Thursday, March 5, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 05 March, 2020

 नात्यांमधील विश्वासाचा धागा महत्वाचा!

किरण अग्रवाल

कुठल्याही कौटुंबिक इमारतीचा पाया घट्ट असतो तो त्या कुटुंबातील सदस्यांमधील परस्परांप्रतिचा विश्वास व त्यांच्यातील निर्व्याज्य प्रेमसंबंधावर. पण या मुद्द्यांनाच ठेच पोहोचली की घराचे वासे खिळखिळे होतात आणि घरातले घरपणच हरवते. सार्वजनिक नळावर होणारी दोन शेजाऱ्यांमधील अथवा अपरिचितांमधली भांडणे आता तितकीसी होत नाहीत, त्याऐवजी घराघरांमध्ये, कुटुंबांमध्ये होणारी आपसातील जी भांडणे वाढताना दिसून येत आहेत त्यामागे हा विश्वासाचा अभावच कारणीभूत असल्याचे प्रकर्षाने बघावयास मिळते. यातून ओढावणाऱ्यां कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्याचे पाहता, नात्यांमधील प्रेमाचा, विश्वासाचा धागा कसा मजबूत करता येईल, याकडे लक्ष दिले जाणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे.



आजची पिढी मोबाइलच्या जंजाळात गुरफटून ‘सोशल’ झाली असे कितीही म्हटले जात असले तरी, ते काही खरे नाही. उलट सोशल माध्यमांमध्ये गुंतून राहणारे तरुण अधिकाधिक स्वकेंद्री बनत चालल्याचे दिसून येते. मी व माझा, यात सर्वकाही शोधणारा व समाधान मानणारा वर्ग अलीकडे वाढत चालला आहे. नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने घ्या, अगर अन्य कारणांमुळे; गावाकडून शहरांमध्ये होणारे स्थलांतर वाढले आहे. त्यातून विभक्त कुटुंबव्यवस्था आकारास येते आहे. अशात ज्याचा निर्णय अंतिम अगर शिरसावंद्य मानला जावा, त्या अधिकारवाणीच्या कुटुंबप्रमुखाची व्यवस्थाही मोडीत निघत चालल्याचे दिसते. परिणामी ‘मी व माझा’च्या भिंती अधिक मजबूत होत आहेत. याच कारणातून परस्परांवरचा विश्वास डळमळू लागला आहे. नातेसंबंधातील प्रेमाला, आपलेपणालाही ओहोटी लागू पाहत आहे. अर्थात, जुनी माणसे-ज्येष्ठ ज्या कुटुंबात आहेत तिथे अजूनही त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो व विश्वासही टिकून असल्याचे दिसते; त्यामुळे कौटुंबिक कटकटींपासून अशी कुटुंबे मुक्त दिसतात; पण बहुतांश घरातील ‘एकहुकमी’पणा लयास गेल्याने परस्परांबद्दलच्या स्पर्धेचे त्यातून आकारास येणाऱ्यां असूयेचे-अविश्वासाचे पदर गडद होत आहेत. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या बदलत्या संकल्पना, संपत्तीचे वाद, व्यसनाधिनता यांसारखी अनेक कारणे यात भर घालणारी ठरतात आणि त्यातूनच कौटुंबिक वादाची-हिंसाचाराची प्रकरणे वाढीस लागतात.

