Wednesday, January 29, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 30 Jan, 2020

माणसा माणसा माणूस हो !

किरण अग्रवाल

साधनांची उपलब्धता ही समाधानाकडे नेणारी असते हे खरेच; पण तेवढ्याने व्यक्ती निश्चिंत होते असे नाही. साधन, सुविधा, संपत्तीचे ऐश्वर्य असूनही कसली ना कसली चिंता भेडसावणारी, चिंतामग्न असणारी माणसे कमी नाहीत. जे जे म्हणून साध्य करायचे असते, ते सारे साधूनही चिंतामुक्ती काही होत नाही; कारण साधनाखेरीजची सुहृदयता असणारी व्यवस्था दिवसेंदिवस क्षीण होत आहे. प्रत्येकच जण आपापल्या व्यापात वा कामात असा काही गुरफटला आहे की, इतरांसाठी द्यायला कुणाकडे वेळच नाही. यातून ओढवणारे एकटेपण, एकारलेपण ही खरी समस्या आहे. त्यात होणारी वाढ ही चिंतेचीच बाब ठरली आहे.



समाजात वाढत्या विभक्त कुटुंब पद्धतीने अनेक समस्यांना जन्म दिल्याचे म्हणता यावे. संयुक्त कुटुंबात सुख-दु:खाचे वाटेकरी लाभत असल्याने व विशेषत: अडीअडचणीच्या काळात सहयोगी लाभून समस्यांचे निराकरण होणे तुलनेने सुलभ ठरत असल्याने जबाबदारीचे दडपण येत नाही. पण, विभक्तावस्था वाढल्याने ती ताण-तणावास निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यातून एकटेपणा वाढीस लागतो, जो विविध समस्यांना निमंत्रण देणारा ठरतो. अमेरिकेतील सिग्मा या विमा एजन्सीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील ६१ टक्के लोक एकटेपणाच्या समस्येने ग्रासले आहेत. ही एकटेपणाची व त्यातून आकारास येणारी नैराश्याची भावना ही तेथील समाजशास्रींसाठी चिंतेची बाब ठरली आहे. ही चिंता यासाठी की, विशेषत: उतार वयात आधार हरविलेल्या ज्येष्ठांना एकटेपणा अधिक बोचतो, असे सर्वसाधारणपणे समजले जाते. ते खरेही आहे. पण त्याचसोबत १८ ते २२ या वयोगटातील तरुणांमध्येही एकटेपणा वाढतो आहे, असे या सर्वेक्षणात आढळून आले; म्हणून याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जाण्याची गरज समोर येऊन गेली आहे. ज्या पिढीने काहीतरी करून दाखविण्याची धमक बाळगावी, गुलाबी स्वप्ने रंगवत आयुष्याकडे पहावे; तीच पिढी एकटेपणा अनुभवताना आढळणार असेल व त्यातून ओढवणारे समस्यांचे ओझे वाहत तणावग्रस्त राहणार असेल तर कुटुंबातील असो, की समाजातील; निकोपता-सुदृढता कशी वाढीस लागावी, हा यातील खरा प्रश्न आहे.

हल्लीची तरुणपिढी सोशल माध्यमांच्या आहारी गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते, हातातल्या मोबाइलमध्ये सदोदित गुंतून राहणारे तरुण याद्वारे मित्रांशी ‘कनेक्ट’ होतात; पण यातले ‘कम्युनिकेशन’ त्यांच्यातल्या एकटेपणाची भावना दूर करण्यास उपयोगी पडत नाही. गर्दीत राहूनही गर्दीपासून दूर राहण्यासारखा हा प्रकार आहे. फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आदी सोशल माध्यमांवर तरुण व्यक्त होतो खरा; पण ती अभिव्यक्ती त्याच्या एकटेपणातून आकारास आलेली असते, असेच यासंबंधी म्हणता यावे. कारण, कुटुंबातच ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याची अगर हातात हात घेऊन हसण्या-खेळण्याची व्यवस्था असेल, ती व्यक्ती समाजमाध्यमांच्या चावडीवर जाऊन आपल्या वैयक्तिक, खासगी स्वरूपाच्या भावभावनांचे प्रदर्शन मांडेल कशाला? पण हल्ली त्याचे प्रमाणही वाढलेले दिसते आहे. अमेरिकेतील सर्वेक्षणात एकटेपणा अनुभवणाऱ्यांमध्ये या सोशल माध्यमात सक्रिय राहणाऱ्यांची संख्या मोठी आढळून आली आहे, ती त्यामुळेच. कारण कुटुंब, त्यातील लहानथोर मंडळी, नात्यातील भावबंध हे सारे आज उरले कुठे आहे? अमेरिकेत तर त्याची खूपच वानवा आहे. पण आपलीही वाटचाल त्याच दिशेने होते आहे, हे दुर्लक्षिता येऊ नये.



