Thursday, July 29, 2021

EditorsView published in Online Lokmat on July 29, 2021

नुकसानग्रस्तांचे दुःख अपार... किरण अग्रवाल / शरीरावरील जखमा भरून निघत असतात, मात्र मनावर झालेल्या आघाताची वेदना कायम अस्वस्थ करीत राहते. कोकणच्या किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी व नद्यांना आलेला महापूर असाच अनेकांसाठी वेदनादायी ठरला आहे. होत्याचे नव्हते करून गेलेल्या या अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांच्या मनावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या केवळ मदतीच्या पॅकेजेसने भरून निघणाऱ्या नाहीत. या पॅकेजेसने संबंधितांचे दुःख काहीसे हलके जरूर होईल, परंतु या आघाताचे व्रण दूर करायचे तर त्यासाठी शासनाला व समाजधुरीणांनाही एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. असे प्रयत्न केवळ प्रासंगिक पातळीवर अश्रू पुसण्यापूरते व दिलाशाच्या दोन शब्दांचेच राहता उपयोगाचे नाही, तर भविष्यकाळात अशा संकटांपासून बचावण्यासाठीच्या उपयात्मक योजनांबाबतही ते होणे गरजेचे आहे.
कोरोनाचे संकट अजून पूर्णतः संपलेले नाहीच, पण त्याच्या दुसऱ्या लाटेतून काहीसे बाहेर पडू पाहत असतानाच निसर्गाच्या फटक्याने नवीन संकटाला सामोरे जाण्याची वेळ आणून ठेवली आहे. गेल्या काही दिवसात कोकणसह कोल्हापूर, सांगली, सातारा व राज्याच्या अन्यही काही परिसरात जो धुवाधार पाऊस झाला त्याने अनेकांची स्वप्ने धुऊन काढली आहेत. चिपळूणमधील हाहाकार असो, की पाण्यात वेढलेले कोल्हापूर; येथील भयकारी चित्रे मनाचा थरकाप उडवणारी आहेत. परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, नांदेड, पुणे आदी ठिकाणीही नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. ग्रामीण भागात नदीकाठावरील शेती खरडली गेली असून नुकतीच झालेली खरिपाची पेरणी वाहुन गेली आहे. पूर पाणी आता ओसरते आहे, पण डोळ्यातले अश्रू ओसरणारे नाहीत. घरादारात, दुकानात चिखल साचला आहे; तर अनेकांची चूल अजूनही पेटू शकलेली नाही. त्यातून जी खिन्नता, विषण्णता आली आहे ती आर्थिक नुकसानीपेक्षाही मानसिकदृष्ट्या मोठी परिणामकारक आहे. त्याच्या म्हणून ज्या जखमा आपदग्रस्तांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत त्या भरून येणे कठीणच आहे. ------------- अशा संकटसमयी कोलमडून पडलेल्या नागरिकांना तातडीने दिलासा देणे व सरकार तुमच्या पाठीशी आहे हे दाखवून देणे गरजेचे असते, त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी आपदग्रस्त भागाचे दौरे केले व नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली हे समाधानाचेच म्हणायला हवे. राज्यपाल महोदयांनी तर चिपळूणमधील पूरग्रस्तांना दिलासा देताना 'देश तुमच्या पाठीशी आहे' अशा शब्दात धीर दिला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यासाठी शासकीय यंत्रणा कामालाही लागली आहे. आपत्तीचे राजकारण न करता सर्वांनी मिळून नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला त्यांचे काम करू द्या, पूरग्रस्त पाहणीचे टुरिझम करू नका असा सल्ला देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदतीची घोषणाही केली. भाजपानेही आपल्या आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युथ फॉर डेमोक्रॅसी सारख्या संस्थाही मदतीसाठी पुढे आल्या आहेत. जागोजागची स्थानिक सामाजिक मंडळेही त्याकरिता सरसावली असून मदतीचा हा हात नक्कीच दिलासादायक ठरला आहे.
महत्वाचे म्हणजे, सरकारी पॅकेजेसमधून मिळणाऱ्या पै- पैशाची, अन्नधान्याची मदत ही ओढवलेल्या दुःखावर तात्कालिक फुंकर घालणारी असली तरी मनावर झालेले आघात दूर करण्यासाठी मानसशास्त्राच्या अंगाने विचार व उपाययोजना होणे गरजेचे आहे. संकटातून ओढवलेली अनेकांची विवशता पाहता अर्थकारणाबरोबरच समाजकारणाचे पदर यात महत्त्वाचे ठरावेत. फक्त मदतीचे सोपस्कार करूनही चालणार नाही, आता पुर पाणी ओसरून गेल्यानंतर तेथे भेडसावू शकणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता त्याहीदृष्टीने उपाय योजना केल्या जाणे गरजेचे आहे. दुःख अपार आहे, तसे समस्याही अगणित असतील; त्याचे निराकरण केवळ मंत्रालयात बसून होणार नाही तर त्या त्या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमून घोषित केलेली मदत शेवटच्या घटकापर्यंत नीट पोहोचते आहे की नाही याचे व केल्या जाणाऱ्या उपाय योजनांचे पर्यवेक्षण करावे लागेल. पिक विमा योजनेसारख्या बाबी अधिक लाभदायी कशा ठरतील याकडे लक्ष पुरवावे लागेल, तसेच प्रतिवर्षी पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता नद्या-नाल्यांना शहर परिसरात संरक्षक भिंत बांधण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविल्याचे पाहता भविष्यकाळात अशा संकटापासून बचावण्यासाठीच्या उपायांकडेही लक्ष द्यावे लागेल. एकूणच संकटसमयी पक्षभेद विसरून धावून जाण्याचा आजवरचा जो इतिहास आहे तो कायम करण्याची ही वेळ आहे इतकेच यानिमित्ताने.. https://www.lokmat.com/editorial/grief-victims-immense-a310/

