Thursday, April 26, 2018

Editors view published in Online Lokmat on 26 April, 2018

पीळ काही सुटेना...!

किरण अग्रवाल

गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल व त्या पाठोपाठच्या देशातील काही पोटनिवडणुकांमधील पराभवानंतर भाजपाकडून शिवसेनेबाबत सावध पावले टाकली गेल्याचे मध्यंतरी दिसून आले असले तरी; या दोघांतील आढ्यतेची दरी रुंदावतच चालल्याचे निदर्शनास येते आहे. ‘नाणार’ प्रकल्पावरून या दोघांत जी हमरीतुमरी सुरू आहे त्यावरून तर ते दिसून यावेच, शिवाय विधान परिषदेच्या काही जागांसाठी उमेदवार घोषित करतानाही उभयतांनी आपापल्या मनमर्जीचा जो प्रत्यय आणून दिला, त्यातूनही तेच स्पष्ट व्हावे.

सत्तेच्या चालू पंचवार्षिक काळात भाजपा व शिवसेनेतील संबंध प्रारंभापासूनच ओढाताणीचे राहिले आहेत. या दोघा पक्षातील ‘युती’ तशी सर्वात जुनी व अखंडित राहिलेली असली तरी यंदा विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वबळ आजमावले आणि अखेरीस सत्तेसाठी पुन्हा निवडणुकोत्तर ‘युती’ केली. त्यामुळे त्यांच्यातील सांधा जुळू शकलेला नाही. अर्थात, शिवसेनेचा चिवटपणा असा की, बाहेर रस्त्यावर त्यांच्याकडून भाजपाविरोधी भूमिका प्रदर्षिली जात असली तरी, सत्तेला लाथ मारण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता या दोघांतील बेबनावाकडे लुटुपुटुची लढाई म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. अशातही, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा निर्धार व्यक्त केल्याने शिवसैनिक कामाला लागले आहेत. भाजपाही ‘शत-प्रतिशत’च्या अपेक्षेत आहेच. त्यामुळे दोघांकडून आपापले बळ जोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांच्या गृहराज्यातील निवडणुकीत त्यांच्या पक्षाची सत्ता राखताना जी दमछाक झाली ती पाहता, हवेत उंच उडालेले त्यांच्या अपेक्षांचे फुगे काहीसे जमिनीकडे आले. उत्तर प्रदेश व बिहारच्या अलीकडील पोटनिवडणुकांच्या निकालांनी या फुग्यांमधील हवा आणखीनच कमी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे एकीकडे स्वबळाच्या निर्धाराने तलवार परजत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयम व सामोपचारानेच निभावताना दिसत होते. परंतु कोकणात होऊ घातलेल्या नाणारच्या पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा भडका उडून गेला आहे.


महत्त्वाचे म्हणजे, गुजरात निवडणुकीमधील दमछाक, पोटनिवडणुकांतील पराभव व विरोधकांनी चालविलेली एकजूट पाहता पुन्हा शिवसेना-भाजपातील ‘युती’चे संकेत मध्यंतरी मिळू लागले होते. त्यामुळेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षित असलेले इच्छुक शिवाजी सहाणे मुंबई मुक्कामी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून आले होते. पुढे त्यांची शिवसेनेतून गच्छंती झाली हा भाग वेगळा; परंतु उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांत ‘युती’ची आशा बळावून गेली असताना पुन्हा फटाके फुटू व वाजू लागले आहेत. यातच विधान परिषदेच्या काही जागांची निवडणूक लागली असून, त्यात नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेनेने नरेंद्र दराडे यांची एकतर्फी उमेदवारी घोषित केली, तर त्यापाठोपाठ दुसºयाच दिवशी शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने मुंबईमधून अनिलकुमार देशमुख व नाशिक विभागातून अनिकेत विजय पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे संभाव्य ‘युती’च्या अपेक्षांवर आपसूकच पाणी फिरून जाणे स्वाभाविक ठरले.

