Tuesday, April 30, 2019

Election article / Blog published in Online Lokmat on 30 April, 2019

मतदान केंद्राच्या बाहेरच गर्दी अधिक !

किरण अग्रवाल

राज्यातील शेवटच्या चरणात मतदान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत यंदा मतदानाचा ‘टक्का’ वाढला खरा; पण तो तसा अंशत: या संज्ञेत मोडणाराच आहे. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीवरून उमेदवारांच्या नफा-नुकसानीचे गणित मांडतानाच घराबाहेर न पडलेल्यांच्या नाराजीची कारणे विचारात घेतली जाणेही गरजेचे ठरावे. कारण, यात सत्तारूढ पक्ष अगर उमेदवाराबद्दलचा निरुत्साह असू शकतो तसाच सरकारने शक्य ते ते सारे प्रयत्न करून व सोयी-सुविधा पुरवूनही केवळ यंत्रणांच्या बेफिकिरीमुळे काहींना मतदानास मुकावे लागलेलेही असू शकते; तेव्हा याबाबत तर्कसंगत चिकित्सेची अपेक्षा गैर ठरू नये.

सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघात सुमारे ६०, तर दिंडोरीत ६५ टक्के मतदानाची आकडेवारी प्राथमिक पातळीवर हाती आली आहे. सर्व ठिकाणची मतयंत्रे एका जागी आल्यावर त्यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. हे आकडे टक्का वाढल्याचेच दर्शवणारे आहेत. गेल्यावेळी, म्हणजे २०१४ मध्ये नाशिक मतदारसंघात ५८.८३ टक्के मतदान झाले होते, त्यात यंदा दीड-दोन टक्क्यांची भर पडली आहे तर दिंडोरीत ६३.४१ टक्के होते, तो आकडाही दोन-अडीच टक्क्यांनी वाढला आहे. भलेही अल्प असेल; पण प्रथमदर्शनी ही वाढच असून, ती अभिनंदनीय आहे याबाबत कुणाचेही दुमत असू नये. ही वाढ कोणत्या मतदारांची असेल किंवा कशामुळे झाली असेल याचा विचार करता, यंदा नवमतदार मोठ्या संख्येने नोंदविले गेल्याची बाब चटकन नजरेत येते. या ‘यंग ब्रिगेड’चा उत्साह व मतदानाबद्दलची अपूर्वाई ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर ठळकपणे दिसून येत होती. अगदी मुंबई, पुण्यात नोकरीस असलेले तरुण मतदानासाठी गावाकडे आले होते. दुपारनंतर बोटास शाई लावलेल्या तरुणांची जी गर्दी नोकरीच्या गावी परतण्यासाठी बस स्टॅण्ड व रेल्वे फलाटांवर दिसून आली त्यावरूनही ते स्पष्ट व्हावे. विशेषत: जिल्ह्यातील ४५ लाखांपेक्षा अधिक असलेल्या मतदारांत चाळिशीच्या आतील तरुणांची संख्या अगदी ४५ टक्के इतकी आहे. महिलांची संख्याही कमी-अधिक याच प्रमाणात आहे. त्यामुळे तरुण व महिलांची मतदानासाठीची लगबग मोठ्या प्रमाणात आढळून आली. टक्का वाढला तो यामुळे.



दुसरे म्हणजे, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनानेही खूप प्रयत्न केलेत. मतदार नोंदणी तर उशिरापर्यंत राबविलीच शिवाय मतदार नावे, मतदान केंद्रे आदी तपशील घरबसल्या जाणून घेण्यासाठी संकेतस्थळही अपडेट ठेवले. यंदा प्रथमच दिव्यांग मतदारांसाठी घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली, तर महिला संचलित सखी मतदान केंद्र उभारले होते. उन्हापासून बचावासाठी मंडप व पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था होती. मतदार‘राजा’ला मतदान करणे सुसह्य वाटावे, अशी ही व्यवस्थेची आखणी होती. या सरकारी प्रयत्नांच्या जोडीलाच सामाजिक संस्था-संघटनाही यंदा मोठ्या प्रमाणात मतदार जागृतीसाठी सरसावलेल्या होत्या. सोशल माध्यमांचा बोलबाला असल्याने त्या माध्यमातून समाजासमाजाच्या ज्ञाती संस्थांनीही मतदान करण्याचे आवाहन केले होते. या साऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेही मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. पण एकीकडे या वाढीचे समाधान असताना, जी नवमतदार नोंदणी होती व त्यांचा प्रतिसादही लाभला आणि अन्य सोयी-सुविधांमुळेही जी वाढ झाली ती प्रामुख्याने नव्याची म्हणता यावी. परंतु एकुणातील वाढीचे अल्पप्रमाण पाहता जुने मतदार फारसे घराबाहेर पडले नसावेत, अशीच शंका घेता यावी. का घडले असावे असे, हाच खरा प्रश्न आहे.

यासंदर्भाने विचार करता, एक तर सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे किंवा कुणीही निवडून गेले तरी काही फरक पडत नाही, या नकारात्मक मानसिकतेतून असे झाले असावे, हा कयास बांधता यावा आणि दुसरे असे की, प्रत्यक्षात जे पाहावयास मिळाले त्यानुसार अनेक मतदारांना मतदान केंद्र व कक्ष आदी माहितीच्या चिठ्ठ्याच पोहोचल्या नसल्यामुळे आणि मतदान केंद्रावर आल्यानंतरही तशी माहिती सुलभतेने न मिळाल्याने अनेकजण वंचित राहिले. हा दोष सर्वस्वी यंत्रणेच्या बेफिकिरीचा आहे. मतदानाच्या अगोदर या मतदार चिठ्ठ्या संबंधितांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना तसे का होऊ शकले नाही? याप्रकरणी कुणी कुणाला जाब विचारणार आहे की नाही? मतदान केंद्रापर्यंत येऊन नाव नसल्यामुळे परत जावे लागलेला एक जरी मतदार असेल तर त्याच्या मनात याबाबीची पडणारी आढी त्याला कायमसाठी निरुत्साही करणारी ठरते. याचे पातक कुणावर? यात वेळच्या वेळी आपल्या नावाची खात्री न करणा-या मतदाराचाही दोष आहेच, नाही असे नाही; परंतु यापूर्वी असलेली नावे अचानक गायब होतात तरी कशी? मतदान केंद्राच्या आत गर्दी आढळण्याऐवजी केंद्राबाहेर आपली नावे शोधणा-यांची गर्दी दिसून येणामागे व मतदानाचा टक्का अपेक्षेइतका वाढू न शकण्यामागे यंत्रणेच्या कामचुकारकीचा मुद्दा म्हणूनच महत्त्वाचा ठरणारा आहे.

