सोशल शिष्टाचाराचा अभाव!
किरण अग्रवाल
कौतुक कुणास न आवडे? म्हणतात, त्याप्रमाणे शुभेच्छा कुणाला नको असतात; कारण त्याने नवी ऊर्मी, बळ मिळून जात असते. भविष्यातील वाटचालीसाठी अशा शुभेच्छांचीच शिदोरी कामी येणारी असते. पण, आपल्याकडे सर्वच बाबतीत आणि त्यातही विनामूल्य अथवा नाममात्र दरावर असणाऱ्या सुविधांचा पुरेपूर उपयोग व उपभोग घेण्याची मानसिकता असल्याने शुभेच्छांचाही असा काही अतिरेकी मारा होतो की, आता बास म्हणण्याची वेळ येते. सोशल मीडियाच्या वापरात सराईत झालेल्यांकडून दिवाळीनिमित्तच्या शुभेच्छांची बरसातही अशीच अतिरेकी झाल्याने ‘सोशल एटिकेट्स’चा मुद्दा चर्चेत येणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.
खरे तर शुभेच्छा-सदिच्छांचा विषय हा तसा व्यक्ती-व्यक्तींमधील व त्यांच्या मनामनांशी संबंधित आहे. ‘घाऊक’ स्वरूपातील शुभेच्छांना त्यात जागा नाही. बऱ्याचदा, व्यक्त न होताही शुभेच्छांची देवाण-घेवाण घडून येते. त्यासाठी नजरेची, स्पर्शाची भाषा पुरेशी ठरत असते. काही एक न बोलता केल्या जाणाऱ्या हस्तांदोलनातून अगर गळाभेटीतून ज्या शुभेच्छा प्राप्त होतात, त्याची संवेदना किती तरी अधिक गहिरी असते. पण काळ बदलला, तशी अभिव्यक्तीची माध्यमे बदलली. प्रत्यक्ष भेटून, घरी जाऊन शुभेच्छा देण्याचे दिवस गेलेत. आता विज्ञानाने प्रत्येकाच्याच हाती मोबाइल टेकविला असल्याने त्याद्वारेच शुभेच्छांची देवाण-घेवाण होऊ लागली आहे. दिवाळी-पाडव्याला शेजार-पाजारी जाऊन व ज्येष्ठांना भेटून केला जाणारा नमस्कार, कमरेतून वाकल्यावर पाठीवर पडणारी त्यांची आशीर्वादरूपी थाप; ख्याली-खुशालीची विचारपूस आदी सारे कमी होत चालले असून, आपण मोबाइलच्या स्क्रिनवर आकाशकंदील लटकवू लागलो आहोत व फराळाची पाठवणी करू लागलो आहोत. हल्ली वेळच नाही हो, या गोंडस सबबीखाली सोशल मीडियाच्या आहारी जाणे आपल्याला कुठे नेऊन सोडणार आहे, हा यातील चिंतेचा मुद्दा ठरावा.
महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलवरील व्हॉट्सअॅपसारख्या चावडीवरून शुभेच्छा दिल्या जात नाहीत तर थोपल्या जातात असेच म्हणण्यासारखा अनुभव येतो. दिवाळीतही तेच झाले. या पर्वात चार-पाच सण सामावलेले असल्याने प्रत्येक दिनाच्या वेगवेगळ्या शुभेच्छांचा मारा झालेला दिसला. गंमत अशी की, अगोदर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज या पाचही तिथींचा एकत्रित शुभेच्छा संदेश दिला गेला आणि नंतर पुन्हा प्रत्येक दिनी स्वतंत्रपणे त्या दिनाला साजेशे संदेशही पाठविले गेले. त्यामुळे अनेकांना संदेश वाचण्याऐवजी ते ‘क्लिअर’ करण्याचे म्हणजे मिटवण्याचेच काम लागून गेल्याचे पाहावयास मिळाले. यंदा या माध्यमाने स्टीकर्स पाठविण्याचीही सोय करून दिलेली असल्याने शुभेच्छुकांनी ‘होलसेल’पणे स्टिकर्सही पाठविले. त्यामुळे एकीकडे बदलत्या काळानुरूप प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येत असताना दुसरीकडे सोशल मीडियातून शुभेच्छा संदेशांच्या अतिरेकी आदान-प्रदानाद्वारे ई-कचऱ्यात मोठी भर घातली गेली.
सोशल मीडियाच्या हाताळणी अगर वापराबाबतच्या एटीकेट्सचा म्हणजे शिष्टाचाराचा मुद्दा यामुळेच महत्त्वाचा ठरावा. ‘या भावात’ गावभरच्यांना शुभेच्छा देता येतात म्हणून या माध्यमावर पडीक असलेले बहुतेकजण इकडच्या संदेशाची तिकडे पाठवणूक करतात. पण त्यातील भाव-भावनांना उधार-उसनवारीचा संदर्भ असतो, हे लक्षातच घेतले जात नाही. शिवाय, एकदा एखाद्या ग्रुपमध्ये शुभेच्छा देऊन झाल्यावर त्या ग्रुपमधील प्रत्येक एकेका सदस्यांना पुन्हा वेगळे संदेश देण्याची गरज नसते, तसेच एकदा शुभेच्छा दिल्यावर काही वेळाने दुसरा कुणाचा चांगल्या मजकुराचा संदेश अथवा स्टिकर आले म्हटल्यावर तेही फॉरवर्ड करणे हे आपल्या उचलेगिरीची साक्ष पटवून देणारेच असते, मात्र या अशा साध्या साध्या गोष्टी पाळल्या जात नाहीत. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत रोज शुभेच्छा देणाऱ्यांना ‘काय निवडणुकीला उभे राहायचेय की काय’ या प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ त्यातूनच आली. शेवटचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संदेश असोत की शुभेच्छा; त्यांच्या भडिमाराने ते वाचणाऱ्या अथवा पाहणाऱ्या व्यक्तीच्या वेळेचा जो अपव्यय (वेस्टेज आॅफ मॅन अवर्स) घडून येतो, त्याची भरपाई कशी होणार? वेळ नाही असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे सोशल मीडियातल्या अवाजवी, अतिरेकी संदेशात अडकून वा गुंतून पडायचे हे राष्ट्रीय संपत्तीच्या हानीसारखेच म्हणता यावे. पण लक्षात कोण घेतो? ‘आहे ना नेटपॅक, मग राहा कनेक्ट’ असाच विचार केला जाणार असेल तर यापेक्षा दुसरे काय होणार? सामाजिक माध्यमांच्या हाताळणीत शिष्टाचाराची गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे.

No comments:
Post a Comment