बरे, कुटुंबातील वाद हा केवळ वाद-वादीपर्यंतचे किंवा भांडणापुरताच मर्यादित असतो तोपर्यंत ठीक, मात्र तो हिंसाचाराच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा त्यासंबंधीची चिंता समाजमनाला सतावणारी ठरल्याखेरीज राहात नाही. यातही परिस्थितीने गांजलेली, हताश झालेली मंडळी असो, की संशयाने घेरलेली व्यक्ती; अशांकडून स्वत:सह इतर संबंधितासही संपविण्याचेच पाऊल उचलले जाताना दिसून येते तेव्हा तर मनाचा थरकाप उडून चिंतेच्या सावल्या भिववणाºयाच ठरून जातात. अशी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अलीकडे वाढू लागली आहेत, हेच चिंताजनक म्हणायला हवे. अगदी अलीकडचीच उदाहरणे घ्या, पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून कोल्हापूर जिल्ह्यातील राशीवडे येथे एकाने पत्नीसह मेहुण्याचा खून केला, तर गोव्यातील खोर्ली-म्हापसा येथे एकाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. शिवडी (मुंबई) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या केली गेल्याची घटना घडली, तर पुण्यातील नºहे भागातही संशयावरूनच प्रियकराचा खून करून एक तरुणी पोलिसांकडे स्वत:हून हजर झाली. ही यादी आणखी बरीच वाढणारी आहे, कारण अशा घटना आता सर्रास होऊ लागल्या आहेत. तेव्हा वैफल्य-निराशा असो, की संशय-अविश्वास; यामुळे ओढावणारे वाद व हिंसाचार रोखायचे असतील तर कुटुंबातील नात्यांचे व परस्परातील प्रेम-विश्वासाचे बंध मजबूत होणे गरजेचे ठरावे, आज दुर्दैवाने ते सैल होताना दिसत आहेत.

समाजाची प्रगती व कुटुंबाची श्रीमंती आज पैसा-आडक्यात पाहिली किंवा मोजली जाते. मनामनांतील परस्पर आदर-विश्वास व संस्काराची शिदोरी या अंगाने विचार करून व्यक्ती वा कुटुंबाची श्रीमंती पाहिली गेल्यास भांडण-तंट्यास जागाच उरणार नाही. पती-पत्नी, भाऊ-भाऊ, काका-पुतणे, मामा-भाचे आदी नाते कुठलेही असो; या नात्यांमधील सन्मान राखला गेला, परस्परांची आपुलकीने काळजी वाहिली गेली तर नात्यांमधली नाजुकता, त्यातील माधुर्य तर टिकून राहीलच शिवाय कोणत्याही संकटांवर मात करीत पुढे जाता येईल. आयुष्यातला, जगण्यातला आनंद-संपन्नता अनुभवायची तर त्यासाठीची सुरुवात अशी घरापासून वा आपल्या कुटुंबापासूनच करता येणारी आहे; पण आजच्या धकाधकीच्या धबडग्यात ते सोडून इतर भौतिक बाबीतच प्रत्येकजण सुख-समाधान शोधायला निघालेला दिसतो आहे. समाजात जागल्याची व मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे संत-महात्मे, कीर्तनकार-प्रवचनकार, प्रेरक वक्ते नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्याचाच तर उपदेश करीत असतात. अगदी गुजरातच्या अहमदाबादेतील विकी पारीख हा तरुण ‘रिस्तो की डोर’ या सांस्कृतिक कार्यक्रमामधून नात्यांतील नजाकतीला उलगडतांना दिसतो, तसे महाराष्टतील चारुदत्त आफळे, सिंधूताई सपकाळ, संजय मालपाणी, डॉ.आनंद नाडकर्णी, अशोक बागवे, प्रवीण दवणे, सलिल कुलकर्णी व संदीप खरे, गुरु ठाकूर आदीही परिवारिक संबंधातील उसवत चाललेली वीण जपण्याचेच निरूपण व मार्गदर्शन करीत असतात. ब्रह्माकुमारी शिवानीदीदी याही अशाच ‘रिस्तो की मधुरता’सारख्या विषयावर समाजमन जागृत करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. तेव्हा, व्यक्ती-व्यक्तीमधील विश्वास व आपुलकीच्या नात्याचा धागा मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होणे हाच वाढता कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठीचा रामबाण उपाय ठरेल हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. 

https://www.lokmat.com/editorial/trust-relationship-why-it-important-and-how-build-it/

No comments:

Post a Comment