Saturday, July 28, 2018

Project Lok - mat





#Project_lok_mat

लोकमतचे संपादकीय संचालक श्री रिशी बाबू दर्डा म्हणजे नवनवीन संकल्पनांचे भंडारच. प्रत्येकवेळी नवी योजना आखून मोठ्या ऊर्जेने ती पूर्णत्वास नेण्याचे त्यांचे कसब लाजबाबच। 
त्यांच्या अभिनव कल्पनेतून लोक-मत जाणून घेण्यासाठी संपूर्ण राज्यभर एक विशेष मोहिम राबविण्यात आली. सुधारणेसाठी संपर्काची प्रक्रिया (Process of connect to correct) म्हणून राबविलेल्या या मोहिमेत राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यातील वाचकांची स्पंदने जाणून घेण्यात आलीत. या अंतर्गत कोल्हापूरचे संपादक श्री वसंत भोसले सर यांच्यासह मराठवाडा दौरा केला.
लातूरचे आमदार अमित देशमुख, तुळजापूरचे माजी मंत्री, आ. मधुकरराव चव्हाण, नांदेडचे माजी मंत्री, आ. डी पी सावंत, परभणीचे आ. डॉ राहुल पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष निंबाळकर, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नांदेडातील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण, लातूरच्या प्रख्यात दयानंद शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री लक्ष्मीरमण लाहोटी, अभिनव मानव विकास संस्थेचे चेअरमन डॉ चेतन सारडा, पर्यावरणवादी डॉ अतुल देऊळगावकर, प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठलराव लहाने, संगीतकार डॉ राम बोरगावकर, साहित्यिक प्रा संध्या रंगारी, आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, आंबेडकरवादी मिशनचे प्रा दीपक कदम, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारे, जि. प. कार्य अधिकारी एच पी तूम्मोड, परभणी महापालिकेचे आयुक्त रमेश पवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडीया, हिंगोली अर्बन बँक चेअरमन सुनील देवरा यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी या दौऱ्यात भेटी झाल्या. अनेक संस्थांचे कामकाजही जाणून घेता आले.
लोकमत हा वाचकांचा आवाज व महाराष्ट्राचा DNA बनला असून त्याच्या प्रभाव व लोकप्रियतेची यानिमित्ताने पुन्हा अनुभूती घेता आली. बरेच काही नव्याने पाहता, अनुभवता व शिकता आले. 
Thanks to Hon'ble Rishi babu n Management...

Friday, July 27, 2018

Editors view published in Online Lokmat on 26 July, 2018

भ्रष्टाचार मुक्तीच्या दिशेने

किरण अग्रवाल

कोणत्याही बाबतीत सर्वसाधारणपणे कर्ता लोकांसमोर येतो, त्यालाच बऱ्या-वाईट परिणामांना सामोरे जावे लागते; करविता मात्र नामानिराळा राहतो. कर्ता आणि करवित्यामधील संबंध मोठा अगर महत्त्वाचा राहत असला तरी, आपत्तीविषयक बाबींमध्ये कुण्या एकालाच दोषी मानण्याचा प्रघात पडल्याने अनिष्ठतेचे संक्रमण सुरूच राहते. लाच देण्या-घेण्या संदर्भातही आजवर तेच होत आले आहे. लाच देणारा प्रामाणिक व घेणाराच तेवढा दोषी समजला जातो. म्हणूनच, भ्रष्टाचारास आळा घालण्याकरिता अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा करणारे जे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे त्याकडे आशेने बघता यावे.

भ्रष्टाचाराची कीड ही सहजासहजी आटोक्यात न येणारी बाब आहे, यावर कुणाचेही दुमत असू नये. भ्रष्टाचार संपविण्याच्या व कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या कुणी कितीही गप्पा केल्या तरी त्यात यश लाभत नाही, हेदेखील वेळोवेळी अनुभवून झाले आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार रोखता येणारच नाही का, तर तसेही नाही; पण त्यासाठी मुळात पारंपरिक धारणांना बदलावे लागेल. आपल्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जे सापळे लावले जातात त्यात बहुतांशी लाच घेणारेच पकडले जातात. वास्तविक कायद्याच्या भाषेत लाच घेण्यासोबत देणाराही दोषी असतो; परंतु देणारा घटक नेहमी साळसुदासारखाच वावरताना दिसतो. साधे उदाहरण यासंदर्भात देता येणारे आहे. रेल्वे प्रवास करताना तिकीट तपासनीस पैसे म्हणजे लाच घेऊन जागा उपलब्ध करून देतो म्हणून सरसकट बोलले जाते; पण लाच घेणाºया त्या रेल्वे तिकीट तपासनिसामागे पैसे घेऊन हात जोडत धावणाºया प्रवाशाचा त्यासाठीचा आग्रह लक्षातच घेतला जात नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याची प्रक्रिया एकतर्फी प्रयत्नातून यशस्वी होणे अवघड ठरते. नेमकी हीच बाब लक्षात घेता, प्रामाणिक सरकारी सेवकांना संरक्षण देतानाच लाच देणाºया व्यक्तीस सात वर्षांची शिक्षा सुचविणारे सुधारित विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. भ्रष्टाचार मुक्ततेच्या दिशेने उचलले गेलेले हे पाऊल, लाच घेणाºयासोबतच देणाºयालाही आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यासंदर्भात महत्त्वाचेच ठरावे.


मुळात, लाच घेणाºयासोबतच देणाराही दोषी असतो हे खरे असले तरी तशा तक्रारीच होताना दिसत नाहीत. कायद्याने देणाºयासाठीही शिक्षेची तरतूद अगोदरपासून आहे; परंतु ती तितकीशी परिणामकारक नाही. म्हणूनच आता त्यात सुधारणा करून ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अर्थात, त्याकरिता तसे तक्रारदार पुढे येणे गरजेचे आहे. राज्यात गेल्या १ जानेवारी ते आतापर्यंत, म्हणजे गेल्या साडेसहा महिन्यात लाचलुचपतचे एकूण ५१५ सापळे लावण्यात आले. त्यात पुणे विभाग सर्वात आघाडीवर (१०८) असून, मुंबई सर्वात मागे (२८) आहे. नागपूर विभागात ८५ तर औरंगाबाद विभागात ६३ सापळे लावले गेलेत. नाशिक परिक्षेत्राची यासंदर्भातली आकडेवारी पाहता आतापर्यंत जे एकूण ५३ सापळे लावण्यात आले ते सर्व लाच घेणाºयांसाठीचे होते. लाच देणाºयाला पकडून देणारी एकही घटना यात नाही. नाशिकच काय, संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे.

नाशकात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जावेद अहमद नामक पोलीस उपायुक्त असताना त्यांनी एका प्रकरणात त्यांना लाच देऊ पाहणाºयास पकडून दिले होते. तर मध्यंतरी एस.टी. महामंडळाचे खराब टायर्स उचलू द्यावेत म्हणून लाच देऊ पाहणाºया भंगार व्यावसायिकास पकडून देण्यात आले होते. औरंगाबादेत २००३ च्या सुमारास हरिष बैजल गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त असताना त्यांनीही अशाच लाच देऊ पाहणाºया एका भंगार व्यावसायिकास पकडून दिले होते; परंतु या घटनांकडे अपवाद म्हणून पाहता यावे. सर्वसाधारणपणे लाच घेणाºयासच सापळा लावून धरले जाते. लाच देणारा मोकळाच राहतो. तेव्हा, भ्रष्टाचारविषयक कायद्यात सुधारणा घडवून आणली गेल्याने आता देणाºया घटकाकडेही लक्ष वेधले जाईल व त्यामुळे दुहेरी प्रयत्नांतून भ्रष्टाचारमुक्तीकडे वाटचाल घडून येईल, अशी अपेक्षा करता यावी.

Friday, July 20, 2018

Editors view published in Online Lokmat on 19 July, 2018

आदिवासींच्या इंग्रजीचा घोऽऽ!

किरण अग्रवाल

अपेक्षांना अंत नसतो हे खरे; पण म्हणून कुणी अपेक्षाच करायच्या सोडून देतो असे नाही. मागण्यांचेही तसेच काहीसे असते. साऱ्याच मागण्या मान्य अगर पूर्ण होत नसतात. तरी त्या लावून धरल्या जातात. त्यासाठी आंदोलने केली जातात. त्यात गैर काही नसतेही, मात्र एखादी मागणी जेव्हा मूळ विषयामागील धारणांशी फारकत घेणारी ठरू पाहते तेव्हा त्याबाबत संभ्रम व आश्चर्य अशा दोन्ही बाबी घडून आल्याखेरीज राहात नाही. सरकारी कोट्यातून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करून घेतल्या जाणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते म्हणून आदिवासी विकास विभागानेच आश्रमशाळांप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढाव्यात, अशी जी मागणी केली जाते आहे, त्याकडेही याच संदर्भाने बघता यावे.