Digital sketch by Pranav Satbhai

26 July, 2021
आज जमानाच डिजिटलचा आहे त्यामुळे Digital sketch by Pranav Satbhai नाशिक जिल्ह्याच्या वनसगाव मधील प्रणव सातभाई या युवा कलाकाराने करून पाठविलेले हे डिजिटल स्केच. कोरोना व लॉकडाउनच्या काळात या युवकाने घरात बसल्या बसल्या सुमारे चारशेहून अधिक व्यक्तिरेखांचे पेंटिंग साकारले. संकटाच्या, निराशेच्या मर्यादा कलेच्या आड येत नाहीत, हेच प्रणवनेही दाखवून दिले आहे. आजच्या अस्वस्थ वर्तमानात व पावसाळी काळात प्रणवच्या या स्केचने तेवढीच एक आनंदाची सर येऊन गेली Keep it up Pranav... God bless you Dear #KiranAgrawal #KirananandNashik #DigitalKiran

Sunday, July 25, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on July 25, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210725_6_2
https://www.lokmat.com/manthan/administrative-contribution-natural-calamity-a310/

Saturday, July 24, 2021

Editors view published in Online Lokmat on July 22, 2021

प्रादुर्भाव कमी, पण भीती कायम... किरण अग्रवाल / कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे, पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरतांना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा पाहता जग तिसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे. नेदरलँडसारख्या देशात तर तीनशे टक्के रुग्ण वाढ झाल्याने आपणासही गाफील राहून चालणार नाही. आपल्याकडे अजूनही देशातील 73 जिल्ह्यांमध्ये दररोज शंभराहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत, शिवाय यापैकी बारा राज्यांमधील 47 जिल्ह्यात संसर्ग दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून यात महाराष्ट्राचाही समावेश असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तेव्हा यासंदर्भातील बेफिकिरी परवडणारी नाही हे साऱ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.
कोरोना ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असून, उद्योग व्यवसायही पुन्हा गती घेऊ पहात आहेत. मध्यंतरी सारे थबकल्यामुळे अनेकांना नोकरीस म्हणजे रोजीरोटीस मुकावे लागले होते, परंतु आता पुन्हा मनुष्यबळाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे विविध आस्थापनांमध्ये नोकरभरती सुरू झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण वाढले असून, यात जयपूर आणि अहमदाबादमधील नोकऱ्यांमध्ये 30 आणि 22 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, तर मुंबईत 12 व पुण्यात सहा टक्‍क्‍यांनी नोकऱ्या वाढल्या असल्याचे सांगणारा साईकी मार्केट पोर्टल वेबसाईटचा अहवाल आला आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आदी आयटी कंपन्यांनी यावर्षी एक लाखापेक्षा अधिक फ्रेशर्सना संधी देण्याचे सूतोवाच मागे केले होतेच, आता एल अँड टी कंपनीने देखील तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार असल्याचे म्हटले आहे. बेरोजगारांसाठी ही बाब दिलासादायक असून त्यामुळे उत्पादन वाढ होऊन त्याचा एकूणच चलन वलनावर परिणाम होणे अपेक्षित आहे. ---------------- बाजारातही चैतन्य असून जागोजागच्या बाजारपेठा गजबजल्या आहेत. शेअर मार्केटमध्येही तेजी दिसून येत असून गेल्या सप्ताहात सेंन्सेक्स, निफ्टी आणि स्मॉल्कॅप या निर्देशांकांनी उच्चांकाची नवीन नोंद केली आहे. काही कंपन्यांनी तर अगदी अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे आकडे आहेत. अर्थव्यवस्थेचा अडलेला वा रुतलेला गाडा हळूहळू पूर्वपदावर येत आहे हे शुभवर्तमानच म्हणायला हवे. आपल्या कडेच नव्हे तर जागतिक पातळीवरही अशीच स्थिती आहे. अगदी ज्या चीनमधून कोरोना आला असे म्हटले गेले त्या चीनमध्येही मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या जून महिन्यातील निर्यात 32 टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. परदेशातील स्थावर मालमत्तेच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भारताच्या परकीय चलन गंगाजळी मध्ये 1.88 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. एकूणच स्थिती सुधारते आहे परंतु ही सुरळीत होऊ पाहत असलेली स्थिती कायम राखायची तर खबरदारी घेणे गरजेचे असून तेच दुर्दैवाने होतांना दिसत नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर सणावाराच्या निमित्ताने जशी गर्दी झाली व निर्बंध धुडकावले गेलेत तशीच स्थिती आता दुसरी लाट ओसरताना दिसून यावी, हे चिंताजनकच आहे. विशेषतः यापुढील 125 दिवस हे अतिसंवेदनशील असल्याचे सांगितले जात असताना निष्काळजीपणा दिसतो आहे, हे अधिक दुर्देवी म्हणावयास हवे. ------------------ आपल्याकडे लग्नसराई जोरात असून त्यातील उपस्थितीच्या मर्यादा कुणीही पाळताना दिसत नाही. तेथे गर्दी तर होतेच आहे, परंतु मास्कचा वापर देखील केला जाताना आढळत नाही. कोरोनापासून बचावण्याचा लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे, पण याबाबतही गांभीर्य नाही. कुठे लस घेणारे उत्सुक आहेत तर यंत्रणा अपुऱ्या पडताना दिसत आहेत व कुठे यंत्रणा तयार असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाणही तुलनेने कमीच आहे. कशाला, हेल्थ केअर व फ्रंट लाईन वर्कर्सचेही 50 ते 60 टक्केच लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने दररोज एक कोटी डोस देण्याचे लक्ष ठेवले आहे, पण ते सरासरी 40 ते 50 टक्के इतकेच गाठले जात आहे; किंबहुना जुलै महिन्यात त्याचीही गती मंदावल्याचे आढळून आले आहे. राज्यातील कोरोनामुक्त जिल्ह्यात आठवी ते दहावीच्या शाळा उघडत आहेत, मात्र शिक्षकांचेही लसीकरण पूर्ण झालेले नाही. अशा स्थितीत तिसरी लाट रोखणे अवघडच ठरेल. तेव्हा आज प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी भविष्यातील तिसऱ्या लाटेचा धोका कमी झालेला नाही हे लक्षात घेऊन लसीकरणाचा वेग वाढविणे व कोरोना टाळण्यासाठी म्हणून लावल्या गेलेल्या निर्बंधांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे बनले आहे. दुसरी लाट ओसरतेय म्हणून सुटकेचा श्‍वास सोडत सारेजण निर्धास्त होणार असतील तर संकट लवकर ओढवलेल्याखेरीज राहणार नाही इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/spacial-editorial-coronavirus-less-risk-cant-take-easily-a720/

Monday, July 19, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on July 18, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210718_8_1
https://www.lokmat.com/manthan/dont-be-afraid-dont-be-confused-activist-a310/

Friday, July 16, 2021

दगडी भिंतीतही माणुसकीचा गहिवर ...

