तेपणाच्या प्राथमिक पातळीवर असे होणे एकवेळ अपवाद म्हणून समजूनही घेता यावे. शिवाय, सारेच प्रश्न समजूतदारीने सुटत नसतात हेदेखील खरे. आपल्याकडील नोकरशाही अशी काही निगरगट्ट झाली आहे की, रूढ अर्थाने तिला अंगावर घेतल्याखेरीज ती जागची हलत नाही. त्यामुळे कधी कधी रौद्रावतार धारण करावाही लागतो. परंतु प्रस्थापित झालेले नेतृत्वही जेव्हा केवळ रौद्रावताराच्या किंवा आक्रमकतेच्याच बळावर प्रश्नाची सोडवणूक करू पाहतात आणि विशेषत:, आमदारकीच्या अनुषंगाने संसदीय विशेषाधिकार असणारी व्यक्तीही त्याच मार्गाने जाऊ पाहते, तेव्हा त्यातून प्रश्न मार्गी लागण्याऐवजी भलतेच वाद आकारास येतात; शिवाय संबंधित व्यक्तीच्या ‘वादग्रस्त’तेत भर पडून जाणेही क्रमप्राप्त ठरते. आमदार कडू यांच्याकडून महापालिका आयुक्तांवर हात उगारला गेल्याच्या प्रकरणातूनही तेच घडून आले आहे.



मुळात आमदार बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमतेसाठीच ख्यातकीर्त आहेत. सामान्यजनांच्या प्रश्नांवर नित्यनवी आंदोलने करण्यातून व ती आक्रमकतेने पुढे नेण्यातूनच त्यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले व त्याच शिदोरीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा आसरा न घेता ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. म्हटले तर ही चांगलीच बाब. शेवटी सामान्यांना आपल्या सुखदु:खाशी एकरूप होणाराच प्रतिनिधी हवा असतो. कडू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून तेच केले. त्यामुळे चळवळ्या व कार्यकर्ता आमदार अशीही त्यांची ओळख बनली. ही ओळख जपताना आक्रमकता त्यांनी सोडली नाही. उलट तिचे नवनवे टप्पे गाठायचा जणू प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. मस्तवाल झालेल्या यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठी आक्रमकता गरजेची असते वगैरे सारे खरे; परंतु प्रत्येक वेळीच ती उपयोगाची नसते. कडू हे विधानसभेचे सदस्य असल्याने जो विषय बाहेर रस्त्यावर सोडवता येणे शक्य नाही तो विधिमंडळात उपस्थित करून सोडवून घेणे त्यांना अशक्य नाही. नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकात अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या तीन टक्के निधीच्या विनियोगाचा विषय तर तसा किरकोळ आहे. तो स्थानिक पालिका प्रशासनाशी चर्चेतून सुटणारा वा सोडविला जाणारा आहे. त्याचसाठी कडू यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास प्रारंभ होत असताना तेथे उपस्थित राहण्याऐवजी नाशकात धाव घेतली व आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासोबत चर्चा केली. ती करताना शब्दाला शब्द भिडला व त्याला वादाचे वळण लाभून कडू यांनी कृष्णांवर हात उगारण्याची मजल गाठली गेली. परिणामी पुढे पोलिसांत गुन्हा नोंदविला जाऊन कडू यांना अटक व जामीन तसेच झाल्या प्रकाराचा निषेध, लेखणी बंद आंदोलन आदी घडून आले. परंतु प्रस्तुत विषयासाठी एवढी ‘हमरी-तुमरी’ची गरज होती का, हा यातील खरा मुद्दा आहे.