महत्त्वाचे म्हणजे, नोकरी-व्यवसायामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे कुटुंबापासून दूर राहात असलेल्यांमध्ये जसा एकटेपणा वाढीस लागलेला दिसून येतो, तसाच त्यांचा सामाजिक सहभागही कमी आढळून येतो. म्हणायला मोबाइलमुळे माणूस सोशल झाला खरा; पण तो समाजापासून अलिप्तच झाल्याचे म्हणता यावे. संक्रांत असो, की विजयादशमी; तिळगूळ व आपट्याचे सोने व्हॉट्सअ‍ॅपवरच पाठविण्याची सोय झाली म्हटल्यावर गावातल्या गावात किंवा गल्लीतही कुणी प्रत्यक्ष भेटीस जाताना दिसत नाही. अशा भेटींमधून गहिरे होणारे नात्यांमधले, मित्रत्वातले भावबंध आता खुंटत चालले आहेत. पूर्वी आजी-आजोबा, काका-मामांकडे जाण्यासाठी शाळांना सुट्या लागण्याची वाट बघितली जायची. आता सुट्यांमध्ये घराबाहेरचे ‘आउटिंग’ वाढले आहे. परिणामी तरुणांसोबतच लहान मुलांमध्येही एकटेपण-एकारलेपण वाढताना दिसत आहे. ही समस्या तणाव वाढविणारी तर आहेच, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर समस्यांना निमंत्रण देणारीही आहे. तेव्हा, माणसा-माणसांतली माणुसकी जागवून संवेदनांचा पाझर प्रभावी होणे हाच यावरील उपाय ठरावा. अमेरिकेतील सर्वेक्षणामुळे याकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक ठरले असून, या एकटेपणापासूनच्या मुक्तीचे मार्ग शोधले जाणे त्यामुळेच गरजेचे ठरले आहे. 

https://www.lokmat.com/editorial/hey-man-please-be-human/

Thursday, January 23, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 23 Jan, 2020

मनसे अधिवेशन ; नवीन झेंडा घेऊ हाती..

किरण अग्रवाल

विचारांची बैठक व उद्दिष्ट्यांची निश्चिती असल्याखेरीज यश लाभत नाही हे खरेच; पण त्यासाठी आता फार वेळ वाट बघितली जात नाही. अलीकडच्या राजकारणात परिस्थितीनुरूप बदलाची भूमिका घेऊन यशाचे उंबरठे गाठण्याचा प्रयत्न त्यामुळेच केला जाताना दिसून येतो. इंजिनाची दिशा बदलूनही अपेक्षित राजकीय यश लाभू न शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विचार वा भूमिकांसोबतच झेंडा बदलून कात टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघता यावे.



चौदा वर्षांच्या वाटचालीत यशापयशाचे व खरे सांगायचे तर, अधिकतर अपयशाचेच चढउतार पाहिलेल्या मनसेचे अधिवेशन आज मुंबईत होत असून, झेंडा व विचारांची बैठक बदलून नव्याने श्री गणेशा करण्याचे संकेत या पक्षाने दिले आहेत. २००६ मध्ये पक्ष स्थापन करताना निळा, भगवा, हिरवा व पांढरा अशा चार रंगांचा झेंडा हाती घेत सर्वसमावेशकतेची भूमिका प्रदर्शली गेली होती, त्यामुळे अगदी सुरुवातीला या पक्षाला उत्साहवर्धक प्रतिसादही लाभला होता. पहिल्याच प्रयत्नात राज्यात १३ आमदार निवडून आले होते, तर नाशिक महापालिकेतही सत्ता मिळवता आली होती; परंतु राजकारणात सवडीची सक्रियता ठेवून चालत नाही. कायम लोकांसमोर राहावे लागते, त्यासाठी वैचारिक सुस्पष्टतेखेरीज पक्षाची संघटनात्मक बांधणीही असावी लागते. मनसे मात्र राजकीय धरसोड करीत राज ठाकरे यांच्या एकखांबी नेतृत्वावरच वाटचाल करीत राहिली, त्यामुळे पक्षातही सर्वसमावेशकता आकारास येऊ शकली नाही. ‘एकला चलो रे’ची ही व्यवस्थाच पुढे चालून या पक्षासाठी राजकीय अपयशाला निमंत्रण देणारी ठरली. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक अशा महानगरी क्षेत्रात वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या मनसेचा प्रभाव उतरंडीला लागला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत एकच आमदार निवडून येऊ शकला होता तोही नंतर पक्षाला जय महाराष्ट्र करून गेला, तर गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा आकडा वाढू शकला नाही. त्यामुळेच बदल व नावीन्याची कास मनसेसाठी गरजेची ठरली होती.