13 July 2021 दगडी भिंतीतही माणुसकीचा गहिवर ...
आज कारागृहात जाण्याचा योग आला, अर्थात गैरसमज नसावा; आरोपी अगर बंदिवान म्हणून नव्हे तर रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तेथे गेलो. लोकमतच्या वतीने संपूर्ण राज्यातच रक्तदान शिबिरे होत आहेत. अकोल्यातही विविध पक्ष व संस्थांतर्फे शिबिरे होत आहेत, यात आज कारागृह प्रशासनाच्या पुढाकाराने कारागृहात शिबिर घेण्यात आले म्हणून तेथे जाणे झाले. एरव्ही जाडजूड दगडी भिंतींची कारागृहे निष्ठुरतेसाठी ख्यात असतात, पण त्यातील अधिकारी - कर्मचाऱ्यांतही माणुसकीचा गहिवर असल्याचे यानिमित्ताने बघावयास मिळाले. अधीक्षक सुभाष निर्मल व तुरुंगाचे वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र आर्य यांच्या प्रोत्साहनाने येथील कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला.
गुजरात अंबुजा एक्सपोर्टस लिमिटेड या खाजगी कंपनीनेही सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेतले व तेथील ऑपरेशनचे प्रेसिडेंट ब्रिजमोहन चितलांगे यांनी स्वतःही रक्तदान केले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, रेडक्रॉसचे प्रभुजितसिंग बच्छेर, डॉ. एन के माहेश्वरी आदी याप्रसंगी उपस्थित होते. LOKMAT initiative ... #लोकमत_रक्ताचं_नातं #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

Editors View published in Online Lokmat on July 15,2021

निषेध नको, जीवनशैली म्हणून सायकलिंग हवी। किरण अग्रवाल / राजकीय आंदोलनांकडे लक्ष वेधले जावे म्हणून त्यात अभिनवता आणली जाते, परंतु काही आंदोलनांमधील अभीनवता केवळ प्रदर्शनी न राहू देता जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारली तर संबंधित समस्यांच्या निराकरणाचे मार्ग त्यातूनही प्रशस्त होऊ शकतात. दुर्दैवाने दिखाऊपणाच्या नादात व प्रसिद्धीच्या सोसात गरजेच्या बाबींचा अंगीकारही राहूनच जातो आणि मग असेच मुद्दे चर्चेत येऊन गेल्याखेरीज राहात नाही. इंधन दरवाढीच्या मुद्यावरून काँग्रेसने विविध ठिकाणी काढलेल्या सायकल मोर्चाकडेही याचदृष्टीने बघता यावे.
इंधनाचे दर दिवसागणिक वाढत असून सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध पक्षांतर्फे आंदोलने केली जात आहेत, यात काँग्रेसतर्फे राज्यात जागोजागी सायकल रॅली काढण्यात आली. पेट्रोल डिझेलचे दर इतके वाढले आहेत की सामान्यांना ते परवडेनासे झाले असून, आता सायकल वापरण्याची वेळ आली आहे असे यातून सुचवायचे होते. सायकलच्या वापरामागील सदर कारण हे नाईलाजातून ओढवलेले व निषेधाच्या प्रदर्शनाचे आहे हे खरे, परंतु तसे जरी असले तरी आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगला व्यायाम म्हणवणारी सायकलिंग या निमित्ताने का होईना केली जाणार असेल तर ते लाभदायकच म्हणायला हवे. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या काही शहरांमध्ये सायकल वापरा बाबतची चळवळ मोठ्या प्रमाणात जोर धरताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात डॉक्टर्सचाही सहभाग आढळून येतो त्यामुळे समान्यांचाही त्यास प्रतिसाद वाढला आहे, तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढले म्हणून सायकलचा वापर केला जाणार असेल तर ते अंतिमतः संबंधितांच्या हिताचेच ठरणार आहे. शिवाय आंदोलनाच्या निमित्ताने का होईना, चार चाकी वाहनाची व मोटार सायकलची सवय जडलेल्या राजकीय नेत्या कार्यकर्त्यांना सायकल चालवून बालपणात हरवायची संधी मिळाली, हेही नसे थोडके. आंदोलनातील प्रदर्शनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहता येऊ शकते हेच यातून लक्षात यावे. ------------ पेट्रोल-डिझेलप्रमाणेच स्वयंपाकाचा गॅसही महागल्याने काही ठिकाणी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक केला गेला व या दरवाढीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. पारंपरिक निषेध मोर्चे न काढता अगर धरणे न धरता केल्या जात असलेल्या या आंदोलनात वेगळेपण आहे हे खरे, पण आंदोलनाचा विषय बाजूस सारून अलीकडच्या काळात हद्दपार होत असलेल्या चुलीवरील स्वयंपाकाचा विचार केल्यास त्यातील लज्जतदार चवीचा आनंद स्मरून गेल्याखेरीज राहात नाही. आधुनिकतेच्या ओघाने म्हणा, की कालमानानुरूप बदलत्या जीवनशैली प्रमाणे; आज अधिकतर घरात गॅस शेगडीवरील स्वयंपाक होऊ लागला आहे. परंतु चूलीच्या राखेत शेकलेल्या भाकरीची सर गॅसवरच्या भाकरीत कशी येणार? तेव्हा अशा आंदोलनकर्त्यांनी अपवाद म्हणून का होईना कधीतरी चुलीवर स्वयंपाक करून आपल्या इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेणाऱ्या नातवांना त्यावरील स्वयंपाकाची चव काय असते हे चाखायची संधी द्यायला काय हरकत असावी? दुसरे म्हणजे, आता पावसाळा सुरू झाला आहे. जागोजागी रस्त्यात खड्डे पडतील व त्यात पावसाचे पाणी साचून अपघात घडतील, असे घडू लागताच परंपरेप्रमाणे रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करायचे आंदोलन हाती घेतले जाईल; हरकत नाही. यातही समस्येकडे लक्ष वेधण्याची अभिनवता निश्चित आहे, परंतु याच मंडळीने याच पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून त्यातही वृक्षारोपण केले तर पर्यावरणाला मोठा हातभार लागू शकेल; पण ते कुणी करत नाही. ------------- अभिनवतेचे सोडा, परंतु कधी कधी काही आंदोलनांची व ते करणाऱ्या आंदोलकांची गंमतही वाटून जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास बऱ्याचदा अमुक एखादी गोष्ट होत नाही म्हटल्यावर त्याचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन केले जाते. काही बाबतीत तर चक्क मुंडनही केले जाते. गंमत किंवा आश्चर्य याचे, की अशा आंदोलन करणाऱ्यांपैकी काहींनी स्वतःच्या कुटुंबातील पितरांचे श्राद्ध कधी घातलेले नसते किंवा आप्तेष्टाच्या वियोगात मुंडन केलेले नसते. अशी मंडळी जेव्हा राजकीय आंदोलनात हिरीरीने पुढे होतात तेव्हा मूळ विषयाखेरीजच्या चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात, आंदोलनासाठी आंदोलन किंवा प्रदर्शन करणे वेगळे आणि स्वतःच्या जीवनात त्याबद्दलचे वेगळेपण अंगीकारणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. उक्ती व कृतीमधील फरक जसा असतो तसे याकडे बघता यावे, एवढेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/dont-protest-cycling-should-be-accept-part-lifestyle-a653/

Monday, July 12, 2021

#लोकमत_रक्ताचं_नातं ...

July 12, 2021 #लोकमत_रक्ताचं_नातं ...
आजही दोन ठिकाणच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन विविध मान्यवरांशी संवाद साधता आला. संत गाडगेबाबा सेवा समिती अकोलातर्फे इन्कम टॅक्स चौकात झालेल्या रक्तदान शिबिरात अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधु जाधव, साहित्य संस्कृती मंडळाचे पुष्पराज गावंडे, चाईल्ड लाईनचे सुगत वाघमारे, वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख गजानन शेळके, सेवा समितीचे संयोजक निशिकांत बडगे, जागर फाउंडेशनचे कवी तुळशीदास खिरोडकर, अजय गावंडे, पत्रकार राजू चिमनकर आदीं मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक दायित्वाच्या पूर्तीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनुभवला.
जय बाभळेश्वर प्रतिष्ठान व शिवसेना शहर प्रमुख श्री राजेश मिश्रा यांच्या सहकार्यानेही रेणुका नगरात रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी नगरसेविका सौ वैशाली शेळके , मंजुषा शेळके, सतीश ढगे, गजानन चव्हाण, माजी सभापती विलास शेळके, पत्रकार आशिष गावंडे आदी उपस्थित होते. यूवा शक्तीमधील चैतन्याचा उत्सवच जणू या शिबिरात साजरा झाला. Thanks to all.. LOKMAT initiative #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat #JaiBabhaleshwar #SantGadgebaba

Sunday, July 11, 2021

#लोकमत_रक्ताचं_नातं ...

