Friday, March 27, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 26 March, 2020

Coronavirus : शांतिदूतांनाही पडले शांततेचे कोडे!


किरण अग्रवाल

धावाधाव... ही तशी अव्याहत चालणारी क्रिया आहे. रोजीरोटीच्या झगड्यात आज प्रत्येकाचीच धावाधाव सुरू आहे. या धावण्याची गती ज्याच्या त्याच्या गरजेनुसार कमी-अधिक असेल; पण कुणी म्हणता कुणी त्याला अपवाद नाही. त्यामुळे या धकाधकीत दोन घटका जरा विसावायला मिळणे अवघडच! तशी संधी मिळाली तरी त्यातील दृश्य-अदृश्यता त्या संबंधितालाच ठाऊक असते. कारण प्रथमदर्शनी दृश्य स्वरूपात एखादी व्यक्ती निवांतपणे पहुडलेली अगर आरामात विसावलेली आढळून येत असली तरी तिचे मन कोणत्या विवंचनेत गुंतले आहे, हे अदृश्य असते, जे दुसऱ्याला कळणारे नसते. अर्थात तसे असले तरी अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.



विसावण्याच्या किंवा आरामाच्याही प्रत्येकाच्या आपापल्या त-हा असतात. कुणी चक्क पलंगावर पाठ टाकून लोळण घेत आराम करतो, तर कुणी खुर्चीत निवांत पडून. ब-याच जणांना कार्यालयीन सेवेदरम्यान खुर्चीत मानेखाली हात घेऊन स्थिरावण्याचीही सवय असते. हा स्थिरावणे शब्द मुद्दाम यासाठी की, काम असो अगर नसो, अशांना सतत फिरफिर करण्याची सवय असते. आपण खूप कामात व परिणामी ताणात आहोत असे प्रदर्शन ते नेहमी करत असतात. त्यामुळे मिळाली संधी की, ते पद्धतशीरपणे खुर्चीत स्थिरावतात. तेव्हा हे स्थिरावणे व विसावणे एकच. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशाचा आधार याला आहे. शरीर थकले, अवयव - गात्र थकले की विश्रांतीची-विसावण्याची गरज भासतेच. पण हल्ली थकावट न बाळगता अगर दर्शवता सतत पळावे-धावावे लागते, हीच खरी समस्या आहे. सामान्य माणसाला तर मरायला जिथे फुरसत नसते, असे म्हटले जाते; तिथे विसावायला कुठे संधी मिळणार? त्याच्यासाठी हक्काचा एकच विसावा असतो, तो अंतिम यात्रेत पार्थिवाला मिळणारा! त्यामुळे रोजच्या धबडग्यात विसावायला मिळण्यासाठी सारेच आसुसलेले असणे अगदी स्वाभाविक आहे.

माझ्या विसाव्याचे स्थान म्हणजे, माझ्या दिवाणखाण्यातील आरामखुर्ची. सकाळी उठल्या-उठल्या बाल्कनीचे दरवाजे उघडून प्रसन्न वारा अंगावर घेत या खुर्चीत विसावायचे व एकेक करून घरी येणारी सारी वर्तमानपत्रे हातावेगळी करायची अशी रोजची परिपाठी. पण, ‘कोरोना’ने त्यात खंड पाडला. अमुक-तमुक वर्षात असे घडले नाही, फर्स्ट टाइम इन हिस्ट्री... यासारख्या संदर्भांनी सध्या अनेक संस्था, आस्थापना ‘लॉकडाउन’ झाल्या आहेत. त्यांच्याही कामात वा सिस्टीममध्ये खंड पडला आहे तसा. त्यामुळे वृत्तपत्रांऐवजी हाती मोबाइल घेत आॅनलाइन वाचन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. यासंबंधीची आतापर्यंत रूढ झालेली सिस्टीम बदलल्याने दार बंद आहे, खुर्ची रिकामी आहे. हे रिकामपणच खरे तर आज मनाची कवाडे सताड उघडी करायला भाग पाडून गेले आहे. एरव्ही गांभीर्याने असो, की अलवार-अलगदपणे; कुठल्याही विषयावर मन:पूत मनात डोकावायला तरी कुठे मिळते? त्यामुळे ‘कोरोना’च्या आपत्ती काळात का होईना, अशी रिकाम्या मनातील भुंग्याची भुणभुण आत्मपरिक्षणाला, चिंतन-मननाला निमंत्रण देणारीच ठरली नसती तर नवल !