मनसेच्या या गरजेला सद्य राजकीय स्थितीचे पोषक निमंत्रण लाभून गेले आहे. प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबविणारी व त्यामुळेच आजवर भाजपशी मैत्री धर्म निभावणारी शिवसेना काँग्रेस सोबत जाऊन सत्ताधारी बनली. विचारधारेतील या बदलामुळे शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता असलेल्या वर्गाला पर्याय देण्यासाठी मनसेने पुढे येणे स्वाभाविक बनले. शिवसेना व मनसेच्या परस्परातील विरोधाचा स्थायीभाव तर यामागे आहेच, शिवाय सद्य राजकीय समीकरणातील काट्याने काटशह देण्याची खेळीही. शिवसेनेसोबतच्या युतीतून बाजूला पडलेल्या भाजपला नव्या मैत्रीचा हात यातून लाभू शकतो. मनसेने हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली तर तसे होण्यात अडचण नसल्याचे वक्तव्य भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या वरिष्ठांकडून अलीकडेच केले गेले ते यासंदर्भात पुरेशी स्पष्टता करणारे ठरावे. मनसेचा झेंडा भगवा केला गेला आहे. त्याचा अन्वयार्थ यात शोधता येणारा आहे. शिवाय केवळ शिवसेनेच्या वेगळ्या वाटचालीमुळे सर्वाधिक आमदार असूनही भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्या वाटेत काटे पेरण्यासाठी मनसेला जवळ करण्यात भाजपलाही काही अडचण असू नये. मनसेच्या बदलणाºया भूमिकेमागे सद्य राजकीय समीकरणांची ही पोषकताच आहे. अधिवेशनातून त्यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.



तसेही मनसेला भाजपचे वावडे नव्हतेच. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार केल्याचे दिसून आले असले तरी तत्पूर्वी याच राज ठाकरे यांनी मोदींचे व त्यांच्या गुजरातमधील विकासाच्या मॉडेलचे तोंड भरून कौतुक केल्याचे कोणाच्या विस्मृतीत गेलेले नाही. पारंपरिकपणे परस्परांविरु द्ध लढलेले शिवसेना व काँग्रेस एकत्र येऊ शकतात तसेच मध्यंतरीच्या काळात जम्मू-काश्मिरात पीडीपी व भाजप एकत्र आलेले पहावयास मिळू शकतात तर महाराष्ट्रात भाजप - मनसेचे सूर जुळण्यात कसली अडचण भासू नये. राज्यात सर्वप्रथम नाशिक महापालिकेची सत्ता हाती घेताना मनसेने भाजपच्याच कुबड्या घेतल्या होत्या. अन्यही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा समीकरणांच्या लघु आवृत्त्या निघून गेल्या आहेत. शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या नवीन राजकीय फॉर्म्युल्यामुळे तशीही अस्तित्वहीनता वाट्यास आलेल्या मनसेला भूमिका बदलून व नवीन झेंडा हाती घेऊन पुढील वाटचालीस प्रारंभ करणे या सा-या पार्श्वभूमीवर गरजेचेच ठरले होते.



https://www.lokmat.com/editorial/new-flag-new-ideology-raj-thackerays-maharashtra-navnirman-sena-set-go-saffron/

#Saraunsh published in Lokmat on 19 Jan, 2020

Wednesday, January 15, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 16 Jan, 2020

स्री सन्मानाची जाणीव महत्त्वाची, करूया लेकीचा सन्मान !

