Thursday, December 31, 2020

#EditorsView published in Lokmat Online on 31 Dec, 2020

कोरोनापासून रक्षणासाठी राजभर यांचा घोटभर उपाय! / किरण अग्रवाल : काखेला कळसा असताना गावाला वळसा मारण्याची आपली रीतच पुरानी आहे, त्यामुळे आपल्या आसपास जे आहे ते सोडून आपण भलतीकडेच धुंडाळत बसतो. आजार आपदेच्या स्थितीतही साधे सोपे उपाय करण्याचे सोडून आपण दुसरीकडे नजरा लावून बसतो. कोरोनावरील उपायाबाबतही तोच अनुभव येत असल्यामुळेच भीम राजभर यांच्यासारख्या तज्ज्ञांना पुढे येऊन हे सांगावे लागले, की काही चिंता करू नका; ताडी प्या आणि कोरोनापासून सुरक्षित राहा! म्हणजे बघा इतका सोपा उपाय; परंतु आपण उगाच वेगवेगळ्या लसींकडे डोळे लावून बसलो आहोत आणि संशोधनावर वेळ घालवत आहोत. याला आपल्याकडे घरातल्या आपल्या माणसाबद्दलची गुणग्राहकताच नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?
उत्तर प्रदेशात आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते. ताडीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असाही दावा त्यांनी केला आहे. तेव्हा त्यांचा हा सल्ला व दावा पाहता आपण उगाच आठ-नऊ महिने कोरोनावर उपाय शोधण्याच्या भानगडीत वेळ घालवला म्हणायचे. ते रेमडीसीवर की काय म्हणतात ते इंजेक्शन घेण्यापेक्षा आपली ताडी घेतलेली केव्हाही छानच. शासनही उगाच भलती सलती औषधी रुग्णालयांना पुरवत बसले व त्यावर कोट्यवधीचा खर्च केला, त्याऐवजी ताडीचे ग्लास सर्व ठिकाणी भरून दिले असते तर किती बरे झाले असते! औषधी गुणधर्माच्या झिंकचा डोस घेण्यापेक्षा झिंग आणणारी ताडी कोरोनाग्रस्तही चवीने चाखतील की! कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या संभावनेतून जागोजागी जे मोठमोठे कोरोना केअर सेंटर उभारून ठेवले गेले आहेत व अधिकतर ठिकाणी ते रिकामेच राहिल्याचेही आढळून येते, तेथे या ताडीचे उपाय योजले गेल्यास तेही भरभरून वाहतील ! पण साध्या सोप्या उपायांवर आमचा विश्वासच नसतो.
राजभर म्हणतात त्याप्रमाणे ताडीमुळे कोरोनापासून रक्षण तर होईलच; पण एकूणच जी भीती समाजामध्ये पसरली आहे ती भीती दूर होऊन उलट रुग्ण आनंदाने चालत कोरोना केअर सेंटरमध्ये येतील, शिवाय राज्याराज्यातील पर्यावरण विभागांना ताडाच्या लागवडीची मोहीम राबवता येईल, म्हणजे औषधी इलाजाला तर ताडी कामास येईलच शिवाय पर्यावरण रक्षणालाही हातभार लागून जाईल. मात्र आपल्याकडे राजभर यांच्यासारख्या अभ्यासकांबद्दलची गुणग्राहकता नाही हेच खरे. ती त्यांच्यात बहन मायावती यांनी हेरली म्हणूनच की काय, या भीम राजभर यांना बहुजन समाज पक्षाच्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानंतर बलिया येथील सत्कार समारंभातच त्यांनी हा उपाय सुचविला. बरे, इतका सोपा उपाय सुचवणारे राजभर हे उत्तर प्रदेशातील आहेत म्हणून आपण नाराज होण्याचे अगर ईर्ष्या करण्याचे कारण नाही, आपल्या नागपुरातच त्यांचे शिक्षण झाले आहे, हे आपल्यासाठी अभिमानाचेच म्हणता यावे. ............ बरे, ताडी ही फक्त कोरोनापासून रक्षणच करते असे नाही, तर ती गंगाजलपेक्षाही शुद्ध व पवित्र असल्याचेही या राजभर महाशयांनी म्हटले आहे म्हणे. दुर्दैवाने सद्य:स्थितीत उत्तर प्रदेशात बहनजींचे म्हणजे बसपाचे शासन नाही, अन्यथा या प्रदेशाध्यक्षांना तेथील मंदिरांमध्ये भाविकांना गंगाजल देण्याऐवजी ताडी तीर्थ देण्याची शिफारस करता आली असती. यातील शुद्धतेचा मुद्दा एक वेळ ग्राह्यही धरता यावा, कारण ताडाच्या झाडापासून उपलब्ध होणारी ताडी ज्या प्रक्रियेतून बनते ती शुद्धता सिद्ध करणारी असूही शकते; परंतु ही ताडी पवित्रही असेल तर तिला तीर्थाचा दर्जा बहाल करण्याची मागणीही राजभर यांनी करायला हवी. खरेच आपण चंद्र व मंगळावर जाण्याच्या बाता करतो, विज्ञानाचे तसे प्रयत्नही चाललेले दिसून येतात; परंतु राजभर यांनी सुचविलेल्या उपाय व पवित्रतेच्या महत्तेखेरीज ताडीचे इतर गुण लक्षात घेता स्वप्नातच काय, डोळे न मिटताही चंद्र वा मंगळावर जाऊन येणे मुळात अवघड नाहीच. तेव्हा ताडीप्रेमींनी तरी राजभर यांचे समर्थन करायला काय हरकत आहे? राजभर जी आगे बढो... https://www.lokmat.com/editorial/drink-toddy-keep-coronavirus-away-says-bhim-rajbhar-a597/

No comments:

Post a Comment