विचार आला, कोरोनाच्या धास्तीने आपले जे रिकामपण ओढवलेय; दारावर बसलेल्या कबुतर पक्ष्याच्या दाम्पत्याला त्याची काही कल्पना असेल का? स्वच्छंद-मुक्तपणे विहरण्याच्या गप्पा आपण करतो ख-या, पण तशी मुक्तता-स्वच्छंदता लाभते का कधी आपल्याला? कबुतराच्या गुटर्गुची बोली आपल्याला कळत नाही खरी; पण एरव्ही खुर्चीत पहुडणारी व्यक्ती आज त्यावर दिसत नसल्याबद्दलची चर्चा तर होत नसावी त्यांच्यात? जिवाच्या जिवलगाची ही जोडी रिकाम्या खुर्चीकडे काय म्हणून बघत असावी, व्यक्तीचे नसणे निर्भयतेचे असल्याचे आनंदनिधान त्यांच्या गुटर्गुत असावे, की दाणा-पाण्याची सोय टळण्यासंबंधीच्या हवालदिलतेचे रुदन? कबुतरांकडे आपण नेहमी शांतिदूत म्हणून पाहतो. शांततेचा संदेश देण्यासाठी कबुतरे उडवतो, पण आज या शांतिदूतांनाही ही शांतीच तर खटकत नसावी?.. एक नव्हे, असंख्य अशा प्रश्नांनी रिकामपणातल्या निवांततेतही मनाच्या कवाडावर जणू किलबिलाटच घडवून आणला. खरेच, आपण अशा बाबींकडे इतक्या मोकळ्या व प्रांजळपणे कधी बघतो का, हा प्रश्न त्यातून अधिकच गडद झाला.

सहज म्हणून हे छायाचित्र मी आमच्या साहित्यिक सुहृदाला, स्वानंद बेदरकर यांना पाठविले. त्यांनी लगेच त्यावर प्रसवले,
‘कबुतरांना पडले कोडे, शांततेचे हे कुठले रूप?
आरामखुर्चीचेही म्हणे, बसून बसून वाजले सूप...’

खरेच तर आहे, कबुतरांनाच काय; कुणाही सुजाण-संवेदनशील मनाला शांततेचे हे रूप कोड्यात टाकणारेच ठरावे. शांतता, निरवता, विसावा आदी. काहीही म्हणा, ते हवेहवेसे असले तरी कधी कधी ही शांतता व त्यातून येणारे रिकामपण मनाला खरवडणारेच ठरते. नदीकाठी बसून व पाण्याच्या प्रवाहात पाय सोडून आनंददायी शीत-शांती अनुभवण्याची परिस्थिती राहिली नाही. आता इतक्या कोलाहलाची सवय झालीय की शांतताही खायला उठते. आजची शांतता व त्यातून ओढवलेल्या विसाव्याला तर भयाची किनार आहे. आणि भय कसलेही असो, ते तर अस्वस्थ वर्तमानाच्या विटेवर अस्थिर भविष्याचा इमला उभारू पाहते. तेव्हा त्याला घाबरून चालत नाही. आत्मविश्वास व धीराच्या बळावर भयमुक्ती नक्कीच साधता येते. तेव्हा सद्यस्थितीत ‘कोरोनो’च्या संकटामुळे अनुभवास येणारे भय टाळून, स्वत:च्या, कुटुंबीयांच्या व समाजाच्याही स्वास्थ्यासाठी घरातच विसावणे गरजेचे ठरले आहे. ते सक्तीचे आहे, तसे सावधानतेसाठीचेही आहे. दारावर बसलेल्या कबुतरांचा सांगावाही तोच तर नसेल?

https://www.lokmat.com/editorial/editorial-view-coronavirus-stay-home-stay-safe/


#Saraunsh published in Lokmat on 22 March, 2020

Thursday, March 19, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 19 March, 2020

Coronavirus ; अब रिश्तों को मजबूत करो ना!