किरण अग्रवाल

स्री-पुरुष समानतेचा विषय आता केवळ चर्चेच्या पातळीवर न राहता प्रत्यक्षात येतानाही दिसू लागला आहे. किंबहुना समानतेतून साकारणारा माता-भगिनींचा सन्मान व बरोबरीने त्यांच्या संरक्षणाबाबतही जाणिवांचा जागर घडून येत असल्याने यासंदर्भातली स्थिती दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे. त्यामुळे ज्या जनजागरणातून हे यश लाभत आहे, ती मोहीम अधिक व्यापक व प्रभावी करण्याची गरज आहे. सध्या सरकारी माध्यमाच्या शाळा-शाळांमध्ये ‘करूया लेकीचा सन्मान’ म्हणून जे उपक्रम राबविले जात आहेत त्याकडे याच दृष्टीने मोठ्या आशेने बघता यावे. संस्कारक्षम बालमनावर यातून कोरली जाणारी स्री सन्मानाची जाणीव महत्त्वाची ठरणार आहे.



भारतातील स्री-पुरुष लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील तफावत हा कायम चिंतेचा मुद्दा राहिला आहे. २०११च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे ९४० महिला, असे हे प्रमाण होते. एकीकडे विकासाच्या व समानतेच्या गप्पा केल्या जात असताना सदर तफावत थोड्याफार फरकाने कायम राहिल्याने कुटुंब व विवाहादी व्यवस्थांवर परिणाम घडून येत आहेत. विशेष म्हणजे, आपल्या लगतच्या नेपाळ, इंडोनेशियासह अमेरिका, रशिया, जपान आदी देशांमध्येही हे प्रमाण अधिक आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा तिथे महिला जास्त आहेत. मागे अल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्वेक्षणातूनच ही आकडेवारी पुढे आली होती. नेपाळमध्ये एक हजार पुरुषांमागे १०४१ स्रिया असे प्रमाण आहे. या सर्व्हेनुसार भारतात दरवर्षी ६ लाख मुली जन्माला येऊ शकत नाहीत, म्हणजे जन्मापूर्वीच त्यांचा मृत्यू ठरलेला असतो. गर्भलिंग निदानातून हे संकट ओढवते. आता शासनाने याबाबतही कायदे कडक केल्याने त्याला काहीसा आळा बसला आहे हे खरे; पण चोरून-लपून केले जाणारे निदान व त्यातून होणाऱ्या कन्याभ्रूण हत्या या पूर्णांशाने थांबलेल्या नाहीतच.

राज्याची यासंदर्भातली स्थिती पाहता आठ जिल्ह्यांतील स्री-पुरुष लिंग गुणोत्तरात कमालीची घट झाल्याची माहिती उघड झाली होती, त्यामुळे गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी इंदूर पॅटर्नची अंमलबजावणी करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली होती. रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, यवतमाळ, परभणी, नांदेड व नंदुरबारसह पुण्याचेही नाव या यादीत होते. केंद्र शासनाने महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून एक सर्व्हे केला होता, त्यातही काही जिल्हे ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे आढळले होते. या जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण हजार मुलांमागे ८४८ पेक्षा कमी आढळले होते. त्यामुळे ‘लेक वाचवा’ अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज प्रतिपादिली गेली होती. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे नारे दिले जात असले तरी शासकीय मोहिमेखेरीज त्याबाबत गांभीर्य बाळगले जाताना दिसत नाही. त्या तुलनेत सामाजिक संस्था-संघटनांनी पुढे येत जी जागृती चालविली आहे, ती प्रभावी ठरताना दिसत आहे. ‘बेटी नही तो बहू कहाँ से लाओंगे’ अशी एक मोहीम यासंदर्भात लक्षवेधी ठरली आहे. शिवाय, विभक्त व मर्यादित कुटुंबव्यवस्थेमुळे सुनेला मिळू लागलेली सन्मानाची वागणूक पाहता मुलालाच वंशाचा दिवा मानण्याची मानसिकता आता बदलू लागली आहे. आधाराश्रमातून मुलाऐवजी मुलीला दत्तक घेऊ पाहणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळेच वाढलेले दिसत आहे. हे शुभ वर्तमानच म्हणायला हवे.



सरकारी शाळा-शाळांमधून राबविले जात असलेले लेकीच्या सन्मानाचे उपक्रम याच दृष्टीने महत्त्वाचे ठरावेत. कारण, नव्या पिढीच्या जाणिवा यातून प्रगल्भ होणार आहेत. शाळांद्वारे राबविल्या जाणा-या या मोहिमेंतर्गत अनेक गावांमध्ये घरांच्या दरवाजावर मुलींच्या नावाच्या पाट्या झळकताना दिसत आहेत, तर काही गावांमध्ये एखाद्या कुटुंबात कन्येचा जन्म झाल्यावर तिची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाऊ लागली आहे. अगदी अलीकडेच एकाने घेतलेल्या नव्या चारचाकी वाहनाची पूजा करताना आपल्या लेकीची पावले कुंकवाने त्या वाहनावर उमटविल्याची घटना समाजमाध्यमांत व्हायरल झाली. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिपदाचा कारभार स्वीकारताच अशोकराव चव्हाण यांनी पहिला फोन या घटनेतील संबंधित व्यक्तीला करून त्याचे अभिनंदन केल्याचेही पहावयास मिळाले. लेकीच्या जन्माची, तिच्या सन्मानाची भावना या अशा घटना-प्रसंगांतून प्रस्थापित होणारी व इतरांसाठीही अनुकरणीय ठरणारी आहे. अशीच मानसिकता सामान्यात रुजवण्याच्या दृष्टीने शालेय पातळीवरील मोहिमांचे व सामाजिक संघटनांच्याही प्रयत्नांचे मोल अनमोल आहेत. 

https://www.lokmat.com/editorial/male-and-female-subject-comes-discussion-again/

Thursday, January 9, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 09 Jan, 2020

भाजप-मनसे एकत्र येणार? फायदा नेमका कोणाला होणार?

किरण अग्रवाल

पक्षीय भूमिका वा तत्त्वांचे अडसर दूर ठेवत व राज्यातील सत्तेची समीकरणे जुळवत आकारास आलेली महाविकास आघाडी आणि त्यानंतर अन्य राज्यांतही होऊ घातलेल्या अशाच प्रकारच्या राजकीय आघाड्या पाहता राजकारणात काहीही अशक्य नसते, यावर पुन्हा एकवार शिक्कामोर्तब होऊन गेले आहे; त्यामुळे भाजप व ‘मनसे’चीही ‘युती’ घडून आल्यास आश्चर्य वाटून घेता येऊ नये. पण, असे करून शिवसेनेला काटशह देण्याच्या नादात स्वत:ची मतपेढी असलेल्या महानगरी तंबूत ‘मनसे’च्या उंटाला शिरकाव करू देणे भाजपस राजकीयदृष्ट्या परवडणारे आहे का, असा प्रश्न उपस्थित होणेही गैर ठरू नये.

विधानसभेत सर्वाधिक संख्याबळ असूनही विरोधी पक्ष नेतेपद सांभाळण्याची वेळ आलेले देवेंद्र फडणवीस व ‘मनसे’चे नेते राज ठाकरे यांची अलीकडेच गुप्त भेट झाल्याची चर्चा असून, भाजप व मनसे एकत्र येणार असल्याचीही वदंता आहे. ‘मनसे’चा झेंडा बदलणार असल्याच्याही चर्चा याचसंदर्भाने घडून येत आहेत. या सर्वच चर्चांना अद्याप कोणीही नाकारलेले नसल्याने त्यात तथ्य असावे, असा अंदाज बांधता यावा. शिवाय, भाजप-मनसे सोबत येणार असेल तर त्यात गैर काही ठरू नये. कारण, भिन्न विचारसरणीचे काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊ शकतात, तर भाजप-मनसेच्या सामीलकीला कशाचा अडसर ठरावा? एकमेकांना टोकाचा विरोध करणारे पक्ष व त्यांचे नेते प्रसंगी हातात हात घेत एकत्र नांदल्याची अनेक उदाहरणे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उमेदवार उभे न करता नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता, तर तद्नंतरच्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’चे उमेदवार उभे करून तेच विरोधाचे सूत्र कायम ठेवले होते, त्यामुळे उभयपक्षीयांचे सूर कसे जुळणार, असा बालीश प्रश्न करणारे करतातही; पण त्याला अलीकडच्या राजकीय स्थितीत काडीचाही अर्थ नाही. तसेही तत्पूर्वी राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वातील गुजरातच्या प्रगतीचे गोडवे गायले होते, हे विसरता येऊ नये.