वाड्या-पाड्यावरील आश्रमशाळांमधून शिक्षण घेऊन आलेली आदिवासी मुले जेव्हा शहरी भागात उच्च शिक्षणासाठी येतात, तेव्हा नवीन वातावरणाशी त्यांचा सांधा तितकासा जुळत नाही. त्यांच्यात क्षमता भरपूर असते, हुशारी असते; तरी ते मूळ प्रवाहापासून काहीसे बाजूला पडतात कारण शहरी मुलांमध्ये आढळणारे धारिष्ट्य त्यांच्यात नसते. अर्थात, अशा प्रतिकूलतेवरही मात करीत पुढे जाणारी व विविध क्षेत्रांत आपली नाममुद्रा उमटवणारी आदिवासी मुले कमी नाहीत हा भाग वेगळा; तो समाधानाचा, कौतुकाचा व त्यांच्यातील विजिगीषू वृत्तीला सलाम करण्याचाच भाग आहे. परंतु सर्वसाधारण आदिवासी मुले ही शहरी कोलाहलात जरा दबून गेल्यागतच दिसतात हेदेखील वास्तव नाकारता येऊ नये. म्हणूनच तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक््षणिक विकासासाठी व स्पर्धेत टिकण्याचे त्यांचे आव्हान कमी व्हावे याकरिता शहरी भागातील खासगी इंग्रजी शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्याची योजना शासनातर्फे आखण्यात आली. २०१० पासून पहिली ते आठवीपर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून दिला जातो आहे. यातील काही अडचणी लक्षात घेता २०१६पासून पहिली ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अशी सोय ठेवून त्यापुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ही बाब ऐच्छिक केली गेली आहे. पण, असे असले तरी खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना तेथे सापत्नभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार असून, आदिवासी विभागानेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.


नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे यासंदर्भात आंदोलन केले गेले. संबंधित इंग्रजी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकडे नीट लक्ष दिले जात नाही, त्यांची गैरसोय व हेळसांड होते असा आरोप करीत आदिवासी विभागानेच आपल्या मालकीच्या इंग्रजी शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वरवर पाहता या मागणीत गैर काही वाटू नये. परंतु मुळात, आदिवासी खात्यामार्फत चालविल्या जाणाºया शाळांमधून गुणवत्ता व शैक्षणिक विकास साधला जात नाही म्हणून तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना ज्यांच्याशी स्पर्धा करायची आहे त्यांच्यासमवेत शिक्षणाची संधी मिळावी, या धारणेतून सदर व्यवस्था आकारास आणली गेल्याचे पाहता मागणीनुसार आदिवासी खात्यानेच आपल्या शाळा उघडल्या तर त्यातून संबंधित मूळ उद्देशाची पूर्ती होणार आहे का, हा प्रश्न उपस्थित व्हावा. आदिवासी खात्याने आदिवासींसाठीच चालविलेल्या शाळेतून विद्यार्थ्यांना अन्य स्पर्धकांचा आवाका कसा लक्षात यावा, हा यातील कळीचा मुद्दा ठरावा. खासगी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची हेतुत: हेळसांड केली जात असेल तर त्याबाबत गगांभीर्याने लक्ष पुरवून विशेष निगराणीची व्यवस्था करता येऊ शकेल; परंतु शाळा व्यवस्थापनच बदलाचा विचार केला गेला तर त्यातून मूळ अपेक्षा अगर धोरणांशी काडीमोडच घडून येईल. इंग्रजी शिकण्यापुरता हा विषय नसून, स्पर्धेशी ओळख हा यातील महत्त्वाचा भाग असल्याने; स्पर्धेकडे पाठ दाखवणी तर यातून होणार नाही ना किंवा आदिवासींचे त्यांच्या स्वत:तील अडकलेपणच कायम राहणार नाही ना, या अंगाने त्याकडे बघायला हवे.

महत्त्वाचे म्हणजे, आदिवासी विकास विभागामार्फत सद्यस्थितीत चालविल्या जाणाºया आश्रमशाळांची स्थिती व तेथील रोजच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. तेथील हेळसांडही काही कमी नाही. म्हणूनच तर धडगाव, पुणे आदी ठिकाणांहून आदिवासी विद्यार्थ्यांचे पायी मोर्चे नाशकात येऊन धडकत असतात. तेव्हा, ज्या आश्रमशाळा आहेत त्यांचीच अवस्था धड सुधरेनासी असताना, या खात्यानेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची अपेक्षा करणे म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर ठरण्याची शक्यता नाकारता येऊ नये. म्हणजे, विद्यार्थी व त्यांची गुणवत्ता बाजूला राहून अगोदर शाळांची उभारणी, शिक्षक-शिक्षकेतरांची भरती आदी बाबीच प्राधान्यक्रमावर येतील. शिवाय ते सर्व करूनही पुन्हा स्पर्धेला तोंड देऊ शकणारा विद्यार्थी घडेल का हा प्रश्न उरेलच. सबब, भावनिकतेपेक्षा व्यवहार्यता तपासून याबाबत भूमिका घेतली जायला हवी. अन्यथा, आज एकूण शिक्षणाचाच घोऽऽ झालेला असताना आदिवासींच्या इंग्रजीचाही घोऽऽ झाल्याशिवाय राहणार नाही.आदिवासींच्या इंग्रजीचा घोऽऽ!

Friday, July 13, 2018

Editors view published in Online Lokmat on 12 Jully, 2018

जबाबदारीचे भान महत्त्वाचे !

किरण अग्रवाल

नोकरीवर असलेल्या नोकरदारास कामगार कायद्याची व त्यातून मिळणाऱ्या अधिकाराची माहिती असते तशी आपल्या कर्तव्य व जबाबदारीची जाण असतेच असे नाही. मतस्वातंत्र्याचे वा अभिव्यक्तीचे तसेच काहीसे आहे. बोलताना, लिहिताना व इकडचे संदेश तिकडे धाडतानाही यासंबंधीचे भान बाळगले जात नाही, म्हणूनच अफवांचे बाजार तेजीत येतात व लोकांना हकनाक जीव गमावण्याची वेळ येते. सरकारला सोशल मीडियाला वेसण घालायची वेळ आली आहे तीदेखील त्यामुळेच.

चिथावणीखोर, सामाजिक सलोख्यास बाधा आणणाºया खोट्या संदेशाचे आदान-प्रदान हा अलीकडे दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरू लागला आहे. कारण आलेल्या संदेशाची खातरजमा न करता त्यावर प्रतिक्रि या देण्याची वा अभिव्यक्त होण्याची सवय आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरे म्हणजे, सोशल माध्यमावर आलेला संदेश इकडून उचलून तिकडे फॉरवर्ड करण्यात बहुतेकांचा कल असतो कारण स्वत: डोकं न लावता अगर संदेश लिखाणाची तसदी न घेता रेडिमेड माहितीचे प्रसारण करून आपली अद्ययावतता दर्शवून देण्याची त्यांची धडपड असते. त्यामुळे सर्वात अगोदर किंवा इतरांच्या पुढे राहण्याच्या प्रयत्नात संदेशाची सत्यता न पडताळता तो पुढे ढकलून देण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांना सजग होत, चुकीचे किंवा खोटे काय आहे ते तुम्हीच ओळखा हे सांगण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागली आहे. पण प्रश्न खरा हाच आहे की, हे दुसºयाने कुणी आपणास सांगण्याची मुळात गरज का भासावी? आपलेच आपणास हे का समजू अगर उमजू नये?


