भाजपात वाढते व्यक्तिकेंद्री राजकारण!
किरण अग्रवाल
प्रादेशिक स्तरावरील राजकारण करणाऱ्या पक्षांवर ते व्यक्तिकेंद्रित असल्याची टीका आजवर सातत्याने करण्यात आली आहे, मात्र देशाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांची अलीकडील वाटचालही त्याच मार्गाने सुरू असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष व त्याच्या विचारधारेऐवजी नेत्यांचे चेहरे बघून निर्णय घ्यायचा तर अगोदर या चेहऱ्यांवरील मुखवटे जाणून घेणे गरजेचे ठरावे, अन्यथा लोकशाहीचाच संकोच घडून येण्याची शक्यता टाळता येऊ नये.
सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणूक प्रचाराचे तापमान बऱ्यापैकी कमाल पातळीवर पोहोचले आहे. आणखी दोन दिवसांनी, ११ एप्रिल रोजी पहिल्या चरणातील २० राज्यांत ९१ जागांसाठी मतदान होईल, त्यात महाराष्ट्रातील ७ मतदारसंघांचाही समावेश आहे. या पहिल्या चरणासाठीच प्रचाराचा जो बार उडालेला दिसून आला तो पाहता, त्यापुढील निवडणुकीच्या ६ चरणांतील उर्वरित मतदारसंघांतील प्रचार कोणत्या पातळीपर्यंत पोहोचेल याची कल्पना यावी. आरोप-प्रत्यारोप हे तर होतच राहतात; परंतु मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर घसरत ज्या पद्धतीने एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चाललेले दिसत आहेत, ते सामान्यांमध्ये आलेल्या राजकारणाबद्दलच्या उबगलेपणात भर घालणारेच म्हणता यावेत. असे यापूर्वी होतच नव्हते अशातला भाग नाही, परंतु त्यातील मर्यादा ओलांडल्या जात असल्याचे आता प्रकर्षाने दिसून येत आहे, आणि म्हणूनच गेल्या संपूर्ण पंचवार्षिक काळात सत्तेत असूनही वंचितावस्था वाट्यास आलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ व तत्त्वनिष्ठ नेत्याला आपल्या ब्लॉगद्वारे ‘आपल्याशी सहमत नसलेल्या कोणालाही भाजपाने कधी शत्रू मानले नाही किंवा राजकीय सहमती नसलेल्यांना देशद्रोही म्हटले नाही’ असा पक्षातील आपल्याच वारसदारांना सूचक अर्थाने ‘पक्षधर्म’ समजावून सांगण्याची वेळ आली.
आजच्या प्रचारात विरोधक म्हणजे जणू शत्रूच असल्यासारख्या शाब्दिक तोफा डागल्या जात आहेत. थेट पाकिस्तानशी संबंध व संदर्भ जोडून निंदा-नालस्ती केली जात आहे. हे तत्त्वाचे राजकारण नसून निवडणूक जिंकण्याचे फंडे आहेत; पण त्यातून लोकशाहीवर आघात होत आहे. महत्त्वाचे म्हणेज, असे व्यक्तीवर हल्ले चढवताना पक्ष वगैरे दुय्यम ठरत आहेत. निवडणुकीच्या राजकारणातील स्पर्धा ही पक्षाशी नव्हे, तर व्यक्तीशी होऊ पाहतेय, त्यामुळे व्यक्तिगत टीकेला टोकाचे स्वरूप येताना दिसत आहेच, शिवाय पक्षांमधले व्यक्तिकेंद्रित्वही बळावत चालले आहे. आजवर आपल्याकडील शिवसेना, मनसेसह राज्याराज्यांत राजकारण करणाऱ्या तृणमूल काँग्रेस, आप, लोकदल, डीएमके, एडीएमके, वाय.एस.आर. काँग्रेस, मिजो नॅशनल फ्रंट, झारखंड विकास मोर्चा, असम गण परिषद, बीजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आदी पक्ष व्यक्तिकेंद्री अगर एकचालकानुवर्ती असल्याचे सांगितले गेले. त्यात बऱ्याचअंशी तथ्यही आहे, पण स्वत:ला राष्ट्रीय म्हणवणारे पक्ष तरी कुठे या व्यक्तिकेंद्रित्वापासून बचावले आहेत? यंदाच्याच निवडणुकीतील भाजपाची टॅग लाइन किंवा संकल्पपत्र हाती घेतले तर या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. एकीकडे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेस शब्द तब्बल ४०२ वेळा उद्धृत करून राहुल गांधी हे नाव केवळ चारदाच उल्लेखीले गेले असताना दुसरीकडे भाजपाच्या जाहीरनाम्यात पक्षाचा उल्लेख २० वेळा तर नरेंद्र मोदींचा उल्लेख त्यापेक्षा अधिक, ३२ वेळा केला गेल्याची आकडेवारी पुढे आली आहे. भाजपात वाढते व्यक्तिकेंद्री राजकारण म्हणूनच याकडे पाहता यावे.
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन त्यांच्या जाहीर सभांमध्ये एक उदाहरण नेहमी देत असत. ‘व्होट फॉर प्रिन्सिपल्स, देन पार्टी अॅण्ड देन पर्सन’ म्हणजे तत्त्व, पक्ष व अखेरीस उमेदवार अशी त्यांची मांडणी असे. आज त्यांच्याच पक्षात नेमके याउलट चालले आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीत यश मिळाल्याचे पाहता यंदा ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशी अधिकृत टॅगलाइन घेऊन निवडणूक लढली जात आहे. भाजपात मोदींनाच अच्छे दिन आल्याने ‘मोदी है तो मुमकीन है’ अशीही मोहीम चालविली जात आहे. याचा अर्थ, पक्षात इतर कुणावरही भरोसा अगर त्यांची क्षमताच उरली नसल्याचे यातून स्पष्ट व्हावे. पक्ष व पक्षाच्या धोरणांपेक्षा व्यक्तीचे स्तोम अधिक माजले की यापेक्षा दुसरे काही होऊ शकत नाही. पक्षाला निवडणूक जिंकून देणारा परीस म्हणून याकडे पाहणारे पाहतीलही, परंतु एका व्यक्तीपुढे आजवरच्या कित्येकांचे श्रम आणि श्रेष्ठत्वही दुर्लक्षिले जाऊ पाहताहेत त्याचे काय? म्हणायला १९९८ मध्येही ‘सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटलबिहारी’ अशी घोषणा देण्यात आली होती. पण खुद्द अटलजींनी आजच्या सारखे स्वत:चे प्रतिमापूजन होऊ दिले नव्हते. अडवाणीही त्याचे साक्षीदार आहेत आणि आजची ही परिस्थिती निमूटपणे पाहण्याची हतबलताही त्यांच्या नशिबी आली आहे. म्हणूनच त्यांनी ब्लॉगमध्ये आपल्या जीवनातील मार्गदर्शक सिद्धांतात ‘नेशन फस्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट’ असल्याचे उद्धृत करून एक प्रकारे या विचारधारेचे उल्लंघन करीत ‘सेल्फ फस्ट’च्या सेल्फी झोनमध्ये वावरणा-यांना हितोपदेश केला आहे. पण, भाजपतील सत्ताकेंद्रितांकडून ते मनावर घेतले जाईलच याची आशा बाळगता येणार नाही. कारण आपल्या क्षमतांच्या मद-मस्तीत मशगूल असणाऱ्यांकडून असे सल्ले गांभीर्याने घेतले जात नसतात मुळी.
Web Title: lok sabha election 2019 bjp politics

No comments:
Post a Comment