Thursday, October 21, 2021

EditorsView published in Online Lokmat on Oct 21, 2021

अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा। किरण अग्रवाल / परतीच्या पावसाने केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र दाणादाण उडवून मोठे नुकसान घडविले. या पावसाने होत्याचे नव्हते करून ठेवले. नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुढे जाण्याखेरीज पर्याय नसतो हे खरेच, पण नेहमीच्या होऊन गेलेल्या या संकटात मदतीला धावून जाण्याच्या सरकारच्याही मर्यादा लक्षात घेता, वेळी-अवेळी होणारा पाऊस व अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे खात्रीशीर संकेत नव्हे, तर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या यंत्रणांच्या सक्षमपणे उपयोगीतेचा यासंबंधाने विचार होणे अपेक्षित आहे.
कोरोनाच्या संकटात अगोदरच झालेल्या नुकसानीमुळे समाज जीवनावर निराशेचे मळभ दाटलेले असताना पावसाच्या फटक्याने त्यात भर घालून ठेवली आहे. यंदा तसा मान्सून चांगला झाल्याने पिके जोमात होती, त्यामुळे यंदाचा दसरा दिवाळी चांगली जाईल असा अंदाज होता. सुदैवाने येईन येईन म्हणून भीती बाळगली गेलेली कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात आतापर्यंत तरी यश आलेले दिसत आहे, त्यामुळेही जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातही चैतन्याचे वातावरण आहे. अशात शेत पिकेही तरारून आल्याने बळीराजा काहीसा सुखावलेला होता, परंतु निसर्गाला ते मान्य नसावे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात आलेल्या परतीच्या पावसाने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचलसह अनेक राज्यात दाणादाण उडविली. दक्षिणेत केरळमध्ये तर हाहाकार उडाला असून काही जणांचे बळीही गेले आहेत. महाराष्ट्रातही विशेषता विदर्भ, मराठवाड्याला मोठा फटका बसून गेला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, धान व मक्यासह वेचणीला आलेला कापूस या परतीच्या पावसात जमीनदोस्त झाला. इतरही पिकांची हानी झाली, त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरारले. ऐन सणावाराच्या तोंडावर हे संकट ओढवल्याने, एकातून सुटले आणि दुसऱ्यात अडकले; अशी अवस्था साऱ्यांची झाली आहे. --------------- नैसर्गिक आपत्तीला इलाज नसतो, त्यामुळे बळीराजावर ओढवलेल्या या संकटातून त्यास काहीसा आधार किंवा दिलासा देण्यासाठी सरकारही आपल्या पातळीवर जमेल ते प्रयत्न करीत आहेच; मात्र ते पुरेसे ठरू शकत नाहीत. तेव्हा रोगावर इलाज करण्यापेक्षा रोगापासूनच दूर कसे राहता येईल या अंगाने यासंदर्भात विचार होणे गरजेचे ठरले आहे. पाणी पावसाचा अंदाज वर्तवणा-या वेधशाळा व हवामान खाते आपल्याकडे आहे, त्यांचे अंदाज कधी खरे तर कधी खोटेही ठरतात; परंतु आहेत त्या यंत्रणांचा सक्षमपणे उपयोग होताना दिसत नाही. विशेषतः वातावरणातील बदलामुळे मान्सून पॅटर्न वेगाने बदलतो आहे. तासाभरात एक, एक हजार मिलिमीटर पाऊस पडू लागला आहे. 2010 पासून ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. अगदी चेरापुंजीचे रेकॉर्ड तोडणारा पाऊस अलीकडे महाराष्ट्रात होऊ लागला आहे, तेव्हा या संदर्भातील आधुनिक व अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अंदाज नव्हे, तर सुस्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था होणे अपरिहार्य बनले आहे. --------------- महत्वाचे म्हणजे, राज्याला किंवा देशालाच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाला ढगफुटीची आगाऊ माहिती देण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने भारताची नोडल एजन्सी म्हणून निवड केलेली आहे, याकरिता कोट्यवधीचा निधीही उपलब्ध करून दिला जात असतो, तेव्हा 'एक्स बँड डॉप्लर रडार' व सुपर कम्प्युटर (HPC) सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध असल्याने त्या यंत्रणेचा वापर करून 'क्लाऊड बस्ट' व 'फ्लॅश फ्लड'ची माहिती मिळवणे व ती स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन संभाव्य नुकसान टाळणे अवघड नाही. दुसरे म्हणजे, मान्सून पॅटर्न बदलत असल्याचे पाहता पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन 'क्राफ्ट पॅटर्न' बदलाचा विचार करणेही आवश्यक आहे, परंतु याहीसंदर्भात पुरेसे जनजागरण होतांना दिसत नाही. कृषी विद्यापीठांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, परंतु ती शिक्षण, संशोधन व विश्लेषणातच अधिकतर व्यस्त असतात. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत व पद्धतीने निसर्गात होत असलेले बदल व त्याप्रमाणे शेतीत करावयाचे बदल समजावून सांगणे गरजेचे झाले आहे. रासायनिक खतांच्या अतीवापराने जमिनीच्या नापिकीसारख्या समस्या ओढवत आहेत. याहीदृष्टीने बदल केला गेला तर होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. https://www.lokmat.com/editorial/accurate-observation-excess-rainfall-required-a310/

No comments:

Post a Comment