महत्त्वाचे म्हणजे, दुपारच्या कडाक्याच्या उन्हामुळे थोडा फरक पडला असा युक्तिवाद करणारे करतीलही; परंतु गेल्यावेळीही यापेक्षा फार वेगळी स्थिती नव्हती. आजच्या एवढी जागरूकता नसताना नाशकात १९६७मध्ये आजवरचे सर्वाधिक ६५.७९ टक्के, तर तत्कालीन मालेगावमध्ये १९६२मध्ये ६६.७६ टक्के मतदान झाले होते. आज एवढे प्रयत्न करून, तरुणाई उत्स्फूर्तपणे सहभागी होऊनही याच आकड्यांशी मिळतेजुळते आकडे गाठले गेले. नाशिक मतदारसंघात गेल्यावेळी म्हणजे २०१४मध्ये, २००९ पेक्षा तब्बल १३ टक्क्यांनी मतदान वाढलेले होते. तसा विचार करता यंदा तो ‘ग्राफ’ खूपच मर्यादित ठरतो. दिंडोरीतही गेल्यावेळी १५ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला होता. यंदा तिथेही अल्पवाढ आहे. थोडक्यात, गेल्यावेळेपेक्षा यंदा ‘टक्का’ वाढला खरा; परंतु त्यासाठीच्या अन्य अनेकविध पोषक बाबींचा विचार करता तो समाधानकारक श्रेणीत गणता येण्यासारखा नाही इतकेच. 


Web Title: More crowd out of polling station!

Thursday, April 25, 2019

Editors view published in Online Lokmat on 25 April, 2019

सांगोपांग विचारांतीच मताधिकार बजावण्याची वेळ

किरण अग्रवाल

प्रचाराचा गलबला असा काही शिगेस पोहोचला आहे की, मतनिश्चितीबाबत संभ्रमाचीच स्थिती उत्पन्न व्हावी; परंतु साऱ्यांचेच सारे काही ऐकून व बरेचसे अनुभवूनही झालेले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विशेषत: यंदा स्थानिक उमेदवार व भोवतालच्या समस्या अगर विकासाविषयी फारशी चर्चा न झडता सर्वांचाच प्रचार अधिकतर राष्ट्रीय विषयाला धरून तसेच परस्परांच्या नीती-धोरण व वर्तनावर आरोप-प्रत्यारोप करीत घडून आला, त्यामुळे आता दुसऱ्या कुणाचे ऐकून नव्हे, तर आपल्या स्वत:शीच ‘मन की बात’ करीत मत निर्धार करायचा आहे.

लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत राज्यात यापूर्वीच्या तीन टप्प्यात ३१ जागांसाठी मतदान होऊन गेले असून, २९ एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यात १७ जागांकरिता मतदान होऊ घातले आहे. त्यासाठीचा प्रचार आता चरणसीमेवर पोहचला आहे. आणखी दोन दिवसांनी जाहीर प्रचार आटोक्यात येईल. त्यानंतर ख-या अर्थाने मतदारराजास मतनिश्चितीसाठीच्या विचाराला उसंत मिळेल. कारण आज रोजच अनेकविध मुद्दे त्याच्या मन:पटलावर येऊन आदळताहेत. सत्ताधारी व विरोधकही सारख्याच त्वेषाने व अहमहमिकेने मतदारांसमोर जात असून, आपणच कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, यंदा आपली योग्यता सांगताना समोरच्याची अयोग्यता अगदी टोकाला जाऊन प्रतिपादिली जाते आहे. यात कुणीही कुणापेक्षा मागे नाही की कमी नाही. शिवाय जाहीर प्रचाराखेरीज सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लढाई लढली जाते आहे. त्यामुळे प्रचारात रंग भरून गेले आहेत. अशा स्थितीत, म्हणजे जेव्हा सारेच एका माळेचे... दिसू लागतात तेव्हा निर्णय करणे अवघड होऊन बसते हे खरे; परंतु त्यातल्या त्यात विचारधारा, भूमिका व पूर्वानुभव लक्षात घेऊन योग्य कोण याचा फैसला करणे गरजेचे असते. कुणीही योग्य नाही असे म्हणत मतदानापासूनच दूर राहणे हे चुकीचे असून, आहे त्यात निवड करणे हीच मतदारांची कसोटी आहे.



अर्थात, तसे पाहता काही मते निश्चितही असतात. व्यक्ती अ की ब याच्याशी त्यांना देणे-घेणे नसते. पूर्वधारणा किंवा मान्यतेने ते चालत असतात. अशी झापडबंद अवस्था खरे तर धोकेदायकच असते; पण हा वर्ग आपल्या भूमिकांपासून ढळताना दिसत नाही. राजकीय भक्त संप्रदाय त्यातूनच आकारास येतो. जो अध्यात्मातील भक्तांपेक्षाही अधिकचा अंधश्रद्धाळू असतो. कुणाचीही असो, डोळे मिटून होणारी भक्ती ठेचकाळायलाच भाग पाडते असा अनेकांचा अनुभव आहे. तेव्हा या भक्त परिवारानेही भलत्या भ्रमात न राहता वस्तुस्थिती तपासून बघायला हवी. पक्षावर किंवा व्यक्तीवर निष्ठा असायलाच हवी, हल्ली तीदेखील आढळत नाही हा भाग वेगळा; परंतु त्या निष्ठेला विवेकाची जोड हवी. विवेक हा चिकित्सेला भाग पाडणारा असतो, ‘कथनी’ व ‘करनी’तील अंतर शोधणारा असतो. म्हणूनच विवेकनिष्ठ राहात निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतरची त्यांची पूर्तता, याहीदृष्टीने विचार केला जाणे गरजेचे ठरावे.

महत्त्वाचे म्हणजे, यंदा विकासाच्या मुद्द्याची फारशी चर्चा न करता आरोप-प्रत्यारोपांवरच भर दिला गेल्याचे दिसून येते. त्यात एकीकडून चौकीदार चोर है सांगितले जात आहे, तर दुसरीकडे विरोधक हे पाकधार्जिण्या फुटीरवाद्यांना पाठिंबा देणारे असल्याचे आरोप केले जात आहेत. अशा स्थितीत संभ्रम वाढीस लागणे स्वाभाविक असते. सुजाण व निवडणूक प्रचारातील चिखलफेकीला सरावलेल्यांना त्यात काही वाटत नाही, त्यांची मते निश्चित असतात; परंतु एक वर्ग असतोच जो गडबडतो. नेमके खरे काय असेल याचा विचार करतो. अशावेळी स्व. प्रमोद महाजन नेहमी उद्धृत करीत त्या मुद्द्याची आठवण येते, तो म्हणजे ‘फर्स्ट वोट फॉर प्रिन्सिपल्स, देन पार्टी अ‍ॅण्ड लास्ट फॉर पर्सन’, म्हणजे धोरणे, पक्ष व नंतर उमेदवार अशा क्रमाने विचार करून मतनिश्चिती करता यावी. आज प्रिन्सिपल्सच्या बाबतीतच आनंदी आनंद गडे अशी स्थिती आहे व ‘मतांसाठी काहीपण’ चालवून घेतले जाताना दिसत असले तरी दिशा निश्चितीसाठी हे सूत्र उपयोगी ठरू शकणारे आहे. देशाला सक्षमपणे पुढे नेऊ शकण्याची क्षमता असणा-या, सर्वधर्मसमभावाची जपणूक करणा-या आणि संविधानाच्या उद्देशिकेत उल्लेखिलेल्या समता व बंधुत्वाच्या भूमिकेला बांधील राहणा-या नेतृत्वकर्त्यांची निवड करायची तर ती विचारपूर्वकच केली जावयास हवी. राज्यातील मतदार आता त्याचदृष्टीने निर्णायक टप्प्यातून जात आहेत. मताधिकार बजावण्याची वेळ चार दिवसांवर आली आहे. म्हणूनच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही निर्णयप्रक्रिया गांभीर्यपूर्वक घडून यावी इतकेच यानिमित्ताने. 