July 11, 2021 #लोकमत_रक्ताचं_नातं ...
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत आयोजित रक्तदान मोहिमेसाठी अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातूनही रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज अकोला कामगार आयुक्त कार्यालय व विविध कामगार संघटना तसेच युवक काँग्रेसच्यावतीने स्वराज भवन येथे रक्तदान शिबिर पार पडले. त्यात महिला भगिनींनीही हिरीरीने सहभाग घेतला. स्वतः सहाय्यक कामगार आयुक्त श्री आर. डी. गुल्हाने यांनीही रक्तदान केले.
श्री गुल्हाने यांच्यासोबतच अकोला एमआयडीसीचे श्री नितीन बियाणी, श्रमिक महीला मोलकरिण संघटनेच्या सौ कल्पना सूर्यवंशी, असंघटित कामगार संघटनेच्या सौ मनीषा चक्रनारायण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, राज्य प्रवक्ता कपिल ढोके, सागर कावरे, अंशुमन गायकवाड, इंटक अध्यक्ष प्रदीप वखारीया आदींनी परिश्रम घेतले.
Thanks to all.. LOKMAT initiative #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

Saraunsh published in Akola Lokmat on July 11, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210711_6_1
https://www.lokmat.com/manthan/fight-peoples-issues-rather-political-movements-a310/

Thursday, July 8, 2021

Editors View published in Online Lokmat on July 08, 2021

शिक्षणाच्या आभासाचा भास पुरे। किरण अग्रवाल / वस्तुस्थितीशी फारकत घेऊन आभासी व्यवस्थांमागे आपण असे काही धावतो व त्याची मनाला इतकी भुरळ पडते की, त्यातून ओढवणाऱ्या नुकसानीचे भानच राहात नाही. ऑनलाइन, आभासी शिक्षणाच्या बाबतीतही तसेच काहीसे होतांना दिसत आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था व आरोग्य व्यवस्था तर ध्वस्त झालीच, शिवाय शिक्षण व्यवस्थेचाही बोजवाराच उडाला. याकाळात विशेषतः प्राथमिक व माध्यमिक पातळीवर ऑनलाइन शिक्षण दिले गेल्याच्या व संकटावर मात करीत ज्ञानदानाचे काम अव्याहत सुरू असल्याच्या ज्या बाता केल्या जात आहेत त्या किती पोकळ वा फसव्या आहेत; तसेच त्यातून कशा नुकसानीस सामोरे जावे लागत आहे ते आता पुढे येऊ लागल्याने यातून गेलेल्यांचे पुढे कसे व्हायचे हा प्रश्न भेडसावणे स्वाभाविक ठरले आहे.
कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद केल्या गेल्या. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरत असल्याचे पाहता मर्यादित संख्येत का असेना सरकारी कार्यालये सुरू झाली आहेत, व्यावसायिक आस्थापनांनाही वेळेच्या मर्यादेत परवानगी आहे; हॉटेल्स व पर्यटन सुरू झाले आहे पण शाळा अजूनही बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग उपलब्ध होऊ शकलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे नुकसान होत असून सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आक्रमकपणे काम करायला हवे असे मत 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अलीकडेच व्यक्त केले; मात्र अजूनही त्याबाबत संभ्रमाचीच स्थिती दिसते. कोरोनामुक्त परिसरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु काही घटकांकडून त्यास विरोध होत आहे. कोरोना संसर्गाच्या भीती बरोबरच ऑनलाइन शिक्षण व्यवस्थित सुरु असल्याचे दाखले याबाबत दिले जातात, मात्र याबाबतची यथार्थता आता एका अहवालाद्वारे पुढे येऊन गेल्याने शिक्षणातील आभासीपणाबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे होऊन गेले आहे. --------------- कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी सुमारे 71 हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याचे यु-डायस प्लसच्या अहवालातून समोर आले आहे. देशात 15 लाख शाळा आहेत त्यापैकी फक्त सुमारे साडेतीन लाख शाळांमध्येच इंटरनेट सुविधा असल्याची आकडेवारी खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. सदरची आकडेवारी पाहता ऑनलाईन शिक्षणाच्या बाता किती पोकळ आहेत हेच स्पष्ट व्हावे. राज्यातील सुमारे 32 हजार शाळांमध्ये साधा संगणकही नाही त्यामुळे संगणक व इंटरनेट नसलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण कसे सुरु असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. ज्या विद्यार्थी अगर पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांच्याकडे फक्त अभ्यासक्रम फॉरवर्ड केले जातात, बाकी ऑनलाईन शंकासमाधानाचा विचारच करता येऊ नये.
महत्वाचे म्हणजे रोजीरोटीसाठी झगडा कराव्या लागणाऱ्या वर्गाकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांच्या मुलांचे काय? मोबाईल जरी असले तरी ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी इंटरनेट रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आदिवासी भागात मुले डोंगरावर जाऊन तर काही ठिकाणी झाडावर चढून रेंज मिळवत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. म्हणजे 'दात आहेत तर चणे नाही' अशी ही स्थिती आहे. खाजगी शाळा व तेथे दाखल असणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बरी असल्याने तेथे ऑनलाइन शिक्षण काहीसे होत आहे असे म्हणता यावे, परंतु महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची स्थिती समाधानकारक म्हणता येऊ नये. तेव्हा केवळ आभासाचा भास मिरवून जे सुरू आहे ते थांबवावे लागणार असून बाकी सारे जनजीवन सुरळीत होत असताना शाळा सुरू करण्याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. शाळा असोत, कि हल्ली सर्वच ठिकाणी वाढलेले खासगी क्लासेस; विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत व डिस्टन्सिंगच्या काही अटी शर्तींवर शाळा तसेच क्लासेस सुरू करावे लागतील, अन्यथा एका पिढीचा शिक्षणाचा पायाच ठिसूळ राहणे क्रमप्राप्त ठरेल. https://www.lokmat.com/editorial/there-are-15-million-schools-country-out-which-only-about-35-million-schools-have-internet-a642/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop

Sunday, July 4, 2021

Lokmat Blood donation..

July 03, 2021 Lokmat Blood donation..
लोकमतचे संस्थापक, संपादक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीदिनापासून राज्यात रक्तदानाचा महायज्ञ सुरू झाला.. कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आयोजित या रक्तदान मोहिमेच्या प्रारंभी लोकमतमधील सहकाऱ्यांनी स्वतः रक्तदान केले. याप्रसंगीची काही आनंद चित्रे...
LOKMAT initiative #लोकमत_रक्ताचं_नातं #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

LOKMAT initiative ...Blood Donation

July 03, 2021 LOKMAT initiative ...Blood Donation
लोकमतचे संस्थापक, संपादक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीदिनी 2 जुलै पासून संपूर्ण राज्यात रक्तदानाचा महायज्ञ सुरू झाला, त्यास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे... अकोला येथे राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सौ. मीनाक्षी गजभिये, आयएमए चे सचिव डॉ तेजस वाघेला, जीएमसी चे डॉ श्यामकुमार सिरसाम, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ आरती कूलवाल आदी उपस्थित होते.
भीम नगरातील बुद्धविहारात व बार्शी टाकळी येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती आकाशदादा शिरसाट यांच्या पुढाकारातून शिबिर घेण्यात आले, त्यांच्या 400 पेक्षा अधिक समर्थकांनी रक्तदान केले तर अकोल्यातील 11 महाराष्ट्रीयन बटालियन एनसीसी कॅम्पमध्ये कर्नल संजय पांडेय यांच्या पुढाकारातून छात्र सैनिकांसाठीही शिबिर घेण्यात आले तेथे मुलांबरोबरच मुलींनीही हिरीरीने पुढे येत रक्तदान केले. याप्रसंगीची ही काही सहभाग चित्रे ...
#लोकमत_रक्ताचं_नातं #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

Saraunsh published in Akola Lokmat on July 04, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210704_8_2
https://www.lokmat.com/manthan/corona-vaccination-depression-about-vaccination-dangerous-a310/

Friday, July 2, 2021

चला जोपासूया... रक्ताचं नातं

01 Jully, 2021 चला जोपासूया... रक्ताचं नातं
रक्तदान हेच महादान: राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता आज त्याचीच गरज आहे लोकमतचे संस्थापक, संपादक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जयंतीदिनी उद्या 2 जुलै पासून संपूर्ण राज्यात सुरू होणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होऊया... @MiLOKMAT initiative #लोकमत_रक्ताचं_नातं #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat

निवांत क्षण ...