भाजपा व शिवसेनेतील संबंध असे वा इतके ताणले गेले आहेत की, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या मोजक्या जागांसाठी लागलीच ‘युती’ने सामोरे जाणे त्यांना कदाचित बरोबर वाटलले नसावे, परंतु यानिमित्ताने केल्या जाणाºया प्रचारातून आणखी वितुष्टाच्या काठिण्याची पातळी गाठल्यावर व मतविभागणीचा फटका सहन करावा लागल्यावर विधानसभा निवडणुकीसाठी जर ‘युती’चीच अपरिहार्यता ओढवली तर ती मतदारांना कितपत स्वीकारार्ह ठरेल हा यासंदर्भातील खरा प्रश्न आहे. पण तसला विचार न करता भाजपा-शिवसेनेची पावले पडत आहेत, जणू ‘युती’ होणे नाही. गेल्या खेपेप्रमाणे स्वबळ सिद्ध न झाल्यास निवडणुकोत्तर ‘युती’चा मार्ग खुला ठेवून लढण्याचेच त्यांनी ठरविलेले त्यातून दिसून यावे. शिवाय त्यांना आपल्या आत्मविश्वासाचीच परीक्षाही यातून घ्यायची असावी. या दोहोंचा सांधा जुळेना व पीळ काही सुटेना, अशी जी स्थिती आज दृष्टिपथास पडते आहे ती त्यामुळेच.

Wednesday, April 18, 2018

Editors view published in Online Lokmat on 19 April, 2018

सरकारी हेरगिरी !

किरण अग्रवाल

महसुली यंत्रणेतील वाढती बेपर्वाई एकीकडे टीकेची बाब ठरली असतानाच दुसरीकडे या यंत्रणेत बोकाळलेला भ्रष्टाचारही किती चिंतेचा विषय बनून गेला आहे, हे त्यासाठी सरकारला नियुक्त कराव्या लागलेल्या खासगी एजन्सीवरून लक्षात यावे. यातून ‘महसुला’तील वाढत्या भ्रष्टाचारावर तर शिक्कामोर्तब घडून यावेच, शिवाय सरकारचा आपल्याच यंत्रणेवर विश्वास उरला नसल्याचेही स्पष्ट व्हावे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशी हेरगिरी ही सरकारी यंत्रणांचे मनोबल खच्ची करणारी व नैसर्गिक, घटनादत्त व्यवस्थेच्या चौकटी उद्ध्वस्त करणारीही ठरणार आहे.

हाताची घडी मोडता येते, परंतु महसुली खात्याकडून घातली गेलेली मांडी म्हणजे पायाची घडी भल्याभल्यांना मोडता येत नाही असे नेहमी म्हटले जाते. यातील रोख हात ओले केल्याखेरीज कामे न होण्यावर, अर्थात भ्रष्टाचारावर असतो हे वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळेच की काय, महसूल विभागातील कामावर देखरेखीकरिता व तेथील भ्रष्टाचाराच्या निपटाऱ्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील महसूल अधिकाºयांच्या आढावा बैठकीत बोलताना खुद्द राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच ही माहिती दिल्याने, अच्छे दिन दाखविण्याचे सांगत व भ्रष्टाचार मोडून काढण्याचा वादा करीत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारलाही भ्रष्टाचार निपटणे शक्य झालेले नाही हेच स्पष्ट व्हावे. या ‘आउट सोर्सिंग’च्या निर्णयाने व निमित्ताने आपल्या खात्यातील भ्रष्टाचार रोखू न शकल्याची कबुली देताना पाटील यांनी स्वत:चा गृहजिल्हा कोल्हापुरात लाचलुचपत विभागाने एका दिवसात सहा छापे घातल्याचेही सांगितले. त्यामुळे या खात्याचे मंत्री म्हणून त्यांचे स्वत:चे व पर्यायाने सरकारचे अपयशही यातून उजागर होऊन गेले आहे.


