Friday, November 30, 2018

Editors view published in Online Lokmat on 29 Nov, 2018

नाती ठिसूळ झाली!

किरण अग्रवाल

माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत. पण या नात्यांनाच नख लावणाऱ्या व प्रसंगी काळिमा फासणा-या घटना समोर येतात तेव्हा त्या नात्यांमधली वाढती ठिसूळता विषण्ण करून गेल्याशिवाय राहात नाही. नात्यांची वीण उसवण्यामागील कारणांचा शोध घेतला जाणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे, कारण असले प्रकार हे केवळ संबंधित कुटुंबातलेच नाही तर समाजव्यवस्थेतील किडकेपण अधोरेखित करून देत असतात.

आजची तरुणपिढी मोबाइलवरील सोशल नेटवर्किंगमध्ये अशी वा इतकी काही गुंतली आहे की, त्यांना शेजार-पाजारचे भानच उरलेले नाही, अशी ओरड अलीकडे वाढली आहे. या गुंतलेपणातून स्वकेंद्रितपणा आकारास येत असून, प्रत्येकजण आपल्यापुरता मर्यादित अगर ज्याला संकुचित म्हणता यावे, असा होत आहे. ही अवस्था खरे तर मनुष्याला मनुष्यापासून, समाजापासून दूर नेणारी आहे. पण त्यातही कुटुंबातले, नात्यांमधले का होईना संबंध या आपल्यापुरते पाहण्यातून दृढ होण्याची अपेक्षा केली जाते. चला, माणूस इतरांपासून दुरावला; परंतु स्वकीयांसोबत तरी जोडला गेला ना, म्हणून त्याकडे पाहिले जाते. मात्र हल्ली हे आपल्यातले नात्यांचे बंध तरी कुठे संवेदनक्षम उरले आहेत? आपलेच आपल्याचा जीव घ्यायला उतावीळ झाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. कधी संपत्तीच्या वाटे-हिस्स्यातून ते घडून येताना दिसते, तर कधी परस्परांमधील ईर्षेतून अगर व्यावसायिक स्पर्धेतून घडून येते. शिवाय जन्मदात्या माता-पित्यांना वृद्धावस्थेत अनाथाश्रमाच्या पाय-यांवर सोडून येणारे दिवटे जिथे निपजतात, तिथे अन्य नात्यांचा आब राखला जाण्याची अपेक्षा तरी कशी करायची? नात्यांची वीण उसवत चालल्याचे चित्र यातून प्रकर्षाने दिसून येणारे आहे.



महत्त्वाचे म्हणजे, पै-पैशातून होणा-या भानगडी किंवा कोर्ट-कज्जे तर सुरू असतातच; पण नात्यांना कलंक लावणारे अमानवीय व अनैतिक प्रकारही अलीकडे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. समाजाचा किंवा वडीलधा-यांचा धाक उरला नाही म्हणून असो, की बदलत्या जीवनशैलीमुळे जागलेल्या अतृप्त विषय वासनांमुळे; विचार वा बुद्धी गहाण टाकून भलतेच काही करून बसणारे लोक नात्यांमधील नाजूक नजाकतीचा व भावबंधाचाच पार चेंदामेंदा करून टाकत असतात. पित्याकडूनच मुलीवर केले जाणारे अत्याचार हे असेच नात्याला बट्टा लावणारे. अधून-मधून अशा दुर्दैवी घटना समोर येतात तेव्हा सुजाणांच्या मेंदूला झिणझिण्या आल्याखेरीज राहात नाही. याच मालिकेत मोडणारे, म्हणजे सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची एक तक्रार नाशकातील उपनगर पोलीस ठाण्यात, तर एका माता-पित्यानेच आपल्या मुलीला मसाज पार्लरमध्ये कामास पाठवून वेश्या व्यवसायात ढकलल्याची तक्रार खुद्द या अभागी मुलीनेच पुण्यात दिल्याचे प्रकार समोर आले होते.

नैतिकतेच्या अध:पतनाचा प्रत्यय घडवणारा असाच एक प्रकार अलीकडेच ठाणे जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्यात नोंदविला गेला तो म्हणजे, नात्याने चुलत बंधू असलेल्यासोबतच पळून जाऊन एका विवाहितेने संसार थाटला व या अनैतिक संबंधात आडकाठी ठरणा-या आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीला तापत्या सळईने चटके दिले. ‘मम्मी व मामा’ने दिलेले चटके या अजाण बालिकेच्या मनावर जो आघात करून गेले आहेत, त्याचे व्रण भरून निघणे कसे शक्य आहे? नात्यांच्या मर्यादा, सन्मानाला खुंटीवर टांगून प्रसवणारी ही अनैतिकता, अघोरीपण ‘नरेची केला किती हीन...’ याचा प्रत्यय आणून देणारे आहे. कशातून व कशामुळे घडून येते हे सारे, हा खरेच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. पापपुण्याच्या कल्पनेवर विश्वास असो अगर नसो; पण पापाच्या घडे भरणीलाही ही लोकं घाबरणार नसतील तर समाजानेच अशा सडक्या मानसिकतेला लगाम घालण्याच्या दृष्टीने पाऊले उचलायला हवीत.