महत्त्वाचे म्हणजे, भाजप व मनसे या दोघांनाही कुण्या सहकाऱ्याची गरज आहे. भाजपची पारंपरिक सहकारी असलेली शिवसेना त्यांच्यापासून दुरावल्याने व तिच्यामुळेच सत्ताविन्मुख राहण्याची वेळ ओढवल्याने भाजपला नव्या जोडीदाराचा शोध आहे. एकपक्षीय राजकारण दिवसेंदिवस अवघड होत चालल्याने ही गरज निर्माण झाली आहे. यातही शिवसेनेला काटशह देण्यासाठी ‘मनसे’ला जवळ करणे हाच पर्याय त्यांच्याजवळ असणे स्वाभाविक आहे. ‘मनसे’च्या दृष्टीने विचार करता, राज ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे मैदान गाजवूनही या पक्षाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. विधानसभेत ‘मनसे’चा एकच आमदार निवडून येऊ शकला. खरे तर सत्तेसाठी नव्हे, विरोधकाची भूमिका सक्षमतेने पार पाडण्यासाठी त्यांनी मते मागितली होती. पण, मतदारांनी त्यातही नाकारले. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता असली तरी तो पक्षही शिवसेनेसोबत सत्तेत गेला. त्यामुळे ‘मनसे’समोर भाजपखेरीज सक्षम सोबतीचा पर्याय उरलेला नाही. तेव्हा उभय पक्षांची परस्परपूरक गरज वा अपरिहार्यता म्हणून यासंबंधीच्या चर्चांकडे पाहता यावे.

काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा मुद्दा मवाळ करावा लागल्याची टीका होत आहेच, त्यामुळे तोच मुद्दा हाती घेऊन व ‘झेंडा’ बदलून ‘मनसे’ला कात टाकता येणारी आहे. असे केल्याने त्यांना भाजपजवळ जाणे शक्य होईल. अर्थात, आजकाल तत्त्व-भूमिकांचे ओझे न बाळगता युती वा आघाड्या साकारतात हा भाग वेगळा; पण हिंदुत्वाचा कॉमन अजेंडा या दोन्ही पक्षांना परस्परांशी जोडून घेण्यास उपयोगी ठरू शकतो. अडचण आहे ती या दोघांच्या कॉमन मतपेढीची. कारण, भाजपचा प्रभाव शहरी व महानगरी क्षेत्रात आहे. ‘मनसे’ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरी भागात अस्तित्व दर्शवून आहे. यात महापालिका असो, की अगदी विधानसभा; ‘शत-प्रतिशत’ यश मिळवण्याचे भाजपचे स्वप्न लपून राहिलेले नाही. ‘मनसे’ आज अस्तित्वासाठी झगडतेय. त्यामुळे त्यांना भाजपची साथ लाभदायी ठरू शकेलही; पण ‘मनसे’ला सोबत घेऊन आपल्या मतपेढीत वाटे-हिस्सेकरी वाढवून घेणे भाजपला परवडणारे आहे का, हा खरा प्रश्न आहे. अर्थात, लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास ‘मनसे’ तयार असेल तर सूर जुळून येतीलही. कारण ‘एकला चलो रे’ची स्थिती आता राहिली नाही हे एव्हाना भाजपच्याही लक्षात आले असेलच. 


https://www.lokmat.com/editorial/bjp-likely-do-alliance-mns-after-shiv-sena-forms-government-congress-ncp/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop

Monday, January 6, 2020

Lokpradnya Awards 2020

१ जानेवारी 2020 रोजी ४:४५ PM वाजता ·



लोकमत परिवारातील प्रज्ञावानांचा गौरव...
लोकमतच्या विविध विभागातील सहकारी तसेच वार्ताहर व वितरक बांधवांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण क्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव लोकमत तर्फे लोकप्रज्ञा अवॉर्डसने करण्यात आला.
सहायक कामगार आयुक्त श्री सुजित शिर्के यांनी यावेळी प्रज्ञावंतांचे कौतुक केले.
#लोकप्रज्ञा #LokmatLokpradnya2020