आमदार कडू यांनी या प्रकरणात अनावश्यक आक्रमकता दर्शविल्याने ते बातमीचा विषय बनून गेले, मात्र मूळ प्रश्नाचे काय हा विषय कायम आहेच. कुठल्याही प्रश्नी तंटा-बखेडा करण्याची कडू यांची कार्यशैली आहे. बखेडा बहाद्दुरगिरी म्हणून तिच्याकडे पाहता यावे. लोकांना असले प्रकार आवडतात कारण आपण जे करू शकत नाही ते दुसरा कुणी करतो आहे म्हटल्यावर त्याकडे ‘नायक’ म्हणून बघण्याची आपल्याकडे सवय आहे. त्यामुळे या शैलीला साजेशेच वर्तन त्यांच््याकडून नाशकातही घडले. आतापर्यंत शेतकरी कर्जमाफीवरून सुरू असलेल्या आंदोलनात अतिशय मुद्देसूद, अभ्यासाने व प्रखरपणे भूमिका मांडणारे तसेच सरकारवर शाब्दिक आसूड ओढणारे कडू नाशिककरांना पहावयास मिळाले होते. आता अधिकाऱ्यावर हात उगारणारे कडू पहावयास मिळाले. त्यातून त्यांची आक्रमक प्रतिमा जपली गेली खरी; पण तेच काय, कोणत्याही लोकप्रतिनिधीची अशी वा एवढी आक्रमकता कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. यंत्रणेच्या निर्ढावलेपणावर प्रहार आवश्यक असला तरी असल्या प्रकाराला उत्तेजन मिळता कामा नये, एवढेच यानिमित्ताने.

Thursday, July 20, 2017

Editor's View published on 20 July, 2017 in Lokmat Online

तारतम्य व संवेदनशीलतेचाच अभाव...
 

किरण अग्रवाल

सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हारगुच्छ न देण्याचे निर्देश केंद्रीय गृहखात्याने दिल्याच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी विवंचनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसाला भेटायला येणाऱ्यांना पुष्पगुच्छ-हारतुरे न आणण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागल्यामुळे विकाासकामांसाठीच्या निधीत कपातही करण्यात आली आहे. परंतु एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आलिशान गाड्यांची खरेदी करायला निघाले असेल तर त्याबाबत सरकारच्या तारतम्याचा तसेच संवेदनशीलतेचाच प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.


  
शेतकऱ्यांसाठी नुकतीच जी ऐतिहासिक कर्जमाफी घोषित करण्यात आली आहे, त्यापोटी सुमारे ३४ हजार कोटींपेक्षा अधिकचा भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. या चलन चणचणीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी खर्चात काटकसरीचे निर्देश दिले आहेत. ही काटकसर केवळ आस्थापना खर्चात करून भागणार नाहीच, त्यामुळे विकासकामांनाही कात्री लावत ‘बजेट’ आवाक्यात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यातील विकासकामांवर परिणाम करणारा हा निर्णय आहे. साधे नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घ्यायचे तर, सन २०१७-१८ साठी जिल्हा नियोजन विकास कार्यालयाने सुमारे ३२१ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर केला होता. यात सूचनेप्रमाणे कपात करीत हा आराखडा २३१ कोटी रुपयांवर आणण्यात येणार आहे. म्हणजे तब्बल ९० कोटी रुपयांच्या कामांना ‘कात्री’ लावण्यात येत आहे. शिवाय, ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्वाधिक खर्च करणारे खाते म्हणून पाहिले जाते, त्यात जुनी कामे पूर्ण केल्याशिवाय नवीन कामांना प्रशासकीय मान्यताच न देण्याचे सुचविले आहे. परिणामी नाही म्हटले तरी, विकास अडखळेल. अर्थात, विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे कितीही सांगितले जात असले तरी अखेर पैशाचे सोंग आणता येत नाही हेच खरे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीची नाजुक अवस्था लक्षात घेता सढळ हस्ते काहीही करणे शक्य होणारे नाही. काटकसर करावीच लागेल. अनावश्यक प्रवर्गात मोडणारी किंवा निकडीची नसणारी कामे टाळावीच लागतील. पण एकीकडे अशी ओढाताण व विकासकामांसाठीच्या खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबवावे लागत असताना दुसरीकडे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी इनोव्हा गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सरकारमधील ‘कर्त्यां’च्या तारतम्याची वा संवेदनशीलतेची चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरले आहे.

