Wednesday, December 4, 2013

Raverayan - 3


प्रत्येक गावाच्या गावपणाला जिवंत ठेवणारा एक प्रवाह असतो, तो म्हणजे नदीचा. कुठलेही गाव अगर वस्ती कोणत्या ना कोणत्या नदीच्या तीरावर / काठावरच वसलेली असते. ही नदीच परिसराला सुजलाम्, सुफलाम् करून गावाला संपन्न, श्रीमंत करीत असते. गावाचे म्हणून जसे एक वेगळेपण असते तसे या नद्यांचेही आपले आगळेपण असते. त्यांचा स्वतःचा एक संदर्भ असतो. कुठे कुठे तो इतिहास वा पुराणाशी जोडलेलाही आढळून येतो. गंगा, यमुना, कृष्णा - कोयना, भद्रा, गोदावरी अशा अनेक नद्यांचे मूळ व कुळ इतिहासात आढळून येणारे आहे. या नद्यांचे आपले मोठेपण आहेच, पण त्यांना ठीक ठिकाणी येउन मिळणार्‍या उप नद्यांचेही वेगळे आख्यान असते. त्यांच्या नामाभिदानापासून ते सुरु  होणारे असते.

सातपुडय़ाच्या पर्वत रांगातून निघून वारकरी संप्रदायाच्या चांगदेव-मुक्ताई तीर्थ स्थळाजवळ ताप्तिला जाऊन मिळणार्‍या रावेरच्या  'नागझिरी'नेही कधी काळी संपन्नता अनुभवली आहे आणि या गावालाही तिने समृद्ध केले आहे. आज मात्न तिची दशा ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे, फाटक्या वस्त्नानिशी शासनाच्या दारी उभ्या असलेल्या मराठी सारखी झाली आहे, हे बघून कुणीही हेलावल्याखेरीज राहु नये. नदी नव्हे, नालाच म्हणायला हवे अशी ही अवस्था आहे.

नगरपालिका कार्यालयाच्या पाठीमागून वाहणारी  'नागझिरी'  रसलपूर रस्त्यावरच्या शिंदखेडय़ापासून सावदा रोडपर्यंत शहराची सोबत करते. जेव्हा रावेर गाव या नदीच्या एकाच बाजूला, म्हणजे काठावर होते तेव्हा परस्पर बंधुत्वाच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेल्या भरजरी शालूचा नितळ झुळझुळता काठ पदर म्हणता यावे, अशी ही नदी होती. या नितळ काठ पदरात तेव्हा पौर्णिमेचा चंद्र उतरलेला पाहता येत असे. आता असे स्वरूप राहिलेले नाही. घरा दारातला कचरा आणून टाकण्याचे ते स्थान झाले आहेच, शिवाय रस्त्यासाठी नदीत भराव टाकला गेल्याने पात्नही संकुचित झाले आहे. काही ठिकाणी तर नदी पात्नात प्लॉटसचे ले-आउट टाकून प्रवाह कुंठीत केला जात आहे. पूर्वी नदीच्या अल्याड गाव व पल्याड केवळ बाहेरपुरा नामक वस्ती होती आणि लगत छानश्या टेकड्या. त्यावर फतेशा वली बाबांचा दर्गा आणि त्यावरचे लांबवरून दिसणारे ध्वज. त्या टेकडीवरूनच  पलीकडे जायची वाट व पायथ्याने खळखळत वाहणारी नदी. आज कागदावर रेखाटाव्या लागणार्‍या निसर्ग चित्रासारखे तेव्हा हे प्रत्यक्षातले चित्र होते.