महत्त्वाचे म्हणजे, केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतर सत्ताबाह्य शक्तींचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार केली जात असतानाच सरकारी खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकृतपणे खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. आपल्या व्रात्य पाल्याची मानगूट दुसºयाच्या हाती देण्याचा हा प्रकार असून, आधुनिक वा वैध हेरगिरी म्हणूनच याकडे पाहता येणारे आहे. तसेही विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी हेरगिरीचे आरोप होत आहेतच. येथे मात्र सरकारतर्फे केली जाणारी हहेरगिरी नसून खासगी एजन्सीमार्फत सरकारचीच हेरगिरी केली जाणार आहे इतकाच काय तो फरक. म्हणजे शासनामार्फतच शासकीय खात्यातील हेरगिरी होऊ घातली आहे. ही बाब साधी नसून गंभीर स्वरूपात मोडणारी आहे, कारण महसूल खात्यावर नियंत्रण वा वचक न राहिल्यानेच त्यात भ्रष्टाचार वाढला असा अर्थ तर यातून काढता येणारा आहेच; पण चंद्रकांत पाटील यांचा स्वत:च्या अखत्यारितील यंत्रणेवर भरोसा राहिला नसल्याचेही त्यातून अधोरेखित होणारे आहे. तसेच असेल तर अशा नेतृत्व व सरकारकडून जनतेने ‘अच्छे दिन’ची अपेक्षा तरी कशी करावी, हा प्रश्न उपस्थित होणे अप्रस्तुत ठरू नये.

मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनंतर दुसºया स्थानी असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे समंजस नेतृत्व म्हणून पाहिले जाते. बहुजनांमध्ये पक्षाचा पाया विस्तारण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पण ते करताना त्यांनी त्यांच्या नाशिक दौºयात विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या राष्टवादीच्या व त्यातही भुजबळ समर्थक आमदार जयंत जाधव यांच्याकडे सदिच्छा भेट देऊन उगाच संशयाची पुटे गहिरी केलीत. पक्ष कार्यालयाची पायधूळ झाडून कार्यकर्त्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याऐवजी किंवा अडगळीत पडलेल्या पक्षाच्याच एखाद्या नेत्या, कार्ययकर्त्याकडे जाण्याऐवजी या अशा सदिच्छाभेटी त्यांनी घेतल्याने भाजपेयींच्याच भुवया उंचावणे स्वाभाविक ठरले आहे. अर्थात, अशा भेटी खासगी स्वरूपाच्याच असतात हेही खरेच; परंतु त्यातून जाणारे संदेश परिणामकारी असतात. तेव्हा जाधव यांच्या भेटीतून पाटील यांना कोणता संकेत द्यावयाचा होता हे तेच जाणोत. मात्र, त्यांच्या यंदाच्या नाशिक दौºयाने विविधांगी चर्चेची कवाडे उघडून दिली आहेत हे नक्की.

Thursday, April 12, 2018

Editors view published in Online Lokmat on 12 April, 2018

इतके का मरण स्वस्त ?

किरण अग्रवाल

शरीर व तब्येत साथ देत नसल्याने बिछान्यावर पडून का होईना, जगण्याची अनेकांची धडपड एकीकडे दिसून येत असताना दुसरीकडे शुल्लक कारणांपोटी शिकली-सवरलेली तरुण मुलं गळफास लावून घेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तेव्हा संवेदनशील मन हेलावून गेल्याखेरीज राहात नाही. अपयश वा त्यातून आलेले नैराश्य हे प्रत्येकालाच अस्वस्थ करते; पण ते टाळण्यासाठी झगडा करायचा सोडून आयुष्यच संपवायचे, हा विचारच पराभूत मानसिकतेचे निदर्शक ठरावा. आजच्या तरुणपिढीत अशी मानसिकता बळावणे हे केवळ दुर्दैवी नसून, ते समाजाचेही अपयशच अधोरेखित करणारे म्हणायला हवे.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा तसा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. त्यातही तरुणांचा सहभाग होताच. पण, त्याखेरीज म्हणजे शेतीतून बिघडलेल्या अर्थ व कुटुंबकारणाव्यतिरिक्त अन्य कारणांतून ज्या आत्महत्या होतात त्यातही तरुणांचे प्रमाण मोठे दिसून येत असल्याने तरुणपिढीच्या कमकुवत मानसिकतेचा प्रश्न विदारकपणे समोर येऊन गेला आहे. अडचणी वा अपयश पचवता न येण्यातून अगर त्यातून बाहेर पडण्याची उमेदद गमावण्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते आणि उच्च विद्याविभूषित मुलेही अशी हिंमत हारताना दिसून येतात, ही यातील शोचनीय बाब आहे. नाशकातीलच या आठवड्यातली उदाहरणे घ्या, चंदनपुरीचे (मालेगाव) संजय भोसले, पाथर्डी परिसरातील सोनू मनोज गरड यांच्या आत्महत्त्यांपाठोपाठ प्रख्यात उद्योजक उदय खरोटे यांचा संगणक अभियंता असलेला पुत्र अजिंक्य व व्यावसायिक चंद्रकांत बोथरा यांचा सनदी लेखापालाचे शिक्षण घेणारा पुत्र गौरव यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यातील अजिंक्यने तर तोंडात गॅस सिलिंडरची नळी घेऊन व गॅस पोटात घेऊन जीवन संपविण्याचा अभिनवच मार्ग पत्करला. सुंदर आयुष्याची स्वप्ने पाहण्याच्या काळात का संपवावी त्यांनी अकाली अशी जीवनयात्रा, हा संशोधनाचा वेगळा विषय ठरावा; परंतु आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरू नये म्हणून गॅस ग्रहणाची शक्कल लढवण्यापर्यंतच्या निर्धाराने हे तरुण आपला शेवट करून घेतात, हेच डोके सुन्न करणारे आहे.


