Thursday, July 6, 2017

Editor's View published on 06 Jully, 2017 in Lokmat Online

दीप्तेशच्या ‘हॅकिंग’ने शिकवलेला धडा!
 
 किरण अग्रवाल
 
कोणतीही बाब मोफत वा सहजासहजी उपलब्ध झाली की तिची ‘किंमत’ राहात नाही, असे नेहमी म्हटले जाते. आता काळानुरूप त्यात किंचितसा बदल करायला हवा. कारण, सहज हाताळता येणाऱ्या तंत्राचा गैरवापर केला गेला तर त्याची मोठी ‘किंमत’ चुकवावी लागण्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. यात ‘किंमत’ हा फॅक्टर कॉमन असला तरी, एकात त्याचे मोल नसल्याचा अर्थ गृहीत आहे, तर दुसऱ्यात तो बऱ्या-वाईट परिणामांच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. मोबाइल चॅटिंग व व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगच्या माध्यमातून ‘नसते’ उद्योग करून बसलेल्या राजस्थानातील दीप्तेश सालेचा या तरुणावर दुसऱ्या संदर्भाने अशीच किंमत मोजण्याची वेळ आली आहे.

 
तरुणाई हल्ली ‘मोबाइल’मध्ये गुंतली आहे. घरी असो, दारी असो, शाळा-महाविद्यालयात असो, की नोकरी-धंद्याच्या ठिकाणी; प्रत्येकजण ‘मोबाइल’मध्ये डोके घालून बसलेला आढळून येतो. मोबाइल वेडाची उपमा देता यावी, इतके वा असे तरुणांचे गुरफटलेपण त्यातून आकारास आले आहे. तरुणांचेच काय, रांगता न येणारी बाळं जेव्हा मोबाइल खेळताना दिसतात, तेव्हा त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलण्याची जणू अहमहमिकाच त्यांच्या माता-पित्यात वा आजी-आजोबात लागलेलीही दिसून येते, इतका काळ गतीने पुढे सरकला आहे. अर्थातच, ही ‘गती’मानता राखण्यासाठी, ती अधिकाधिक ग्राहकात बिंबवण्यापासून जोपासण्याची पराकाष्ठा संबंधित कंपन्यांकडून केली जाणे स्वाभाविक आहे, कारण तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यातूनच त्यांच्यात स्पर्धा होऊन कमीत कमी किमतीत नेट, डाटा अगर ‘वाय-फाय’सारख्या बाबी उपलब्ध करून देण्याची होड लागली आहे. या कमी किमतीत व प्रसंगी मोफतही मिळणाऱ्या सदर सेवांच्या आहारी जाणारी पिढी फावल्या वेळेतच काय, कामाच्या वा शिक्षणाच्याही वेळेत मोबाइल खेळताना नसत्या उपद्व्यापात अडकली की मग ‘किमती’ने कमी असलेली ही सेवा किती जबर ‘किंमत’ मोजायला कारणीभूत ठरते हेच दीप्तेशच्या प्रकरणावरून लक्षात घेता यावे.


 
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील जसोलगावचा दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा हा बी.कॉम.च्या अंतिम वर्षाला असलेला पंचविशीतला तरुण. लहान भावाच्या प्लॅस्टिक कॅरिबॅग विक्रीच्या दुकानात उपलब्ध असलेल्या ‘वाय-फाय’ सुविधेचा लाभ घेत त्याने वेगवेगळ्या साइट्सवरून हॅकिंगच्या टीप्स मिळवल्या व त्यानंतर जसोलगावात बसून राजस्थान व गुजरातमधील काही शहरांसह महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक व पुण्यातील डॉक्टर्स, उद्योजक आदि. प्रतिष्ठित महिलांचे सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप अकाउण्ट हॅक करून त्यांच्या मित्रत्वाच्या यादीत असलेल्यांना अश्लील संदेश पाठविण्याचा व फोन करून अश्लील बोलण्याचा मनोविकृत उपद्व्याप केला. फक्त व्हॉटस्अ‍ॅपच नव्हे तर फेसबुक, इन्स्टाग्राम व जी-मेलचे अकाउंटही हॅक करून त्याने अनेकांशी अश्लील संवाद साधला. एकापाठोपाठ एक असे हॅकिंगचे गुन्हे नोंदविले गेल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून दीप्तेशचा हा वाह्यातपणा शोधून काढला व त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. निव्वळ सहज वा मोफत उपलब्ध आहे म्हणून फालतूपणातून त्याने हा वेडाचार केल्याचे चौकशीत पुढे येत आहे. दीप्तेशचे वडील हयात नाहीत, घरात आई व एक लहान भाऊ आहे. त्याचे स्वत:चे शिक्षण सुरू आहे. शिक्षण पूर्ण करून आईला समाधानाचे दिवस दाखविण्याऐवजी तो या वाममार्गाला लागला आणि अखेर पोलिसांना सापडला.
 
इत्यर्थ इतकाच की, तरुणवर्ग चटकन कशाच्याही आहारी जातो. तसे होताना बऱ्या-वाईटाचा विचार करण्याचा विवेक त्यांच्यात असतोच असे नाही. फुकट वा सहज मिळतेय ना, मग घ्या ओरबाडून; अशा मानसिकतेतून काहीजण भलत्याच मार्गाला लागतात आणि अंतिमत: आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्याही स्वप्नांची वाताहत करून बसतात. प्रत्येक कुटुंबाने व समाजानेही यासंबंधातील धोका ओळखून पाल्यांकडे लक्ष पुरविण्याची खबरदारी घेणे कसे वा किती गरजेचे बनले आहे, याचा धडा दीप्तेशच्या प्रकरणावरून मिळून गेला आहे. आणि तो फक्त तेवढ्यापुरताही मर्यादित नाही तर मोबाइल व त्याद्वारे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आपल्या खासगी माहितीच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याची शिकवण देणाराही ठरला आहे.

No comments:

Post a Comment