यात्रा / जत्रा व रथोत्सवासारखे ग्रामोत्सव प्रत्येकाच्याच आस्थेचे व श्रद्धेचे भाग असतात. गावाच्या धार्मिक तसेच सांस्कृतिक संचिताचे ते दृष्य स्वरूप तर असतेच पण सर्व धार्मिक समूहांच्या एकात्म आनंदभावाचे ते एक आनंदनिधानही असते. रावेरच्या श्री दत्त जन्मोत्सव व त्यानिमित्तच्या रथोत्सवाचेही तसेच आहे आणि आमच्यादृष्टीने त्याचे महत्व यासाठीही आहे की, या ग्रामोत्सवाचे कारक असलेल्या पुरातन श्री दत्त मंदिर संस्थानाच्या पायाभरणीपासून आमच्या पिढ्या न पिढ्यांचा त्याच्याशी संबंध राहिला आहे.
१७ / १८ व्या शतकात श्री सदगुरू सच्चिदानंद
स्वामी नामक एक थोर संत होऊन गेले. ते मुळचे माहूरचे. एकनाथपंथीय संत श्री
हरिदासजी (नांदेड) यांचा अनुग्रह त्यांना लाभला. त्यांच्या आज्ञेनेच
स्वामींनी तीनदा नर्मदा परिक्रमा केल्या. त्या करताना नर्मदा माईने त्यांना
दर्शन दिल्याचेही सांगितले जाते. स्वामींनी श्री माहूर क्षेत्री बारा
वर्षे अनुष्ठान केले. दत्तगुरूंनी संत रामदास स्वामी व संत एकनाथांना दिले
होते तसे मलंग दर्शन या आराधनेदरम्यान स्वामींना दिले. प्रसाद म्हणून छडीही
दिली. भारत भ्रमण करत ते खंडवा (म. प्र.) मार्गे बऱ्हाणपूरला आले असता
रावेरचे श्रीमंत सुपूशेठ वाणी, शेषाद्री महाराज नाईक व घनश्यामदास
लक्ष्मणदास अग्रवाल आदी तत्कालीन मान्यवर मंडळी त्यांना भेटायला आणि रावेर
येथे येण्याच्रे निमंत्रण द्यायला सजविलेल्या बैल गाड्यांचा
ताफा घेऊन बऱ्हाणपूरला गेले होते. पण त्यावेळी श्रीमंतीचे लक्षण मानल्या
जाणाऱ्या या ताफ्याने यायला त्यांनी नकार दिला. मंडळी रावेरकडे परतली, आणि
पाहतात ते काय तर, स्वामी त्यांच्या अगोदरच रावेरच्या वेशीवरील
पाताळगंगेच्या काठी असलेल्या हनुमान मंदिरात अवतरलेले. त्यांच्या आगमनाने
रावेरकर कसे आनंदले याचे वर्णन "शृंगारले रावेर, सडे घातले रस्त्यांवर,
रांगोळीचे प्रकार, किती म्हणून सांगावे" अशा शब्दात स्वामींच्या लिलामृतात
आढळून येते. सर्वांनी त्यांना गावात चालण्याची विनंती केली तर कुणाकडेही
जाण्यास नकार देऊन ते गावातील नाल्याकाठी येउन थांबले. अखेर या मंडळीच्या
पुढाकाराने तेथेच श्री दत्त मं दिराची उभारणी केली गेली. १८३० मध्ये
श्री दत्त मंदिर संस्थान आकारास आले आणि तेव्हापासूनच दत्त
जन्मोत्सव व रथोत्सवाचा प्रारंभ झाला. या रथोत्सवासाठी पहिला रथ सेठ
घनश्यामदास अग्रवाल यांनीच तयार करून संस्थानला अर्पण केला. भक्त दास गणु
महाराजांनी स्वामींवर लिहिलेल्या ओवीबद्ध पोथ्यांमध्ये आणि संस्थानकडील
दस्तावेजात हे सारे संदर्भ आढळून येतात.
या संदर्भातील शेठ घनश्यामदास हे आमचे खापर
पणजोबा. त्यांच्या नंतरची आमची ही पाचवी पिढी. तर संस्थानच्या गादीपतींचीही
आता पाचवी पिढी कार्यरत आहे. स्वामी सच्चिदानंद महाराजांनी १८८८ मध्ये
वयाच्या १०८ व्या वर्षी संत माधवदास महाराजांकडे रावेरची गादी सोपवून
संजीवन समाधी घेतली. माधवदासजी हे मुळचे तांदूळवाडीचे कुलकर्णी.