Thursday, November 22, 2018

Editors view published in Online Lokmat on 22 Nov, 2018

Tukaram Mundhe : मुंढेपर्वाची अखेर!

- किरण अग्रवाल

लोकशाही व्यवस्थेत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे आपले एक महत्त्व असते किंवा निर्णयप्रक्रियेत स्थान असते, तसेच प्रशासन प्रमुखाचे काही अधिकार असतात. जोपर्यंत या दोघांत सामोपचार, समन्वय असतो तोवर सर्व काही सुखेनैव चालते; परंतु त्याला जेव्हा धक्का लागतो तेव्हा शासन व प्रशासनात ठिणगी उडणे स्वाभाविक ठरून जाते. खरे तर लोकांच्या कल्याणाकरिताच दोघा घटकांना काम करायचे असल्याने त्यांच्यात अधिकाराच्या वर्चस्ववादाची स्पर्धा होण्याचे कारण असू नये. परंतु तसे झाले, की उभयपक्षी घुसमट वाढून काम करणे मुश्कील होते. नाशिक महापालिकेत तेच होत होते, म्हणूनच अवघ्या नऊ महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीला सामोरे जावे लागले आहे.

तसे पाहता, तुकाराम मुंढे यांना बदलाबदलीत आता नावीन्य राहिलेले नाही. नियमावर बोट ठेवून निडरपणे काम करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब करणारा दागिना म्हणून ते बदलीकडे पाहतात. कारण जिथे कुठे, ज्या पदावर ते गेले तिथे त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला मोडीत काढण्याचे धाडस केले. असा अधिकारी अगर अशी व्यक्ती लोकप्रतिनिधींना तर रुचणारी नसतेच नसते; पण खुद्द प्रशासन व्यवस्थेलाही पचनी पडणारी नसते. मुंढे हे तर एकाचवेळी अनेक आघाडींवर स्वच्छताकरणाची प्रक्रिया करू पाहणारे अधिकारी आहेत. हाताखालील यंत्रणेला कामाला जुंपताना व त्यात हयगय करणाऱ्यांना दंडीत करताना उगाच लोकानुनय न करता लोकांनाही काही सक्तीच्या सवयी लावण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. नाशकातही त्यांनी प्रशासन व्यवस्थेत बेफिकिरी बाळगणाºयांना निलंबित वा बडतर्फ करीत अनेकांची सुस्ती दूर केली होती, तर विकास हवा ना मग करवाढ स्वीकारायची तयारी ठेवा म्हणत नाशिककरांनाही दणका दिला होता. त्यामुळे त्यांना समर्थन देणाºयांपेक्षा त्रास अनुभवणाºया विरोधकांचीच संख्या अधिक दिसून येणे क्रमप्राप्त ठरले होते.



महत्त्वाचे म्हणजे, मुंढे यांनी प्रशासनात गतिमानता आणली म्हणून त्यांचे कौतुकच केले जात असताना त्यांनी लोकप्रतिनिधींनाही वेसण घालण्याचे काम केले. गरज असो नसो, ऊठसूट समाजमंदिरे बांधण्याच्या प्रस्तावांना त्यांनी बासनात बांधताना नगरसेवक निधीलाही कात्री लावली. तसेच ते नाशकात येण्यापूर्वी संमत करून ठेवलेल्या सुमारे अडीचशे कोटींच्या कामांनाही केराची टोपली दाखविली. त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात गेले. प्रथमच स्वबळावर महापालिकेच्या सत्तेत आलेल्या भाजपाला त्यांच्या नियमावर बोट ठेवून काम करण्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे तर, महासभेने ठराव करूनही त्याला ठोकरण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यातून मुंढेंवर अविश्वास आणण्याची वेळ आली; परंतु मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ती नामुष्की टाळली. त्यातून उभयतांनी, म्हणजे आयुक्त व सत्ताधाºयांनीही सामंजस्याचा संकेत घेणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. उलट त्यानंतरच्या काळात महापौर रंजना भानसी उघडपणे मैदानात उतरून आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका करू लागल्या. पक्ष कसा अडचणीत आला व सारे नगरसेवक कसे त्रस्त झाले आहेत हे पटवून देण्यात त्या यशस्वी ठरल्याचे म्हणावे लागेल, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना अखेर मुंढे यांची पाठराखण करण्याचे सोडून दोन वर्षात त्यांची चौथ्यांदा बदली करणे भाग पडले असावे.

