Wednesday, November 27, 2019

#EditorsView published in Online Lokmat on 28 Nov, 2019

सूत जुळले, आता पोत जपण्याचे आव्हान !

किरण अग्रवाल

राज्यातील सत्तास्थापनेसाठी सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येऊन महाविकास आघाडीचे सरकार आज शपथ ग्रहण करणार असले तरी, ही सत्तेची तिचाकी कशी चालणार हेच उत्सुकतेचे ठरून गेले आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते हे खरे, त्यामुळेच भिन्न विचारसरणीचे आणि आजवर परस्परांविरुद्ध लढलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि ‘पुन्हा येणार’ म्हणणाऱ्यांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली; त्यामुळे यापुढच्या काळात सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष अटळ ठरावा. पण त्याचसोबत सत्ताधारी बनलेल्यांमधील सामंजस्याचा सेतू ढळू न देणेदेखील कसोटीचेच ठरणार आहे.

राजकारणात अलीकडे बेभरवशाची स्थिती मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. तत्त्व, निष्ठा यांसारखे शब्द राजकीय शब्दकोशातून हद्दपार होत आहेत; पण त्याहीपलीकडे जेव्हा विशिष्ट अशा भूमिकेतून निर्णय घेत काही अनपेक्षित समीकरणे साकारतात, तेव्हा आश्चर्याची जागा उत्सुकता घेते. राज्यात आज सत्तारूढ होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारबद्दलही जनमानसात तेच औत्सुक्य दाटलेले दिसणे स्वाभाविक आहे. कारण, एक तर पारंपरिक मित्र असलेल्या शिवसेना-भाजपचे बिनसले आहे, दुसरे म्हणजे या बिनसलेपणातून महाशिव आघाडी साकारत असताना भाजपने अजित पवार यांना सोबत घेत आघाडीला मात देण्याच्या नादात राजकीय भूकंप घडविला. पण अवघ्या चार दिवसात त्यांना शस्रे टाकून द्यावी लागली. या पार्श्वभूमीवर सभागृहातील १०५च्या संख्येतील विरोधक भाजपशी सामना करीत सत्ताशकट हाकणे, म्हणावे तितके सहज-सोपे खचितच नाही. अर्थात, अजित पवार यांनाच घेऊन ‘पुन्हा’ सत्तेत येण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडी आणखीनच एकजिनसी झाली आहे. शिवाय या सर्व सत्तासमरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाच ‘पॉवर प्ले’ मोठा अगर परिणामकारी राहिला हे संपूर्ण देशाला पहावयास मिळाले; पण आता कसोटी सत्तेचे शिवधनुष्य उचलणा-या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लागणार आहे.



ज्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे सरकार येत आहे ते पाहता, लवकरच येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनापासूनच त्यांना विरोधकांशी चार हात करावे लागण्याची शक्यतता आहे. सत्तेत जाण्याच्या इच्छेने पक्षबदल करून भाजपत गेलेले व अखेर सत्तेबाहेर राहावे लागलेले मातब्बरही या विरोधकांत आहेत. पण, या विरोधकांना तोंड देताना स्वकीयांना सांभाळणेही कमी जोखमीचे नाही. तसेही मंत्रिमंडळातील संभाव्य नावे बघता शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादीतील नावे अधिक वजनदार ठरावित. अनुभवाने व प्रभावाने मातब्बर असलेल्या या मंडळींचा ठाकरे यांना सत्ता राबविताना लाभच अधिक होईल; पण तो करून घेताना तारेवरची कसरत टाळता येऊ नये. एकपक्षीय सत्ता राबवताना स्वपक्षीयाला रोखणे तुलनेने अवघड नसते, मात्र बहुपक्षीय कसरतीत तेच महत्त्वाचे असते. उद्धव ठाकरे यांची त्यातच कसोटी लागणार आहे. भाजपला रोखण्यासाठीचा एकमात्र पर्याय म्हणून हे सत्तासमीकरण आकारास आलेले असल्याने समजूत व सामोपचाराची भूमिका म्हणूनच सर्वांच्या दृष्टीने आवश्यक ठरणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आले असले आणि या तीनही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आणि निवडणूक न लढलेल्या पक्ष-पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवत व पेढे वाटप करीत आपापसात सूत जुळल्याचे दर्शवून दिले असले तरी, परस्परांत लढलेल्यांच्या मनातील राग दूर होऊन ते मांडीला मांडी लावून कसे बसतील हे बघणे खरे औत्सुक्याचे ठरले आहे. वरिष्ठ वा नेते पातळीवर जी समजूतदारी दाखविली जाते, ती तशीच स्थानिक पातळीवर दिसणे अवघड असते. यातही राज्यात विशेषत: ग्रामीण भागात शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीतच ख-या लढती झाल्या आहेत. आजवरच्या सा-याच निवडणुकांत हेच पक्ष परस्पर विरोधक राहिल्याने स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी राजकीय विरोधाची गाढ पुटे चढली आहेत. यंदाच्या निवडणूक प्रचारात तर टोकाला जाऊन परस्परांवर आरोप केले गेले होते, त्यातून कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव झालेले दिसून येतात. आता ते सर्व विसरून व हातात हात घालून सत्तेचा रथ ओढायचा आहे. किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवणे वेगळे, आणि मनामनातील राजकीय वितुष्ट घालवून एकोप्याने कामास लागलेले दिसून येणे वेगळे. त्याचदृष्टीने विकासासाठी व विशिष्ट भूमिकेतून भिन्न पक्षीयांचे सूत जुळले आहेत, आता सामंजस्याचा पोत जपला जाण्याची तेवढी अपेक्षा आहे. 

https://www.lokmat.com/nashik/congress-ncp-shivsenas-yarn-matched-now-challenge-maintain-texture-maharashtra-government/

No comments:

Post a Comment