किरण अग्रवाल

काळ बदलतो तशा गरजा, अपेक्षा तर बदलतातच; नव्या पिढीचे नवे विचारही आढळून येतात. ‘जनरेशन गॅप’ म्हणून पाहिले जाते याकडे. हे अपरिहार्यही असते. अर्थात, या सर्व बदल वा परिवर्तनात कसल्याही बाबतीत एकमत होणे अवघड बनते. जितक्या व्यक्ती तितक्या दिशेला त्यांची तोंडे असतात. पण अशाही स्थितीत, एका विषयावर किंवा समस्येवर मात्र सर्वांचेच एकमत होणारे असते व ते म्हणजे, ‘सर्व काही आहे परंतु वेळच नाही हो’ या रडगाण्यावर. कोणत्याही संदर्भाने होणाऱ्या चर्चा असोत, त्यात वेळ नसल्याचा कॉमन फॅक्टर असतो. अगदी व्यावसायिक कामकाज असो, की कुटुंबासाठी काही करायचे असो; सर्वांची हळहळ अगर असहायता आढळते ती वेळच नसल्याबद्दल. पण आपत्तीतून इष्टापत्ती म्हणावे तसे, कोरोनामुळे वेळेची समस्या दूर झाली आहे आता. सर्वांनाच भरपूर वेळ उपलब्ध झाला आहे. त्यामुळे किमान या वेळेचा सदुपयोग घडवीत कौटुंबिक नात्यांचे, जबाबदारीचे बंध अधिक घट्ट करायला काय हरकत असावी?




रोजी-रोटीसाठीच्या लढाईत आज प्रत्येकच जण असा काही अडकला आहे की, त्याला फावला वेळ आहेच कुठे? कुणालाही व कशाच्याही बाबतीत विचारा, एकच उत्तर मिळते ‘अहो मरायलाही वेळ नाही’. विशेषत: नोकरदारांची तर याबाबतीतली व्यथा सारखी आहे. त्यातही शहरी भागातले, म्हणजे ग्रामीण भागात कुटुंबातील ज्येष्ठांना ठेवून आलेल्यांची तर वेळेच्या बाबतीत खूपच दमछाक होताना दिसते. पती-पत्नी दोघेही नोकरदार असतील तर विचारायलाच नको. विभक्त कुटुंब पद्धतीतून ओढावलेल्या ज्या काही अडचणी आहेत, त्यात ही वेळेची कमतरता अधिक मोठ्या प्रमाणात जाणवते. अशात नातेसंबंधासाठी किती वेळ काढता येणार? नाते-संबंधातीलही काका-मामा-मावशांचे जाऊ द्या, पत्नी व स्वत:च्या मुलांसाठीही वेळ काढणे जिकिरीचेच ठरत असल्याची अनेकांची तक्रार असते. ‘बाबा कामावरून उशिरा येतात तेव्हा आम्ही झोपलेले असतो व आम्ही सकाळी शाळेला जातो तेव्हा बाबा झोपलेले असतात; म्हणजे भेट होते ती सुटीच्याच दिवशी’... अशी खंत बोलून दाखविणारी अनेक बालके आपल्या आजूबाजूस आढळतात. प्रमाण कमी-अधिक असेल; परंतु कुटुंबासाठीही वेळ देता न येऊ शकणाऱ्यांची घालमेल अनेकांमध्ये प्रत्ययास येते. पण वेळेची ही समस्या आता ‘कोरोना’मुळे काही कालावधीसाठी का होईना दूर झालेली आहे. त्यामुळे कुटुंबातील, नातेसंबंधांतील दुर्लक्षाचा बॅकलॉग भरून काढता येण्याची संधी म्हणून याकडे पाहता यावे.