मुंढे यांची प्रामाणिकता, त्यांची शिस्तप्रियता व धडाडी याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही; परंतु या जोडीला लोकप्रतिनिधींशी जो समन्वय हवा होता तो साधला न गेल्याने संघर्ष उडाला. नगरसेवकांची सारीच कामे योग्य असतील असेही नाही, काही चुकीची असतीलही. परंतु यच्चयावत सारेच अयोग्य समजून काम करणे समर्थनीय ठरू शकत नाही. विशेषत: गेल्या मार्चपासून शहरातील हरित पट्ट्यासह पार्किंग व मोकळ्या भूखंडांवर त्यांनी करवाढ सुचविली होती. ती रद्द करण्याचा एकमुखी ठराव महासभेने संमत केला असतानाही मुंढे यांनी तो ठरावच बेकायदा ठरवण्याचा प्रयत्न केला. स्वत:वरील अविश्वासानंतर त्यांनी त्यात शिथिलता आणली. शिवाय, लोकशाहीव्यवस्थेतील लोकप्रतिनिधींचे महत्त्व लक्षात न घेता अगर त्यांना न जुमानता कालिदास कलामंदिर असो, की नेहरू उद्यान, लोकार्पणे केली. त्यामुळे संघर्ष शिगेला पोहोचणे स्वाभाविक ठरले. लोकप्रतिनिधी दुखावले असताना काही समाज घटकही दुखावले गेले. बांधकाम परवानग्यांमधील कठोरता व नियम-निकषांची अंमलबजावणी यावरून बांधकाम व्यावसायिक व डॉक्टरपेशातील लोकही नाराज झाले. करवाढीमुळे शेतकरीही रस्त्यावर उतरले होतेच. म्हणजे अन्य घटकही नाराजच होते. पालकमंत्र्यांची यासंदर्भातली प्रतिक्रिया बोलकी आहे. समन्वय, सामोपचाराची वेळोवेळी संधी देऊनही तक्रारी कायम राहणार असतील तर बदलीखेरीज पर्याय उरत नाही. मुख्यमंत्र्यांचा नाइलाज झाला असावा तो त्यामुळेच.

Monday, November 19, 2018

Saraunsh published in Lokmat on 18 Nov, 2018


Blog / Editors view published in Online Lokmat on 17 Nov, 2018

कशी साधावी भूकमुक्ती?

किरण अग्रवाल

लोकसंख्यावाढीचा वेग चिंताजनक बनला असून, साधन-सामग्रीची भासणारी कमतरता अगर व्यवस्थांवर येणारा ताण एवढ्याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाते; परंतु त्याहीपेक्षा आणखी एक बाब महत्त्वाची आहे जी संयुक्त राष्ट्राने लक्षात आणून दिली आहे ती म्हणजे, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी भुकेची समस्या. त्यामुळे पाणी व पर्यावरणाबद्दल जशी चिंता बाळगली जाते तशीच ती येणाऱ्या काळात सामोरे जावे लागणाऱ्या भुकेच्या समस्येबद्दल बाळगली जाणे गरजेचे बनले आहे.

माणसाची भूक वाढत चालली आहे, असे आपण सहज म्हणून जातो. ही भूक आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याशी संबंधित असते. कितीही मिळाले तरी मनुष्याचे समाधान होत नाही, या अर्थाने तसे म्हटले जाते. परंतु शब्दश: विचार करता, अन्नाद्वारे भागविली जाणारी भूकदेखील वाढत असून, आगामी काळात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाची भूक भागवता येईल का, हा जटिल प्रश्न ठरणार आहे. भूक व भयमुक्ततेची आश्वासने सर्वत्रच दिली जातात. जन्माला आलेली कुणीही व्यक्ती भुकेली वा उपाशी झोपू नये असा आदर्श विचार बाळगला जातो; परंतु ही भूकमुक्ती साधणे अशक्यप्रायच असल्याचे म्हणावे लागेल. कारण, भूक भागविणारे अन्नधान्य उत्पादन; ते पिकवण्यासाठी लागणारी जमीन आदी आहे तेवढीच असताना खाणारी तोंडे मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. संपूर्ण पृथ्वीवर आज सुमारे 750 कोटींपेक्षा अधिक असलेली लोकसंख्या लवकरच सुमारे 900 कोटींवर पोहचेल, असे म्हटले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील लोकांची भूक भागवायची कशी, असा प्रश्न त्यातून उभा राहणार आहे, कारण आजच त्यासाठी दमछाक होताना दिसत आहे.


अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या 2018च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार (ग्लोबल हंगर इण्डेक्स) 119 देशांच्या यादीत भारत तब्बल 103 क्रमांकावर आहे. गत वर्षापेक्षा चार नंबरने ही घसरण अधिक आहे. त्यामुळे मोदी सरकारनेही भूकमुक्तीच्या कितीही गप्पा केल्या तरी त्यात अर्थ नसल्याचेच स्पष्ट व्हावे. अशास्थितीत वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे हे कसरतीचेच ठरणार आहे. कारण, एक तर आजच सर्वाना पुरेल एवढे अन्न नाही. जे आहे ते सर्वाना परवडेल असेही नाही. शिवाय, उपलब्ध असणारे अन्न शरीराला आवश्यक असणारी प्रथिने पुरविणारे म्हणजे सकस आहे का, हा आणखी वेगळा प्रश्न आहे. आपल्याकडे कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे ते या सकस अन्नाच्या अभावामुळेच. मागच्या, म्हणजे 2010 च्या इंडिया स्टेट हंगर इण्डेक्सनुसार महाराष्ट्रामधील सुमारे 27 टक्के लोकांना जेवणातून मिळणारे उष्मांक पुरेशा प्रमाणात मिळतील असे अन्न मिळत नाही. गरिबी, बेरोजगारी यामुळे सकस अन्न घेऊ न शकण्यातून ही समस्या उद्भवते आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ती दिवसेंदिवस उग्र होत जाणार असून, त्यामुळेच अन्नाची मागणी वाढून भुकेची समस्याही वाढणार आहे, संयुक्त राष्ट्राला तीच चिंता भेडसावते आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मनुष्याच्या खाण्या-पिण्याबाबतच्या बदललेल्या सवयी व त्याच्या शारीरिक वाढीमुळे आगामी काळात आजच्यापेक्षा अधिक भूक वाढलेली असेल. प्रा. डॅनियल म्युलर व फेलिप वास्क्वेझ यांनी 1975 ते 2014 या काळात यासंदर्भात घडलेले बदल या अहवालात नोंदविले असून, त्यात 186 देशांचा अभ्यास केला गेला आहे. या काळात मनुष्य 14 टक्क्यांनी अधिक सशक्त झाल्याने त्याची भूकही वाढल्याचे म्हटले आहे. पूर्वी मानवाला जितक्या कॅलरीज लागत होत्या, त्यापेक्षा आज अधिक लागत असल्याचे व मनुष्याच्या वजनातदेखील सुमारे सहा ते 33 टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदविले आहे. स्वाभाविकच सशक्तता व वजन-उंची वाढल्याने त्याची भूकही वाढली आहे. त्याकरिता अन्नाची मागणीही अपरिहार्यपणे वाढली आहे. यापुढील काळात लोकसंख्या जसजशी वाढेल, तसतसा हा विषय अधिक गंभीरपणे समोर येणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी होऊ शकणारे झगडे व पर्यावरण रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या जागृतीप्रमाणोच सकस अन्नाच्या उत्पादनाकडेही गांभीर्याने लक्ष पुरवावे लागणार आहे.

Wednesday, November 14, 2018

Editors view published in Online Lokmat on 15 Nov, 2018

मानसिकता बदलाचीच गरज !

किरण अग्रवाल

शिक्षणाने विचारांच्या कक्षा रुंदावतात, जाणिवा प्रगल्भ होतात वगैरे सारे खरे; परंतु तरी शिकली-सवरलेली माणसे जेव्हा एखाद्या अडाण्यासारखे काम करून बसतात तेव्हा शिक्षणातून बाजूला पडलेल्या मूल्याधिष्ठितपणाकडे लक्ष वेधले जाणे क्रमप्राप्त ठरून जाते. मुलगा व मुलीमधील भेद कमी होऊन समाजात स्त्री-पुरुष समानता बऱ्यापैकी वाढीस लागली असताना, तसेच कन्या जन्माचे जागोजागी स्वागत सोहळे केले जात असताना; मुलीला जन्म दिल्याच्या कारणातून एका उच्चविद्याविभूषित प्राध्यापकाने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या पत्नीस घराबाहेर काढून दिल्याची घटना समोर आल्याचे पाहता त्यातूनही हाच मूल्य वा नीतिशिक्षणाचा अभाव उजागर होणारा आहे.




मुलालाच वंशाचा दिवा मानण्याचा एकांगी विचार त्यागून मुलीलादेखील मुलाप्रमाणेच वाढवण्याची मानसिकता दिवसेंदिवस बळावते आहे, याबद्दल दुमत असू नये. मूलबाळ नसलेल्या दाम्पत्यांकडून दत्तक म्हणून स्वीकारल्या जाणा-या बाळांमध्ये मुलींना अधिक मागणी असल्याचे शुभवर्तमान आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत आपण कुठेच कशातच कमी अगर मागे नसल्याचे महिलांनी सिद्ध केले आहे. स्त्री-पुरुष समानतेची जाणीव त्यातूनच प्रगाढ होत गेली आहे. शिक्षणाने येणारी समज व सामाजिक संस्थांनी चालविलेले जनजागरण यासंदर्भात कामी येते आहेच, शिवाय स्त्रीभ्रूणहत्येविरोधातील कायदा असल्यानेही काहीसा धाक बसला आहे. अर्थात, तरी गर्भलिंग निदान करून घेऊन गर्भपात केले जात असल्याचे प्रकार पूर्णत: बंद झालेले नाहीत. तसे करणारे अधून-मधून पकडले जात असतातच; परंतु व्यापक प्रमाणावर पाहता कन्या जन्माचे स्वागत करणारे वाढले आहेत हे नक्की. मध्यंतरी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील एका गावात घरांच्या दारावर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. त्यातूनही मुलींबद्दलच्या वाढत्या सन्मानाचीच भावना प्रदर्शित झाली. शासनातर्फेही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. पण हे सारे सकारात्मक चित्र एकीकडे आकारास आलेले असताना बुरसटलेल्या विचारातून बाहेर न पडलेल्यांचे प्रताप जेव्हा पुढे येतात व त्यातही शिक्षितांचा सहभाग आढळून येतो तेव्हा त्यांची कीव करण्यावाचून गत्यंतर उरत नाही.