प्रत्येकाला आपले स्वत:चे भलेबुरे जसे कळते, तसे समाजासाठी काय चांगले वा तोट्याचे हे का कळत नाही किंवा त्या अंगाने विचार का केला जात नाही, हा यातील प्रश्न आहे. आपल्या सामाजिक जाणिवा तितक्या प्रगल्भ नाहीत, हे त्याचे उत्तर आहे. प्रगत साधनांमुळे माणूस प्रगत झाला, हातात अत्याधुनिक मोबाइल आल्याने जणू जग त्याच्या मुठीत आले; पण या जगात वावरायचे कसे याचे ज्ञान त्याच्या ठायी नाही. शिक्षण घेऊनही सुशिक्षितपणाचा अभाव आढळावा अशी ही स्थिती आहे. विशेष म्हणजे, तरु ण पिढी ही अधिक शिकली, सवरलेली आहे. पण तिच्या सामाजिक जाणिवा खूपच तकलादू असल्याचे दिसून येते. सोशल माध्यमाला सदोदित चिपकून वा बिलगून असणारी मंडळी त्यावरील अंगठेछाप प्रतिसादात अडकून बसते. खोट्या समाधानात स्वत्व हरवून बसलेली ही मंडळी मग विचार न करता दुसºयाच्या हातचे बाहुले होऊन बसते. दुसरीकडून आलेला कसलाही संदेश त्यातील सत्यता पडताळून न पाहता आपल्या संपर्कातील इतरांना पाठवून लोक मोकळे होतात, आपत्ती ओढवते ती त्यातूनच. सोशल माध्यमांवरील संदेशाचे आवागमान म्हणूनच चिंतेचा विषय होऊन बसला आहे.

समाजात तेढ निर्माण होणारे जे काही प्रसंग अलीकडील काळात घडलेत, त्यामागे अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या भडकावू संदेशांचा वाटा मोठा राहिल्याचे दिसून आले आहे. मुले पळविणाºयांची टोळी आल्यासारख्या अफवा पसरविणाºया संदेशांनीही अनोळखी इसमांबद्दल शंकेचे वातावरण निर्माण केले. अशा गैरसमजुतीच्या कारणातून देशभरात २७ निष्पापांचे प्राण घेतले गेले. म्हणूनच याबाबत समाजमन जागृत करण्याची गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल माध्यमांवर डोळे वटारले गेल्यावर त्यांनी अशी जनजागरणाची मोहीम हाती घेतली आहे, तसेच पोलीस खातेही शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी व पालकांना तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या प्रमुखांना जाणीव करून देत आहेतच. पण सुजाण नागरिक म्हणून आपणच आपली जबाबदारी ओळखून अशा अफवा पेरणाºया संदेशांना रोखले तर अप्रिय घटनांना संधी मिळणार नाही.

Wednesday, July 11, 2018

Vendor's Birthday


#Lokmat_Vendor_Birthday_Celebration
वितरक बंधू... वृत्तपत्र वितरण प्रणालीतील महत्वाचा घटक. ऊन, वारा व पावसाशी झुंज देत वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचविणाऱ्या या घटकाशी 'लोकमत'चे असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी लोकमत कार्यालयात वितरक बंधूंचा वाढदिवस सामूहिक स्वरूपात साजरा करण्यात आला. याप्रसंगी 'लोकमत'चे सहाय्यक उपाध्यक्ष श्री. बी. बी. चांडक व निवासी संपादक श्री. किरण अग्रवाल यांच्यासमवेतचे हे छायाचित्र....

July 05, 2018 @ Lokmat, Ambad

Malegaon Anniversary


मालेगाव म्हटले की मनःपटलावर गत काळातील काही घटना तरारून जातात
पण काळ लोटला, तसे मालेगाव कात टाकतेय
खूप बदल झाला आहे, माणसांत, व्यवस्थेत आणि मानसिकतेतही..
सामंजस्य व सद्भाव वाढीस लागला आहेच, विकासही घडून येतोय.
लोकमतही या स्थित्यंतराचा साक्षीदार राहिला आहे
म्हणूनच मालेगाव लोकमतचा वर्धापन दिन म्हटले की वाचकांच्या प्रेमाचा, बंधुत्वाचा आगळा अनुभव येतो
सर्व क्षेत्रीय, धर्मीय व वयाच्या हितचिंतकांचा हा गोतावळाच तर आमच्या जाणिवा अधिक प्रगल्भ करतो...

यंदाही राज्यमंत्री दादाजी भुसे, माजी आमदार मुफ्ती मो इस्माईल, उप महापौर सखाराम घोडके, मविप्र अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, जि प सभापती सौ मनिषा पवार, रिपाइंचे ज्येष्ठ नेते देवराज गरुड, पंचायत समिती सभापती सौ प्रतिभा सूर्यवंशी, सरकारी वकील शिशिर हिरे, साहित्यिक विनोद गोरवाडकर, महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, प्रांत अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, पत्रकार स्नेही शंकर वाघ, प्रमोद सावंत, ब्रिजमोहन शुक्ल, बिपीन बागुल, रविराज सोनार आदी अनेक मान्यवरांची भेट आम्हास अधिक संपन्न करून गेली

मालेगावचे आमचे सहकारी शफीक शेख, अतुल शेवाळे, मिलिंद जोशी, किशोर इंदोरिकर, राजू वडगे, सय्यद रशीद, निलेश नहिरे, सुभाष पवार, वसिम शेख, परमानंद देशपांडे, सादिक शेख, छायाचित्रकार सुभाष सूर्यवंशी आदींच्या परिश्रमानेच हे शक्य झाले

July 02, 2018 @ Malegaon

Doctor Lahane


मोठी सेवा बजावणारे लहाने डॉक्टर...
काही व्यक्तित्व असे असतात की पहिल्या भेटीतच जिंकून घेतात
डॉ विठ्ठल लहाने त्यातीलच एक
लोक-मत जाणून घेण्याच्या मोहिमेंतर्गत लातुरात आलो असता त्यांची भेट झाली

प्लास्टिक सर्जन असलेले डॉ विठ्ठलराव
प्रख्यात नेत्र तज्ञ, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांचे बंधू
म्हणजे सेवा हीच त्यांची जातकुळी व तोच त्यांचा DNA

श्रीमंतांचा उपचार म्हणवणारी प्लास्टिक सर्जरी सामान्यांपर्यंत न्यावी म्हणून ते मुंबई, पुणे ऐवजी लातुरात रमले
स्माईल ट्रेनच्या सहकार्याने दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावर गेल्या बारा वर्षात सुमारे सात हजारापेक्षा अधिक मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केल्या
एवढ्या मोठ्या प्रमाणात या सर्जरी करणारे सेंटर म्हणून लहाने हॉस्पिटल महाराष्ट्रात एकमेव आहे
नाकाची प्लास्टिक सर्जरी यातही त्यांची मास्टरकी आहे
मुलींच्या लग्नातील समस्या यामुळे दूर होण्यास मदत होते
अचाट आणि अफाट असे हे सारे सेवाकार्य...
त्यांच्याशी गप्पा मारतांना हाच सेवेचा स्थायीभाव अनुभवला.

लोकमत कोल्हापूरचे संपादक श्री वसंतराव भोसले, लातूरचे संपादकीय विभाग प्रमुख श्री धर्मराज हल्लाळे, श्री नितिन खोत यावेळी सोबत होते, त्याप्रसंगीचे आठवण चित्र ...

Jun 22, 2018 @ Lahane Hospital, Latur

Father's Day


लोकमत सखी मंच आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या वतीने 'फादर्स डे' निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध सेलिब्रेटीजच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला।
त्याप्रसंगी प्रख्यात तबलावादक डॉ. राम बोरगावकर, गणेश बोरगावकर, अभिनेत्री तथा कथ्यक नृत्यांगना प्राची शहा, सुधीर शहा, अभिनेत्री मृणाल दुसानिस, बाळकृष्ण दुसानिस, पार्श्वगायिका योगिता गोडबोले, दत्तात्रय गोडबोले यांच्यासमवेत अपोलो हॉस्पिटलचे डॉ, अनिज तिवारी, लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल

Jun 17, 2018 @ Indraprastha Hall

Aspire Exhibition


#लोकमत_ऍस्पायर_एज्युकेशन_फेअर_२०१८
दहावी बारावीच्या निकालानंतर विद्यार्थीबरोबरच पालकांमध्ये मोठी चिंता असते ती करिअरच्या नवीन वाटा निवडण्याची. त्या वाटा कोणत्या असतात हे सांगण्यासाठी हे प्रदर्शन...
मान्यवरांची मार्गदर्शन सत्रे व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाची माहिती..
सिटी सेंटर मॉल समोरील लक्षिका कार्यालयात उद्या रविवारपर्यन्त
सर्व संबंधितांनी आवर्जून भेट दयावी असे प्रदर्शन...

अस्पायर प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल, बी बी चांडक, विकास शेलार, निलेश सौदागर तसेच संस्थाचालक, प्रतिनिधी प्रभाकर धात्रक, प्राचार्य शांताराम बडगुजर, सुरजितसिंग मनचंदा, पी के शहाबादकर, व्ही एस मोरे, जितेंद्र शहा आदींसमवेतचे छायाचित्र.