‘कोरोना’चा फै लाव रोखण्यासाठीच्या खबरदारीचा भाग म्हणून अनेक खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची सूट दिली आहे. शाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुटी दिली गेल्याने मुले घरातच आहेत. सिनेमागृह-मॉल्स बंद आहेत म्हटल्यावर तिथे जाण्याचा प्रश्न नाही. सार्वजनिक कार्यक्रम थांबलेले आहेत. बाहेरगावी जाण्याचा म्हणजे प्रवासाचा धोका स्वीकारायचा नाहीये. एकुणात अनेकांना घरातच बसण्याची वेळ आली आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांची अडचण होणार आहे हे खरेच; परंतु आपत्तीत समाधान शोधताना असा ज्यांना ज्यांना म्हणून वेळ उपलब्ध होणार आहे, त्यांना तो सत्कारणी लावताना कुटुंबासमवेतचे नाते अधिक दृढ करण्याची ही संधी आहे. घरात थांबताना टीव्हीसमोरच बसून न राहता, अगर मोबाइलवरून सोशल माध्यमांच्या जंजाळात स्वत:ला अडकवून न घेता मुलांबरोबर गप्पा मारता येतील. त्यांच्या बरोबर लहान होऊन खेळता येईल. आई-बाबा व अन्य वडिलधाऱ्यांसोबत सुख-दु:खे शेअर करता येतील. नोकरीच्या व काम-धंद्याच्या धबडग्यात अनेकदा अनेकांना कुटुंबासोबत जेवण करणेही शक्य होत नसते. आता वेळ मिळालाच आहे तर कुटुंबीयांसमवेत छान गप्पांचा फड रंगवीत जेवण करण्याचा आनंद घेता येणार आहे. एरव्ही घरात असूनही नसल्यासारखे अनेकांचे राहणे असते तेव्हा यासंबंधीच्या रोजच्या धकाधकीतून मिळालीच आहे थोडी उसंत, तर नाती घट्ट करूया ना!

महत्त्वाचे म्हणजे, आजची अवस्था उद्या बदलणारच आहे. काळ हा कधी थांबत नसतोच. त्यामुळे ‘कोरोना’च्या सावटातून दूर होत पुन्हा सारे सुरळीत करताना अधिक वेळ द्यावा लागेल. झालेले नुकसान भरून काढावे लागेल, त्यासाठीची धावपळ-मेहनत करावी लागेल. तुंबलेली-खोळंबलेली कामे मार्गी लावावी लागतील. थोडक्यात, तेव्हा वेळ काढणे मुश्किलीचे ठरेल. त्यामुळे आजच्या स्थितीकडे संकट म्हणून अजिबात न पाहता, संधी म्हणून पाहता यावे. कुटुंबातले-नात्याचे बंध अधिक गहिरे करण्यासाठी या लाभलेल्या वेळेचा उपयोग करून घेता यायला हवा. असे केल्याने दुहेरी लाभ पदरी पडणारे आहेत. घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी उगाच न जाता ‘कोरोना’पासून बचावताही येणारे आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवून त्यांच्या आनंदात-समाधानात भरही घालता येणार आहे. तेव्हा ही संधी घेऊ या, आणि म्हणूया..‘कोरोना के डर से डरो ना, अब छुट्टी मिली ही है दफ्तर से तो, रिश्तों को मजबूत करो ना!...’

https://www.lokmat.com/editorial/editorial-view-corona-virus-and-easy-ways-strengthen-your-relationship/

Thursday, March 12, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 12 March, 2020

एकाकडे अनेक खात्यांचे ‘शॅडो’ कारभार ; 
राज यांच्या मनसेची सावलीही छोटीच !