यानिमित्ताने आत्महत्यांच्या बाबतीत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, जगभरात दरवर्षी सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करीत असल्याची माहिती हाती आली. यातील १७ टक्के आत्महत्या भारतात होतात. प्रतिदिनी ते प्रमाण सुमारेे ३०० इतके असल्याचे देशाच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीवरून आढळून येते. या ब्यूरोने देशातील २०१४ मधील आत्महत्यांचा जो आकडा दिला आहे तो १,०९,४५६ इतका आहे. यात आजारपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक ४७,२४२ इतके होते, तर त्याखालोखाल कौटुंबिक कारणांतून आत्महत्या करणाºयांची संख्या २८ हजारांपेक्षा अधिक होती. याखेरीज लग्नकार्याशी व प्रेमप्रकरणाशी संबंधित तसेच परीक्षेतील अपयश, हुंडा, प्रॉपर्टीचे वाद, गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधिनता आदी अनेकविध कारणांतून आत्महत्या घडून येत असतात. विशेष म्हणजे, लोकप्रिय अभिनेते व नेत्यांच्या निधनानंतर आक्रोश करीत चक्क आत्महत्या करणाºया भक्त वा समर्थकांचे प्रमाण मोठे असणाºया तामिळनाडूपेक्षाही महाराष्ट्रातील आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. खरोखर चक्रावून टाकणारीच ही बाब आहे.

कशातून घडून येते हे, असा प्रश्न यासंदर्भात उपस्थित होत असला तरी, मानसिक तणाव व मनाच्या खचलेपणातून या आत्महत्या घडून येतात असे त्याचे निर्विवाद उत्तर असते. तेव्हा, हे खचलेपण व विशेषत: तरुणांमधले नैराश्य कसे रोखता येईल हा खरा आणि महत्त्वाचा ठरणारा प्रश्न आहे. आजच्या धकाधकीच्या काळात साºयांनाच धावावे लागत आहे. तरुणवर्गाच्या अपेक्षा मोठ्या असतात, त्या अपेक्षांची पूर्ती चटकन व्हावी यासाठी ते अधिक परिश्रमाने प्रयत्नरत असतात. पण, मध्येच एखादा अडचणीचा ‘गतिरोधक’ आला तर त्यावर आदळून त्यांची मन:स्थिती बिघडते. अशावेळी घरातील कर्त्या किंवा वडिलधाºयांशी त्यांचा संवाद असला तर त्यातून त्यांना धीर मिळून ते सावरले जातात, अन्यथा नैराश्याच्या गर्तेत अडकतात. दुर्दैवाने आज प्रत्येकच जण ‘बिझी’ झाला आहे. ज्याला कुणाला फारसे काम नसते तेही मोबाइलच्या महाजालात इतकके व्यस्त असतात, की पाल्यांकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ मिळत नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळेही यात भर पडून गेली आहे. अनुभवाच्या किंवा युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे आजी-आजोबा गावात आणि कमावती मुले शहरात, असे कुटुंब चित्र आकारास आले आहे. त्यामुळेही कुटुंबातला संवाद हरवला आहे. मुलांशी मित्र बनून वागण्या-बोलण्याची गरजच ओळखली जात नाही, परिणामी मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढीस लागून मानसिक असुरक्षा भेडसावू लागते. त्यातूनच ‘लाथ मारीन, तिथे पाणी काढेन’ यासारख्या आशावादाऐवजी निराशा बळावते. तीच पुढे आत्मघाताच्या मार्गावर नेते. तेव्हा तरुणपिढीशी संवादच नव्हे तर सुसंवाद साधला जाणे व कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात बिंबवणे यासंदर्भात गरजेचे ठरावे. याच अनुषंगाने मुलांना मोठे होऊ द्या, त्यांच्यापरीने त्यांना बागडू द्या, त्याचे स्वातंत्र्यही द्या; पण त्यांचे बोट सुटू देऊ नका, अशी अपेक्षा पालकांकडून केली जाणे गैर ठरू नये.