Jun 09, 2018 @ Lakshika Mangal Karyalaya

Environmental Day


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
@ लोकमत कार्यालय, अंबड
अर्थातच, रोपणासोबत संवर्धनाच्या शपथेसह...

Jun 05, 2018 @ Lokmat, Ambad

Raj Didi


आतला आवाजच खरा मार्गदर्शक...
समाजात वा कोणत्याही क्षेत्रात वावरतांना कुणी कितीही चेहरे व मुखवटे धारण करून वावरत असले तरी, शेवटी अंतरात्मा प्रत्येकाला जागवत असतो.
हा आतला आवाज हाच आपला मार्गदर्शक असतो...
मुंबईतील नारायण रेकी सत्संग परिवाराच्या श्रीमती राजेश्वरीदीदी मोदी यांचे म्हणणे कुणालाही पटावे असेच आहे

नाशिक सेवा समितीतर्फे त्यांचा सत्संग आयोजिण्यात आला होता, त्यानिमित्त सर्वश्री ब्रिजलालजी धूत, नेमीचंदजी पोद्दार, प्रदीपजी बुब, राजेश पारीख, विमल सराफ व ताराचंद गुप्ता यांच्या प्रेमापोटी राजदीदींना भेटण्याचा व गप्पांचा योग आला...

Jun 04, 2018 @ Shankaracharya Hall

Jahirat Chalisa


आवर्जून बघावे असे, #जाहिरात_चालीसा ...
नाशिकमध्ये जाहिरातींना सौंदर्याचा साज चढविण्याचं काम कुणी केलं असेल तर ते सुनील धोपावकर या अवलिया कलंदराने.

जाहिरात वाचली जाण्याअगोदर ती बघितली गेली पाहिजे, असा मूळ विचार घेऊन सुनील भाईंनी कॉपीत अक्षरे मांडताना त्यात रंग भरले।
ग्राहकाच्या सांगण्याप्रमाणे कॉपी न करता आपल्या प्रज्ञेने प्रॉडक्ट् पब्लिश करणारा हा कलासक्त माणूस...
एका ज्वेलर्सच्या कंगन फेस्टिवलची जाहिरात करतांना
हो मी हातात बांगड्या भरल्याय
हे अभिमानाने सांगण्याची कल्पकता दर्शविणारा...
तीच तर धोपावकर स्टाईल, वा त्यांचा पॅटर्न।

2006 मध्ये लोकमत नाशिकचा दशकपूर्ती विशेषांक 'वेध' करतांना सुनील भाई व नंदू गवांदे यांच्यासह मी ही सौंदर्यदृष्टी अनुभवली. 8/10 दिवस सोबत बसून आम्ही पानांच्या रचनेचे/ मांडणीचे अनेक पर्याय तपासून अंक पूर्ण केला होता। पाव वडे खात केलेला हा अंक, त्यातील सुनीलभाईची मेहनत त्यांचे 'जाहिरात चालीसा' प्रदर्शन पाहतांना नजरेसमोर तराळून गेली

May 28, 2018 @ Kusumagraj Smarak

Jalsamruddhi Program


पाणी बचतीचा विषय गंभीरच खरा...
अवघ्या तीन टक्के पाण्यावर आपला खेळ सुरू आहे.
जलसाक्षरतेची कशी निकड आहे हेच यातून लक्षात यावे.
‘लोकमत’ व रिन आयोजित जलउत्सव कार्यक्रमात बोलायचे म्हणून माहिती घेतली असता कळले की, पृथ्वीवर उपलब्ध पाण्यापैकी ९७ टक्के पाणी समुद्रात असल्याने ते खारट बनते, ज्याचा वापरास उपयोग होत नाही.
उरते केवळ तीन टक्के पाणी.
या तीन टक्क्यातही दोन टक्के बर्फाच्या स्वरूपात असते म्हणे.
उरलेल्या एक टक्क्यातील ८५ टक्के शेतीसाठी तर दहा टक्के इंडस्ट्रीसाठी,
म्हणजे खरे तर ०.५ टक्केच पाणी पिण्यासाठी व तत्सम वापरासाठी आहे.
खरेच गंभीर आहे ही बाब.
म्हणूनच प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
चला त्यासाठी शपथबद्ध होऊया...

May 27, 2018 @ Cidco, Nashik

Gajanan Vyakhyanamala


नाशिकरोडच्या योगीराज श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्याख्यानमालेचे यंदाचे 11 वे वर्ष. चित्रकार असलेल्या रमेश जाधव या सेवानिवृत्त शिक्षकाने चिकाटीने हा ज्ञानयज्ञ चालविला आहे. यंदा या मालेचे उदघाटन करायचा योग आला.

लायन्स क्लबच्या हॉल मध्ये ज्येष्ठानी दिलेल्या पुस्तकांचे वाचनालयही सुरू करण्यात आले, त्याप्रसंगी लायन्सचे सचिन शहा, अंजली विसपुते, संजय पगारे, कवी रवींद्र मालुंजकर आदी

May 18, 2018 @ Lion's Garden, Nashik Road

Mother's Day



मातृशक्तीला वंदन...
अभिनय व गीतांसाठी प्रख्यात असलेल्या सेलिब्रेटीजना मातोश्रीसह जेव्हा व्यासपीठावर येऊन काही बोलण्याचा योग येतो तेव्हा तेही कसे भावुक व हळवे होतात याचाच प्रत्यय लोकमत सखी मंचच्या 'मा तुझे सलाम' कार्यक्रमात आला.
आयुष्याचा मळा फुलविण्यात मातृत्वाच्या मायेची ओल कशी महत्वाची ठरली हे सांगताना अभिनेते व गायक अगदी हरखून गेलेले दिसले...

मातृ दिनानिमित्त लोकमत सखी मंच तर्फे प्रख्यात अभिनेत्री किशोरी शहाणे व बॉबी वीज, दिपाली सय्यद व रत्नप्रभा भोसले, गायक अनिरुद्ध जोशी व अमृता जोशी तसेच मंगेश बोरगावकर व सुनीता बोरगावकर या सेलिब्रेटीजसह विविध क्षेत्रातील माय लेकरांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंगल, दिपक चंदे, लोकमतचे सहा उपाध्यक्ष बी बी चांडक यांच्यासमवेतची ही काही आनंदचित्रे...

May 16, 2018 @ Dadasaheb Gaikwad Sabhagruha

Cosmos Bank


कॉसमॉस बँक... आपुलकीने सेवा देणाऱ्या माणसांची बँक
नाशिकच्या काठे गल्लीतील शाखेचा काल 13 वा वर्धापनदिन होता. या शाखेत नेहमीच सौजन्यशीलतेचा अनुभव येतो. ग्राहक देवो भव मानत सेवा बजावणारा कर्मचारीवर्ग ही या शाखेची खासियत. त्यामुळेच या शाखेने व्यवस्थापनाकडून तिसऱ्यांदा फाईव्ह स्टार रेटिंगचे प्रमाणपत्र मिळविलेले. यावेळी सेवा ऑटोमोटिव्हतर्फे स्विफ्ट गाडीचे विपणनही करण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त बँकेचे सभासद पुरुषोत्तम गोविंद भावसार यांनी बासरी वादन केले. गांधीनगर नोट प्रेस मधून निवृत्त झालेल्या व वय वर्षे 82 असलेल्या भावसार काकांच्या बासरीचे सूर तर श्रवणीय होतेच, पण त्यांचा उत्साह व फिटनेस तरुणांनाही लाजवणारा होता.
शाखा व्यवस्थापक श्री संदीप जामठे, पासिंग ऑफिसर श्री ज्ञानेश्वर गुरव तसेच नीरज शिरापुरे, ऋषिकेश जाधव, योगेश गायधनी, पुष्कर कुलकर्णी, अमित वनमाळी आदी सर्वांचेच परिश्रम या गौरवमयी वाटचालीमागे आहेत...

May 03, 2018 @ Cosmos Bank, Kathe Galli Branch

My Marathi Vyakhyanmala


बुद्धं शरणं गच्छामि...
सिडकोतील माय मराठी व्याख्यानमालेचा समारोप तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनी झाला, तो धागा पकडत समाजात वाढत्या कायिक व वाचिक हिंसेचा मुद्दा उपस्थित करून भगवान बुद्धांचे पंचशीलाचे आचरणच आज गरजेचे असल्याचे प्रतिपादिले ...
मित्रवर्य सावळीराम तिदमे व धडपड्या तरुण किरण सोनार यांच्या आग्रहाने जाणे झाले. आमदार सौ सीमाताई हिरे याही सोबत होत्या. प्रा राज शेळके यांनी अखेरचे पुष्प गुंफले. छान हिरवळीवरील या मालेतील सहभागाने एक सायंकाळ रम्य ठरली...