किरण अग्रवाल

काही वेदना अशा असतात, की ज्या ठसठसतात; पण बोलता येत नाही. अशावेळी परिणामांचा विचार न करता मन मोकळ केलेले केव्हाही बरे! मनाला लागलेली बोच तर त्यामुळे दूर होण्याची शक्यता असतेच, शिवाय लाभली तर सकारात्मकता अगर अनुकूलताही लाभण्याची अपेक्षा करता येते. राजकारणातील अपयशातून ओढावणाऱ्या वेदना वा अस्वस्थतेचेही असेच काहीसे असते. मोकळेपणे त्या मांडण्याला म्हणूनच महत्त्व देऊन त्याकडे गांभीर्याने पाहिले जायला हवे. लोकं आपल्याकडून कामाची अपेक्षा करतात; पण मतदान मात्र करीत नाहीत, याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी खंत बोलून दाखविली आहे याकडेही त्याचदृष्टीने बघता यावे.



राजकारणाचा बाज अलीकडे बदलून गेला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत विकासाला मते मिळाल्याचे दिसले हे खरे; परंतु बहुतांश ठिकाणी विकासापेक्षा अन्य फॅक्टरचाच बोलबाला निवडणुकांमध्ये राहात असल्याचे दिसते. त्यामुळे विविध राजकीय पक्षांतर्फे उमेदवारी देतानाही जे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहिले जाते, त्यात विकास घडवून आणण्याच्या क्षमतेखेरीज जात-पात, पैसा-प्रभाव आदी बाबींचा प्राधान्याने विचार केला जाताना दिसतो. निवडणुकीतील खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाऊ लागल्याने स्वाभाविकच निवडून आल्यावर लोकसेवेच्या माध्यमातून या गुंतवणुकीच्या वसुलीचे ध्येय बाळगले जाते. कधी धर्म प्रभावी ठरतो, तर कधी पैसा. या बाबींच्या जोडीला कसली तरी लाट असली की संधी निश्चित होते. अशावेळी विकास हा चर्चेपुरता उरतो. दुर्दैव असे की, एरव्ही विकासाच्या गप्पा करणारे, विकास न करणाऱ्यांच्या नावाने शिमगा करणारे अनेक जण मतदानाचा हक्क बजावण्याचेच टाळतात, त्यामुळे गैरमार्गाचा अवलंब करणा-यांचे फावते. परिणामी जो निकाल समोर येतो त्यावरून विकासाचा मुद्दा बाजूलाच पडल्याचे बोलले जाते. ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे अलीकडे वारंवार जी खंत व्यक्त करतात ती याचसंदर्भात. एरव्ही विकास, विकास म्हणून जे गळे काढले जातात, ते मतदानाच्यावेळी नेमके कसे विसरले जाते? ‘मनसे’च्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यातही राज यांनी हीच वेदना बोलून दाखविली. ती एकदम दुर्लक्षिता येऊ नये.

