Thursday, August 27, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 27 August, 2020

नाशिककरांना संकटातही दिलासा... 

शहर विकासाच्या वाटेवर वेगाने अग्रेसर


किरण अग्रवाल

संकटे ही कोणतीही व कुठल्याही स्तरावरची असोत, ती परीक्षा पाहणारीच असतात. यातही नैसर्गिक आपत्तीचे वा महामारीसारखे संकट असेल तर एकूणच समाजमन धास्तावून जाते. अशास्थितीत निराशेचे मळभ दाटून येणेही स्वाभाविक असते; पण याचकाळात जेव्हा दोन चार का होईना चांगल्या बाबीही घडून येतात तेव्हा मनाला उभारी मिळून खