Thursday, February 15, 2018

Editors view published in Online Lokmat on 15 Feb, 2018

त्र्यंबकेश्वरचेही दत्तकविधान!

किरण अग्रवाल

पारंपरिक कामांखेरीज विकासाची नवी मानके स्थापायचित तर त्यासाठी कल्पनाशक्ती हवीच; पण कल्पनेतल्या संकल्पनांना वास्तवात उतरवायचे तर निधीही गरजेचा असतो. नव्हे, तोच महत्त्वाचा असतो. अनेक ठिकाणच्या विकासाचा गाडा अडतो अथवा रुततो तो या निधीअभावीच. त्यामुळे निधी वितरणाचा अधिकार असलेल्या खुद्द राज्याच्या अर्थमंत्र्यांनीच त्र्यंबकेश्वरला दत्तक घेण्याची घोषणा केली म्हटल्यावर तेथील विकासाबाबतच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक ठरावे.

बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला मोठा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असला तरी, या वारशाचे नीटपणे जतन होत नसल्याची वास्तविकता चटकन नजरेत भरणारीच ठरत आली आहे. ज्योतिर्लिंगामुळे तेथे भाविकांची बारमाही गर्दी असतेच, त्याखेरीज वारकरी संप्रदायाचे आराध्य ज्ञानोबा माउलींचे वडील बंधू असलेले संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांचे समाधी मंदीरही त्र्यंबकेश्वरात असल्याने त्यांच्या दर्शनासाठीही प्रतिदिनी शेकडो भाविक येतात. पौष वद्य एकादशीला मोठी यात्रा भरते. त्याकरिता तर लाखो भाविक तेथे येत असतात. सिंहस्थात शैवांचा मेळाही त्र्यंबकेश्वरी भरत असतो, जो देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या लोकांच्याही श्रद्धा व औत्सुक्याचा भाग असतो. त्र्यंबकेश्वरातल्याच पर्वतरांगांतील ब्रह्मगिरीतून गंगा नदी अवतीर्ण झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. पण असे सारे ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ असतानाही त्यांच्याशी संबंधित स्थळे दुर्लक्षित आहेत. देवदर्शनाच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह त्र्यंबक भेटीवर आलेल्या राज्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही ते निदर्शनास आले, आणि म्हणूनचच गंगा अवतीर्ण झालेल्या व सिंहस्थाचे स्नान होणाºया कुशावर्त कुंडाबरोबरच ब्रह्मगिरीला दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी केली. मुनगंटीवार अर्थमंत्री असल्याने या स्थळांच्या देखरेख व विकासाकरिता निधीची अडचण येणार नाही, पर्यायाने हे दत्तक विधान फळास येईल, अशी आशा त्यातून बळावून गेली आहे.


त्र्यंबकच्या या दत्तकविधानाला नाशिकच्या दत्तकविधानाची पार्श्वभूमी आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेऊन विकास करून दाखविण्याचा शब्द नाशिककरांना दिला होता. त्यानुसार महापालिकेत भाजपाची सत्ता येऊनही विकास कुठे दिसेना म्हणून तुकाराम मुंढे यांना नाशकात पाठविले गेल्याची चर्चा आता होते आहे. यावरून दत्तक पाल्याची काळजी घेण्याची भूमिका स्पष्ट व्हावी, म्हणूनच त्र्यंबकच्याही दत्तकविधानाकडे मोठ्या आशा-अपेक्षेने पाहिले जात आहे. अर्थात त्र्यंबक नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर हे दत्तकविधान केले गेले आहे. त्यामुळे निवडणुकोत्तर लाभाच्या दृष्टीने त्याकडे पाहता येणारे असून, स्थानिक सत्ताधाºयांना ते लाभदायीच ठरणार आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेता राज्यस्तरावरून पर्यटन विकाास व पुरातन वास्तू संवर्धनासाठीचा निधी उपलब्ध झाल्यास ऐतिहासिक वास्तू वा स्थळे जतन करणे सोयीचे ठरणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ब्रह्मगिरी पर्वतावरील निसर्गसंपदा जपली जाण्याचीही अपेक्षा या दत्तकविधानातून वाढून गेली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे वनखातेही असल्याने या पर्वतराजीवरील वनसंवर्धनाला यातून चालना मिळू शकेल. पर्वत पोखरून त्यावर होऊ घातलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भाने त्याचे मोठे महत्त्व आहे. ब्रह्मगिरीतून उगम पाऊन कुशावर्तात अवतीर्ण झालेल्या गंगा नदीचा पुढील मार्ग जागोजागी अवरुद्ध झाला आहे. नमामि गोदा फाउण्डेशनसारख्या पर्यावरणवादी संस्थांच्या सोबतीने स्थानिक नगरपालिका गंगेला खळाळती ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेच, आता या दत्तकविधानातून सदर मोहिमेलाही बळ लाभण्याची अपेक्षा आहे. एकूणच अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे देवदर्शन त्र्यंबकेश्वरवासीयांच्याही पथ्यावरच पडले असे म्हणायचे.

No comments:

Post a Comment