मुळात, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित केली गेल्याने सरकारी तिजोरीवर ताण आल्याचे सांगताना व त्यातून विकासकामांना कात्री लावत असताना दुसरीकडे निव्वळ अ‍ॅम्बेसिडरमधून फिरणे आवडत नाही म्हणून उंची वाहने खरीदण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने ती बाब टीकेला निमंत्रण देणारीच ठरावी. राज्यात अशी २२५ वाहने असावीत व त्यातही खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये ती सर्वाधिक असावीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. सदरचा निर्णय सद्यस्थितीत म्हणजे आर्थिक बिकटावस्थेच्या काळात समर्थनीय ठरू शकणार नाही हे उघड असतानाही त्याबद्दल ‘तारतम्य’ बाळगले गेले नाही. शिवाय हा विषय इतकाच मर्यादित नसून सरकारची संवेदनहीनता उघड करणाराही म्हणायला हवा. कारण पुन्हा तेच, जनसामान्यांच्या कामांवरील खर्चात कपात करून अतिमहत्त्वाच्या म्हणविणाऱ्यांना आरामदायी वाहनात फिरवायची काळजी घेतली जात असेल तर त्याकडे संवेदनहीनतेखेरीज काय म्हणून पाहता यावे? नाही तरी अलीकडे अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे मंत्रिपदावरील वगैरे मंडळी सरकारी गाड्यांमधून कुठे फिरतात? ते अधिकतर स्वत:च्या वाहनात असतात व त्यांच्यामागे राजशिष्टाचाराला धरून सरकारी वाहने धावत असतात. तरी नवीन गाड्यांचा सोस धरला जात असेल तर सामान्यांच्या भुवया वक्री होणारच!

विशेष म्हणजे, भलेही काटकसरीचा भाग नसेल; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पुष्पगुच्छ न स्वीकारण्याचा निर्णय अलीकडेच घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील आपल्या वाढदिवसाला कोणी फलक, बॅनर्स लावू नयेत त्याऐवजी ज्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा करावी, असे आवाहन केले आहे. यातून पंतप्रधान व मुख्यमंत्री या दोघांचीही संवेदनशीलता दिसून यावी. परंतु एकीकडे शीर्षस्थ नेत्यांची अशी भूमिका असताना राज्यातील त्यांचेच अनुयायी मात्र आपल्या ऐशआरामासाठी उंची वाहने खरीदण्यासारखा निर्णय घेऊन नेमके संवेदनाहीनतेचा प्रत्यय आणून देताना दिसावेत हे परस्परविरोधाभासी तर आहेच, सरकार एकविचार वा एक भूमिकेने चालत नसल्याचेही त्यातूून उघड होऊन जाणारे आहे.

Thursday, July 13, 2017

Editor's View published on 13 Jully, 2017 in Lokmat Online.



सरणावर ‘समृद्धी’!
 
किरण अग्रवाल 
 
जगातल्या कोणत्याही प्रकल्पासाठी दिले गेले नाही इतके विक्रमी ‘विस्थापन पॅकेज’ शासनाने घोषित करूनही ‘समृद्धी’ महामार्गाला कायम असलेला विरोध आणि त्यासाठी आत्महत्यांकरिता शेतांमध्ये रचून ठेवलेले सरण व झाडा-झाडांवर बांधून ठेवलेले फास पाहता, सदरचा प्रश्न सरकारी ‘खाक्या’ने नव्हे तर सुसंवादाच्या माध्यमातूनच सोडवला जाण्याची गरज अधोरेखित होऊन गेली आहे. 

