Saturday, December 21, 2013

Raverayan - 4



यात्रा / जत्रा व रथोत्सवासारखे ग्रामोत्सव प्रत्येकाच्याच आस्थेचे व श्रद्धेचे भाग असतात. गावाच्या धार्मिक तसेच सांस्कृतिक संचिताचे ते दृष्य स्वरूप तर असतेच पण सर्व धार्मिक समूहांच्या एकात्म आनंदभावाचे ते एक आनंदनिधानही असते. रावेरच्या श्री दत्त जन्मोत्सव व त्यानिमित्तच्या रथोत्सवाचेही तसेच आहे आणि आमच्यादृष्टीने त्याचे महत्व यासाठीही आहे की, या ग्रामोत्सवाचे कारक असलेल्या पुरातन श्री दत्त मंदिर संस्थानाच्या पायाभरणीपासून आमच्या   पिढ्या न पिढ्यांचा त्याच्याशी संबंध राहिला आहे.
 
१७ / १८ व्या शतकात श्री सदगुरू सच्चिदानंद स्वामी नामक एक थोर संत होऊन गेले. ते मुळचे माहूरचे. एकनाथपंथीय संत श्री हरिदासजी (नांदेड) यांचा अनुग्रह त्यांना लाभला. त्यांच्या आज्ञेनेच स्वामींनी तीनदा नर्मदा परिक्रमा केल्या. त्या करताना नर्मदा माईने त्यांना दर्शन दिल्याचेही सांगितले जाते. स्वामींनी श्री माहूर क्षेत्री बारा वर्षे अनुष्ठान केले. दत्तगुरूंनी संत रामदास स्वामी व संत एकनाथांना दिले होते तसे मलंग दर्शन या आराधनेदरम्यान स्वामींना दिले. प्रसाद म्हणून छडीही दिली. भारत भ्रमण करत ते खंडवा (म. प्र.) मार्गे बऱ्हाणपूरला आले असता रावेरचे श्रीमंत सुपूशेठ वाणी, शेषाद्री महाराज नाईक व घनश्यामदास लक्ष्मणदास अग्रवाल आदी तत्कालीन मान्यवर मंडळी त्यांना भेटायला आणि रावेर येथे येण्याच्रे निमंत्रण द्यायला सजविलेल्या  बैल  गाड्यांचा  ताफा घेऊन बऱ्हाणपूरला गेले होते. पण त्यावेळी श्रीमंतीचे लक्षण मानल्या जाणाऱ्या या ताफ्याने यायला त्यांनी नकार दिला.  मंडळी रावेरकडे परतली, आणि पाहतात ते काय तर, स्वामी त्यांच्या अगोदरच रावेरच्या वेशीवरील पाताळगंगेच्या काठी असलेल्या हनुमान मंदिरात अवतरलेले. त्यांच्या आगमनाने रावेरकर कसे आनंदले याचे वर्णन "शृंगारले रावेर, सडे घातले रस्त्यांवर, रांगोळीचे प्रकार, किती म्हणून सांगावे" अशा शब्दात स्वामींच्या लिलामृतात आढळून येते. सर्वांनी त्यांना गावात चालण्याची विनंती केली तर कुणाकडेही जाण्यास नकार देऊन ते गावातील नाल्याकाठी येउन थांबले. अखेर या मंडळीच्या पुढाकाराने तेथेच श्री दत्त मंदिराची  उभारणी केली गेली. १८३० मध्ये श्री दत्त मंदिर संस्थान आकारास आले आणि  तेव्हापासूनच दत्त जन्मोत्सव व रथोत्सवाचा  प्रारंभ झाला. या रथोत्सवासाठी पहिला रथ सेठ घनश्यामदास अग्रवाल यांनीच तयार करून संस्थानला अर्पण केला. भक्त दास गणु महाराजांनी स्वामींवर लिहिलेल्या ओवीबद्ध पोथ्यांमध्ये आणि संस्थानकडील दस्तावेजात हे सारे संदर्भ आढळून येतात.
 
या संदर्भातील शेठ घनश्यामदास हे आमचे खापर पणजोबा. त्यांच्या नंतरची आमची ही पाचवी पिढी. तर संस्थानच्या गादीपतींचीही आता पाचवी पिढी कार्यरत आहे. स्वामी सच्चिदानंद महाराजांनी १८८८ मध्ये वयाच्या १०८ व्या वर्षी संत माधवदास महाराजांकडे रावेरची गादी सोपवून संजीवन समाधी घेतली. माधवदासजी हे मुळचे तांदूळवाडीचे कुलकर्णी. त्यानंतरच्या केशवदास महाराज, भानुदास महाराज, विद्यमान श्रीपाद महाराज व त्यांचे सुपुत्र ऋषिकेश जी, या सर्वांशीच आमचे संबंध राहिले आहेत. पर्यायाने आमचा या संस्थानशी पिढीजात संबंध टिकून आहे. आता  ओढला  जाणारा  रथ तालुक्यातील बेटावदच्या धार्मिक  भक्त  रतन  बाई  यांनी  अर्पण  केला  आहे. १९०६ पासून तो ओढला जातो आहे. तो  मिळाल्यावर घनश्याम शेठ यांनी दिलेला रथ दुसखेडा येथील बालानंद महाराज संस्थानला भेट देण्यात आला, पण पहिल्या रथाचे दाते म्हणून आजही रथ ओढण्यापूर्वी मानकरी म्हणून आमच्या कुटुंबियांचा संस्थान तर्फे सन्मान केला जातो. आनंदाचा भाग म्हणजे नवीन पिढीचे ऋषिकेशजी पारंपारिक संबंध जोपासून संस्थानचे सारथ्य कुशलतेने करीत आहेत. इतिहास व संस्कृती-संस्काराची जाण असलेल्या ऋषिकेश यांना सारा कालक्रम अगदी मुखोदगतही आहे. गादीची परंपरा, वारसा सक्षमपणे चालविण्याची अपेक्षा त्यांच्या कडून नक्कीच पूर्ण होऊ शकेल.
 
गीता जयंतीला ध्वज पूजेने दत्त जयंती उत्सवाचा प्रारंभ होतो. दत्त जन्मोत्सवाच्या महासोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव होतो. रथावर पूजेचा मान स्व. श्रीधर राजगुरू परिवाराकडे आहे. सध्या मुंबईत असलेले डॉ. रामचंद्र राजगुरू, तुषार राजगुरू आदी त्यासाठी आवर्जून येतात व सेवा रुजू करतात. रथाला मोगरी लावण्याचा मान कासार व लोहार समाज बांधवांकडे आहे. आज भूषण कृष्णाजी कासार, कैलास शारंगधर कासार, प्रफुल्ल कासार, अमृतलाल लोहार, जिवन लोहार, विजय लोहार, प्रभाकर सोनू पाटील, मधुकर बारी, निलेश बारी, निलेश पाटील आदी ती जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पाडतात. मोठ्या व अवजड अश्या रथाला नियंत्रणात ठेऊन छोट्या गल्ल्यांमधून नगर परिक्रमा घडविण्याचे कसब तेच जाणोत. जुन्या पोस्ट गल्लीतील शास्त्री  चौकातून निघणारा हा रथ भोई वाडा, गांधी चौक, मेन रोड, नागझिरी मार्गे पुन्हा शास्त्री चौकात परततो. नगर परीक्रमेदरम्यान भाविक रथावर तिळ व गुळापासून बनविलेल्या रेवड्या उधळतात. सुमारे १५० ते २०० क्विटल रेवड्या उधळल्या जात असतील. तिसऱ्या दिवशी पालखी व मेणा निघतो. पालखीत पांडुरंगाची मूर्ती विराजमान असते तर मेण्यात स्वामींची प्रतिमा असते. पालखी सोहळ्यात सराफ परिवारातील विजय गोटीवाले, महेंद्र सोनार, दत्तात्रय गोटीवाले, प्रशांत, विजय, प्रदीप, मनोहर, रवींद्र सोनार, सुधाकर तारकस आदी सेवा बजावतात. पाताळगंगेच्या काठी सदगुरूंची समाधी आहे, तेथे दर्शन करून आठवडे बाजाराच्या पटांगणात दही हंडीचा कार्यक्रम होतो. फटाक्यांची आतषबाजी होते. पूर्वी 'नागझिरी'वर दारूखाना होई. गांधी चौकातील बारूदवाले त्याची व्यवस्था करीत. 
 
सुमारे पावणे दोनशे वर्षांहून अधिकची ही प्रथा आजही कायम आहे. गेल्या वर्षी २०१२ ला नेमक्या याचवेळी गावात दंगल झालेली होती. पण भाविकांच्या भावनेचा आदर राखून प्रशाननाने संचारबंदीत दुपारी सूट दिली व रथोत्सव पार पडला होता. रथोत्सवानिमित्त मंदिर परिसरात  'नाल्यावर' यात्रा  भरते. अर्थात आता नाला राहिलेलाच नाही. तो पूर्णपणे अस्तंगत झालाय. तो बुजुवून त्यावर दुकाने बांधली गेलीय. गावातील सांड पाण्याचा हा नाला मस्तानशा बाबांच्या दर्ग्याजवळ नागझीरीला मिळे. आता तेथे रस्ता झाला आहे. या सर्व परिसरात यात्रा भरलेली असते. रेवड्या खात व पिपाण्या वाजवीत यात्रेत फिरण्याच्या आनंदाची तुलना कशाशीही होऊच शकत नाही. मस्तानशहा वली हे सदगुरू सच्चिदानंदांचे समकालीन मुस्लिम संत. त्यांच्या समाधीस्थळी मंदिर संस्थानतर्फे उत्सवाचे रीतसर निमंत्रण पाठविण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवही या उत्सवात सहभागी होतात. यंदा असे निमंत्रण तेथील मौलानांना देताना दर्ग्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष दुमदुमला. रथाच्या नगर परिक्रमे दरम्यान मुस्लिम पंच कमेटी तर्फेही मानकरीचा सन्मान करण्यात आला. हिंदु - मुस्लिम सलोख्याची ही अनोखी प्रथा धार्मिक भावनांचा बाजार मांडणारयांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

Wednesday, December 4, 2013

Raverayan - 3


प्रत्येक गावाच्या गावपणाला जिवंत ठेवणारा एक प्रवाह असतो, तो म्हणजे नदीचा. कुठलेही गाव अगर वस्ती कोणत्या ना कोणत्या नदीच्या तीरावर / काठावरच वसलेली असते. ही नदीच परिसराला सुजलाम्, सुफलाम् करून गावाला संपन्न, श्रीमंत करीत असते. गावाचे म्हणून जसे एक वेगळेपण असते तसे या नद्यांचेही आपले आगळेपण असते. त्यांचा स्वतःचा एक संदर्भ असतो. कुठे कुठे तो इतिहास वा पुराणाशी जोडलेलाही आढळून येतो. गंगा, यमुना, कृष्णा - कोयना, भद्रा, गोदावरी अशा अनेक नद्यांचे मूळ व कुळ इतिहासात आढळून येणारे आहे. या नद्यांचे आपले मोठेपण आहेच, पण त्यांना ठीक ठिकाणी येउन मिळणार्‍या उप नद्यांचेही वेगळे आख्यान असते. त्यांच्या नामाभिदानापासून ते सुरु  होणारे असते.

सातपुडय़ाच्या पर्वत रांगातून निघून वारकरी संप्रदायाच्या चांगदेव-मुक्ताई तीर्थ स्थळाजवळ ताप्तिला जाऊन मिळणार्‍या रावेरच्या  'नागझिरी'नेही कधी काळी संपन्नता अनुभवली आहे आणि या गावालाही तिने समृद्ध केले आहे. आज मात्न तिची दशा ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे, फाटक्या वस्त्नानिशी शासनाच्या दारी उभ्या असलेल्या मराठी सारखी झाली आहे, हे बघून कुणीही हेलावल्याखेरीज राहु नये. नदी नव्हे, नालाच म्हणायला हवे अशी ही अवस्था आहे.

नगरपालिका कार्यालयाच्या पाठीमागून वाहणारी  'नागझिरी'  रसलपूर रस्त्यावरच्या शिंदखेडय़ापासून सावदा रोडपर्यंत शहराची सोबत करते. जेव्हा रावेर गाव या नदीच्या एकाच बाजूला, म्हणजे काठावर होते तेव्हा परस्पर बंधुत्वाच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेल्या भरजरी शालूचा नितळ झुळझुळता काठ पदर म्हणता यावे, अशी ही नदी होती. या नितळ काठ पदरात तेव्हा पौर्णिमेचा चंद्र उतरलेला पाहता येत असे. आता असे स्वरूप राहिलेले नाही. घरा दारातला कचरा आणून टाकण्याचे ते स्थान झाले आहेच, शिवाय रस्त्यासाठी नदीत भराव टाकला गेल्याने पात्नही संकुचित झाले आहे. काही ठिकाणी तर नदी पात्नात प्लॉटसचे ले-आउट टाकून प्रवाह कुंठीत केला जात आहे. पूर्वी नदीच्या अल्याड गाव व पल्याड केवळ बाहेरपुरा नामक वस्ती होती आणि लगत छानश्या टेकड्या. त्यावर फतेशा वली बाबांचा दर्गा आणि त्यावरचे लांबवरून दिसणारे ध्वज. त्या टेकडीवरूनच  पलीकडे जायची वाट व पायथ्याने खळखळत वाहणारी नदी. आज कागदावर रेखाटाव्या लागणार्‍या निसर्ग चित्रासारखे तेव्हा हे प्रत्यक्षातले चित्र होते.