Thursday, April 5, 2018

Editors view published in Online Lokmat on 05 April, 2018

संशयाचे भूत भयंकर !

किरण अग्रवाल

नाते कोणतेही असो, कुटुंबातले की अगदी ग्राहक व व्यावसायिकातले; ते विश्वासाच्याच बळावर टिकते. अविश्वास जिथे आला तिथे नाते जुळू शकत नाही व जुळलेले नाते टिकूही शकत नाही. शिवाय, या अविश्वासाच्याच हातात हात घालून संशय फोफावत असतो, जो जरा अधिकचा घातक ठरतो. नात्यातील संशयातून ‘नरेचि केला हीन किती नर’चा प्रत्यय तर वेळोवेळी येतच असतो. अलीकडच्या काळातील सोशल मीडियाचे वाढलेले प्रस्थ व अनेकांचे त्यातील गुंतण्यातूनही असाच संशय बळावण्याच्या घटना वाढत असून, तो नव्याने चिंता तसेच चिंतनाचा विषय बनू पाहत आहे.

प्रगतीचे मापदंड हे तसे नेहमी व्यवस्था व साधन-सामग्रीशी निगडित राहिल्याचे दिसून येते. ही भौतिक प्रगती भलेही डोळे दिपवणारी असली तरी, विचार व वर्तनाने माणूस प्रगत झाला का; या प्रश्नाचे उत्तर अजूनही नकारात्मक आल्याखेरीज राहत नाही. एरव्ही स्त्रीशक्तीच्या पूजेची, तिच्या स्वातंत्र्य व सन्मानाची चर्चा केली जाते; परंतु खरेच का दिले जाते तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचे, जगण्याचे स्वातंत्र्य हादेखील तसा सनातन प्रश्न आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियावर ‘माझी कन्या माझा अभिमान’सारख्या मोहिमांत सहभागी होणारे अनेकजण कन्येच्या घराबाहेरील फिरण्या-भेटण्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात जी बंधने घालताना दिसून येतात किंवा ‘सातच्या आत घरात’ अशी अपेक्षा बाळगतात ते कशामुळे? तर जमान्याबद्दलचा अविश्वासच त्यामागे असतो. पण तसे असतानाच पाल्यांवर पालकांचा व कुटुंबीयांवर आपला विश्वास तरी कुठे उरला आहे हल्ली?



अविश्वास व त्याच्या जोडीने उद्भवणाऱ्या संशयाबद्दलचे हे प्रदीर्घ प्रास्ताविक यासाठी की, या बाबींना आता सोशल मीडिया व प्रगत साधनांचा हातभार लागताना दिसून येत आहे. याचसंदर्भात ‘लोकमत’ माध्यम समूहाचे एडिटर इन चीफ श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी फेसबुकवरून दिलेला सावधानतेचा इशारा गांभीर्याने घेता येणारा आहे. ‘तुम्ही तुमच्या जोडीदाराचा फोन त्याच्या/तिच्या नकळत तपासून पाहिला तर तो गुन्हा ठरणार असून, त्याबद्दल तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास व ८७ लाखांचा दंड होऊ शकतो...’, असा हा इशारा आहे. ‘सध्या भारतात असा नियम नाही; पण सौदी अरेबियाने व्यक्तीचे खासगी स्वातंत्र्य आणि समाजाच्या नैतिकतेचे रक्षण करण्यासाठी हा कडक कायदा केला आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. इशारा म्हणून तर याकडे पाहता यावेच; पण सवय वा संशयातून जडलेली विकृती म्हणूनही त्याकडे बघता येणारे आहे. कारण अशी तपासणी ही विश्वासाचा घात करणारी तर असतेच असते, शिवाय ती व्यक्तिस्वातंत्र्य आणि नैतिकतेवर आघात करणारीही असते. त्यामुळे वैचारिक संकुचितता सोडून याविषयाकडे बघितले जाणे प्राथम्याचे ठरावे. हे यासाठीही महत्त्वाचे की, अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ होत असून, त्यामुळे उद्भवणारे कुटुंबकलह पोलीस ठाण्ययांपर्यंत पोहोचत आहेत व त्यातून सामाजिक व्यवस्थेलाच धक्के बसताना दिसत आहेत.