मुळात, राज ठाकरेच काय; बहुतेक राजकारण्यांना यासंदर्भात मतदारांकडून नाकारले जाण्याची जी वेळ येते त्यात विकासासोबत विश्वासाच्या अभावाचा फॅ क्टर महत्त्वाचा असतो हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. कधी कधी क्षमता असतात; परंतु संधी मिळत नाही, आणि काही बाबतीत संधी मिळाली तर तिचे सोने केले जात नाही. ही बाब विश्वासाला ठेच पोहोचवणारी ठरते. ‘मनसे’ व राज ठाकरे यांच्या संदर्भानेच बोलायचे तर नाशिक महापालिकेत त्यांना संधी मिळाली होती. पूर्ण पाच वर्ष तिथे ‘मनसे’चे महापौर होते. पण, थांबा थांबा म्हणत शेवटच्या चरणात विकासाचे नवनिर्माण घडविले गेले. त्यामुळे या पक्षाचेच नगरसेवक पुढील निवडणुकीत ‘मनसे’ सोडून भाजपच्या दारात गेले व पालिकेतील सत्ताही गेली. त्याच काळात नाशिक शहरात ‘मनसे’चे तीन आमदार निवडून दिले गेले होते; परंतु त्यांच्याकडूनही नवनिर्माण घडून येऊ शकले नाही. परिणामी त्याही जागा पुढील निवडणुकीत हातून गेल्या. जनतेला, मतदारांना हल्ली वाट बघण्याची सवय राहिलेली नाही. त्यामुळे उक्तीतला विकास कृतीत ताबडतोब उतरला नाही तर विश्वास डळमळतो. ‘मनसे’च्या बाबतीत तेच झाले.



महत्त्वाचे म्हणजे, ‘मनसे’ ही एक खांबीच राहिली आहे. राज ठाकरे गर्दी खेचतात खरे; परंतु पक्षाचा म्हणून कुठे काही कार्यक्रम दिसत नाही. ‘खळ्ळ खट्याक’वर लांबचा पल्ला गाठता येत नाही. शेवटी कार्यकर्त्यांची व त्यांच्या माध्यमातून पक्षाची सक्रियता राखायची तर पक्षकार्यात सातत्य असावे लागते. ‘मनसे’त त्याचीच उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे. राज यांच्याकडून विकासाची अपेक्षा करता येणारी असली तरी तो घडवून आणू शकणारी मातब्बर फळी त्यांच्याकडे दिसत नाही. लोकं ऐकायला येतात, गर्दीही करतात; पण मते दुस-यालाच देतात हे जे काही होते त्यामागे अशी पक्षांतर्गत व्यवस्थेची, कार्यक्रमांची, सक्रियता-सातत्याची उणीव आहे. आताही वर्धापनदिनी त्यांनी प्रतिरूप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) घोषणा केली. ती कल्पना चांगली असली तरी, एकाकडे अनेक खात्यांचे ‘शॅडो’ कारभार सोपवावे लागल्याची त्यातील परिस्थिती पाहता ‘मनसे’च्या संघटनात्मक बळावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले. सावलीच्याही सक्षमतेचे नेते या पक्षाकडे कमी असल्याचेच यातून समोर आले. म्हणजे पक्षही छोटा, आणि त्याची सावलीही छोटीच. शिवाय स्थानिक पातळीवरील पक्षाच्या वाढ-विस्तार व मजबुतीकडे लक्ष देण्याऐवजी थेट सरकारवर निगराणीचे कार्य हाती घेतल्याने ही ‘शॅडो कॅबिनेट’ टीकेस पात्र ठरून गेली.

अर्थात, राजकीय विरोधाचा वा टीकेचा विचार न करता या त्यांच्या प्रयत्नांतून चांगलेच काही निघेल असे आशावादी नक्कीच राहता यावे; पण त्यासाठी घोषणा, संकल्पनांवरच न थांबता खरेच सरकारच्या कामाचा सावलीसारखा मागोवा घेतला जाणे गरजेचे आहे. या माध्यमातून का होईना, मतदारांशी विश्वासाचे नाते निर्माण झाले तर नवनिर्माणाला हातभार लागू शकेल. तेव्हा, राज ठाकरे यांनी विकासाच्या अपेक्षा करताना मतदान होत नसल्याची वेदना बोलून दाखविली व सत्तेची सावली बनण्याची योजना मांडली हे बरेच झाले म्हणायचे. छगन भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे मनसेच्या पक्ष कार्यकर्त्यांना काही काम त्यानिमित्ताने मिळाले, या दृष्टीने पक्षासाठी जरी या फंड्याचा उपयोग घडून आला तरी पुरे !

https://www.lokmat.com/editorial/mns-one-hand-shadow-many-cabinets-vrd/

Thursday, March 5, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 05 March, 2020

 नात्यांमधील विश्वासाचा धागा महत्वाचा!