नाशकातील एका प्राध्यापकाने अशाच मागास विचारातून, मुलीला जन्म देणाºया आपल्या पत्नीस घराबाहेर काढून दिल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात नोंदविली गेली आहे. प्रियंका गोसावी असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या प्रियंकाच्या आयुष्यात कन्येचे आगमन झाले तेव्हापासून पती व सासू-सासºयांकडून छळाला सामोरे जावे लागत होते, असे तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. यासंबंधीचा न्यायनिवाडा यथावकाश होईलच; परंतु प्रातिनिधिक तक्रार म्हणून याकडे पाहता येणारे आहे, कारण शहरातला निवास व शिक्षण आदी असूनही केवळ मुलीला जन्म दिल्याने म्हणजे ‘नकोशी’मुळे एखाद्या विवाहितेवर घराबाहेर काढले जाण्याची वेळ येत असेल तर वंशासी निगडित एकांगी विचारधारेची जळमटे अद्याप पूर्णत: दूर झाली नसल्याचेच त्यातून स्पष्ट व्हावे. येथे शहरी रहिवासाचा व शिक्षणाचा संदर्भ एवढ्याचसाठी की, त्याने म्हणून व्यक्तीच्या शहाणपणाचे आडाखे हल्ली बांधले जातात. पण, अशी उदाहरणे समोर आली की त्यातील तकलादूपणा लक््षात येतो. अडाणी बरे असे म्हणण्याची वेळ येते कारण ते लोकलज्जा तरी बाळगतात. थोडक्यात, ब-या-वाईटाची अगर योग्य-अयोग्याची समज लाभण्यासाठी शिक्षणाचा दागिनाच कामी येणारा असला, तरी तो मूल्याच्या धाग्यात ओवलेला असणे गरजेचे आहे, एवढाच यातील मथितार्थ.

Friday, November 9, 2018

Blog / Editors view published in Online Lokmat on 10 Nov, 2018

सोशल शिष्टाचाराचा अभाव!

किरण अग्रवाल

कौतुक कुणास न आवडे? म्हणतात, त्याप्रमाणे शुभेच्छा कुणाला नको असतात; कारण त्याने नवी ऊर्मी, बळ मिळून जात असते. भविष्यातील वाटचालीसाठी अशा शुभेच्छांचीच शिदोरी कामी येणारी असते. पण, आपल्याकडे सर्वच बाबतीत आणि त्यातही विनामूल्य अथवा नाममात्र दरावर असणाऱ्या सुविधांचा पुरेपूर उपयोग व उपभोग घेण्याची मानसिकता असल्याने शुभेच्छांचाही असा काही अतिरेकी मारा होतो की, आता बास म्हणण्याची वेळ येते. सोशल मीडियाच्या वापरात सराईत झालेल्यांकडून दिवाळीनिमित्तच्या शुभेच्छांची बरसातही अशीच अतिरेकी झाल्याने ‘सोशल एटिकेट्स’चा मुद्दा चर्चेत येणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.

खरे तर शुभेच्छा-सदिच्छांचा विषय हा तसा व्यक्ती-व्यक्तींमधील व त्यांच्या मनामनांशी संबंधित आहे. ‘घाऊक’ स्वरूपातील शुभेच्छांना त्यात जागा नाही. बऱ्याचदा, व्यक्त न होताही शुभेच्छांची देवाण-घेवाण घडून येते. त्यासाठी नजरेची, स्पर्शाची भाषा पुरेशी ठरत असते. काही एक न बोलता केल्या जाणाऱ्या हस्तांदोलनातून अगर गळाभेटीतून ज्या शुभेच्छा प्राप्त होतात, त्याची संवेदना किती तरी अधिक गहिरी असते. पण काळ बदलला, तशी अभिव्यक्तीची माध्यमे बदलली. प्रत्यक्ष भेटून, घरी जाऊन शुभेच्छा देण्याचे दिवस गेलेत. आता विज्ञानाने प्रत्येकाच्याच हाती मोबाइल टेकविला असल्याने त्याद्वारेच शुभेच्छांची देवाण-घेवाण होऊ लागली आहे. दिवाळी-पाडव्याला शेजार-पाजारी जाऊन व ज्येष्ठांना भेटून केला जाणारा नमस्कार, कमरेतून वाकल्यावर पाठीवर पडणारी त्यांची आशीर्वादरूपी थाप; ख्याली-खुशालीची विचारपूस आदी सारे कमी होत चालले असून, आपण मोबाइलच्या स्क्रिनवर आकाशकंदील लटकवू लागलो आहोत व फराळाची पाठवणी करू लागलो आहोत. हल्ली वेळच नाही हो, या गोंडस सबबीखाली सोशल मीडियाच्या आहारी जाणे आपल्याला कुठे नेऊन सोडणार आहे, हा यातील चिंतेचा मुद्दा ठरावा.


महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपसारख्या चावडीवरून शुभेच्छा दिल्या जात नाहीत तर थोपल्या जातात असेच म्हणण्यासारखा अनुभव येतो. दिवाळीतही तेच झाले. या पर्वात चार-पाच सण सामावलेले असल्याने प्रत्येक दिनाच्या वेगवेगळ्या शुभेच्छांचा मारा झालेला दिसला. गंमत अशी की, अगोदर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज या पाचही तिथींचा एकत्रित शुभेच्छा संदेश दिला गेला आणि नंतर पुन्हा प्रत्येक दिनी स्वतंत्रपणे त्या दिनाला साजेशे संदेशही पाठविले गेले. त्यामुळे अनेकांना संदेश वाचण्याऐवजी ते ‘क्लिअर’ करण्याचे म्हणजे मिटवण्याचेच काम लागून गेल्याचे पाहावयास मिळाले. यंदा या माध्यमाने स्टीकर्स पाठविण्याचीही सोय करून दिलेली असल्याने शुभेच्छुकांनी ‘होलसेल’पणे स्टिकर्सही पाठविले. त्यामुळे एकीकडे बदलत्या काळानुरूप प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येत असताना दुसरीकडे सोशल मीडियातून शुभेच्छा संदेशांच्या अतिरेकी आदान-प्रदानाद्वारे ई-कचऱ्यात मोठी भर घातली गेली.

सोशल मीडियाच्या हाताळणी अगर वापराबाबतच्या एटीकेट्सचा म्हणजे शिष्टाचाराचा मुद्दा यामुळेच महत्त्वाचा ठरावा. ‘या भावात’ गावभरच्यांना शुभेच्छा देता येतात म्हणून या माध्यमावर पडीक असलेले बहुतेकजण इकडच्या संदेशाची तिकडे पाठवणूक करतात. पण त्यातील भाव-भावनांना उधार-उसनवारीचा संदर्भ असतो, हे लक्षातच घेतले जात नाही. शिवाय, एकदा एखाद्या ग्रुपमध्ये शुभेच्छा देऊन झाल्यावर त्या ग्रुपमधील प्रत्येक एकेका सदस्यांना पुन्हा वेगळे संदेश देण्याची गरज नसते, तसेच एकदा शुभेच्छा दिल्यावर काही वेळाने दुसरा कुणाचा चांगल्या मजकुराचा संदेश अथवा स्टिकर आले म्हटल्यावर तेही फॉरवर्ड करणे हे आपल्या उचलेगिरीची साक्ष पटवून देणारेच असते, मात्र या अशा साध्या साध्या गोष्टी पाळल्या जात नाहीत. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत रोज शुभेच्छा देणाऱ्यांना ‘काय निवडणुकीला उभे राहायचेय की काय’ या प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ त्यातूनच आली. शेवटचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संदेश असोत की शुभेच्छा; त्यांच्या भडिमाराने ते वाचणाऱ्या अथवा पाहणाऱ्या व्यक्तीच्या वेळेचा जो अपव्यय (वेस्टेज आॅफ मॅन अवर्स) घडून येतो, त्याची भरपाई कशी होणार? वेळ नाही असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे सोशल मीडियातल्या अवाजवी, अतिरेकी संदेशात अडकून वा गुंतून पडायचे हे राष्ट्रीय संपत्तीच्या हानीसारखेच म्हणता यावे. पण लक्षात कोण घेतो? ‘आहे ना नेटपॅक, मग राहा कनेक्ट’ असाच विचार केला जाणार असेल तर यापेक्षा दुसरे काय होणार? सामाजिक माध्यमांच्या हाताळणीत शिष्टाचाराची गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे.

Editors view published in Online Lokmat on 08 Nov, 2018

‘युती’च्या दिशेने...?

किरण अग्रवाल

देशपातळीवरील बदलती राजकीय समीकरणे पाहता शिवसेना-भाजपा ‘युती’ होणार की ठरल्याप्रमाणे स्वबळच आजमावले जाणार, हा प्रश्न औत्सुक्याचा ठरला आहे खरा; पण या दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या कडवट उद्गारांची धार दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्यावरून काही अंदाज बांधले गेले तर ते सपशेल धुडकावता येऊ नयेत. नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह उभय पक्षीयांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळत एकमेकांची जी पाठराखण केलेली दिसून आली, त्यावरूनही या अंदाजांना बळ लाभणारे असून, संबंधितांची पाऊले ‘युती’च्या दिशेने पडत असल्याचेच ते निदर्शक म्हणावे लागेल.

