Saturday, March 16, 2019

Blog / Political article published in Online Lokmat on 15 March, 2019

काकांच्या कृपेनं पुतण्यांचा बोलबाला... 

- किरण अग्रवाल

राज्याच्या राजकारणात काकांवर कडी करून पुतण्यांनी बाजी मारल्याचे आजवर अनेक घटनांतून दिसून आले आहे. यात काका ते काकाच राहिल्याचेही बघावयास मिळाले असले तरी, पुतण्यांनीही या काकांच्या अधिपत्याखाली राजकीय वरचष्मा राखण्यात कसर ठेवलेली नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर मातब्बर नेते छगन भुजबळ यांचा विचार टाळून त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाच उमेदवारी घोषित केल्याची बाबही याच पुतणेशाहीच्या वाढत्या प्रस्थाला अधोरेखीत करणारी म्हणता यावी.

महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे, वसंतराव नाईक व मनोहर नाईक, शरद पवार व अजित पवार, अनिल देशमुख व आशिष देशमुख अशा काही काका-पुतण्यांच्या जोडय़ांनी राजकारण गाजविल्याची उदाहरणे कमी नाहीत. काकांचे बोट धरुन राजकारणात पुढे आलेल्या पुतण्यांनी काकांदेखत आपले स्वत:चे सवतेसुभे उभारून यशस्वितेचे पाऊल टाकल्याचेही राज ठाकरे व धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने पहावयास मिळाले आहे. राष्ट्रवादीतील पवार काका-पुतण्याचे राजकारणही महाराष्ट्राला नवीन राहिलेले नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे खासदार बनल्या आणि पक्ष तसेच पक्षेतर राजकारणात त्यांनी स्वत:चे स्वतंत्र वलय निर्माण केले असले तरी, राष्ट्रवादीतील राजकारण मात्र अजितदादांच्याच भोवती फिरत राहिले आहे. सुप्रियाताईंनीही यासंदर्भात स्पष्टता करत पक्षीय पातळीवर दादांच्या दादागिरीला नेहमी दाद देऊन  शरद पवार यांच्या वारसदारीबाबतच्या चर्चाना थोपविले आहे.



राष्ट्रवादीतीलच मातब्बर नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीतही अशीच काहीशी परिस्थिती राहिली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून कॉँग्रेस व राष्ट्रवादीत वाटचाल करणा-या भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपदही भूषविले, परंतु त्याखेरीजही त्यांची ‘फायर ब्रॅण्ड’ नेते म्हणून टिकून असलेली प्रतिमा महत्त्वाची राहिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने ठेवलेल्या आरोपांमुळे सुमारे दोन वर्षे तुरुंगात घालवावी लागलेल्या भुजबळांनी जामिनावर बाहेर येताच ज्या पद्धतीने सत्ताधा-यांवर तोफ डागून त्यांना घेरण्याचे धाडस चालविले आहे, ते पाहता आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात शरद पवार यांच्यानंतर प्रचारासाठी सर्वाधिक मागणी राहणारे स्टार प्रचारक म्हणून भुजबळांकडेच बघितले जात आहे. भुजबळ यांचे पुत्र पंकज गेल्यावेळी दुस-यांदा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. परंतु, भुजबळांच्या राजकीय गोतावळ्यात मोठय़ा साहेबांनंतर छोटे साहेब म्हणून चर्चा होते ती त्यांचे पुतणो समीर यांचीच.

समीर भुजबळ यांनी विलासराव देशमुख यांचे सरकार सत्तेवर असताना ते पाडण्यासाठी चालविले गेलेले तत्कालीन प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे विलासरावांच्याच शिफारशीवरून 2009 मधील लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे नाशकात समीर यांना उमेदवारी दिली गेली होती. या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून समीर यांनी नाशकात काही प्रकल्प मंजूर करवून घेतले. परंतु आपल्या फटकळ स्वभावामुळे सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचे फारसे पटू शकले नाही. त्यामुळेच गेल्यावेळी 2014 च्या निवडणुकीत समीर यांच्याऐवजी थेट काकांनाच म्हणजे छगन भुजबळ यांनाच लोकसभेसाठी मैदानात उतरविले गेले. परंतु मोदी लाटेपुढे त्यांचाही निभाव लागू शकला नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर महाराष्ट्र सदन आणि बेनामी संपत्तीचे शुक्लकाष्ट त्यांच्या पाठीशी लागले आणि दोघांनाही सुमारे दोन वर्षे तुरूंगात घालवावी लागली. अलिकडेच ते जामिनावर बाहेर आले आहेत.

अशा परिस्थितीतही चालू लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात भुजबळांपैकीच एक उमेदवार राष्ट्रवादीकडून दिला जाणे निश्चित होते. यात छगन भुजबळ यांची प्रकृती व पक्ष पातळीवर त्यांच्यावर असलेली संपूर्ण राज्यातील प्रचाराची जबाबदारी पाहता पुन्हा पुतणे समीर यांनाच उमेदवारी दिली जाणे अपेक्षितच होते. परंतु समीर यांना पक्षांतर्गतच असलेला विरोध पाहता काका की पुतण्या याबद्दलची उत्सुकता कायम होती. यासंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी छगन भुजबळ यांनी नाशकात खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात ‘समीरमुळेच मी तुरुंगातून जिवंत बाहेर येऊ शकलो’, असे भावनिक विधान करुन एकप्रकारे पुतण्याच्या पाठीशी पक्षीय बळ एकवटण्याचा प्रयत्न केला होता. तरी, राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव घोषित न झाल्याने भुजबळांसह पक्ष कार्यकर्त्यांमधील घालमेल वाढली होती. भुजबळांखेरीज अन्य नावेही त्यामुळेच चर्चेत येऊन गेली होती. परंतु, अंतिमत: राष्ट्रवादीने मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांची उमेदवारी घोषित करतानाच नाशकातून समीर भुजबळ यांचीही उमेदवारी निश्चित केल्याने राजकारणातील पुतणेशाहीच्या बोलबाल्यावर शिक्कामोर्तब होऊन गेले आहे.


Web Title: culture of political dynasties in maharashtra

No comments:

Post a Comment