Wednesday, November 14, 2018

Editors view published in Online Lokmat on 15 Nov, 2018

मानसिकता बदलाचीच गरज !

किरण अग्रवाल

शिक्षणाने विचारांच्या कक्षा रुंदावतात, जाणिवा प्रगल्भ होतात वगैरे सारे खरे; परंतु तरी शिकली-सवरलेली माणसे जेव्हा एखाद्या अडाण्यासारखे काम करून बसतात तेव्हा शिक्षणातून बाजूला पडलेल्या मूल्याधिष्ठितपणाकडे लक्ष वेधले जाणे क्रमप्राप्त ठरून जाते. मुलगा व मुलीमधील भेद कमी होऊन समाजात स्त्री-पुरुष समानता बऱ्यापैकी वाढीस लागली असताना, तसेच कन्या जन्माचे जागोजागी स्वागत सोहळे केले जात असताना; मुलीला जन्म दिल्याच्या कारणातून एका उच्चविद्याविभूषित प्राध्यापकाने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या पत्नीस घराबाहेर काढून दिल्याची घटना समोर आल्याचे पाहता त्यातूनही हाच मूल्य वा नीतिशिक्षणाचा अभाव उजागर होणारा आहे.




मुलालाच वंशाचा दिवा मानण्याचा एकांगी विचार त्यागून मुलीलादेखील मुलाप्रमाणेच वाढवण्याची मानसिकता दिवसेंदिवस बळावते आहे, याबद्दल दुमत असू नये. मूलबाळ नसलेल्या दाम्पत्यांकडून दत्तक म्हणून स्वीकारल्या जाणा-या बाळांमध्ये मुलींना अधिक मागणी असल्याचे शुभवर्तमान आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत आपण कुठेच कशातच कमी अगर मागे नसल्याचे महिलांनी सिद्ध केले आहे. स्त्री-पुरुष समानतेची जाणीव त्यातूनच प्रगाढ होत गेली आहे. शिक्षणाने येणारी समज व सामाजिक संस्थांनी चालविलेले जनजागरण यासंदर्भात कामी येते आहेच, शिवाय स्त्रीभ्रूणहत्येविरोधातील कायदा असल्यानेही काहीसा धाक बसला आहे. अर्थात, तरी गर्भलिंग निदान करून घेऊन गर्भपात केले जात असल्याचे प्रकार पूर्णत: बंद झालेले नाहीत. तसे करणारे अधून-मधून पकडले जात असतातच; परंतु व्यापक प्रमाणावर पाहता कन्या जन्माचे स्वागत करणारे वाढले आहेत हे नक्की. मध्यंतरी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील एका गावात घरांच्या दारावर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. त्यातूनही मुलींबद्दलच्या वाढत्या सन्मानाचीच भावना प्रदर्शित झाली. शासनातर्फेही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. पण हे सारे सकारात्मक चित्र एकीकडे आकारास आलेले असताना बुरसटलेल्या विचारातून बाहेर न पडलेल्यांचे प्रताप जेव्हा पुढे येतात व त्यातही शिक्षितांचा सहभाग आढळून येतो तेव्हा त्यांची कीव करण्यावाचून गत्यंतर उरत नाही.

नाशकातील एका प्राध्यापकाने अशाच मागास विचारातून, मुलीला जन्म देणाºया आपल्या पत्नीस घराबाहेर काढून दिल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात नोंदविली गेली आहे. प्रियंका गोसावी असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या प्रियंकाच्या आयुष्यात कन्येचे आगमन झाले तेव्हापासून पती व सासू-सासºयांकडून छळाला सामोरे जावे लागत होते, असे तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. यासंबंधीचा न्यायनिवाडा यथावकाश होईलच; परंतु प्रातिनिधिक तक्रार म्हणून याकडे पाहता येणारे आहे, कारण शहरातला निवास व शिक्षण आदी असूनही केवळ मुलीला जन्म दिल्याने म्हणजे ‘नकोशी’मुळे एखाद्या विवाहितेवर घराबाहेर काढले जाण्याची वेळ येत असेल तर वंशासी निगडित एकांगी विचारधारेची जळमटे अद्याप पूर्णत: दूर झाली नसल्याचेच त्यातून स्पष्ट व्हावे. येथे शहरी रहिवासाचा व शिक्षणाचा संदर्भ एवढ्याचसाठी की, त्याने म्हणून व्यक्तीच्या शहाणपणाचे आडाखे हल्ली बांधले जातात. पण, अशी उदाहरणे समोर आली की त्यातील तकलादूपणा लक््षात येतो. अडाणी बरे असे म्हणण्याची वेळ येते कारण ते लोकलज्जा तरी बाळगतात. थोडक्यात, ब-या-वाईटाची अगर योग्य-अयोग्याची समज लाभण्यासाठी शिक्षणाचा दागिनाच कामी येणारा असला, तरी तो मूल्याच्या धाग्यात ओवलेला असणे गरजेचे आहे, एवढाच यातील मथितार्थ.

No comments:

Post a Comment