Web Title: The time to vote after thinking and making descision

Wednesday, April 24, 2019

Election Article / Blog published in Online Lokmat on 23 April, 2019

चव्हाण यांचे हात दाखवून अवलक्षण!

किरण अग्रवाल

काळाच्या बदलानुसार व्यक्तीच्याही गरजा व अपेक्षा बदलत असतात. कालसापेक्षता महत्त्वाची मानली जाते ती त्यामुळेच. राजकारणाच्या क्षेत्रालाही ते लागू होते. यात काळानुसार स्वत:ला बदलावे लागते, अन्यथा आपला पक्ष किंवा मतदारच आपल्याला बदलण्याची भूमिका घेऊन मोकळे होतात. यासाठी कुठे थांबायचे, याचा निर्णय घ्यावा लागतो; जो सहजासहजी कुणी घेताना दिसत नाही. राजकीय व्यक्ती तर जिवाच्या अंतापर्यंत ‘खुर्ची’त राहू इच्छिते. त्यामुळे कुणी काही बदल केला की नाराजीतून त्यांचे पाय अधिक खोलात जाताना दिसून येतात. नाशिक जिल्ह्यातील भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याही बाबतीत तेच झाल्याचे म्हणता यावे.

लोकसभा निवडणुकीतील नाशिक व दिंडोरीमधील ‘युती’च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव (ब) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली असता, त्यांच्या व्यासपीठावर तिकीट कापलेले खासदार चव्हाण उपस्थित झाले खरे; पण गेल्या पंचवार्षिक काळात ज्यांच्यासोबत ते संसदेत होते, त्या मोदी यांनी चव्हाण यांच्याशी बोलण्याचे किंवा त्यांच्याकडे पाहण्याचेही टाळून उलट शिवसेनेच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा केलेली दिसून आली, त्यामुळे चव्हाण यांची भाजपतील उपयोगीता संपल्याचेच स्पष्ट संकेत यातून मिळालेत. खरे तर दिंडोरीच्या उमेदवारीवरून चव्हाण यांनी जे नाराजी नाट्य प्रदर्शिले त्या पार्श्वभूमीवर भाजपतही काहीशी चिंताच व्यक्त केली जाते आहे. पण अशाही स्थितीत चव्हाण मोदी यांच्या सभेनिमित्त व्यासपीठावर आल्याने त्यांना भाषण करायला संधी देऊन मतदारांमधील संभ्रम दूर करण्याची भाजपला संधी होती. नगरमध्ये दिलीप गांधी यांना बोलू दिले गेले होते; परंतु पिंपळगाव (ब)च्या सभेत चव्हाणांच्या बाबतीत तेही टाळले, त्यामुळे भाजपनेच आता त्यांना थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणता यावे.



का झाले असावे हे चव्हाणांच्या बाबतीत? तर त्यांना तिकीट कापल्याची नाराजी कुठे सोडून पुढे पक्षकार्यात लागायचे हे कळले नाही म्हणून. नाशकात माणिकराव कोकाटे यांची भूमिका नक्की होती. भाजपने तिकीट नाही दिले तरी लढायचेच असे त्यांनी ठरविले होते. पण, दिंडोरीत तिकीट कापले म्हणून अपक्ष लढण्याची हिंमत चव्हाण दाखवून शकले नाहीत. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, कोरड्या विहिरीत उडी मारायची जर मानसिकता नव्हती तर नाराजी ताणून धरण्याची गरज काय होती, असा प्रश्न पडावा. पक्षाने उमेदवार बदलला म्हटल्यावर मोठ्या मनाने निर्णय स्वीकारून दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला ते लागले असते तर ‘झाकली मूठ...’ राहिली असती. त्यामुळे भविष्यात कदाचित वेगळी संधी चालून येऊ शकली असती; परंतु कुठे थांबावे हे चव्हाण यांना कळले नाही आणि अखेर मोदी यांच्या व्यासपीठावर जाऊनही दुर्लक्षित ठरण्याची नामुष्की त्यांनी ओढवून घेतली. ‘हात दाखवून अवलक्षण’ म्हणतात ते यालाच.

महत्त्वाचे म्हणजे, राजकारणात अनिच्छेनेही कधी कधी समझौते करून संयमाची भूमिका घ्यावी लागते, अन्यथा काळ मागे सोडून दिल्याशिवाय राहात नाही. राज्यात भाजपचे सरकार असताना आदिवासी विभागातील भरती प्रक्रियेवर आवाज उठवत चव्हाण यांनी स्वपक्षाचेच मंत्री विष्णू सावरा यांना अडचणीत आणून ठेवले म्हणून तशीही पक्षांतर्गत नाराजी ओढवून घेतली होती. त्यात तिकीट कापले गेल्यावर थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांना एका आरोग्य शिबिरासाठी आर्थिक मदत दिली नाही म्हणून आपली उमेदवारी डावलल्याचा आरोप ते करून बसले. परिणामी पक्ष धुरिणांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले ओरखडे अधिक वेदनादायी ठरणे स्वाभाविक बनले. मनुष्याला राग येतो तेव्हा, ‘ठंडा कर के खाने का...’ सल्ला दिला जातो. तापल्या तव्यावर पाणी शिंपडले गेले तर चर्रऽऽऽ होतेच. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बाबतीत तेच झाले, नव्हे त्यांनी ते ओढवून घेतले; त्यामुळेच मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावर चव्हाणांकडे हेतुत: दुर्लक्ष केले गेलेले दिसून आले जे त्यांच्या सर्वपक्षीय मित्रांना व पक्षातील समर्थकांनाही व्यथित करणारेच ठरले. 


Web Title: Chavan's arm showing unaware!