मध्यंतरी शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात मोठे आंदोलन उभे राहिल्याने ‘समृद्धी’चा प्रश्न काहीसा मागे पडला होता. परंतु ‘ऐतिहासिक’ म्हणविली गेलेली कर्जमाफी जाहीर करूनही जसा तो प्रश्न निकाली निघालेला नाही व संपूर्ण कर्जमाफीसाठीचे आंदोलन सुरूच आहे; त्याप्रमाणे नागपूर ते मुंबईदरम्यान होणाऱ्या समृद्धी द्रूतगती महामार्गाचा प्रश्नही सुटू शकलेला नाही. त्यासाठी जमीन घेताना पाचपट मोबदला देण्याचादेखील ‘ऐतिहासिक’ निर्णय घेतला गेला, मात्र तरी या मार्गाची बिकट वाट सुकर होण्याची चिन्हे नाहीत. शासनाने भूसंपादनासाठीचे सुधारित दर जाहीर केल्यावर सदरचा विषय पुन्हा तीव्र रूप धारण करीत पुढे आला आहे. विशेषत: या महामार्गासाठी जमीन देण्यास नाखुश असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी जमिनीच्या मोजणीसाठीच विरोध करताना झाडांवर गळफास टांगून ठेवले होते, आता त्यांनी चक्क सरण रचून ठेवले आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या 
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...
या रचनेची प्रकर्षाने आठवण व्हावी अशी ही स्थिती आहे. यावरून यासंबंधीचा विरोध किती टोकाचा बनला आहे आणि ‘समृद्धी’च कशी सरणावर आली आहे याचीही कल्पना यावी.
 
 

मुळात, आम्हाला आमच्या जमिनीच द्यायच्या नाहीत तर त्याची किंमत दुप्पट देण्याचा किंवा आता पाचपट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशीच शेतकऱ्यांची भूमिका आहे. तथापि मध्यंतरी या महामार्गाशी संबंधित दहाही जिल्ह्यांतील प्रकल्पबाधितांची जी बैठक औरंगाबाद येथे झाली होती, त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशीी भेटून-बोलून समन्वयातून मार्ग काढण्याचा मध्यम मार्ग सुचविला होता. परंतु तसा प्रयत्न होण्यापूर्वीच सरकारने नवीन दरपत्रक जाहीर केल्याने थंडावलेला विषय अधिक उग्रपणे उफाळून येणे स्वाभाविक ठरून गेले आहे. खरे तर जेव्हा ठरावीक किंवा चाकोरीबद्ध सरकारी पद्धतीतून विषय मार्गी लागत नसतात, तेव्हा सामोपचार, संयम व संवाद या त्रिसूत्रीचाच आधार घेत ते सोडविणे शहाणपणाचे असते. पण तेच होत नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या महामार्गास प्रारंभापासून विरोध होत असताना त्यादृष्टीने आश्वासक पाऊले उचलली गेली नाहीत. उलट खासगी समन्वयकांच्या बळावर व नंतर प्रांत तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीतून त्यासाठी प्रयत्न केले गेलेत; परंतु लोकांमध्ये, लोकांसोबत राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन व प्रकल्पबाधितांशी चर्चा करून प्रश्न हाताळण्याचे प्रयोग फारसे घडून आले नाहीत. ‘समृद्धी’चा प्रश्न त्यामुळेच जटिल बनून पुढे आलेला दिसतो आहे.