May 01, 2018 @ Cidco, Nashik

LAA, Pune


#LAA... Lokmat Achievers Awards 2018
वितरणाचा जल्लोष झाला यंदा पुण्या LAA ......
लोकमतमधील अचिव्हर्सना सन्मानित करण्याचा हा सोहळा.
तरुण नेतृत्व, कार्यकारी संचालक श्री करण दर्डा यांच्या संकल्पनेतून साकारलेला व श्री आशिष जैन यांच्या संयोजनाने उभारलेला हृद्य सोहळा.
नाशिकमध्ये या आयोजनाची हॅट्ट्रिक केल्यानंतर यंदा पुण्या LAA हा सोहळा झाला, अर्थातच पुण्यात लोकमत नंबर 1 ठरल्याची पार्श्वभूमी त्यामागे होती. व्यवसायिकतेच्या पलीकडे जाऊन चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप व इन हाऊस टॅलेंटला व्यासपीठ देणारा हा कौटुंबिक सोहळा.

यानिमित्ताने लोकमत परिवाराचे प्रमुख श्री विजय बाबूजी दर्डा व श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांचे मार्गदर्शन म्हणजे ऊर्जा निर्मितीची फॅक्टरीच. आव्हाने पेलण्याची शक्ती देणारा विश्वास व सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे त्यामागील सूत्र हे दिशादर्शन करणारेच. याचसोबत श्री देवेंद्र बाबू, श्री रिशी बाबू व श्री करण बाबू यांची नवी उमेद जागवणारी व सक्षम हाती नेतृत्व असल्याची खात्री देणारी मनोगते हेच या सोहळ्याचे वैशिष्ट्य.

Apr 21, 2018 @ Hotel Orchid, Balewadi, Pune

Lokmat Anniversary



स्नेहाचा सागर...
लोकमतचा वर्धापन दिन म्हणजे वाचकांच्या स्नेह सागराचे दर्शन अनुभवण्याचा दिवस. सागराला येणारी भरती नंतर ओसरते, पण लोकमत वरील वाचक प्रेमाची व स्नेहाची भरती प्रतिवर्षी 'वर्धिष्णू' होते आहे; तीच तर आमचे बळ, तीच आमची प्रेरणा व जबाबदारीची जाणीव करून देणारी आमची धारणा...

यंदाही स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास, शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी, स्वामी डॉ तुळशीदास गुट्टे तसेच महापौर सौ रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सर्वश्री बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, डॉ राहुल आहेर, पंकज भुजबळ, जयंत जाधव, योगेश घोलप, डॉ अपूर्व हिरे, जि प अध्यक्ष सौ शीतल सांगळे, जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण, जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी डॉ अनंत गीते, पोलीस आयुक्त डॉ रविंद्र कुमार सिंगल, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ई वायूनंदन, एकलहरा विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता निखारे, म्हाडाचे रिजनल ऑफिसर रमेश निसाळ, एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर हेमांगी पाटील, प्रख्यात बांधकाम उद्योजक अशोक कटारिया, नरेश कारडा, सुजॉय गुप्ता यासह राजकीय, प्रशासन, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेह सोहळ्याला उपस्थित राहून लोकमतसोबतचे आपले नाते अधिक दृढ केले
धन्यवाद शब्द अपुरा पडावा असा हा स्नेह ...वाचक प्रेमाची पावती देणारा तोच उत्साह।
तीच आमची शक्ती आणि ऊर्जा...

Apr 20, 2018 @ Lokmat, Ambad

Beats Of Freedom


बिट्स ऑफ फ्रीडम... तबले के रंग, शादाब के संग।
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कुल व पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान तर्फे आयोजित प्रख्यात मियाँ तानसेन घराण्याचे 'तालमणी' शादाब भारतीया यांच्या सोलो तबलावादन व संगीत फ्युजनने नाशिककरांची भरभरून दाद मिळविली. शादाब जी यांच्या तबल्यावर थिरकणाऱ्या बोटांची जादुई नजाकत विलक्षणच ...
सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या आग्रहामुळे जाणे झाले आणि स्वर, लय व तालची आनंदानुभूती घेता आली।

Apr 17, 2018 @ Raosaheb Thorat Hall

Dr. Ambedkar Jayanti


महामानव, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीने मिरवणूकीऐवजी व्याख्यान आयोजित केले. तसेच काही संस्था व वाचनालयांना पुस्तकांचा संच भेट दिला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक माजी न्यायाधीश अनिल वैद्य, औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, उपमुख्य अभियंता सुनील इंगळे, राकेशकुमार कमटमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गांगुर्डे यांच्यासमवेतची ही काही छायाचित्रे..

Apr 14, 2018 @ Eklehra Thermal Power Station

Ram Katha


कथा कोणतीही असो, रामकथा व भागवत कथाच नव्हे तर अगदी आजी आजोबांकडून सांगितल्या जाणाऱ्या राजा राणीच्या कथा का असेनात; ते सांगणाऱ्याची प्रत्येकाची एक शैली असते. त्या कथनात डुंबून जायला भाग पाडतो तो खरा कथाकार. वृंदावन येथील संत श्री विजय कौशल जी महाराज हे असेच एक ख्यातनाम नाव.
रामायणाचे मर्मज्ञ, अमोघ व रसाळ वाणीच्या त्रिवेणी संगमासह वर्तन व आचरणातील संतत्व ज्यांच्याठायी अनुभवयास मिळते अश्या श्री विजय कौशलजीं कडून श्रीराम कथा ऐकण्याची संधी नाशिककरांना लाभणार आहे. 12 ते 18 एप्रिल दरम्यान धनदाई लान्स येथे होणाऱ्या या ज्ञानयज्ञाच्या नियोजनासाठी आयोजित पहिल्या बैठकीप्रसंगी आयोजक श्री खुशाल भाई पोद्दार, नेमीचंद पोद्दार यांच्या समवेत लोकमतचे निवासी संपादक श्री किरण अग्रवाल, मनोज टीबरेवाला, कैलाशचंद्र परशरामपुरीया, डॉ शोधन गोंदकर, पंकज व प्रमोद परशरामपुरीया, रवींद्र केडिया, गिरीश पोद्दार, हितेश व महेंद्र पोद्दार, नितीन राका आदी. जयप्रकाश जातेगावकर, श्याम ढेडिया, महेशभाई अग्रवाल, राजेश पारीख, वसंत खैरनार, सुशील केडीया, राजुभाई पोद्दार आदी मान्यवरही यात सहभागी होते.

Apr 02, 2018 @ Ekta Society, Gangapur Road

IMA Program


विश्वासाची गुढी ....
डॉक्टर व रुग्णातील नाते आणि डॉक्टरांची सुरक्षा या विषयावर IMA तर्फे परिसंवाद घेण्यात आला. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ऍड एम वाय काळे, डॉ मनोज चोपडा, डॉ अमोल अन्नदाते, डॉ एस के सिंघल, डॉ कविता गाडेकर, डॉ बीएसव्ही प्रसाद, डॉ आवेश पलोड यांच्यासोबत यात सहभागी होता आले.
कोणत्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो, तोच डॉक्टर व रुग्णाच्या नात्यात जपला जावा. संवाद व समन्वय वृद्धिंगत व्हावा असा चर्चेचा सूर निघाला।
या आयोजनासाठी डॉ मंगेश थेटे, डॉ हेमंत सोननीस, डॉ सतीश पाटील, डॉ मुकेश अग्रवाल आदींनी दाखविलेली कल्पकता महत्वाची ठरावी.

Mar 18, 2018 @ IMA Hall, Shalimar Chowk

Sakhi Women's Day


मातृशक्ती... जय हो।
लोकमत सखी मंच म्हणजे महिला भगिनींचे हक्काचे व्यासपीठ. या मंचतर्फे आयोजित एका नाटयाच्या कार्यक्रमात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशकातील विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी अभिनेते उमेश कामत, अभिनेत्री स्पृहा जोशी तसेच पार्क साईटचे मर्झीयान पटेल, डॉ पुष्कर व मुग्धा लेले, सम्यक व रश्मी सुराणा, झेडपीतील सभापती मनीषा पवार यांच्यासमवेत गौरवार्थी...