Thursday, April 18, 2019

Article on West Bengal Election published in Lokmat on 18 April, 2019


Editors view published in Online Lokmat on 18 April, 2019

अस्मानी संकटांवेळी शेतकऱ्यांप्रती सरकारी असंवेदनशीलतेचाच प्रत्यय!

किरण अग्रवाल

अजाणतेपणातून जेव्हा एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष घडून येते तेव्हा ते समजून घेता यावे, मात्र विषयाचे महत्त्व, त्याची गंभीरता व त्यासंबंधीच्या दुर्लक्षातून होऊ शकणारे परिणाम हे सारे माहीत असतानाही त्याकडे काणाडोळाच केला जाताना दिसून येतो, तेव्हा ती बाब व्यक्ती असो की यंत्रणा; तिची असंवेदनशीलताच अधोरेखित करून देणारी ठरते. निवडणुकीच्या धामधुमीत घडून आलेल्या शेतकरी आत्महत्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, या शेती व शेतकऱ्यांशी संबंधित दोन्ही विषयांकडे झालेल्या शासनाच्या दुर्लक्षाकडेही त्याच संदर्भाने बघता यावे.

सध्या देशाच्या व राज्याच्याही सत्तेत असलेला पक्ष व त्याचे नेते विरोधकाच्या भूमिकेत होते, तेव्हा शेतकरी आत्महत्यांच्या विषयावर त्यांनी चांगलेच रान पेटवले होते. परंतु ते सत्ताधारी बनल्यावरही या आत्महत्या थांबू शकलेल्या नाहीत. किंबहुना त्यांचे प्रमाण वाढलेच आहे. दुर्दैव असे की, एकीकडे निसर्गाने अडचणीत आणून ठेवल्याने हताश व निराश झालेल्या बळीराजाला सरकारकडूनही मदतीचा, सहानुभूतीचा हात मिळेनासा अगर विश्वास वाटेनासा झाल्याने तो गळफास घेण्यासारखा टोकाचा निर्णय घेत आहे. सरकार नावाची मठ्ठ यंत्रणा मात्र जागची हलून संवेदनशीलता दाखवताना दिसत नाही. याबाबत लोकांमध्ये चीड का उत्पन्न होते किंवा राग का व्यक्त केला जातो, तर अस्मानी संकट थोपवणे आपल्या हातातील बाब नाही; पण हे वा असे संकट ओढवल्यानंतर सत्ताधाऱ्यांचाही ‘सुल्तानीपणा’च अनुभवास येतो म्हणून. साधे बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसायला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून लढ म्हणायलाही सत्ताधा-यांकडे वेळ नसावा, हे खेदजनक आहे.




सध्या तर सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आपल्याकडे आचारसंहितेचा बाऊ करून कामचुकारपणा करण्याची प्रवृत्ती तर यंत्रणेत अशी काही बळावली आहे की विचारू नका. त्यामुळे आत्महत्या घडल्या काय किंवा अवकाळी गारपिटीने शेतपिके उद्ध्वस्त झाली काय, त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातीलच आकडेवारी पाहिली तर निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १७४ शेतकºयांच्या आत्महत्या घडून आल्या आहेत. यातील सर्वाधिक ९१ आत्महत्या या दुष्काळाचा चटका सोसत असलेल्या मराठवाड्यातील आहेत. त्यानंतर विदर्भाचा (४९) नंबर लागतो. पण सत्ताधारीच काय, सारेच नेते आपापल्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. तिकीट न मिळाल्याने रुसलेल्या-फुगलेल्यांच्या घरी धावत जाऊन त्यांच्या दाढ्या धरायला नेत्यांना वेळ आहे; पण आत्महत्या केलेल्याच्या घरी जाऊन संबंधित कुटुंबीयांचे साधे सांत्वन करताना कुणी दिसून आलेले नाही.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये तेथील शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेल्याने त्याचाच फटका मोठ्या प्रमाणात बसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा सारेच जण बळीराजासाठीचा कळवळा प्रदर्शित निवडणूक प्रचारात उतरलेले आहेत; पण या दरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबतही तातडीने दखल घेतली गेलेली दिसून आली नाही. अवकाळी पावसामुळे देशभरात ५० जणांचा बळी गेला त्यांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून मदत घोषित केली गेली; परंतु जागोजागी अनेक घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, संसार उघड्यावर आले त्याचप्रमाणे शेतमालाचेही मोठे नुकसान झाले. खळ्यात व चाळीत साठवलेला कांदा भिजला, द्राक्षाच्या बागा भुईसपाट झाल्या, गहू, हरभराही भिजला. पण वरून आदेश न आल्याने स्थानिक शासकीय यंत्रणेने अद्याप या नुकसानीचे पंचनामे करण्याची तसदी घेतलेली नाही. वरून आदेशही कधी येणार व कोण देणार? नेते प्रचारात आहेत तर मंत्रालयीन अधिकारी निवांत आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय? बळी पडलेल्यांच्या कुटुंबाला साहाय्यता निधी घोषित केला गेला; परंतु उघड्यावर आलेल्या कुटुंबाचे काय? त्याची साधी विचारपूसही कुणी करताना दिसत नाही. चीड आणणारेच हे चित्र आहे. 

Web Title: Government's insensitivity about known problems of farmers

Tuesday, April 16, 2019

Election Article / Blog published in Online Lokmat on 16 April, 2019

हे काळा पैसा शोधण्यातले अपयशच!

किरण अग्रवाल

काळा पैशाचे शोधकाम हे भाषणात आश्वासने देण्याइतके सोपे-सहज नाही, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आता झाली असावी; कारण म्हणता म्हणता पाच वर्षे संपली. देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील बँकांमध्ये असलेला काळा पैसा शोधून भारतात आणण्याची आश्वासने गेल्या निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु बाहेरील जाऊ द्या, देशातही हे काम त्यांना करता आले नाही. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत देशात तब्बल २५०४ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त झाल्याने तेच स्पष्ट होऊन गेल्याचे म्हणता यावे.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियात वापरल्या जाणाऱ्या भाजपाच्याच टॅग लाइनप्रमाणे ‘पूर्वीपेक्षा अधिक’चे प्रत्यंतर अनेक बाबतीत येत आहे. कधी नव्हे इतक्या टोकाच्या व जहरी प्रचाराने ही निवडणूक लढली जात आहेच, शिवाय जिंकण्यासाठीचे जे जे म्हणून काही ‘फंडे’ वापरले जातात, त्यातही अधिकची भर पडत असल्याचे यंदा प्रकर्षाने दिसत आहे. ही भर राजकीय पक्षांना अधिकृतपणे मिळणाऱ्या निधीत जशी पडताना दिसते, तशी निवडणुकीतील खर्चातही मुक्तहस्तपणे होताना दिसते आहे. रोकड, मद्य, अंमली पदार्थाचा यात घडून येत असलेला गैरवापर केवळ आश्चर्यचकित करणाराच नसून व्यवस्था सुधारू पाहण्याच्या बाता मारणाऱ्यांचे अपयश अधोरेखित करणाराही आहे. विशेष म्हणजे, इतर राजकीय पक्षांपेक्षा आपण वेगळे असल्याची टिमकी वाजविणाऱ्या भाजपामध्येही मोठ्या प्रमाणात बंडाळी, तिकीट वाटपातील घोळ व त्यातून जाहीरपणे हाणामाऱ्या झाल्याचे दिसून आले आहे.