Dhopawkars Akshar Exibition

३१ डिसेंबर, २०१९ रोजी ६:१४ PM वाजता ·



ऐसी अक्षरेच बोलकी ...
शब्दाचे सामर्थ्य समजावून सांगण्याची गरज नाही, पण या शब्दांनाही जेव्हा रंग-रूपाचे लावण्य लाभते तेव्हा ती अक्षरे स्वतः बोलू लागतात.
असेच मराठी अक्षरांना व शब्दांना बोलायला लावण्याचे अद्भुत काम आमचे स्नेही व नाशकातील प्रख्यात कला प्रेमी श्री सुनील धोपावकर जी यांनी केले आहे. शब्द बघताच त्याचा अर्थ उलगडावा, इतके जबरदस्त सामर्थ्य त्यांच्या या टायपोग्राफीत आहे. शब्दांना दृश्य स्वरूपातील ओळख देण्याच्या भन्नाट कल्पनाशक्तीचा प्रत्यय या अक्षर प्रदर्शनातून आल्यावाचून राहत नाही.
जेष्ठ पत्रकार श्री सुरेश भटेवरा जी यांच्या समवेत हे प्रदर्शन बघण्याचा योग आला.
कुसुमाग्रज स्मारकात दि. 2 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन आहे, अगदी आवर्जून बघावे असे ते आहे...

#अक्षर #SunilDhopawkar #KiranAgrawal #SureshBhatewra

Lokmat Lifestyle 2019 Awards

३० डिसेंबर, २०१९ रोजी ५:०८ PM वाजता ·






स्टाइल ही काही केवळ कपडेलत्ते किंवा हेअर स्टाईलने सिद्ध होत नसते, तर आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात वेगळेपणाची वाट चोखाळून कर्तृत्व कसे सिद्ध केले यावरूनही ती स्पष्ट होते. आपल्या लाईफमध्ये व्यावसायिकदृष्ट्या अशीच स्टाईल प्रस्थापित केलेल्यांचा नुकताच लोकमत लाइफस्टाइल अवॉर्डने गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात प्रख्यात अभिनेते, चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, लोकमतचे सहा उपाध्यक्ष बी बी चांडक, एम्पायर स्पायसेसचे आनंद राठी, सेवा ग्रुपचे आदित्य बाफणा व गौरवार्थी यांच्यासमवेतची काही आनंदचित्रे ...
@MiLokmat initiative
#LokmatLifeStyleAwards

#Saraunsh published in Lokmat on 05 Jan, 2020

Thursday, January 2, 2020

#Editorsview published in Online Lokmat on 02 Jan, 2020

ऐसी कळवळ्याची जाती!

किरण अग्रवाल

आनंद कशात मानायचा अगर जल्लोष कसा साजरा करायचा, हा खरे तर व्यक्तिगणिक बदलणाऱ्या उत्तरांचा प्रश्न. पण एक नक्की खरे की, आपला आनंद इतरांना तापदायी ठरू नये. अर्थात जिथे सुहृदयता वा संवेदना असते तिथे आपल्या स्वत:पेक्षा इतरांचा विचार प्राधान्याने डोकावल्याखेरीज राहात नाही. सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२० या नववर्षाचे स्वागत करताना अनेक व्यक्ती, संस्था, समूहांनी तो केल्याचे प्रकर्षाने दिसून आले. अंधाºया रात्रीच्या गर्भात उष:कालाचे बीज अंकुरते ते या अशाच विचार-शलाकांनी. काळ्या परिघावरले हे पांढरे ठिपके दिवसेंदिवस कसे वृद्धिंगत करता येतील हा खरा प्रश्न आहे.

