Thursday, February 7, 2019

Editors view published in Online Lokmat on 07 Feb, 2019

निर्मोहित्वामागील प्रेरणा महत्त्वाच्या !

- किरण अग्रवाल

मनुष्यजन्म हा मोठ्या पुण्यकर्माने लाभतो असे म्हणतात, मग तसे असताना आणि शिवाय कौटुंबिक सौख्य-संपन्नता लाभूनही कुणाच्या मनाला आत्महत्येचा विचार का शिवावा, हा प्रश्न जसा बुचकळ्यात टाकणारा आहे तसाच किंवा तितकाच; आनंदी आयुष्याची स्वप्ने उबवायची सोडून चांगली अभियांत्रिकी वा विपणनादी विद्याशाखांची पदवी धारण केलेली तरुण मुले नागा संन्यास का स्वीकारतात, हा प्रश्नही काहीसा अचंबित करणाराच आहे. शेवटी कोणतीही व्यक्ती जगते कशासाठी अथवा तिला जगावेसे का वाटते, या प्रश्नाचे उत्तर पाहू जाता जगण्यामागील प्रेरणा क्षीण होऊ लागल्यामुळे तर असे होत नसावे ना, असा वेगळाच प्रश्न त्यातून उपस्थित होऊन गेल्याशिवाय राहू नये.

अर्थात, प्रश्नांचेच हे जंजाळ आहे. जन्म आणि मृत्यूच्या दोन काठांमधले अंतर पार करायचे तर अनेकविध प्रश्न व अडथळ्यांची नौका वल्हवित जावे लागते. ‘लहरो से डरकर नय्या पार नही होती, कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती’ असे म्हणूनच तर म्हटले जाते. पण तरी काही जण हात टेकल्यागत परिस्थितीशरणतेतून टोकाचा निर्णय घेताना दिसतात. विशेषत: निसर्गही साथ देत नाही, कुणाकडून कसल्या मदतीची किंवा सहकार्याची आस उरत नाही तेव्हा हतबलता व उद्विग्नता आकारास येऊन जगण्यातील गम्यच हरवून गेल्याची भावना तीव्र होते, मग अशास्थितीत जगायचे तरी कशासाठी, कुणासाठी, असा प्रश्न आशेचे अंकुर खुडून टाकण्यास पुरेसा ठरतो आणि त्यातून व्यक्ती आत्महत्येच्या निर्णयाप्रत पोहचते. जबाबदारी व जगण्यापासून दूर जाण्याचा हा मार्ग समर्थनीय मुळीच नाही, तरी काही जण त्या वाटेने जातात. तेव्हा ही आयुष्याच्या अंताकडे नेणारी उद्विग्नता टाळायची असेल तर जगण्यातले मर्म, त्यातील आनंद-ओढ प्रगाढ होणे गरजेचे ठरावे; परंतु ते तितकेसे होताना दिसते का, हाच प्रश्न आहे.



महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यातील निरसता व असहाय्यता व्यक्तीला आत्महत्येकडे ओढून नेते असे म्हटले तर सर्वसंगपरित्यागही त्यातूनच घडून येतो की काय, असाही प्रश्न उपस्थित व्हावा. सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात तब्बल दहा हजार जणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली असून, त्यात इंजिनिअर व एमबीए झालेल्यांचा समावेश आहे, हे वृत्त बघता सनातन धर्मात अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या या तपस्याविधीच्या स्वीकारासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षितांनी पुढे येणे हे कोणत्या प्रेरणेतून घडून आले असावे? बरे, परिस्थितीने पिचलेली, हताश झालेली, आयुष्याच्या उतरंडीकडे आलेली ही ज्येष्ठ मंडळी नाही, तर यातील बहुतेकजण तरुण व शिकले-सवरलेले आहेत. लाथ मारतील तिथे पाणी काढू शकतील, अशी ही मंडळी आहे. गुलाबी स्वप्ने पाहून ते पूर्णत्वास नेण्यासाठी धडपड करण्याचे त्यांचे वय आहे, तरी ते साधुत्वाकडे ओढले गेले. शिक्षणाने विचार करण्याची क्षमता त्यांच्या ठायी आली आहे, त्यामुळे त्यांनी सदरचा निर्णय विचारपूर्वकच घेतला आहे हेदेखील स्पष्ट आहे. मग यासाठीच्या कोणत्या प्रेरणांनी त्यांना खुणावले असावे?

वस्र बदलले, म्हणजे लंगोटी नेसली व अंगाला भस्म लावले की झाले साधु; इतका हा साधा-सोपा प्रकार नाही. त्यासाठी अनेकविध निर्बंधांची, भौतिक सुख-सुविधांच्या त्यागाची मोठी प्रक्रिया आहे. सुमारे सहा वर्षांच्या तपश्चर्येला त्याकरिता सामोरे जावे लागते, तरी हे उच्चशिक्षित तरुण त्याकडे ओढले गेले. त्यामुळे, एका वेगळ्या क्षेत्रातील करिअरच्या प्रेरणा त्यामागे राहिल्या, की जीवनातील निरसताच त्यांना तिकडे घेऊन गेली हा अभ्यासाचा व चिकित्सेचा विषय ठरावा. मोह-मायेच्या त्यागाचे निर्मोहित्व हे सोपे नसते. स्वत:चा यासंबंधीचा परित्याग हा संपूर्ण कुटुंबावरही परिणाम करणारा असतो. नाइलाजातून साधू बनणे व विचारपूर्वक ते स्वीकारणे यात मोठा फरक आहे. म्हणूनच त्यामागील प्रेरणांचा शोध औत्सुक्याचा ठरावा. अर्थात, ते काहीही असो; शिक्षा व दीक्षेचा हा मिलाफ साधू सांप्रदायाला आलेल्या ‘अच्छे दिन’ची जाणीव करून देणारा मात्र नक्की म्हणता यावा. 

Web Title: Engineers to management graduates, 10000 to turn Naga sadhus

No comments:

Post a Comment