देशात होत असलेल्या सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचे केवळ एकाच चरणातील मतदान झाले असून, अजून सहा चरणातील मतदान बाकी आहे, तरी आतापर्यंत २५०४ कोटींची रोकड जप्त झाली व तब्बल ४८,८०४ किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. यातील लक्षणीय मुद्दा असा की, सर्वाधिक ५१७ कोटींची रोकड व सर्वाधिक किमतीचे अंमली पदार्थ देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांच्या गृहराज्यात गुजरातमध्ये सापडली आहेत. हा बेहिशेबी इतका पैसा बरोबर निवडणुकीच्यावेळी आला किंवा निघाला कुठून, हा खरा प्रश्न आहे. नोटाबंदीच्या निर्णयाद्वारे ‘गोलमाल’ केली गेल्याचा जो आरोप काँग्रेस व मनसे आदी पक्षांकडून केला जात आहे, त्यावर विश्वास बसावा असेच हे चित्र आहे. नीती, निष्ठा पक्षकार्य वगैरे बाबी राहिल्या तोंडी लावण्यापुरत्या, ‘पैसा’ हा फॅक्टरच निवडणुकीत महत्त्वाचा ठरू पाहतो आहे, हेच यावरून स्पष्ट व्हावे. यासंदर्भातही अगदी गुजरातचेच उदाहरण देता यावे, तेथील भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरविलेल्या उमेदवारांपैकी अवघे पाच जण असे आहेत ज्यांची मालमत्ता एक कोटीच्या आत आहे. बाकी सर्वच्या सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत. यात उमेदवारांची सांपत्तिक स्थिती हा आक्षेपाचा भाग नाही, तर सामान्य कार्यकर्ता उमेदवारीत कुठे आहे, हा खरा मुद्दा आहे. 

आर्थिक बळ असल्याखेरीज निवडणूक लढता येत नाही, हाच बोध यातून घेता येणारा आहे. परंतु पैसा हा केवळ ‘पांढरा’ असून उपयोगाचा नसतो. कारण आयोगाच्या आचारसंहितेतील मर्यादेपेक्षा अधिक खर्च दाखवता येत नसला तरी निवडणूक तेवढ्यात होत नाही. म्हणून ‘काळा’ पैसा असावा व खर्चावा लागतो हे उघड सत्य आहे. निवडणुकीच्या काळात जी कोट्यवधीची बेहिशेबी रोकड जागोजागी हस्तगत होत आहे, ती अशी ‘काळी’ म्हणवणारीच आहे. म्हणूनच, देशातील व देशाबाहेरील बँकांत असलेला काळा पैसा हुडकून आणण्याची गर्जना करीत सत्तेवर आलेल्यांचे यासंदर्भातले अपयशही यानिमित्ताने आपोआप उघड होऊन गेले आहे. अन्यथा, करप्रणाली सक्त केली गेली असताना व संबंधित यंत्रणांची डोळ्यात तेल घालून टेहळणी सुरू असताना नोटांची अशी बंडले पकडली गेली नसती. 


Web Title: Lok Sabha Election 2019 Political Party Politics black money

Thursday, April 11, 2019

Editors view published in Online Lokmat on 11 April, 2019

विजयासाठी ‘वाट्टेल ते’ घातकच!

किरण अग्रवाल

युद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते. नाही तरी अलीकडे निष्ठा, तत्त्वादी शब्द राजकीय क्षितिजावरून अस्तंगत होऊ पाहात आहेत, त्यामुळे काही बाबी सोडताना नवीन काही अनुसरणे हा कालप्रवाहाचाच भाग ठरावा. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगीतील कमजोरी अगर उणिवा हेरण्यासाठी ‘डिटेक्टिव्ह’ नेमून त्यांच्याद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधिताचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही या ‘वाट्टेल ते’ प्रकारात मोडणारेच ठरावेत.

विकासाच्या बाबतीत कितपत प्रगती साधली गेली हा वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निवडणुकीतील प्रचार साधनांत मोठी प्रगती साधली गेल्याचे यंदा प्रकर्षाने दिसून येत आहे. उमेदवार भलेही अंगठेबहाद्दूर असेल, मात्र त्याच्या प्रचारासाठी उभारण्यात आलेल्या ‘वॉररूम’मध्ये तंत्रकुशल तरुणांच्या फौजा तैनात असल्याने जाहीर स्वरूपातील प्रचारापेक्षाही मतदाराच्या हाती असलेल्या मोबाइल फोनपर्यंत पोहचून व्यक्तिगत पातळीवर संपर्काचे प्रभावी फंडे प्रत्येकाकडून राबविले जात आहेत. यात स्वत:चा प्रचार व त्यादृष्टीने आपण केलेली किंवा भविष्यात करावयाच्या कामांची माहिती ‘सोशल मीडिया’द्वारे मतदारांपर्यंत पोहचवतानाच, निवडणूक रिंगणातील आपल्या विरोधकास जेरीस आणणारे मुद्देही ‘फॉरवर्ड’ करण्याला प्राधान्य दिले जात आहे. प्रचार हा तर नंतरचा भाग झाला, परंतु उमेदवारी मिळू न देण्यासाठीही असे ‘फंडे’ सोशली व्हायरल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापली जाण्यास असेच काहीसे कारण लाभल्याचे लपून राहिलेले नाही. तेव्हा, एकूणच निवडणूक प्रचारात सोशल मीडियाला व त्यावरून केल्या जाणाऱ्या उचित आणि अनुचितही प्रचाराला यंदा मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे.