आपला मोबाइल तपासणाºया पत्नीला तिच्या पतीने केलेली बेदम मारहाण व नंतर जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीची नाशिकच्या एका पोलीस स्टेशनमध्ये अलीकडेच नोंदविली गेलेली घटना यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरावी. पतीचा मोबाइल तपासण्याची गरज पत्नीला का भासावी, या साध्या प्रश्नातून यातील संशयाचे पदर उलगडणारे आहेतच; पण सहचराबद्दलच्या अविश्वासाने पती-पत्नीतील नाते किती ठिसूळ वळणावर येऊन थांबले आहे तेदेखील यातून स्पष्ट होऊन जाणारे आहे. अर्थात, ही झाली एक घटना जी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. परंतु असे असंख्य पुरुष व महिला असाव्यात ज्यांना या पद्धतीच्या परस्परांकडून होणाºया तपासणीला सामोरे जाण्याची वेळ येत असावी. नात्यातले, मग ते पती-पत्नी, वडील-मुलगी, भाऊ-बहीण, दीर-भावजई असे कुठलेही असो; त्यातले बंध या अविश्वासापायी किती कमजोर होऊ पाहत आहेत हा यातील चिंतेचा मुद्दा आहे.

याबाबतीत येथे आणखी एका उदाहरणाचा दाखला देता येणारा आहे, जो नोकरदार महिलांच्या मानसिक कुचंबणेकडे लक्ष वेधण्यास पुरेसा आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या व कौटुंबिक तणाव स्थितीतील समुपदेशक म्हणून काम करणाºया अनिता पगारे यांनी सोशल माध्यमावरच त्याची चर्चा घडवून आणली आहे. एका नोकरदार महिलेचा पती आपली पत्नी झोपी गेल्यावर तिच्या मोबाइलची चेकिंग करतो आणि मग मध्यरात्री तिला उठवून ‘हे असेच का केले’ वा ‘तसेच का केले’ म्हणून तिची हजेरी घेतो. ती महिला याबद्दल तिच्यापरीने खुलासे करते. सोशल नेटवर्किंगसाठी असे करावे लागते, त्यात काही लफडे नसते... वगैरे समजावण्याचा प्रयत्न करते. परंतु शिव्याशाप व मारझोडीला सामोरे जाण्याखेरीज तिच्या हाती काही लागत नाही, अशी एक हकीकत अनिताने ‘शेअर’ केली आहे. यावर कुठल्या जमान्यात आहोत आपण, असा प्रश्नच पडावा. स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा या केवळ व्यासपीठीय भाषणांपुरत्या व उत्सवी स्वरूपाच्याच राहिल्याचे आणि परिणामी ‘ती’च्या सन्मानाचे, समानतेचे वा अधिकाराचे विषयदेखील पुरुषप्रधानकीच्या अहंमन्य वाटेवर काहीसे मागेच पडत चालल्याचे यातून स्पष्ट होणारे आहे. भुताटकीवर कुणाचा विश्वास असो, अगर नसो; पण संशयाचे भूत मानेवर बसले की ते मात्र कोणत्याही नात्यात आडकाठी आणल्याशिवाय राहात नाही हेच यातून लक्षात घ्यायचे. तेव्हा, विश्वासाचा अनुबंध दृढ करीत नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करूया... हाच यानिमित्तचा सांगावा !