याप्रश्नी होणारा जागोजागच्या शेतकऱ्यांचा विरोध पाहता शरद पवार यांनी पुढाकार घेतला असला तरी ‘राजकारण’ म्हणून समृद्धीला विरोध करावा असे पवार नक्कीच नाहीत. त्यांच्याही आजवरच्या प्रदीर्घ सत्ताकाळात विकासासाठी काहींचे विस्थापन घडून आले आहेच. मुद्दा फक्त इतकाच की, तसे करताना सर्वांना विश्वासात घेण्याची भूमिका असावी लागते. ‘समृद्धी’प्रश्नी ती न दिसता सरकारी बळावर रेटून नेेण्याचेच प्रयत्न दिसतात, म्हणूनच पवार यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची भूमिका मांडली होती. शिवाय या विषयात सुरुवातीपासून म्हणजे पवार यांच्याही अगोदरपासून लक्ष पुरविलेल्या ‘भाकप’चे नेते भालचंद्र कांगो यांनीही अलीकडेच सरण रचून त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जो दौरा केला त्यात अशीच भूमिका स्पष्ट केली आहे. ‘विकासाला विरोध नाहीच, तर कायदा धाब्यावर बसवून दडपशाहीने सरकार जे धोरण राबवते आहे त्याला आपला विरोध आहे’, असे कांगो यांनी म्हटले आहे. परंतु त्यादृष्टीने प्रत्यक्ष संवादातून प्रकल्पबाधिताना विश्वासात घेण्याऐवजी सरकार ‘फेसबुक’सारख्या सोशल माध्यमात उतरून याही बाबतीतली ‘ऐतिहासिकता’ दर्शविण्यात धान्यता मानत आहे. असे गंभीर व अडचणीचे विषय चव्हाट्यावर चघळून सुटत नसतात, उलट त्याबाबत अधिक बभ्रा न करता ते चार भिंतीत चर्चा करून सोडविणे अधिक हिताचे असते. पण तेवढे वा तसे भान न राखता विषय हाताळला जाताना दिसतो आहे. अर्थात, हाताबाहेर चाललेल्या या विषयाची जाण सरकारलाही झाल्याने की काय, आता शुक्रवारी (दि. १४) शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रकल्पबाधितांची बैठक होऊ घातली असल्याने संवादातून समृद्धीचा मार्ग प्रशस्त होण्याची अपेक्षा बाळगता यावी.

Thursday, July 6, 2017

Editor's View published on 06 Jully, 2017 in Lokmat Online

दीप्तेशच्या ‘हॅकिंग’ने शिकवलेला धडा!
 
 किरण अग्रवाल
 
कोणतीही बाब मोफत वा सहजासहजी उपलब्ध झाली की तिची ‘किंमत’ राहात नाही, असे नेहमी म्हटले जाते. आता काळानुरूप त्यात किंचितसा बदल करायला हवा. कारण, सहज हाताळता येणाऱ्या तंत्राचा गैरवापर केला गेला तर त्याची मोठी ‘किंमत’ चुकवावी लागण्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. यात ‘किंमत’ हा फॅक्टर कॉमन असला तरी, एकात त्याचे मोल नसल्याचा अर्थ गृहीत आहे, तर दुसऱ्यात तो बऱ्या-वाईट परिणामांच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. मोबाइल चॅटिंग व व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगच्या माध्यमातून ‘नसते’ उद्योग करून बसलेल्या राजस्थानातील दीप्तेश सालेचा या तरुणावर दुसऱ्या संदर्भाने अशीच किंमत मोजण्याची वेळ आली आहे.

 
तरुणाई हल्ली ‘मोबाइल’मध्ये गुंतली आहे. घरी असो, दारी असो, शाळा-महाविद्यालयात असो, की नोकरी-धंद्याच्या ठिकाणी; प्रत्येकजण ‘मोबाइल’मध्ये डोके घालून बसलेला आढळून येतो. मोबाइल वेडाची उपमा देता यावी, इतके वा असे तरुणांचे गुरफटलेपण त्यातून आकारास आले आहे. तरुणांचेच काय, रांगता न येणारी बाळं जेव्हा मोबाइल खेळताना दिसतात, तेव्हा त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलण्याची जणू अहमहमिकाच त्यांच्या माता-पित्यात वा आजी-आजोबात लागलेलीही दिसून येते, इतका काळ गतीने पुढे सरकला आहे. अर्थातच, ही ‘गती’मानता राखण्यासाठी, ती अधिकाधिक ग्राहकात बिंबवण्यापासून जोपासण्याची पराकाष्ठा संबंधित कंपन्यांकडून केली जाणे स्वाभाविक आहे, कारण तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यातूनच त्यांच्यात स्पर्धा होऊन कमीत कमी किमतीत नेट, डाटा अगर ‘वाय-फाय’सारख्या बाबी उपलब्ध करून देण्याची होड लागली आहे. या कमी किमतीत व प्रसंगी मोफतही मिळणाऱ्या सदर सेवांच्या आहारी जाणारी पिढी फावल्या वेळेतच काय, कामाच्या वा शिक्षणाच्याही वेळेत मोबाइल खेळताना नसत्या उपद्व्यापात अडकली की मग ‘किमती’ने कमी असलेली ही सेवा किती जबर ‘किंमत’ मोजायला कारणीभूत ठरते हेच दीप्तेशच्या प्रकरणावरून लक्षात घेता यावे.