Mar 13, 2018 @ Dadasaheb Gaikwad Sabhagruha

Hindi Kavi Sammelan


नेहमीच्या ताण तणावात तेवढाच विरंगुळा ...
नासिक हिंदी सभेतर्फे आयोजित हास्य कवी संमेलन प्रसंगी प्रख्यात कवी शशिकांत यादव, राजेंद्र मालवीय 'आलसी', डॉ भुवन मोहिनी, शंभू शिखर, सुदीप भोला, कपिल जैन तसेच अशोका बिल्डकानचे अशोक कटारिया, कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा, निर्माण बिल्डर्सचे नेमीचंद पोद्दार, आर्कि सुरेश गुप्ता, यशवंत सिंग, गुलाबप्रसाद पांडे आदीं समवेत ...

Mar 10, 2018 @ Dadasaheb Gaikwad Sabhagruha

Women's Day


मातृशक्तीला वंदन....
महिला दिनानिमित्त लोकमत तर्फे विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव उंचावणाऱ्या महिला भगिनिंचा गौरव करण्यात आला. लोकमत सखी मंच च्या माध्यमातून 'ति'चा जागर नेहमीच घडून येतो, काल यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील तारकांच्या कार्याचा जागर घडून आला.

Mar 08, 2018 @ Lakshika Mangal Karyalaya, Cidco, Nashik

Sreehari Pratisthan, Nampur


मातृशक्तीला वंदन....
महिला दिनानिमित्त लोकमत तर्फे विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव उंचावणाऱ्या महिला भगिनिंचा गौरव करण्यात आला. लोकमत सखी मंच च्या माध्यमातून 'ति'चा जागर नेहमीच घडून येतो, काल यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील तारकांच्या कार्याचा जागर घडून आला.
बागलाण तालुक्यातील नामपूर येथे श्रीहरी प्रतिष्ठानच्या महिला गौरव सोहळ्यासही उपस्थित राहता आले. पत्रकार श्री शरद नेरकर व सौ स्नेहलता नेरकर या दाम्पत्याने या प्रतिष्ठानतर्फे चालविलेले कार्य खरेच स्पृहणीय आहे. ग्रामीण भागातील या कार्यक्रमास लाभलेला प्रतिसादही मोठा उत्साहवर्धक होता.

Mar 08, 2018 @ Nampur

Phool Panchami


रंगपंचमीनिमित्त लोकमत मधील सहकारींसंगे... फुलपंचमी

Mar 06, 2018 @ Lokmat, Ambad

Holikotsav


नाशिक हिंदी सभेतर्फे आयोजित होलिकोत्सव प्रसंगी महापौर सौ रंजनाताई भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उद्योगपती अशोकजी कटारिया, माजी उपमहापौर गुरुमितभाई बग्गा, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, आर्कि सुरेश गुप्ता आदीं समवेत...

Mar 02, 2018 @ Lion's Club Hall, Pandit Colony

Printer's Day


लोकमत मुद्रण व्यवस्थेतील सहकाऱ्यांचा गौरव...
वृत्तपत्र म्हटले की पत्रकार डोळ्यासमोर येतो, प्रसंगी जाहिरात व वितरण प्रतिनिधीही येतो पण ते वृत्तपत्र मुद्रित करून देणारा व रात्रभर मशिनवर राबणारा तितकाच महत्वाचा घटक पडद्यामागेच राहतो. जागतिक मुद्रण दिनाच्या निमित्ताने या सहकाऱ्यांच्याच गौरवाप्रसंगीचे हे छायाचित्र...

Mar 01, 2018 @ Lokmat, Nashik

Pensioners Association


समाजातील निरांजने...
प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचा आग्रह, नव्हे आदेशामुळे आॅल इंडिया सेंट्रल गर्व्हनमेंट पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात जाण्याचा योग आला. प्राचार्य यशवंत पाटील लिखित ‘निरामय आनंदी वार्ध्यक्य’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी माझ्या हस्ते झाले.
अनेकविध जीवनानुभवांनी संपन्न असलेले ज्येष्ठ नागरिक हे सामाजासाठी दीपस्तंभच असतात. परंतु दुर्दैवाने अनेक ज्येष्ठांच्या नशिबी एकाकीपण आले आहे. ‘जुनं ते सोनं असतं’ याबद्दल दुमत नाही, परंतु जुन्यालाच कवटाळून न बसता नवीन पिढीशी समतोल साधत वर्तमानाशी सांधा जुळवता आला तर एकाकीपणा जाऊन ज्येष्ठ व्यक्तींचे कुटुंब व समाजातील श्रेष्ठत्त्व उजळून निघेल... अशी मांडणी यानिमित्ताने करता आली.

Feb 17, 2018 @ Samarth Karyalaya, Pune Road

Goda Deepotsav


गोदा अनन्य दीपोत्सव 2018...
गोदावरी नदी प्रगट दिनानिमित्त प्रथमच आयोजित गोदावरी अनन्य दीपोत्सवाप्रसंगीचे छायाचित्र... गोदेचा प्रवाह खळाळता राखण्यासाठी प्रयत्नशील व संघर्षरत असलेल्या गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी या धडपड्या तरुणाच्या कल्पकतेतून व पुढाकारातून साकारलेले हे पर्व।
पुरोहित संघाच्या प्रतिवर्षी केल्या जाणाऱ्या गंगा गोदावरी जन्मोत्सवाला या अनन्य दीपोत्सव व गोदा प्रदूषण मुक्तीच्या शपथेची जोड म्हणजे धार्मिकतेला सामाजिक जाणिवेचे पाठबळच...

Jan 28, 2018 @ Ramghat, Panchavati

Sarpanch Award 2018



‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड २०१८...
नाशिक जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक प्रवेक्षिकांमधून निवडल्या गेलेल्या तेरा श्रेणीतील सरपंचांचा सन्मान सोहळा डोळे दीपवणारा ठरला. बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली तसेच महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक असलेल्या या उपक्रमासाठी लोकमतच्या वार्ताहरांनी घेतलेले परिश्रम मोलाचे ठरले.
कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्करदादा पेरे या प्रमुख वक्त्यांसह माजी मंत्री विनायकदादा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, महसूल आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींची उपस्थिती व मार्गदर्शनही नवी ऊर्जा प्रदान करणारे ठरले. याप्रसंगीची ही काही आनंदचित्रे...

Jan 2018 @ Hotel Express Inn, Nashik

Republic Day


Dpj.... देशपांडे प्रदीप जगन्नाथ
1988 मध्ये मी लोकमतमध्ये दाखल झाल्यावर 'किरण अग्रवाल आज लोकमतच्या सेवेत जॉईन झाले' असा मेसेज टेलीप्रिंटरवरून जळगावला पाठवणारे हे ऑपरेटर देशपांडे. आणखी 3 महिन्यांनी ते सेवानिवृत्त होतील म्हणून आज त्यांच्या हस्ते लोकमत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
200 रुपये महिना पगारावर नोकरीची सुरुवात करणारे देशपांडे लोकमत मध्ये dpj म्हणून ओळखले जातात. प्रतिकूलतेतून वाटचाल करीत असल्याने वय झाले तरी अतिशय लाजाळू, मेहनतीही. आता आता पर्यंत ते जेलरोड ते अंबड पर्यंत सायकलवर येत.
आज या माझ्या जेष्ठ सहकारयाच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना मन भरून आले, जुन्या आठवणी दाटून आल्या.
राष्ट्राभिमानाच्या या पर्वात जुन्या सहकारीचा हा सन्मान आनंददायीच ठरला आहे...
जयहिंद.. जय भारत।

School Program, Lasalgaon


लासलगावचे श्री महावीर जैन विद्यालय... प्रशस्त आवार, सुमारे 2500 विद्यार्थीसंख्या असलेली व शिक्षणाचा बाजार न मांडता ज्ञानदान करणारी संस्था. 'परस्परोपग्रहो जीवानाम' असे तिचे ब्रीद.
संस्थेचे अर्ध्वयू श्री जव्हरीलालजी ब्रह्मेचा तसेच अन्य पदाधिकारी सुनील आब्बड, महावीर जी चोपडा, शांतीलाल जी जैन, मोहन बरडीया आदींच्या प्रेमापोटी स्नेह संमेलनाच्या उदघाटनाला जाणे झाले. नाशिकचे श्री सतीश कोठारी व सीए श्री प्रफुल बरडीया यांच्यासह शिवसेनेचे निफाड तालुका अध्यक्ष सुधीर कराड सोबत होते. तेथे व्यासपीठिय भाषणबाजीत फार न गुंतता विद्यार्थ्यांत जाऊन त्यांना पर्यावरण रक्षण व स्वछता बाबतची शपथ घ्यायला लावली. फार अपेक्षा नाहीत, दहा टक्के जरी तसे घडून येऊ शकले तरी पुरे...