त्यानंतरच्या केशवदास महाराज, भानुदास महाराज, विद्यमान श्रीपाद महाराज व
त्यांचे सुपुत्र ऋषिकेश जी, या सर्वांशीच आमचे संबंध राहिले आहेत.
पर्यायाने आमचा या संस्थानशी पिढीजात संबंध टिकून आहे. आता ओढला जाणारा
रथ तालुक्यातील बेटावदच्या धार्मि क भक्त रतन बाई यांनी अर्पण केला आहे. १९०६ पासून तो ओढला जातो आहे. तो मिळाल्यावर घनश्याम शेठ यांनी दिलेला रथ
दुसखेडा येथील बालानंद महाराज संस्थानला भेट देण्यात आला, पण पहिल्या
रथाचे दाते म्हणून आजही रथ ओढण्यापूर्वी मानकरी म्हणून आमच्या कुटुंबियांचा
संस्थान तर्फे सन्मान केला जातो. आनंदाचा भाग म्हणजे नवीन पिढीचे ऋषिकेशजी
पारंपारिक संबंध जोपासून संस्थानचे सारथ्य कुशलतेने करीत आहेत. इतिहास व
संस्कृती-संस्काराची जाण असलेल्या ऋषिकेश यांना सारा कालक्रम अगदी
मुखोदगतही आहे. गादीची परंपरा, वारसा सक्षमपणे चालविण्याची अपेक्षा
त्यांच्या कडून नक्कीच पूर्ण होऊ शकेल.
गीता जयंतीला ध्वज पूजेने दत्त जयंती उत्सवाचा प्रारंभ होतो. दत्त जन्मोत्सवाच्या महासोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव होतो. रथावर
पूजेचा मान स्व. श्रीधर राजगुरू परिवाराकडे आहे. सध्या मुंबईत असलेले डॉ.
रामचंद्र राजगुरू, तुषार राजगुरू आदी त्यासाठी आवर्जून येतात व सेवा रुजू
करतात. रथाला मोगरी लावण्याचा मान कासार व लोहार समाज बांधवांकडे आहे. आज
भूषण कृष्णाजी कासार, कैलास शारंगधर कासार, प्रफुल्ल कासार, अमृतलाल लोहार,
जिवन लोहार, विजय लोहार, प्रभाकर सोनू पाटील, मधुकर बारी, निलेश बारी,
निलेश पाटील आदी ती जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पाडतात. मोठ्या व अवजड
अश्या रथाला नियंत्रणात ठेऊन छोट्या गल्ल्यांमधून नगर परिक्रमा घडविण्याचे
कसब तेच जाणोत. जुन्या पोस्ट गल्लीतील शास्त्री चौकातून निघणारा हा रथ भोई
वाडा, गांधी चौक, मेन रोड, नागझिरी मार्गे पुन्हा शास्त्री चौकात
परततो. नगर परीक्रमेदरम्यान भाविक रथावर तिळ व गुळापासून बनविलेल्या
रेवड्या उधळतात. सुमारे १५० ते २०० क्विटल रेवड्या उधळल्या जात असतील.
तिसऱ्या दिवशी पालखी व मेणा निघतो. पालखीत पांडुरंगाची मूर्ती विराजमान
असते तर मेण्यात स्वामींची प्रतिमा असते. पालखी सोहळ्यात सराफ परिवारातील
विजय गोटीवाले, महेंद्र सोनार, दत्तात्रय गोटीवाले, प्रशांत, विजय, प्रदीप,
मनोहर, रवींद्र सोनार, सुधाकर तारकस आदी सेवा बजावतात. पाताळगंगेच्या काठी
सदगुरूंची समाधी आहे, तेथे दर्शन करून आठवडे बाजाराच्या पटांगणात दही
हंडीचा कार्यक्रम होतो. फटाक्यांची आतषबाजी होते. पूर्वी 'नागझिरी'वर
दारूखाना होई. गांधी चौकातील बारूदवाले त्याची व्यवस्था करीत.
No comments:
Post a Comment