यातील अनुचित प्रचारासाठीच्या माहिती संकलनाकरिता काही राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीही खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीजना काम दिल्याचे या क्षेत्रातील असोसिएशनचे अध्यक्ष कुंवर विक्रमसिंह यांनीच सांगितले आहे. विरोधकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिवाय अनैतिक संबंध आदी माहिती याद्वारे मिळवून व तिचा प्रचारात वापर करून प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात असल्याचे पाहता यंदा प्रचारात कोणती पातळी गाठली जाऊ पाहते आहे ते स्पष्ट व्हावे. नीती, नैतिकता वगैरे सब झुठ; दुसऱ्याचे येनकेन प्रकारे खच्चीकरण करून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त करू पाहण्याची ही रणनीती बहुतेकांकडून अवलंबिली जाऊ पाहात असल्याने तिला लाभलेली सर्वमान्यता लक्षात यावी. कुणाच्या खासगी आयुष्याचे असे भांडवलीकरण करणे चुकीचे आहे, नैतिकतेस धरून नाही व कायदेशीरदृष्ट्या वैधतेत मोडणारेही नाही; हे माहीत असूनही तसे करण्याचा प्रयत्न होतो, हे खरे आक्षेपार्ह ठरावे. पण, काळ बदलला तसे प्रचाराचे तंत्र बदलले व त्यात ‘सबकुछ चलता है’ प्रवृत्ती बळावली, त्याचेच हे लक्षण म्हणता यावे.

निवडणुका येतील-जातील, जय-पराजयही होत राहतील; मात्र प्रचाराच्या असल्या ‘वाट्टेल त्या’ तंत्रातून कुणाच्या का होईना प्रतिमेवर ओढले जाणारे ओरखडे आणि त्याद्वारे गढुळणारे समाजमन हे चिंतेचाच विषय ठरावे. पण काळ इतका वेगाने पुढे सरकत आहे आणि निवडणुकीच्या रणांगणात यश मिळवण्याकरिता इतकी काही अटीतटीची लढाई चालली आहे की, प्रचारातील योग्य-अयोग्यतेचे भानच कुणाकडून राखले जाताना दिसत नाही. असे भान नसलेल्या व ताळतंत्र सोडून प्रचार करू पाहणाऱ्यांना आपल्या मताधिकाराच्या उपयोगाने ताळ्यावर आणण्याचे काम मतदारांनाच करावे लागणारे आहे. 


Web Title: Lok Sabha Election 2019 Political Party Politics

Election Article / Blog published in Online Lokmat on 09 April, 2019

भाजपात वाढते व्यक्तिकेंद्री राजकारण!

किरण अग्रवाल

प्रादेशिक स्तरावरील राजकारण करणाऱ्या पक्षांवर ते व्यक्तिकेंद्रित असल्याची टीका आजवर सातत्याने करण्यात आली आहे, मात्र देशाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांची अलीकडील वाटचालही त्याच मार्गाने सुरू असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष व त्याच्या विचारधारेऐवजी नेत्यांचे चेहरे बघून निर्णय घ्यायचा तर अगोदर या चेहऱ्यांवरील मुखवटे जाणून घेणे गरजेचे ठरावे, अन्यथा लोकशाहीचाच संकोच घडून येण्याची शक्यता टाळता येऊ नये.


सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणूक प्रचाराचे तापमान बऱ्यापैकी कमाल पातळीवर पोहोचले आहे. आणखी दोन दिवसांनी, ११ एप्रिल रोजी पहिल्या चरणातील २० राज्यांत ९१ जागांसाठी मतदान होईल, त्यात महाराष्ट्रातील ७ मतदारसंघांचाही समावेश आहे. या पहिल्या चरणासाठीच प्रचाराचा जो बार उडालेला दिसून आला तो पाहता, त्यापुढील निवडणुकीच्या ६ चरणांतील उर्वरित मतदारसंघांतील प्रचार कोणत्या पातळीपर्यंत पोहोचेल याची कल्पना यावी. आरोप-प्रत्यारोप हे तर होतच राहतात; परंतु मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर घसरत ज्या पद्धतीने एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चाललेले दिसत आहेत, ते सामान्यांमध्ये आलेल्या राजकारणाबद्दलच्या उबगलेपणात भर घालणारेच म्हणता यावेत. असे यापूर्वी होतच नव्हते अशातला भाग नाही, परंतु त्यातील मर्यादा ओलांडल्या जात असल्याचे आता प्रकर्षाने दिसून येत आहे, आणि म्हणूनच गेल्या संपूर्ण पंचवार्षिक काळात सत्तेत असूनही वंचितावस्था वाट्यास आलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ व तत्त्वनिष्ठ नेत्याला आपल्या ब्लॉगद्वारे ‘आपल्याशी सहमत नसलेल्या कोणालाही भाजपाने कधी शत्रू मानले नाही किंवा राजकीय सहमती नसलेल्यांना देशद्रोही म्हटले नाही’ असा पक्षातील आपल्याच वारसदारांना सूचक अर्थाने ‘पक्षधर्म’ समजावून सांगण्याची वेळ आली.



आजच्या प्रचारात विरोधक म्हणजे जणू शत्रूच असल्यासारख्या शाब्दिक तोफा डागल्या जात आहेत. थेट पाकिस्तानशी संबंध व संदर्भ जोडून निंदा-नालस्ती केली जात आहे. हे तत्त्वाचे राजकारण नसून निवडणूक जिंकण्याचे फंडे आहेत; पण त्यातून लोकशाहीवर आघात होत आहे. महत्त्वाचे म्हणेज, असे व्यक्तीवर हल्ले चढवताना पक्ष वगैरे दुय्यम ठरत आहेत. निवडणुकीच्या राजकारणातील स्पर्धा ही पक्षाशी नव्हे, तर व्यक्तीशी होऊ पाहतेय, त्यामुळे व्यक्तिगत टीकेला टोकाचे स्वरूप येताना दिसत आहेच, शिवाय पक्षांमधले व्यक्तिकेंद्रित्वही बळावत चालले आहे. आजवर आपल्याकडील शिवसेना, मनसेसह राज्याराज्यांत राजकारण करणाऱ्या तृणमूल काँग्रेस, आप, लोकदल, डीएमके, एडीएमके, वाय.एस.आर. काँग्रेस, मिजो नॅशनल फ्रंट, झारखंड विकास मोर्चा, असम गण परिषद, बीजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आदी पक्ष व्यक्तिकेंद्री अगर एकचालकानुवर्ती असल्याचे सांगितले गेले. त्यात बऱ्याचअंशी तथ्यही आहे, पण स्वत:ला राष्ट्रीय म्हणवणारे पक्ष तरी कुठे या व्यक्तिकेंद्रित्वापासून बचावले आहेत? यंदाच्याच निवडणुकीतील भाजपाची टॅग लाइन किंवा संकल्पपत्र हाती घेतले तर या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. एकीकडे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेस शब्द तब्बल ४०२ वेळा उद्धृत करून राहुल गांधी हे नाव केवळ चारदाच उल्लेखीले गेले असताना दुसरीकडे भाजपाच्या जाहीरनाम्यात पक्षाचा उल्लेख २० वेळा तर नरेंद्र मोदींचा उल्लेख त्यापेक्षा अधिक, ३२ वेळा केला गेल्याची आकडेवारी पुढे आली आहे. भाजपात वाढते व्यक्तिकेंद्री राजकारण म्हणूनच याकडे पाहता यावे.

भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन त्यांच्या जाहीर सभांमध्ये एक उदाहरण नेहमी देत असत. ‘व्होट फॉर प्रिन्सिपल्स, देन पार्टी अ‍ॅण्ड देन पर्सन’ म्हणजे तत्त्व, पक्ष व अखेरीस उमेदवार अशी त्यांची मांडणी असे. आज त्यांच्याच पक्षात नेमके याउलट चालले आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीत यश मिळाल्याचे पाहता यंदा ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशी अधिकृत टॅगलाइन घेऊन निवडणूक लढली जात आहे. भाजपात मोदींनाच अच्छे दिन आल्याने ‘मोदी है तो मुमकीन है’ अशीही मोहीम चालविली जात आहे. याचा अर्थ, पक्षात इतर कुणावरही भरोसा अगर त्यांची क्षमताच उरली नसल्याचे यातून स्पष्ट व्हावे. पक्ष व पक्षाच्या धोरणांपेक्षा व्यक्तीचे स्तोम अधिक माजले की यापेक्षा दुसरे काही होऊ शकत नाही. पक्षाला निवडणूक जिंकून देणारा परीस म्हणून याकडे पाहणारे पाहतीलही, परंतु एका व्यक्तीपुढे आजवरच्या कित्येकांचे श्रम आणि श्रेष्ठत्वही दुर्लक्षिले जाऊ पाहताहेत त्याचे काय? म्हणायला १९९८ मध्येही ‘सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटलबिहारी’ अशी घोषणा देण्यात आली होती. पण खुद्द अटलजींनी आजच्या सारखे स्वत:चे प्रतिमापूजन होऊ दिले नव्हते. अडवाणीही त्याचे साक्षीदार आहेत आणि आजची ही परिस्थिती निमूटपणे पाहण्याची हतबलताही त्यांच्या नशिबी आली आहे. म्हणूनच त्यांनी ब्लॉगमध्ये आपल्या जीवनातील मार्गदर्शक सिद्धांतात ‘नेशन फस्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट’ असल्याचे उद्धृत करून एक प्रकारे या विचारधारेचे उल्लंघन करीत ‘सेल्फ फस्ट’च्या सेल्फी झोनमध्ये वावरणा-यांना हितोपदेश केला आहे. पण, भाजपतील सत्ताकेंद्रितांकडून ते मनावर घेतले जाईलच याची आशा बाळगता येणार नाही. कारण आपल्या क्षमतांच्या मद-मस्तीत मशगूल असणाऱ्यांकडून असे सल्ले गांभीर्याने घेतले जात नसतात मुळी.


Web Title: lok sabha election 2019 bjp politics

Thursday, April 4, 2019

Editors view published in Lokmat Online on 04 April, 2019

प्रचारकी फंड्यांना प्रारंभ!

किरण अग्रवाल

नेहमीपेक्षा वेगळे काही घडते, तेव्हा तो चर्चेचा अगर माध्यमांतील बातमीचा विषय होतो; म्हणून बातमीत येऊ पाहणारे अशा वेगळेपणाच्या शोधात असतातच. निवडणुकीच्या राजकारणातही ते प्रकर्षाने पाहावयास मिळते, कारण माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याबरोबरच मतदारांशी जवळीक साधण्याचे कामही त्यातून साधता येते. भाजपाच्या खासदार हेमामालिनी या मुळातच अभिनेत्री असल्याने त्यांनी आपल्या प्रचारादरम्यान शेतातील गहू कापून त्याच्या पेंढ्याही बांधून दिल्याच्या प्रकाराकडे असा प्रचारकी फंडा म्हणूनच बघता यावे, अन्यथा वाढत्या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडून येत असताना त्यांच्या दारावर गेल्याचे न दिसलेल्या हेमामालिनी अशा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेल्या दिसल्या नसत्या.


राजकीय पक्षांकडून अभिनयादी क्षेत्रातील सेलिब्रिटीजना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते त्यामागील हेतू स्पष्ट असतो तो म्हणजे, जनमानसात असलेल्या त्यांच्या प्रतिमेचा लाभ उठवून जागा राखणे. यात बऱ्याचदा यशही लाभते कारण ते आपल्या कलागुण वैशिष्ट्यांमुळे अगोदरच मतदारांच्या मनात पोहोचलेले असतात. ती जवळीक मतपरिवर्तनासाठी कामी येते. पण, सेलिब्रिटीजमुळे त्या त्या राजकीय पक्षांना संबंधित जागेवर विजय मिळवणे सोपे होत असले तरी, मतदारांचे प्रश्न सोडविण्यात हे निवडून गेलेले सेलिब्रिटीज यशस्वी ठरतात का, हा प्रश्नच ठरावा आणि मग तसे होत नसताना किंवा एरव्ही अभिनय बाजूला ठेवून सामान्यांचे प्रश्न मार्गी लावताना न दिसलेले राजकारणातील अभिनेते वा अभिनेत्री, प्रचाराच्या दरम्यान वेगळे काही करून चर्चेत येऊ पाहतात तेव्हा त्यातून त्यांनाही राजकारणाचीच हवा लागल्याचे स्पष्ट होऊन जाते. हेमामालिनी यांच्याबाबतीतही तेच वा तसेच घडल्याचे म्हणता येणारे आहे.



महत्त्वाचे म्हणजे, हेमामालिनी यांनी शेतकाम करणाऱ्या महिलांमध्ये प्रचार करताना गहू कापून देण्याचा प्रचारकी फंडा राबवला. पण, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी संसदेत खासदारकी गाजवल्याचे कधी दिसून आलेले नाही. ‘पेरिओडिक लेबर फोर्स सर्व्हे-२०१८’ची आकडेवारी अलीकडेच समोर आली आहे, ती पाहता ग्रामीण भागातील महिलांचा जो रोजगार २००४-०५ मध्ये ४९.४ टक्के होता तो घटून २०१७-१८ मध्ये निम्म्यावर म्हणजे २४.६ टक्क्यांवर आला आहे. काम करण्यायोग्य ठरविल्या गेलेल्या १५ ते ५९ या वयोगटातील महिला मोठ्या संख्येने बेरोजगार झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. गहू काढणी करणा-या शेतकरी भगिनींची कणव बाळगून प्रचारादरम्यान हे शेतकाम करून दाखवणाऱ्या हेमामालिनींनी या महिलांच्या हाताचे रोजगाराचे काम संपत चालल्याकडे खासदार म्हणून कधी लक्ष पुरवले असते तर ग्रामीण भागातील बाजार व अर्थव्यवस्था अधिक भक्कम होण्यास नक्कीच मदत झाली असती; पण तसे न होता पडद्यावरील अभिनयाप्रमाणे प्रचारातही अभिनयच करताना त्या दिसून आल्या.