Jan 24, 2018 @ Mahaveer Jain Vidyalaya, Lasalgaon

Sakhi Sankrant


‘लोकमत’ सखी मंचचा कार्यक्रम म्हटला की, चैतन्य व उत्साहाने भारलेल्या सखींचा झरा, नव्हे खळाळता धबधबाच असतो. सक्रांत सोहळ्यानिमित्तही त्याचाच प्रत्यय आला. यावेळी ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेतील उन्मेष व सायली म्हणजेच अभिजीत आणि स्नेहा यांच्यासह घेतलेली ही सेल्फी...

Jan 23, 2018 @ Nandanvan Lawns, Nashik

Journalist Day Niphad


पत्रकार दिन... सत्व, स्वत्व व सत्त्याची कसोटी।
निफाड तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. पत्रकारिता हा माझ्या दैनंदिन श्वासाचा व रोजच्या जगण्याचा भाग झालेला असल्याने आजवरचा अनुभव आणि भविष्यातील आव्हाने यावर मोकळेपणे बोलता आले.
आजच्या असंवेदनशील वातावरणात माणुसकीच्या संवेदना जागविण्याचे व विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान लक्षात आणून दिले.
सत्व व स्वत्व जपत सत्याची कास धरली तर चौथा स्तंभ अधिक मजबूत होईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायणराव कायस्थ, अशोक कापसे, अरविंद देसाई आदींसोबतच वितरक कोष्टीकाका, वारुबा वाघमोडे, बाळासाहेब कुंभार्डे आदींचाही सत्कार करण्यात आला. गेल्यावर्षी अकाली निधन झालेल्या छायाचित्रकार, पत्रकार नाना सुरवाडे यांच्या धर्मपत्नी चारुशीला यांना मदतीचा धनादेश देऊन सहकारी च्या प्रतीची जी सहयोगाची भावना दर्शविली गेली ती महत्वाची ठरावी.
ऍड रामनाथ शिंदे, अण्णा पाटील बोरगुडे, यशवंत पवार, शेखर देसाई, सुदर्शन सारडा, संदीप चकोर, माणिक देसाई आदीं चे नियोजन उत्कृष्ट राहिले।

Jan 06, 2018 @ Niphad

Khandesh Mahotsav


खान्देशनी संस्कृती न्यारीच... खान्देश हाऊ खाणीसना प्रदेश शे. कारण न्यारा न्यारा क्षेत्रमा चमकदार कामगिरी करणारा मोठला लोकेसनी परंपरा खान्देशले शे. खान्देश हाई रत्नसनी खाण शे. असा बराच रत्नस्माईन काहीस्ले कालदिन खान्देश रत्न पुरस्कार दिसनी त्यासना सत्कार व्हयनात.
नाशकातील खान्देश महोत्सवचा समारोप काल खान्देश रत्न पुरस्कार वितरणाने झाला. या महोत्सवानिमित्त खान्देशातील गिरणा, तापीचा संगम नाशिकच्या गोदेशी घडवून प्रादेशिक समरसतेच्या अभिसरणाचा चांगला पायंडा आयोजक आमदार सौ सीमाताई हिरे, महेश हिरे यांनी पाडला. प्रख्यात वकील 'पद्मश्री' उज्ज्वल निकम, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, ज्येष्ठ भाजपा नेते सुरेश बाबा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे आदींसह या सोहळ्यात सहभागी होता आले, त्याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...

Jan 01, 2018 @ Thakkar Dome, Cidco, Nashik

Journalist Day

पत्रकार दिनी सायकलींग....
खरे तर शाळा सुटली, तेव्हाच सायकलही सुटली. मध्यंतरी धाकट्या कन्येने माझ्याकडूनच सायकल शिकायचा हट्ट धरला तेव्हा एकदा ती हाती घेतली, पण पहिल्या प्रयत्नातच माझ्यासकट ती कलंडली म्हटल्यावर पुन्हा हात लावला नव्हता. पण पत्रकार दिनानिमित्त नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने मानवता कँसर सेंटरच्या सहकार्याने सायकलिंग ठेवल्याने प्रवीणजी खाबिया व डॉ राज नगरकर आदींच्या आग्रहाने पुन्हा सायकल हाती घेतली. माजी खासदार तथा ज्येष्ट पत्रकार भारतकुमार राउत तसेच पोलीस अधिकारी हरीश जी बैजल, चंदूलाल जी शाह, मिलिंद सजगुरे, किरण लोखंडे, राजेश पाटील, संजय राकेचा, नितीन राका आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. खूप दिवसाने सायकलिंगचा आनंद घेता आला.

Jan 06, 2018 @ Manavta Curie, Nashik

Thursday, July 5, 2018

Editors view published in Online Lokmat on 05 Jully, 2018

इतकी का ठिसूळ नाती?

किरण अग्रवाल

नाती ही काचेच्या भांड्यासारखीच असतात. ती तडकलीत की पुन्हा जुळण्याची शक्यता कमीच असते. नाती जपा असे म्हणूनच तर म्हटले जाते. पण कळणारी ही बाब अनेकांना वळत नाही. विशेषत: अडचणीच्या घडीतही नात्याची गुंफण उसवलेली मंडळी आपली अहंमन्य भूमिका न सोडता वागताना वा वावरताना दिसून येतात तेव्हा, अशांना नातीच कळत नाहीत की काय, असा प्रश्न पडून गेल्याशिवाय राहात नाही. नात्यांमध्ये ओढवलेली दुरस्थता व त्यातून कुटुंबकबिल्यात येणारी शुष्कता ही अनेकविध समस्यांना जन्म देणारीच असल्याने हा विषय सामाजिक चिंतेचा तसेच चिंतनाचाही ठरावा.

कुटुंब पद्धतीत वाढलेल्या विभक्ततेने जे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, त्यात नात्यांच्या ठिसूळपणाची बाब अग्रक्रमाने विचारात घेण्यासारखी आहे कारण व्यक्ती-व्यक्तीच्याच नव्हे तर एकूणच सामाजिक वेदनेचा पदर त्याच्याशी निगडित आहे. खरे तर नात्यात रस न उरणे किंवा त्यात महत्त्व न वाटणे या तशा भिन्न बाबी असल्या तरी त्या दोघांचा शेवट संबंध विच्छेदाकडेच नेणारा असतो; पण हे झाले टोकाचे पाऊल. खरीच का नाती अशी टोकाला नेऊन कडेलोट करण्यासारखी असतात, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होणारा असून, त्याची कारणे शोधायला निघता परस्परातील अविश्वास तर त्यामागे आढळून येतोच शिवाय कौटुंबिक जबाबदारीसंबंधीचे सामाजिक भय आज उरले नसल्यानेही ही स्थिती ओढवल्याचे आढळून येते.


अविश्वासातून तुटीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या नात्यांची उदाहरणे कमी नाहीत. पती-पत्नीमधील विश्वास संपल्याने विकोपाला गेलेली भांडणे जागोजागी पोलीस दप्तरी नोंद होत असतात. लग्नाला तब्बल १९ वर्षे झालेली व पदरी दोन अपत्ये असताना सिनेमात काम करण्याच्या हौसेपोटी गायब राहणाऱ्या पत्नीबद्दल मुंबईतील भायखळा पोलिसांकडे अलीकडेच दाखल झालेली तक्रार त्यापैकीच एक. प्रस्तुत प्रकरणातील खरे खोटे संबंधिताना ठाऊक; परंतु नात्यातील दुरावा वाढण्यास अविश्वास कारणीभूत ठरत असल्याची शेकडो उदाहरणे देता येणारी आहेत. ती जशी चिंतेची आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब आहे ती कुटुंब कर्तव्याबद्दल सामाजिक धाक न उरल्याची. त्याकडे समाजधुरिणांनी गांभीर्याने लक्ष पुरवण्याची गरज आहे.