किरण अग्रवाल

कुठल्याही कौटुंबिक इमारतीचा पाया घट्ट असतो तो त्या कुटुंबातील सदस्यांमधील परस्परांप्रतिचा विश्वास व त्यांच्यातील निर्व्याज्य प्रेमसंबंधावर. पण या मुद्द्यांनाच ठेच पोहोचली की घराचे वासे खिळखिळे होतात आणि घरातले घरपणच हरवते. सार्वजनिक नळावर होणारी दोन शेजाऱ्यांमधील अथवा अपरिचितांमधली भांडणे आता तितकीसी होत नाहीत, त्याऐवजी घराघरांमध्ये, कुटुंबांमध्ये होणारी आपसातील जी भांडणे वाढताना दिसून येत आहेत त्यामागे हा विश्वासाचा अभावच कारणीभूत असल्याचे प्रकर्षाने बघावयास मिळते. यातून ओढावणाऱ्यां कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्याचे पाहता, नात्यांमधील प्रेमाचा, विश्वासाचा धागा कसा मजबूत करता येईल, याकडे लक्ष दिले जाणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे.



आजची पिढी मोबाइलच्या जंजाळात गुरफटून ‘सोशल’ झाली असे कितीही म्हटले जात असले तरी, ते काही खरे नाही. उलट सोशल माध्यमांमध्ये गुंतून राहणारे तरुण अधिकाधिक स्वकेंद्री बनत चालल्याचे दिसून येते. मी व माझा, यात सर्वकाही शोधणारा व समाधान मानणारा वर्ग अलीकडे वाढत चालला आहे. नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने घ्या, अगर अन्य कारणांमुळे; गावाकडून शहरांमध्ये होणारे स्थलांतर वाढले आहे. त्यातून विभक्त कुटुंबव्यवस्था आकारास येते आहे. अशात ज्याचा निर्णय अंतिम अगर शिरसावंद्य मानला जावा, त्या अधिकारवाणीच्या कुटुंबप्रमुखाची व्यवस्थाही मोडीत निघत चालल्याचे दिसते. परिणामी ‘मी व माझा’च्या भिंती अधिक मजबूत होत आहेत. याच कारणातून परस्परांवरचा विश्वास डळमळू लागला आहे. नातेसंबंधातील प्रेमाला, आपलेपणालाही ओहोटी लागू पाहत आहे. अर्थात, जुनी माणसे-ज्येष्ठ ज्या कुटुंबात आहेत तिथे अजूनही त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो व विश्वासही टिकून असल्याचे दिसते; त्यामुळे कौटुंबिक कटकटींपासून अशी कुटुंबे मुक्त दिसतात; पण बहुतांश घरातील ‘एकहुकमी’पणा लयास गेल्याने परस्परांबद्दलच्या स्पर्धेचे त्यातून आकारास येणाऱ्यां असूयेचे-अविश्वासाचे पदर गडद होत आहेत. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या बदलत्या संकल्पना, संपत्तीचे वाद, व्यसनाधिनता यांसारखी अनेक कारणे यात भर घालणारी ठरतात आणि त्यातूनच कौटुंबिक वादाची-हिंसाचाराची प्रकरणे वाढीस लागतात.

