Thursday, April 26, 2018

Editors view published in Online Lokmat on 26 April, 2018

पीळ काही सुटेना...!

किरण अग्रवाल

गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल व त्या पाठोपाठच्या देशातील काही पोटनिवडणुकांमधील पराभवानंतर भाजपाकडून शिवसेनेबाबत सावध पावले टाकली गेल्याचे मध्यंतरी दिसून आले असले तरी; या दोघांतील आढ्यतेची दरी रुंदावतच चालल्याचे निदर्शनास येते आहे. ‘नाणार’ प्रकल्पावरून या दोघांत जी हमरीतुमरी सुरू आहे त्यावरून तर ते दिसून यावेच, शिवाय विधान परिषदेच्या काही जागांसाठी उमेदवार घोषित करतानाही उभयतांनी आपापल्या मनमर्जीचा जो प्रत्यय आणून दिला, त्यातूनही तेच स्पष्ट व्हावे.

सत्तेच्या चालू पंचवार्षिक काळात भाजपा व शिवसेनेतील संबंध प्रारंभापासूनच ओढाताणीचे राहिले आहेत. या दोघा पक्षातील ‘युती’ तशी सर्वात जुनी व अखंडित राहिलेली असली तरी यंदा विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वबळ आजमावले आणि अखेरीस सत्तेसाठी पुन्हा निवडणुकोत्तर ‘युती’ केली. त्यामुळे त्यांच्यातील सांधा जुळू शकलेला नाही. अर्थात, शिवसेनेचा चिवटपणा असा की, बाहेर रस्त्यावर त्यांच्याकडून भाजपाविरोधी भूमिका प्रदर्षिली जात असली तरी, सत्तेला लाथ मारण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता या दोघांतील बेबनावाकडे लुटुपुटुची लढाई म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. अशातही, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा निर्धार व्यक्त केल्याने शिवसैनिक कामाला लागले आहेत. भाजपाही ‘शत-प्रतिशत’च्या अपेक्षेत आहेच. त्यामुळे दोघांकडून आपापले बळ जोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांच्या गृहराज्यातील निवडणुकीत त्यांच्या पक्षाची सत्ता राखताना जी दमछाक झाली ती पाहता, हवेत उंच उडालेले त्यांच्या अपेक्षांचे फुगे काहीसे जमिनीकडे आले. उत्तर प्रदेश व बिहारच्या अलीकडील पोटनिवडणुकांच्या निकालांनी या फुग्यांमधील हवा आणखीनच कमी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे एकीकडे स्वबळाच्या निर्धाराने तलवार परजत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयम व सामोपचारानेच निभावताना दिसत होते. परंतु कोकणात होऊ घातलेल्या नाणारच्या पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा भडका उडून गेला आहे.


महत्त्वाचे म्हणजे, गुजरात निवडणुकीमधील दमछाक, पोटनिवडणुकांतील पराभव व विरोधकांनी चालविलेली एकजूट पाहता पुन्हा शिवसेना-भाजपातील ‘युती’चे संकेत मध्यंतरी मिळू लागले होते. त्यामुळेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षित असलेले इच्छुक शिवाजी सहाणे मुंबई मुक्कामी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून आले होते. पुढे त्यांची शिवसेनेतून गच्छंती झाली हा भाग वेगळा; परंतु उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांत ‘युती’ची आशा बळावून गेली असताना पुन्हा फटाके फुटू व वाजू लागले आहेत. यातच विधान परिषदेच्या काही जागांची निवडणूक लागली असून, त्यात नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेनेने नरेंद्र दराडे यांची एकतर्फी उमेदवारी घोषित केली, तर त्यापाठोपाठ दुसºयाच दिवशी शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने मुंबईमधून अनिलकुमार देशमुख व नाशिक विभागातून अनिकेत विजय पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे संभाव्य ‘युती’च्या अपेक्षांवर आपसूकच पाणी फिरून जाणे स्वाभाविक ठरले.

भाजपा व शिवसेनेतील संबंध असे वा इतके ताणले गेले आहेत की, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या मोजक्या जागांसाठी लागलीच ‘युती’ने सामोरे जाणे त्यांना कदाचित बरोबर वाटलले नसावे, परंतु यानिमित्ताने केल्या जाणाºया प्रचारातून आणखी वितुष्टाच्या काठिण्याची पातळी गाठल्यावर व मतविभागणीचा फटका सहन करावा लागल्यावर विधानसभा निवडणुकीसाठी जर ‘युती’चीच अपरिहार्यता ओढवली तर ती मतदारांना कितपत स्वीकारार्ह ठरेल हा यासंदर्भातील खरा प्रश्न आहे. पण तसला विचार न करता भाजपा-शिवसेनेची पावले पडत आहेत, जणू ‘युती’ होणे नाही. गेल्या खेपेप्रमाणे स्वबळ सिद्ध न झाल्यास निवडणुकोत्तर ‘युती’चा मार्ग खुला ठेवून लढण्याचेच त्यांनी ठरविलेले त्यातून दिसून यावे. शिवाय त्यांना आपल्या आत्मविश्वासाचीच परीक्षाही यातून घ्यायची असावी. या दोहोंचा सांधा जुळेना व पीळ काही सुटेना, अशी जी स्थिती आज दृष्टिपथास पडते आहे ती त्यामुळेच.

No comments:

Post a Comment