एका रुग्णालयात अनुभवयास मिळालेली दोनच उदाहरणे यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरावीत. त्यापैकी पहिले म्हणजे, साठीतील एक महिला पक्षाघात झालेल्या आपल्या पतीला रुग्णालयात घेऊन आलेली. काहीही करा, यांना वाचवा अशी तिची याचना. सोबत कुणीच कसे नाही, असे विचारता जी बाब कळली ती खरी अस्वस्थ करणारी. म्हणाली, मुलगा रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या पथकात आहे. सूनबाईही डॉक्टर आहे. पण त्यांना वेळ नाही. विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयात ही महिला पतीला घेऊन आली, तेथून मुलाचे घर जवळच आहे. पण सासू-सासºयास रुग्णालयात जेवणाचा डबा देण्याचीही सूनबाईची तयारी नाही. डोळ्यात आसवं घेऊन खिन्न मनाने नशिबाला दोोष देत ही महिला आपल्या पतीच्या रुग्णालयीन सेवेत व्यस्त आहे.

दुसरे उदाहरण, पती-पत्नीचे जमत नाही. एकुलता एक मुलगा असल्याने व समाजात बदनामी नको म्हणून मुलाचे आई-वडील पडती बाजू घेत सूनबाईशी जुळवून घ्यायला तयार आहेत; पण तडकलेली काच जुळायला तयार नाही. अशात मुलाचा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली. म्हातारे आई-वडील जिवाच्या आकांताने धडपडत आहेत. पण सूनबाई अशा प्रसंगीही पाठीशी उभे राहायला तयार नाही. नावाला रुग्णालयात येऊन एकदा भेटून गेली. काही झाले तर कळवा, असे सांगून गेली. काही झाले म्हणजे काय अपेक्षित आहे तिला याचाच विचार करीत म्हातारा-म्हातारीचे डोळे टपटप टपकत आहेत. नात्यांमधले उसवलेपण किती गंभीर पातळीवर पोहचले आहे तेच यातून स्पष्ट व्हावे. वृद्ध माता-पित्यांकडे दुर्लक्ष करणाºया पाल्यांना जरब बसविणारा कायदा सरकारने केला आहे; पण ‘आपलेच दात आणि आपले ओठ’ची भावना हतबल करीत असते. म्हणजे कायदा असून त्याचा उपयोग करता येत नाही व सामाजजिक भयही उरले नाही. माता-पित्यांना वाºयावर सोडून देणाºयांचा कान धरायला कुणी पुढे येत नाही. नाती ठिसूळ होताहेत ती त्यामुळेच. समाजशास्त्रींनी ही नाती टिकवण्यासाठी व जगवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

Saraunsh published in Lokmat on 01 Jully, 2018


Editors view published in Online Lokmat on 28 June, 2018

परि उमगले ना तंत्र जीवनाचे !

किरण अग्रवाल

शाळा, महाविद्यालयातील परीक्षेत उत्तीर्ण होणारे जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी होतातच असे नाही, कारण शिक्षणातील मूल्याधिष्ठितपणा तर कमी होत चालला आहेच; शिवाय आयुष्यातील चढ-उताराला धैर्याने सामोरे जाण्याचे शिक्षण त्यात घडून येईनासे झाले आहे. नोकरीसाठीचे शिक्षण वाढले असून, जीवनासाठी झगडाव्या लागणाऱ्या कसरतीचे भान त्यातून जागवले जात नाही. त्यामुळे शिक्षित होऊनही असहायता अनुभवव करणारी तरुण मंडळी शुल्लक समस्यांमुळे मानसिकदृष्ट्या कोलमडून पडताना दिसते व त्यातूनच टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवायलाही मागेपुढे पाहत नाही. शिक्षणाने जबाबदारीची जाणीव घडविली जातेय का किंवा कोणत्याही अडचणींना हिमतीने सामोरे जाण्याचे धाडस बिंबवले जातेय का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.

शिक्षणामुळे विचाराच्या कक्षा रुंदावतात. विवेकाच्या ज्योती प्रज्वलित होतात व त्यामुळे भल्या-बुºयाची जाण होते, असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. बव्हंशी ते खरेही आहे, तसा अनुभवही समाजात वावरताना येतो. परंतु त्याचबरोबर अडीअडचणीच्या अगर कसोटीच्या प्रसंगी भलेभले उच्चविद्याविभूषित गांगरून गेलेलेही दिसून येतात. अर्थात, इथवरही ठीक. कारण शिक्षणाने आलेले भान संबंधितांना अधिक चिकित्सक बनवत असेल, त्यामुळे ते निर्णयप्रक्रियेत गोंधळलेले दिसूनही येत असतील कदाचित; परंतु याची पुढची पायरी गाठत प्रश्न सोडविता येत नसेल किंवा तशी शक्यता दिसत नसेल तर चक्क आयुष्य संपवायला निघण्याच्या निर्णयाप्रत ते येत असतील तर मग शिक्षणाने त्यांना काय शिकवले, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे. अनेक ठिकाणच्या विविध प्रकरणांत शिक्षित तरुण हिंमत सोडून किंवा हतबलतेतून अप्रिय निर्णय घेताना दिसून येतात, तेव्हा आश्चर्य वाटून जाते ते त्यामुळेच.


लाथ मारीन तेथे पाणी काढेन, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याच्या ठायी असते ती तरुण पिढी. पण या तरुणांतील शिकलेली मुलेही आत्महत्येचा मार्ग अनुसरतानाची अलीकडची दोन उदाहरणे या संदर्भातील गंभीरता लक्षात आणून देणारी आहे. यातील एक घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील. ईश्वर वठार येथील अनिशा लवटे या पॉलिटेक्निकला शिकणाºया तरुणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. कारण काय तर, शिक्षणाचा वाढता खर्च भागवताना वडिलांची होणारी ओढाताण तिला बघवत नव्हती. तिची एक बहीण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर भाऊ वारणा येथे शिकतो आहे. एक एकर शेतीतून या तीनही मुलांचा शिक्षणाचा भार पेलवत नसल्याने वडिलांवरील कर्ज वाढत होते. त्यामुळे अनिशाने आयुष्य संपविले. असे करताना जे वडील कर्जबाजारी होऊन तिला शिकवण्यासाठी धडपडत होते, त्यांच्यावर किती दु:खाचा डोंगर कोसळेल याचा विचार केला गेला नाही. हतबलतेतून तिने हे पाऊल उचलले; पण तिचे शिक्षण तिला याबाबत मार्गदर्शक ठरूशकले नाही, असेच म्हणायला हवे. शिक्षणातून विचार करण्याची क्षमता लाभली असती तर कदाचित तिने असा टोकाचा निर्णय घेतला नसता. अडचणीतून मार्ग निघण्याची वाट बघत ती परिस्थितीला सामोरे गेली असती. पण तसे होऊ शकले नाही.

दुसरे उदाहरण असेच काहीसे आहे. गुजरातच्या बडोदा येथे इंजिनिअरिंगच्या दुसºया वर्षात शिकणाºया नैतिककुमार तांडेल या विद्यार्थ्याने आपल्या भावाला किडनी मिळावी म्हणून आत्महत्या केली. मुळात, भावाच्या जगण्यासाठी अशा पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपविण्याचे कुणीही समर्थन करणार नाही. कारण गरजूला किडनी मिळण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे आत्महत्या करूनही वेळ दवडला गेल्याने त्याची किडनी उपयोगी पडू शकली नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाºया नैतिकने उगाच स्वत:चा जीव गमावल्याचे स्पष्ट व्हावे. अवयव प्रत्यारोपणासाठीची पुरेशी वैज्ञानिक माहिती नसण्यातून हे घडून आलेले दिसते. म्हणूनच अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन किंवा घेताना नैतिकने काय शिकले, असा प्रश्न उपस्थित व्हावा. यातील भाव-भावनांचा उद्वेग, असहायतेतून आलेली अपरिहार्यता आदींचा विचार ठीक असला तरी आत्महत्येचा पर्याय कसा योग्य ठरावा? शिक्षणाने मुले शिक्षित होत आहेत; पण ते सुशिक्षित होत आहेत का, यासारखा प्रश्नही त्यामुळेच केला जातो. प्रस्तुतच्या घटना पाहता व विशेषत: तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उचलेले पाऊल बघता, ते शिक्षणातील तंत्र शिकू पाहत होते; पण जीवनाचे तंत्र त्यांना काही उमगले नसावे असेच खेदाने म्हणता यावे. समाजमन अस्वस्थ करणाºया या घटनांकडे गांभीर्याने बघून तरुणातील हतबलतेवर इलाज शोधण्याची वेळ आली आहे, ती त्यामुळेच.