बरे, कुटुंबातील वाद हा केवळ वाद-वादीपर्यंतचे किंवा भांडणापुरताच मर्यादित असतो तोपर्यंत ठीक, मात्र तो हिंसाचाराच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा त्यासंबंधीची चिंता समाजमनाला सतावणारी ठरल्याखेरीज राहात नाही. यातही परिस्थितीने गांजलेली, हताश झालेली मंडळी असो, की संशयाने घेरलेली व्यक्ती; अशांकडून स्वत:सह इतर संबंधितासही संपविण्याचेच पाऊल उचलले जाताना दिसून येते तेव्हा तर मनाचा थरकाप उडून चिंतेच्या सावल्या भिववणाºयाच ठरून जातात. अशी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अलीकडे वाढू लागली आहेत, हेच चिंताजनक म्हणायला हवे. अगदी अलीकडचीच उदाहरणे घ्या, पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून कोल्हापूर जिल्ह्यातील राशीवडे येथे एकाने पत्नीसह मेहुण्याचा खून केला, तर गोव्यातील खोर्ली-म्हापसा येथे एकाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. शिवडी (मुंबई) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या केली गेल्याची घटना घडली, तर पुण्यातील नºहे भागातही संशयावरूनच प्रियकराचा खून करून एक तरुणी पोलिसांकडे स्वत:हून हजर झाली. ही यादी आणखी बरीच वाढणारी आहे, कारण अशा घटना आता सर्रास होऊ लागल्या आहेत. तेव्हा वैफल्य-निराशा असो, की संशय-अविश्वास; यामुळे ओढावणारे वाद व हिंसाचार रोखायचे असतील तर कुटुंबातील नात्यांचे व परस्परातील प्रेम-विश्वासाचे बंध मजबूत होणे गरजेचे ठरावे, आज दुर्दैवाने ते सैल होताना दिसत आहेत.

समाजाची प्रगती व कुटुंबाची श्रीमंती आज पैसा-आडक्यात पाहिली किंवा मोजली जाते. मनामनांतील परस्पर आदर-विश्वास व संस्काराची शिदोरी या अंगाने विचार करून व्यक्ती वा कुटुंबाची श्रीमंती पाहिली गेल्यास भांडण-तंट्यास जागाच उरणार नाही. पती-पत्नी, भाऊ-भाऊ, काका-पुतणे, मामा-भाचे आदी नाते कुठलेही असो; या नात्यांमधील सन्मान राखला गेला, परस्परांची आपुलकीने काळजी वाहिली गेली तर नात्यांमधली नाजुकता, त्यातील माधुर्य तर टिकून राहीलच शिवाय कोणत्याही संकटांवर मात करीत पुढे जाता येईल. आयुष्यातला, जगण्यातला आनंद-संपन्नता अनुभवायची तर त्यासाठीची सुरुवात अशी घरापासून वा आपल्या कुटुंबापासूनच करता येणारी आहे; पण आजच्या धकाधकीच्या धबडग्यात ते सोडून इतर भौतिक बाबीतच प्रत्येकजण सुख-समाधान शोधायला निघालेला दिसतो आहे. समाजात जागल्याची व मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे संत-महात्मे, कीर्तनकार-प्रवचनकार, प्रेरक वक्ते नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्याचाच तर उपदेश करीत असतात. अगदी गुजरातच्या अहमदाबादेतील विकी पारीख हा तरुण ‘रिस्तो की डोर’ या सांस्कृतिक कार्यक्रमामधून नात्यांतील नजाकतीला उलगडतांना दिसतो, तसे महाराष्टतील चारुदत्त आफळे, सिंधूताई सपकाळ, संजय मालपाणी, डॉ.आनंद नाडकर्णी, अशोक बागवे, प्रवीण दवणे, सलिल कुलकर्णी व संदीप खरे, गुरु ठाकूर आदीही परिवारिक संबंधातील उसवत चाललेली वीण जपण्याचेच निरूपण व मार्गदर्शन करीत असतात. ब्रह्माकुमारी शिवानीदीदी याही अशाच ‘रिस्तो की मधुरता’सारख्या विषयावर समाजमन जागृत करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. तेव्हा, व्यक्ती-व्यक्तीमधील विश्वास व आपुलकीच्या नात्याचा धागा मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होणे हाच वाढता कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठीचा रामबाण उपाय ठरेल हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. 

https://www.lokmat.com/editorial/trust-relationship-why-it-important-and-how-build-it/