 
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील जसोलगावचा दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा हा बी.कॉम.च्या अंतिम वर्षाला असलेला पंचविशीतला तरुण. लहान भावाच्या प्लॅस्टिक कॅरिबॅग विक्रीच्या दुकानात उपलब्ध असलेल्या ‘वाय-फाय’ सुविधेचा लाभ घेत त्याने वेगवेगळ्या साइट्सवरून हॅकिंगच्या टीप्स मिळवल्या व त्यानंतर जसोलगावात बसून राजस्थान व गुजरातमधील काही शहरांसह महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक व पुण्यातील डॉक्टर्स, उद्योजक आदि. प्रतिष्ठित महिलांचे सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप अकाउण्ट हॅक करून त्यांच्या मित्रत्वाच्या यादीत असलेल्यांना अश्लील संदेश पाठविण्याचा व फोन करून अश्लील बोलण्याचा मनोविकृत उपद्व्याप केला. फक्त व्हॉटस्अ‍ॅपच नव्हे तर फेसबुक, इन्स्टाग्राम व जी-मेलचे अकाउंटही हॅक करून त्याने अनेकांशी अश्लील संवाद साधला. एकापाठोपाठ एक असे हॅकिंगचे गुन्हे नोंदविले गेल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून दीप्तेशचा हा वाह्यातपणा शोधून काढला व त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. निव्वळ सहज वा मोफत उपलब्ध आहे म्हणून फालतूपणातून त्याने हा वेडाचार केल्याचे चौकशीत पुढे येत आहे. दीप्तेशचे वडील हयात नाहीत, घरात आई व एक लहान भाऊ आहे. त्याचे स्वत:चे शिक्षण सुरू आहे. शिक्षण पूर्ण करून आईला समाधानाचे दिवस दाखविण्याऐवजी तो या वाममार्गाला लागला आणि अखेर पोलिसांना सापडला.
 
इत्यर्थ इतकाच की, तरुणवर्ग चटकन कशाच्याही आहारी जातो. तसे होताना बऱ्या-वाईटाचा विचार करण्याचा विवेक त्यांच्यात असतोच असे नाही. फुकट वा सहज मिळतेय ना, मग घ्या ओरबाडून; अशा मानसिकतेतून काहीजण भलत्याच मार्गाला लागतात आणि अंतिमत: आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्याही स्वप्नांची वाताहत करून बसतात. प्रत्येक कुटुंबाने व समाजानेही यासंबंधातील धोका ओळखून पाल्यांकडे लक्ष पुरविण्याची खबरदारी घेणे कसे वा किती गरजेचे बनले आहे, याचा धडा दीप्तेशच्या प्रकरणावरून मिळून गेला आहे. आणि तो फक्त तेवढ्यापुरताही मर्यादित नाही तर मोबाइल व त्याद्वारे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आपल्या खासगी माहितीच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याची शिकवण देणाराही ठरला आहे.

Saturday, July 1, 2017

Saraunsh published in Lokmat on 02 Jully, 2017


Editor's View published on 29 June, 2017 in Lokmat Online

‘रेशन’मधील बायोमेट्रिक तंत्र ठीक; पण..
 
 किरण अग्रवाल

कोणत्याही प्रणालीत काळाप्रमाणे बदल करून नव्या तंत्राचा अवलंब गरजेचाच असतो, अन्यथा मागे पडण्याचा धोका संभवतो. पण हा बदल घडवताना जुनी दुखणी दुर्लक्षून चालत नसते. कारण, त्या दुखण्याचे निराकरण न करता नव्याच्या नवलाईत गुंतायचे म्हटले तर जुनी दुखणी अधिक वेदनादायी अगर गहिरी होतात. राज्यातील रेशन धान्य दुकानांत ‘बायोमेट्रिक तंत्र’ लागू करताना तसेच काहीसे होताना दिसत आहे.
 