आता नदीच्या वरच्या बाजूला अभोडा धरण बांधले गेल्याने नदीतले पाणी अडविले गेले.  नागझिरीत उरलेय अपवादाने येणारे पावसाचे आणि गावातील गटारींचे पाणी. गावाच्या कोपर्‍यात अहिल्यादेवी होळकरांनी मोठ्ठा हौद बांधून दिला होता म्हणे.  'नागझिरी हौद'  म्हणून तो आजही ओळखला जातो. तेव्हा जंगलातले तरस वगैरे प्राणी या हौदावर पाणी प्यायला येत, असे जुने जाणते सांगतात. पूर्वी गणेश विसर्जनही याच हौदात होई. या हौदाला लागून  'मोतीझिरा' होता. त्याला लागून धोबी घाट होता. परीट बांधवांची त्यावर गर्दी असे. आज या ठिकाणी नाकाला रुमाल लाऊन उभे राहणेही अशक्य आहे. इमाम वाडय़ातून पुढे नदी ओलांडून गेल्यावर जो बाहेरपुरा वसलेला आहे त्याला लागुनच फुकटपुराही वसलाय. नावाप्रमाणेच अधिकतर फुकटात म्हणजे अतिक्रमित. पलीकडे इदगाह मैदानाच्या टेकडीवर व भाटखेडा रोडवरही मोठी वस्ती झालीय. त्यामुळे नदी गावाच्या मध्यात आल्यासारखे झालेय.

गावाच्या दुसर्‍या बाजूने म्हणजे (बर्‍हाणपूर) ओंकारेश्वररोडच्या बाजूने डोंगर टेकडय़ांवरचे पाणी आपल्या उदरात घेऊन  'पाताळगंगा'  वाहे. कपडे धुवायला येणार्‍या बाया बापडय़ांची त्यावर गर्दी होई. पूर्वीच्या स्वस्तिक टॉकीजच्या  पाठीमागून जाऊन ती  तामसवाडीजवळ भोकरीच्या नदीला मिळे. आज तीही कोरडी पडली आहे.
 
नागझिरीला लागूनच इमाम वाडय़ाखाली आमचा पिढीजात वाडा होता.  १८०० च्या अखेरच्या व १९०० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे पणजोबा तेथे राहात. आमच्या समोर तेथे गाई-गुरे बांधली जात. तेथे चारा वगैरेही ठेवला जाई. आम्ही भावंडे वाडय़ात खेळायला जात. त्यामुळे नदी पलीकडला आजचा विकास अगदी आमच्या समोर झालेला आम्ही पाहिला आहे. वाडय़ातल्या विहिरीतून बादली बादलीभर पाणी ओढून बैलांना पाजणे जीवावर येई म्हणून तेव्हा अनेकदा घरगडय़ांसोबत बैलांना पाणी पाजायला नदीवर नेले आहे. नदीकाठी कुंभार समाज बांधवांची वस्ती होती. घरीच बैल जोडय़ा असल्याने पोळ्याला मातीचे बैल कधी आणावे लागले नाहीत, पण दिवाळी आदी सणाला मातीचे बोळके आणायला नारायण शंकर (प्रजापती) काकांकडे खूपदा गेल्याचे आठवते. या सर्व जीवन प्रवासाला तेव्हा नदीच्या झरझर व मंजुळ गाण्याची अविभाज्यपणे साथसंगत होती. नदीच्या त्या झुळझुळत्या पाण्याकडे नुसते डोळे भरून पाहीले तरी मनातल्या गुंत्याचा पीळ सैल व्हायला मदत होई. काळ्या मातीच्या ढेकळावर पाण्याचा थेंब पडल्यावर जसे होते, तसे. भावनिकच नव्हे, तर अनामिक, आध्यात्मिक बंध म्हणावे असे हे सारे होते. पण हरवलेय् ते आता. तिसेक वर्षांपूर्वी आमचा वाडा दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांना विकला गेला. आज हेच दारा मेंबर रावेरचे नगराध्यक्ष आहेत. या वाड्याच्या जागेवर त्यांचा मोठ्ठा बंगला उभा झालाय्. त्यातूनच गावाचा कारभार ते पाहतात. तो पाहताना नदीची दुर्दशा पाहण्याचे दुर्दैव त्यांच्यावरही ओढवलेय् म्हणायचे.