28 June, 2021
अकोला जिल्ह्यातील लोकमतच्या वार्ताहर व वितरक बांधवांची बैठक आटोपल्यानंतर हॉटेल RJ येथे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा यांच्या सोबतचा एक निवांत क्षण ... ( छायाचित्र सौजन्य : श्री. विनय टोले ) #KiranAgrawalLokmat #AkolaLokmat

Editors view published in Online Lokmat on Jully 01, 2021

लसीकरणाचा वेग मंदावता कामा नये ! किरण अग्रवाल / कोरोनापासून बचावासाठी लसीकरणाशिवाय आज घडीला अन्य पर्याय नाही म्हणून वेगाने सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे ही समाधानाचीच बाब आहे; परंतु लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्याची आकडेवारी बघता काही जिल्हे खूपच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व नवीन डेल्टा व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर ही पिछाडी चिंतेचे कारण ठरली तर आश्चर्य वाटू नये.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे मृत्यूदरही कमी झाला आहे. अर्थात ही दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता कायम आहे, त्यातच डेल्टा प्लस व्हेरीयंटचा धोका पाहता राज्यात मुंबईसह 33 जिल्ह्यांचा समावेश स्तर तीनच्या नियमांमध्ये करण्यात आला असून तेथे पुन्हा कठोर निर्बंध लागू करावे लागले आहेत. म्हणजे कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसून उलट नव्या विषाणूमुळे तो वाढला आहे, पण त्याचे तितकेसे गांभीर्य जनतेमध्ये दिसून येत नाही हे दुर्दैव. खबरदारीचा भाग म्हणून निर्बंध घोषित केले गेले असले तरी ते जनतेकडून पूर्णांशाने पाळले जाताना दिसत नाहीत. कोरोना गेला या अविर्भावात बहुसंख्य लोक विना मास्क घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे विना मास्क बाहेर पडणाऱ्यांमुळे इस्त्रायल, जर्मनी व ऑस्ट्रेलिया या तीन देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या 70 टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी अलीकडेच समोर आली आहे, तरी जनता सुधारायचे नाव घेत नाही. खरी चिंता आहे ती त्यामुळेच. ---------------- लसीकरणात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार व तामिळनाडूचा नंबर लागतो. आपल्याकडे महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे सव्वातीन कोटी लोकांना लस देण्यात आली असून त्यात 60 लाखांहून अधिक लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरण हाच उपाय असल्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, राज्यात दररोज पंधरा लाख लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. अर्थात लसीकरणात वाढ होत असली तरी यंत्रणांमधील गोंधळ कायम आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी उसळून फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमाची पायमल्ली घडून येत आहे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी गर्दीमुळे धक्काबुक्की व चेंगराचेंगरी झालेली पाहावयास मिळाली. तेव्हा व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव दूर केला जाणे गरजेचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे यात खूपच हाल होत असून पोलिओ लसीप्रमाणे घरोघरी जाऊन ज्येष्ठांचे लसीकरण करता येईल का याचा विचार होणे अपेक्षित आहे. ---------------- महत्त्वाचे म्हणजे राज्यातील एकूण लसीकरणाची आकडेवारी व टक्केवारी समाधानकारक वाटत असली तरी जिल्हास्तरीय आकडेवारी पाहता काही जिल्हे खूपच पिछाडलेले दिसतात. विदर्भातील अकोला जिल्ह्याचे उदाहरण घ्या, तेथे पहिल्या डोसचे लसीकरण अवघे 21 टक्के झाले असून दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी अवघी 0.6 टक्के इतकीच असल्याचे समोर आले आहे. ही टक्केवारी समाधानकारक नसून, येऊ घातलेला धोका थोपविण्यासाठी पुरेशी नाही. तेव्हा लसीच्या पुरवठ्यात अडचण आहे, की नागरिकांच्या पुढाकारात हे यासंदर्भात बघायला हवे. जागोजागी लसीकरण केंद्रांवर लागणाऱ्या रांगा बघता नियोजनातच गडबड दिसते. आता कोरोना ओसरत असल्याने काही नागरिकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे हेदेखील खरे, तेव्हा कारण काही का असेना पण या मोहिमेतील गती मंदावता कामा नये. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता लवकरात लवकर अधिकाधिक लोकांना दुसरा डोस दिला जाणे गरजेचे आहे, त्यासाठी स्थानिक यंत्रणांकडून नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. https://www.lokmat.com/editorial/corona-vaccination-should-not-be-slowed-down-a607/