अर्थात, सेलिब्रिटीज हे अधिकतर अभिनय क्षेत्रातीलच राहात असल्याने त्यांचा अंगभूत अभिनय समजून घेता यावा, मात्र अनेकदा राजकीय नेतेही त्यात मागे राहात नसल्याचे दिसून येते. नकलाकारी हा असाच अभिनय प्रकार. राजकीय व्यासपीठांवरून शिवसेनाप्रमुखांनी विरोधकांची खिल्ली उडवत केलेल्या नकला आजही अनेकांच्या आठवणीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे व छगन भुजबळ सध्या अनेक सभा व बैठका गाजवताना दिसत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील प्रचाराचा विचार करता, त्या-त्या राज्यांमध्ये तेथील वेशभूषा करून व तेथील स्थानिक भाषेत ‘मित्रो और भाईयो, बहनो...’ करण्याचे फंडेदेखील बघायला मिळतातच ना ! तेव्हा, मतदारांशी जवळीकता साधण्याचे हे फंडे यापुढच्या काही दिवसात अधिक वाढलेले दिसून येतील. मतदारांनीच निर्णय घ्यायचाय की, या प्रचारकी फंड्यांना भुलायचे का आपले प्रश्न संसदेत मांडून ते सोडवून घेऊ शकण्याची क्षमता असणाऱ्यांना तेथे निवडून पाठवायचे! 


Web Title: lok sabha election 2019 Hema Malini in full campaign mode, seen working in field with workers harvesting wheat crop

Tuesday, April 2, 2019

Blog / Election article published in Online Lokmat on 02 April, 2019

कोरड्या विहिरीतील उड्या !

किरण अग्रवाल

राजकारणात बाकी, म्हणजे पक्षनिष्ठा वगैरे काही असो वा नसो; परंतु स्वत:बद्दलचा दांडगा आत्मविश्वास असणारे नेते मोठ्या संख्येने बघायला मिळतात. समोर पराभव अगर अपयश दिसत असतानाही अनेकजण या आत्मविश्वासामुळेच स्वत:हून त्याकडे चालत जातानाही दिसतात. अर्थात, बऱ्याचदा जाणतेपणातूनही असे केले जाते, कारण पडणे निश्चित असले तरी पाडण्यासाठीच होती आमची खरी लढाई, अशी भूमिका घेऊन काहीजण लढत असतात. काही तर थांबण्याकरिता कुणाचा शब्द घेण्यासाठी देखील लढायची तयारी दर्शवतात. ‘भविष्यासाठीचा वायदा’ असा स्वच्छ वा स्पष्ट हेतू त्यामागे असतो. अशा साऱ्यांसाठी निवडणुकांचा काळ म्हणजे सुगीचे दिवस असतात. त्यामुळे आताही लोकसभा निवडणूक होत असल्याने अशाच अनेकांनी ठिकठिकाणी प्रमुख पक्षीय उमेदवारांच्या नाकात दम आणून ठेवलेला दिसून येणे स्वाभाविक म्हणायला हवे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षांतरे होतच असतात, तर काहीजण तिकिटाकरिता नाही; पण सत्तेच्या छायेत कायम राहण्यासाठीही राजकीय घरोबे बदलत असतात. याखेरीज काही असे असतात, जे बंडखोरी करून व प्रसंगी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आपले उपद्रवमूल्य दर्शवून देण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, कमी मतदारसंख्येच्या निवडणुकीत त्यांचे गणित जुळूनही जाते कधी कधी; परंतु लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात तसे होणे अवघडच असते. नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, नाशिकसह पूर्वीच्या मालेगाव व आताच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंतच्या म्हणजे १९५१ ते २००४ पर्यंतच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११५ अपक्षांनी नशीब आजमावले; परंतु त्यापैकी एकालाही दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. एकदा तर खासदार राहून नंतर अपक्ष उमेदवारी करणा-या डॉ. प्रतापराव वाघ यांना अवघ्या नऊ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. तात्पर्य इतकेच की, बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढणे हे साधे सोपे नाही.



खासदारकीची हॅट्ट्रिक करूनही यंदा तिकीट कापले गेलेल्या दिंडोरीतील हरिश्चंद्र चव्हाण यांनी हीच वास्तविकता लक्षात घेऊन, अपक्ष उमेदवारी म्हणजे ‘कोरड्या विहिरीतली उडी’ असल्याचे अतिशय अचूक विधान केले आहे. पण राज्यातच नव्हे; संपूर्ण देशात अशा ‘उड्या’ घेऊ पाहणाऱ्यांची संख्या वाढतेय हेच आश्चर्यकारक आहे. अर्थात, प्रारंभी उल्लेखिल्यानुसार स्वत:बद्दलच्या फाजील वा अतिआत्मविश्वासातूनच या अपक्ष उमेदवा-या वाढत आहेत हेच खरे. यात अशा उमेदवा-यांना कुणाचा विरोध असण्याचेही कारण नाही, कारण लोकशाही व्यवस्थेने तसा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. परंतु कधी कधी प्रमुख उमेदवारांची गणिते बिघडवायला त्या कारणीभूत ठरतात, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नसते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारी नाकारली गेल्याने बंडखोरी करणा-या किंवा अपक्ष लढणा-यांचेही एकवेळ समजून घेता यावे; परंतु साध्या साध्या कारणाने रुसून बसणा-यांच्या नाराजीचे स्तोम हल्ली वाढत चालले आहे. पक्ष व निष्ठा यासंबंधी काही बांधिलकीच उरली नसल्याने हे घडते आहे. याच निवडणुकीतले उत्तर महाराष्ट्रातीलच एक उदाहरण घ्या, काय तर म्हणे गावात दुस-याकडे भेटायला येऊन गेलेला उमेदवार आपल्याकडे मात्र आला नाही म्हणून काँग्रेसमधील एका मातब्बर ज्येष्ठाने थेट वेगळ्या विचाराची भाषा केलेली दिसून आली. किती हा बालिशपणा? पण, उगाच किरकोळ कारणातून नजरेत भरून जाण्यास काहीजण जसे उत्सुकच असतात. तिकीट वाटपात डावलले गेलेले अन्य इच्छुक आणि असे नाराजीचे स्तोम माजवण्यास उत्सुक असणा-यांना सांभाळत लढायचे म्हणजे तेच खरे दिव्य असते. मतदारांच्या दारात जाण्यापूर्वी अशांकडे हात जोडत फिरणे मग उमेदवारासाठी गरजेचे होऊन बसते. सध्या बहुतेक ठिकाणी अशाच कोरड्या विहिरीत उड्या घेऊ पाहणा-यांच्या नाकदु-या काढण्याचे प्रयत्न चाललेले पहावयास मिळत आहेत. 


Web Title: Article on political leaders rebellion from party