 सरकारी अंग असलेल्या काही यंत्रणा अगर खात्यांची ‘ख्याती’ अशी काही होऊन बसली आहे की त्यांच्याबाबत अपवादानेच चांगले बोलले जाते. यात पोलीस खात्यापाठोपाठ महसूल यंत्रणेचा नंबर लागतो. कारण, या खात्यांमध्ये त्यांच्याशी संबंधित काम असलेल्या सामान्य व्यक्तीस क्वचितच चांगला अगर समाधानकारक अनुभव येतो. त्यातही महसूलमधील अन्न व नागरी पुरवठा खाते असेल तर विचारायलाच नको, इतकी या खात्याची ‘महती’ मोठी आहे. पुरवठा खाते म्हणजे उंदरांनीच नव्हे, तर मोठ्या घुशींनी पोखरलेले खाते म्हटले जाते, कारण त्यात ठायीठायी पोखरायला वाव असल्याचेच आजवर अनेक प्रकरणांतून दिसून आले आहे.  रॉकेल असो की रेशन दुकानासाठीचे धान्य, खुल्या म्हणजे काळा बाजारात पकडले गेल्याच्या अनेक घटना आजही सर्वत्र घडतच असतात. नाशिक जिल्ह्यातील सुरगाण्यातील रेशन धान्य घोटाळ्याचे उदाहरण घ्या. त्याची चर्चा तर थेट विधिमंडळात गाजली. सुमारे पाचेक कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात आठ तहसीलदारांसह १३ जणांवर निलंबनाची कारवाई केली गेली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गोंधळ-गडबड यामुळे अधोरेखित झाल्याने यासंबंधीच्या काळ्या बाजाराला चाप लावण्यासाठी शासनाने दोषींवर चक्क ‘मोक्का’न्वये कारवाई करण्याची घोषणा केली. यानंतर काही प्रमाणात नक्कीच सुधारणा होताना दिसून आली. 


 
 सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अनागोंदी रोखताना सर्वप्रथम गॅसधारक शोधण्यात आले व त्याआधारे रॉकेल घेणाºयांचा आकडा काढून त्या तुलनेत रॉकेल पुरवठ्याचा मेळ घालण्यात आला, परिणामी रॉकेलच्या काळा बाजारावर नियंत्रण आले. आता अन्नधान्य पुरवठ्याच्या बाबतीतही तोच प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शिधापत्रिका आधार कार्डशी जोडल्या जात असून, त्यापुढील टप्पा म्हणून ‘बायोमेट्रिक’ प्रणालीने रेशनच्या धान्य वितरणाची व्यवस्था उभारली जात आहे. त्याअंतर्गत ग्राहक म्हणजे शिधेसाठी शासनाने प्राधान्य दिलेल्या कुटुंबातील शिधापत्रिकाधारक रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी आला की त्याच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे मशीनवर घेतले जातील. तसे केल्यावर लगेच त्याच्याशी संबंधित माहितीच्या तपशिलाची पावती मिळेल आणि त्याआधारे दुकानदार धान्य मोजून देईल. प्रथमदर्शनी पारदर्शकतेची खात्री वाटावी अशी ही व्यवस्था आहे. शासनातर्फे हे जे प्रयत्न केले जात आहेत ते नि:संशय चांगल्यासाठीच आहेत. कामकाजात पारदर्शकता येऊन खºया गरजूंपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचविण्यात त्यामुळे मदतच होणार आहे; परंतु ‘बायोमेट्रिक’सारखे नवीन तंत्र लागू करताना त्यासाठी आवश्यक त्या पूर्वतयारीची खबरदारी न घेता त्याची थेट अंमलबजावणी केली जात असल्याने शासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे. 
 