आता नदीच्या वरच्या बाजूला अभोडा धरण बांधले गेल्याने नदीतले पाणी अडविले गेले.  नागझिरीत उरलेय अपवादाने येणारे पावसाचे आणि गावातील गटारींचे पाणी. गावाच्या कोपर्‍यात अहिल्यादेवी होळकरांनी मोठ्ठा हौद बांधून दिला होता म्हणे.  'नागझिरी हौद'  म्हणून तो आजही ओळखला जातो. तेव्हा जंगलातले तरस वगैरे प्राणी या हौदावर पाणी प्यायला येत, असे जुने जाणते सांगतात. पूर्वी गणेश विसर्जनही याच हौदात होई. या हौदाला लागून  'मोतीझिरा' होता. त्याला लागून धोबी घाट होता. परीट बांधवांची त्यावर गर्दी असे. आज या ठिकाणी नाकाला रुमाल लाऊन उभे राहणेही अशक्य आहे. इमाम वाडय़ातून पुढे नदी ओलांडून गेल्यावर जो बाहेरपुरा वसलेला आहे त्याला लागुनच फुकटपुराही वसलाय. नावाप्रमाणेच अधिकतर फुकटात म्हणजे अतिक्रमित. पलीकडे इदगाह मैदानाच्या टेकडीवर व भाटखेडा रोडवरही मोठी वस्ती झालीय. त्यामुळे नदी गावाच्या मध्यात आल्यासारखे झालेय.

गावाच्या दुसर्‍या बाजूने म्हणजे (बर्‍हाणपूर) ओंकारेश्वररोडच्या बाजूने डोंगर टेकडय़ांवरचे पाणी आपल्या उदरात घेऊन  'पाताळगंगा'  वाहे. कपडे धुवायला येणार्‍या बाया बापडय़ांची त्यावर गर्दी होई. पूर्वीच्या स्वस्तिक टॉकीजच्या  पाठीमागून जाऊन ती  तामसवाडीजवळ भोकरीच्या नदीला मिळे. आज तीही कोरडी पडली आहे.
 
नागझिरीला लागूनच इमाम वाडय़ाखाली आमचा पिढीजात वाडा होता.  १८०० च्या अखेरच्या व १९०० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे पणजोबा तेथे राहात. आमच्या समोर तेथे गाई-गुरे बांधली जात. तेथे चारा वगैरेही ठेवला जाई. आम्ही भावंडे वाडय़ात खेळायला जात. त्यामुळे नदी पलीकडला आजचा विकास अगदी आमच्या समोर झालेला आम्ही पाहिला आहे. वाडय़ातल्या विहिरीतून बादली बादलीभर पाणी ओढून बैलांना पाजणे जीवावर येई म्हणून तेव्हा अनेकदा घरगडय़ांसोबत बैलांना पाणी पाजायला नदीवर नेले आहे. नदीकाठी कुंभार समाज बांधवांची वस्ती होती. घरीच बैल जोडय़ा असल्याने पोळ्याला मातीचे बैल कधी आणावे लागले नाहीत, पण दिवाळी आदी सणाला मातीचे बोळके आणायला नारायण शंकर (प्रजापती) काकांकडे खूपदा गेल्याचे आठवते. या सर्व जीवन प्रवासाला तेव्हा नदीच्या झरझर व मंजुळ गाण्याची अविभाज्यपणे साथसंगत होती. नदीच्या त्या झुळझुळत्या पाण्याकडे नुसते डोळे भरून पाहीले तरी मनातल्या गुंत्याचा पीळ सैल व्हायला मदत होई. काळ्या मातीच्या ढेकळावर पाण्याचा थेंब पडल्यावर जसे होते, तसे. भावनिकच नव्हे, तर अनामिक, आध्यात्मिक बंध म्हणावे असे हे सारे होते. पण हरवलेय् ते आता. तिसेक वर्षांपूर्वी आमचा वाडा दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांना विकला गेला. आज हेच दारा मेंबर रावेरचे नगराध्यक्ष आहेत. या वाड्याच्या जागेवर त्यांचा मोठ्ठा बंगला उभा झालाय्. त्यातूनच गावाचा कारभार ते पाहतात. तो पाहताना नदीची दुर्दशा पाहण्याचे दुर्दैव त्यांच्यावरही ओढवलेय् म्हणायचे.

No comments:

Post a Comment