भाजपात नरेंद्र मोदी - अमित शहा पर्व अवतरल्यानंतर या पक्षाच्या शिवसेनेसोबतच्या सर्वात जुन्या ‘युती’त मिठाचा खडा पडल्याचे एव्हाना लपून राहिलेले नाही. गेल्यावेळी विधानसभेला या दोघांनी आपले स्वबळ अजमावूनही पाहिले; परंतु एकट्याचे गणित न जुळल्याने अखेर ‘युती’नेच सत्ता स्थापन करावी लागली. अर्थात, सत्तेत सोबत असतानाही या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना आडवे जाण्याची संधी सोडली नाही. शिवसेना तर सत्तेत असल्याचे विसरून बऱ्याचदा विरोधकांचीच भूमिका बजावताना दिसून येते. बरे, हे केवळ अंतस्थ पातळीवर चालते असे नव्हे तर थेट जाहीरपणे एकमेकांच्या वस्रहरणाचे प्रकार व प्रयत्न त्यांच्यात सुरूच असतात. महाराष्ट्रात आपल्या खांद्यावर मान ठेवून भाजपा रुजली, वाढली व आता ते आपल्यालाच बाजूला सारून शतप्रतिशत राज्य पादाक्रांत करायला निघाल्याच्या रागातून शिवसेनेने यापुढे येऊ घातलेल्या निवडणुकीसाठीही आपली ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केलेली आहे. भाजपानेही हे आव्हान स्वीकारल्याचे वेळोवेळी म्हटले आहे. पण, आता एकूणच देशात भाजपाविरोधकांच्या एकत्रिकरणाचे जे प्रयत्न चालले आहेत आणि त्याला यशही लाभते आहे ते पाहता, आहे त्या सोबत्यांना सोडून वा दुखावून चालणार नाही हे भाजपाच्याही लक्षात आले आहे. परिणामी उभयतांकडून कडवटपणा टाळून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे प्रत्यंततर घडून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रमाप्रसंगीही त्याचीच चुणूक दिसून आली.


शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यक्रमाप्रसंगी उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील एकाच वाहनाने तर आलेच; परंतु दोघांनी परस्परांची स्तुतीही केली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते सर्व मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाठपुरावा केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तर आपण सरकारच्या चांगल्या कामात खोडा घातला नाही, असे ठाकरे म्हणाले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्यावेळी मराठवाड्यासाठी पाणी सोडले म्हणून जे आमदार अनिल कदम त्यावेळी विरोधासाठी आघाडीवर होते, त्याच कदम यांनी यावेळी मात्र महाजनांकडून नाशिक व मराठवाड्यात चांगला समन्वय साधला गेल्याची पावती दिली. आपल्यातील वाद मिटल्याचेही दोघांनी जाहीर केले. महत्त्वाचे म्हणजे, महाजन यांना उद्देशून, ‘तुम्ही नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास न्या; राजकारण गेले चुलीत, मी तुमच्या सोबत येईन’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगून आपली जुळवून घेण्याची मानसिकता दर्शवून दिली.

शिवसेना-भाजपातील ताणल्या गेलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’च्या दारी जाण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्या शिवाजी सहाणे यांचे विधान परिषद उमेदवारीचे तिकीट कापले गेल्याचा इतिहास अजून विस्मृतीत गेलेला नाही. पण तरी शिवसेना आमदाराने आपल्या कार्यप्रमुखांच्या साक्षीने भाजपा मंत्र्यांचे व सरकारचे कौतुक करण्याचे धाडस दाखविले व तितकेच नव्हे; तर मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावर खंबीरपणे लढलेल्या भाजपाच्या आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कारही करविला. या साऱ्या गोष्टींतून शिवसेना-भाजपाचे सूर पुन्हा जुळू लागल्याचेच संकेत मिळणारे आहेत. अर्थात, राजकारणात जे दिसते तेच पूर्णसत्य असते असेही नाही. परंतु पेटलेपणातून आलेला कडवटपणा जेव्हा समजूतदारीच्या कौतुकात बदलताना दिसतो, तेव्हा त्यातून सहोदराच्याच वाटा प्रशस्त होण्याची शक्यता वाढते. पिंपळगाव (ब)च्या कार्यक्रमात तेच दिसून आले.

Thursday, November 1, 2018

Editors view published in Online Lokmat on 01 Nov, 2018

उजेड पेरूया...!

किरण अग्रवाल

आनंद, सुख-समाधानाच्या व्याख्या अगर संकल्पना या व्यक्तिगणिक बदलणाऱ्या असतात हे खरेच; पण तरी त्यात किमान समान तत्त्वाचा विचार करायचा झाल्यास दुस-याच्या चेह-यावर हास्य निर्मिता आल्याखेरीज यातली कोणतीही बाब साध्य ठरू शकत नाही. आजची परिस्थिती मात्र यापेक्षा काहीशी विपरीत आहे. ‘मी’ व ‘माझ्यातले’ अडकलेपण इतके काही वाढले आहे की दुस-यांचा अगर इतरांचा विचारच केला जाताना दिसत नाही, आपमतलबीपणाचे हे पाश तोडल्याखेरीज खरा आनंद अनुभवता येणे शक्य नाही. यंदाच्या दिवाळीत प्रवाहापासून लांब असलेल्या वंचित, उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा उजेड पेरण्यासाठी तेच करायला हवे.