 ‘बायोमेट्रिक’ प्रणालीच्या अवलंबाची चर्चा फार पूर्वीपासून होती. परंतु त्यासाठी आवश्यक ठरणारे ‘डेटा फिडिंग’ म्हणजे माहितीची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्याने तिची अंमलबजावणी रखडली होती. विद्यमान अवस्थेतही त्याबाबत फार प्रगती झालेली नाही. तरी कार्यवाही सुरू केली गेली आहे. संपूर्ण राज्यात ही व्यवस्था लागू केली जात आहे. परंतु नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घ्या; सदरची बायोमेट्रिक प्रणाली यशस्वी होण्यासाठी रेशन ग्राहकांच्या माहितीचे जे संगणकीकरण होणे अपेक्षित आहे ते जिल्ह्यात फक्त १२, तर नाशिक शहरात अवघे ८ टक्के इतकेच झाले आहे. म्हणजे, अनुक्रमे तब्बल ८८ व ९२ टक्के ‘डाटा’ उपलब्ध नसताना रेशन दुकानदारांच्या हाती आॅनलाइन व्यवहारासाठीचे ‘पॉइंट आॅफ सेल’ (पॉस) मशिन्स सोपविले जात आहेत. तेव्हा, मशिन्स आले तरी संगणकीकृत माहितीच उपलब्ध नसेल तर त्यांचा काय व कसा उपयोग होणार? या मशिन्सची देखभाल, त्यासाठीची अन्य साधन-सुविधा याबाबी तर वेगळ्याच. रेशन दुकानदारांच्या कामात पारदर्शकता आणू पाहणाºया सरकारच्या निर्णयाबाबतच शंका उपस्थित व्हावी असे हे प्रकरण असून, त्यामुळेच कोट्यवधींच्या मशिन्स खरेदीची घाई कशासाठी, असा प्रश्न केला जात आहे.
 
 सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक वितरण प्रणालीत काळा बाजार करणारे असले तरी सारेच तसे नाहीत. परंतु रेशन दुकानदार हा कितीही प्रामाणिकपणे सेवा देत असला तरी त्याच्याकडे संशयानेच पाहण्याची सवय सरकारी व्यवस्थेला जडून गेली आहे. त्यातून रेशन धान्य दुकानदारांच्या अडचणी व मागण्यांकडे आजवर लक्षच दिले गेले नाही. मालाच्या वाहतुकीचा खर्च, साठवणुकीतील तूट, दुकानाचे भाडे, हमाली आदि.चे नुकसान सोसून अतिशय तुटपुंज्या कमिशनवर ते दुकान चालवित आहेत. हे तुटपुंजेपणही किती, तर क्विंटलभर धान्यामागे अवघे ७० रुपये. एवढ्यात कुणाचेही कसे भागेल, हा विचारात घेण्यासारखा साधा मुद्दा आहे. शिवाय याबाबतीत होत असलेल्या शासकीय अनास्थेचे एकच उदाहरण पुरेसे ठरावे ते म्हणजे, शासकीय धान्य गुदामातून थेट रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोच करून देण्याची जबाबदारी शासनाची असताना तसे होत नाही. दुकानदारांनाच त्यासाठी झळ सोसावी लागते. म्हणूनच अनेकदा गुदामातून निघालेला माल वाटेत काळ्या बाजारात गेलेला दिसून येतो. तेव्हा, दुकानदारांच्या अशा अडचणी व त्यासंबंधीच्या त्यांच्या मागण्यांकडेही शासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. पण ते होत नाही म्हणून आता रेशन धान्य दुकानदार राजीनामे देण्याच्या मानसिकतेत आले आहेत. जागोजागी त्यासंबंधीचे ठराव होत आहेत. तसे झाले तर सार्वजनिक वितरण व्यवस्थाच कोलमडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पारदर्शकता ही एकतर्फी अपेक्षेतून आणि केवळ नवीन तंत्राने येणार नाही. त्यासाठी आजवरच्या समस्यांचा मागोवा घेत त्यांचे निराकरणही गरजेचे आहे. रेशन धान्य वितरणात बायोमेट्रिकचा अवलंब करताना शासनाने तेच प्राधान्याने करणे अपेक्षित आहे.