वर्ष सरले, म्हणजे कॅलेंडर बदलले. हा बदल होताना काळाचे संक्रमण घडले. यात वर्तमानाच्या ओसरीत उभे राहात आपण २०१९ला निरोप देताना २०२०चे स्वागत केले. ते करताना आनंद वा जल्लोषासाठी निमित्त शोधणारा मनुष्य स्वभाव असल्याने प्रत्येकानेच आपापल्यापरीने त्याची योजना केली. पण, हा नववर्ष स्वागताचा आनंद साजरा करताना व जल्लोष करतानाही आपली काळजी घेण्यासाठी शहरा-शहरांतील रस्तोरस्ती पोलिसांना तैनात करावे लागले. म्हणजे, समाजातील मोठा वर्ग आनंदात डुंबत असताना एका अन्य वर्गाला मात्र काळजीवाहकाच्या भूमिकेतून भर थंडीत रात्र जागून काढावी लागली. यात काय विशेष, ती तर त्यांची जबाबदारीच म्हणूनही याबाबत सांगितले जाऊ शकेल; परंतु असली वेळच का यावी, किंवा आपल्या आनंदाच्या अतिरेकावर नजर ठेवण्यासाठी इतर कुणास राखण करावी लागणार असेल तर त्यास आनंद म्हणायचा का, किंवा अशा आनंदाच्या उपभोगातून लाभणारे समाधान काय कामाचे हा यातील खरा प्रश्न ठरावा. आपला आनंद अगर जल्लोष हा इतरांसाठी तापदायी ठरणारा असेल तर त्याला आनंदच म्हणता येऊ नये. अशा आनंदामागे धावणारे काही कमी नाहीत, हे खरे असले तरी इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारेही काही आहेत याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. असल्या सत्कार्य व सत्प्रवृत्तींनी लकाकणाºया पणत्यांचा प्रकाश भलेही मर्यादित असेल; पण उद्याचे अवकाश व्यापण्याची ताकद त्यात आहे हे नक्की!



नववर्षाचे स्वागत व जल्लोष करण्यासाठी हॉटेल्सच्या पार्ट्यांमध्ये आनंद शोधणारे एकीकडे दिसत असताना, दुसरीकडे अनाथालयातील बालके, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ तसेच रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त व एड्सग्रस्तांसोबत वेळ घालवत आनंद साजरा करणारेही यंदा मोठ्या प्रमाणात दिसून आले. रस्त्याच्या कडेवर थंडीत कुडकुडणाºया वंचित बालकांच्या अंगावर मायेच्या शालीचे पांघरूण घालणाºया काही संस्थाही पुढे आलेल्या पहावयास मिळाल्या. दिवाळीच्या वेळी गावकुसाबाहेरील गोरगरिबांच्या व अनाथांच्या अंगणी संवेदनांचे दीपप्रज्वलित करून त्यांना गोडधोड खाऊ घालणाºया व नवीन कपडेलत्ते देत दिवाळी साजरी करणाºया संस्थांची जशी प्रतिवर्षी भर पडताना दिसते, तशी यंदा नववर्षाचे स्वागत करतानाही असे माणुसकीचे पाट वाहताना दिसले ही खूप आशादायी बाब आहे. अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी नववर्षाचे स्वागत करताना गरजूंना मायेची ऊब दिली. काहींनी शहरातील हॉटेल्समध्ये न रमता वाड्यापाड्यांवर जात तेथील बांधवांसोबत नववर्षाचे स्वागत केले तर काहींनी रुग्णालयांतील रुग्णांसोबत आपला आनंद वाटून घेतला.

शेवटी आनंद हा वाटून घेण्याने वाढतो म्हणतात हेच खरे. स्वत:च्या आनंदात इतरांना सहभागी करून घेतल्याने व त्यांच्या चेहºयावरील आनंदाचे भाव न्याहाळण्यात किंवा अनुभवण्यात जे समाधान लाभते ते दुसरे कशात लाभावे? अर्थात, त्यासाठी किंवा असा विचार करण्याकरिता संवेदना असावी लागते. संत तुकोबारायांनी मातृहृदयाच्या वत्सल भावाचा दाखला देत, ‘लेंकराचे हित, जाणे माउलीचें चित्त। ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती।।’ असे जे म्हटले आहे ते यासंदर्भाने लागू पडावे. नववर्षाचे स्वागत करताना आईच्या हृदयाने, पाल्याबद्दलचा कळवळा वाटावा अशा भूमिकेतून विविध संस्था व व्यक्तींनी दाखविलेली मानवतेची वाट म्हणूनच आदर्शदायी आहे. या अशा प्रयत्नांची संख्या आज कमी असली तरी स्वकेंद्री आचरणाला बहुकेंद्री चेहरा देण्याच्या दृष्टीने एक ठिणगी म्हणून त्याकडे पाहता यावे. हीच ठिणगी उद्याची माणुसकीची मशाल बनून पुढे येण्याची अपेक्षा करूया... 

https://www.lokmat.com/editorial/happy-new-year-2020-new-year-celebration-ngo-and-poor-people/