सध्या सगळीकडे दिवाळीची लगबग अनुभवयास मिळत आहे. नाही म्हटले तर, यंदा निसर्गाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळाची छाया असून, मायबाप सरकारकडून दिलाशाची अपेक्षा केली जातेय, त्यादृष्टीने काही निर्णय घेतलेही गेले आहेत. ते पुरेसे नसले तरी बाजारातील वातावरण चैतन्याची चाहुल देणारे आहे. व्यक्तिगत दु:खे, अपेष्टा बाजूला सारून सण साजरे करण्याची आपली परंपरा आहे. प्रसंगी ऋण काढून आपण सण साजरे करीत असतो, कारण यानिमित्ताने कुटुंबातील, समाजातील प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद हा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा-प्रेरणा देणारा असतो. नकारात्मक बाबींच्या अंध:कारावर प्रकाशाचे चांदणे पेरणारा हा सण असल्याने सारेच त्ययासाठी उत्सुक असतात. दोन्ही कर जोडोनी उजेडाची उधळण यात होते, घराघरांवर आकाशदीप उजळलेले दिसतात. सारे वातावरण व आसमंतच एका अनोख्या चैतन्याने व मांगल्याने भारणारा हा सण आहे; पण चैतन्याचे, उत्साहाचे व आनंदाचे हे तरंग सर्वव्यापीपणे अनुभवास येताना दिसत नाहीत ही वास्तविकता आहे.


आपण आपल्यातच मशगुल असतो. आपल्यापलीकडे काय चालले आहे, इतरेजण कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला शिवत नसतो. दिवाळीचा सण व त्यानिमित्तचा आनंद साजरा करताना या आपल्यापलीकडल्यांकडे लक्ष देण्याची किंवा त्यांचा विचार करण्याची गरज आहे. आर्थिक विषमतेच्या पातळीवर जे चित्र दिसून येते त्यासंदर्भानेच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे. आनंद अअगर समाधानाचे भाव केवळ आपल्या कुटुंबीयांच्या चेह-यावर अथवा मनांमध्ये अनुभवण्यासोबतच विवंचनेत असणा-या, परिस्थितीने गांजलेल्या वंचित, उपेक्षितांबरोबरच विशेषत: काही कारणपरत्वे कुटुंबाने व समाजानेही टाकून दिलेल्यांमध्ये अनुभवता आले तर कुणाचाही आनंद द्विगुणीत झाल्याखेरीज राहणार नाही. शेवटी आनंद हा मानण्यावर असतो असे नेहमीच म्हटले जाते, मग ही मानण्याची प्रक्रिया आपल्याखेरीज इतरांनाही आनंदानुभूती मिळवून देण्याच्या दृष्टीने सुरू करायला काय हरकत असावी? खरा आनंद हा त्यातच असतो.

आपल्या सभोवताली अनेक अप्रिय घटनांचा काळोख दाटला आहे. म्हणून का अवघे विश्व अंध:कारमय झालेले आहे असेही म्हणता येणार नाही. दूर कोठेतरी सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात कार्यमग्न आहेतच ना. ते त्यांच्यापरिने पणती बनून सभोवतालचा अंधार छेदण्याचे कार्य करीत आहेत आणि हिच आशेचे तिरीप म्हणता येईल. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील अनेक बांधव अजूनही मूळ प्रवाहात येऊ शकलेले नाहीत. शहरी भागात आपण दिवाळीच्या फराळाची स्पर्धा करतो; परंतु तिकडे नियमित व आवश्यक त्या जेवणाचीच मारामार असल्याने कुपोषणासारखा विषय सुटू शकलेला नाही. समाजसेवी संस्था व व्यक्ती ‘एक करंजी मोलाची’सारखे उपक्रम राबवून आदिवासी भागात जातात व तेथील वंचितांबरोबर दिवाळी साजरी करतात, अशा संस्था-व्यक्तींना आपण बळ द्यायला हवे. त्यांच्यासोबत आदिवासी भागात जायला हवे. आपल्या या सहृदयतेने आदिवासी बालकांच्या चेह-यावर साकारणारा आनंद हा किती अनमोल वा अवर्णनीय असतो, हे ते प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज कळणारे नसते. अनैतिक संबंधातून जन्मास आलेली मुले कचराकुंड्यांजवळ टाकून दिलेली आढळतात. अशा मुलांना मायेची ऊब देणा-या संस्था त्यांच्यापरीने दिवाळी साजरी करतातच; पण आपणही आपला आनंद त्यांच्यासमवेत वाटून घेतला तर त्यातून लाभणा-या समाधानाची तुलना करता येऊ नये. हल्ली वृद्धाश्रमे वाढीस लागल्याचे दुर्दैवी चित्र आहे. ज्यांचे बोट पकडून आपण चालू लागलो, वृद्धावस्थेत त्यांचेच बोट सोडून देण्याचे पातक करणारेही समाजात आहेत. त्यासंदर्भातील कारणमीमांसेत जाण्याचा हा विषय नाही; परंतु कुटुंबाकडूनच नाकारल्या गेलेल्यांसमवेत आपण काही क्षण घालवू शकलो, तर ख-याअर्थाने अंध:कारावर उजेडाचे शिंपण घडून येईल. अखेर कारुण्य असते, तिथेच संवेदना जागते. संवेदनशीलताच व्यक्तीला प्रयत्नांच्या मार्गावर अग्रेषित करते. तेव्हा, दीपावलीचा आनंद हा आपल्यापुरता किंवा केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता ज्यांच्या उशाशी दीप लागू शकत नाही अशांसमवेत वाटून घेतला तर ती दिवाळी संस्मरणीय ठरू शकेल. त्यासाठी मनामनांमध्ये त्यासंबंधीच्या जाणिवेचा, संवेदनांचा उजेड पेरूया...