भांडण-तंटा नकोच!
किरण अग्रवाल
भांडणाला विषय असावाच लागतो याचे बंधन नसतेच मुळी. कसल्याही व क्षुल्लकातल्या क्षुल्लक कारणांवरूनही भांडण होते किंवा करता येते. यात असावे लागते ती भांडण करण्याची क्षमता व उर्मी. ज्याला वेगळ्या भाषेत भांडकुदळपणा म्हणता यावे. अर्थात, भांडणातून हाती काय लागते, हा तसा प्रश्नच असला तरी, मनस्ताप मात्र घडून आल्याखेरीज राहात नाही. बरे, हा मनस्ताप केवळ प्रासंगिक अगर तात्कालिक स्वरूपाचाच असतो असेही नाही. भांडण कुठल्या विषयाचे, पातळीचे आणि किती तीव्रतेचे आहे, त्यावर ते ठरते. अगदी भारत-पाकिस्तानातले भांडण असो, की साधे गल्लीतील नळावरचे; त्यातून मनस्ताप हा ठरलेला असतो. तेव्हा, भांडण करण्यापूर्वी विचार केलेलाच बरा म्हणायचा.
भांडणासंबंधीचे हे प्रास्ताविक यासाठी की, नळावर झालेल्या भांडणातून उद्भवलेल्या कोर्टकचेरीचा एक फैसला अलीकडेच आला आहे. म्हणायला ते नळावरचे भांडण होते व त्याचे कारणही खूप काही गंभीर होते अशातला भाग नव्हता. शेजारीच वास्तव्यास असलेल्या फिर्यादीच्या जागेत डबर टाकला म्हणून आरोपीने नळावर पाणी भरण्यासाठी एकत्र आले असता कुरापत काढून केस धरले व हाताला चावा घेतला, अशी ‘टिपीकल’ फिर्याद पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात नोंदविली गेली होती. या खटल्याचा निकाल २३ वर्षांनी लागला असून, आरोपी महिलेच्या वयाचा विचार करता व तिचा पूर्व इतिहास तसेच वर्तमान गुन्हेगारी स्वरूपाचे नसल्याने न्यायालयाने चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर आरोपीची सुटका केली आहे. परंतु या एकूणच प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाची दीर्घकालीकता व त्यादरम्यान उभय पक्षांना जो काही मनस्ताप सोसावा लागला असेल तो पाहता काय मिळवले संबंधितांनी त्यातून, असा प्रश्न नक्कीच उपस्थित व्हावा. कारण, कोर्ट-कचेरी म्हटली की साक्षी-पुरावे, जाब-जबाब आले. त्यात वेळ जातोच. विषय वा कारण क्षुल्लक असले तरी प्रक्रियांमधले अडकलेपण त्यातून ओढवते. तेच मनस्ताप वाढवणारे किंवा देणारे असते. शहाण्याने कोर्ट-कचेरीची पायरी चढू नये असे म्हटले जाते, ते उगीच नव्हे!
तरी भांडणांची अगर तंटा-बखेड्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या पोलीस दप्तरात २०१३ मध्ये एकूण २,३४,३८५ गुन्ह्यांची नोंद झालेली असून, त्यात प्रॉपर्टीविषयक गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक ७२,१९५ होती. चालू २०१८ या वर्षामध्ये जानेवारी ते जून अखेरपर्यंत फक्त हाणामारीच्याच सुमारे ९ ते १० हजार म्हणजे प्रतिमाह साडेनऊशे घटना नोंदविल्या गेल्या आहेत. अन्य दरोडा, खून आदी गुन्हे वेगळेच. त्यामुळे स्वाभाविकच न्यायव्यवस्थेवरही ताण येत आहे. निर्णय प्रक्रियेला विलंब होतो हे खरे. पण त्यामागील कारणे लक्षात घेतली जात नाही. म्हणूनच सबुरी, सामोपचार व समजुतदारी गरजेची आहे. आपल्याकडे अलीकडे अध्यात्ममार्गींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अध्यात्माचा मार्गही याच त्रिसूत्रीचा जागर घडवत असतो. तरी समाजातील द्वेष, ईर्षा, मत्सरादी अवगुणांचे प्रमाण कमी होत नाही. पालथ्या घड्यावर पाणी अशीच ही स्थिती असते. पण स्वत:बद्दलचा मोह सुटत नसल्याने व्यक्तीकडून प्रमाद घडून येतात. त्यातून भांडणे उद्भवतात व ती पोलीस दप्तरी पोहोचतात. साधे-सोपे व निसर्गत: आकारास येणारे हे जीवनचक्र आहेत. मानव्यशास्त्राच्या अंगाने विचार करता, राग-लोभाचे व स्वभावाचे हे रससंस्कार न चुकणारेच असतात. परिणामी मनस्ताप हा यातील उपघटकदेखील ओघाने जीवनमानात अंतर्भूत होतो. प्रश्न फक्त इतकाच की, या मनस्तापाचे प्रमाण कमी नाही का करता येणार? त्यासाठी काय करायला हवे?
म्हटले तर अवघड आहे त्याचे उत्तर. पण, ढोबळपणे सांगायचे तर पुन्हा उपरोल्लेखित त्रिसूत्रीवरच येऊन विसावता यावे. कारण स्वत:ची समजुतदारी हाच यावरील खात्रीशीर उपाय ठरावा. दुर्दैवाने आज ती समजुतदारीच लयास जाताना दिसत आहे. ‘आरे’ ला ‘कारे’ने उत्तर देण्याची मानसिकता बळावली आहे. त्यामुळे हेतुत: अगर जाणीवपूर्वक न घडलेल्या घटनेबद्दलही समजून न घेता वाद घालण्याचे प्रकार होत असतात. यात अशा प्रकरणात किंवा घटनात नुकसान झाले असेल तर तो वादही समजून घेता यावा, परंतु नुकसान झालेले नसतानाही अनवधानाने घडलेल्या घटनेप्रकरणी वाद घातले जातात व समज ऐवजी गैरसमज करून घेतले जातात तेव्हा ते विकोपास जाऊन पोलीस स्टेशनची पायरी गाठताना दिसून येतात. किमान असल्या प्रकरणात तरी समजुतदारी दाखवून मनस्ताप टाळता येऊ शकतो, पण तेच होत नाही. नळावरची भांडणे तसलीच असतात. त्यातही समजुतदारी दाखविली जात नाही म्हणून दोन-दोन दशके कोर्टकचेरी करण्याची व मनस्ताप ओढवून घेण्याची वेळ येते. तेव्हा शक्यतोवर भांडण-तंटे टाळलेलेच बरे, हाच यातील इत्यर्थ.

No comments:
Post a Comment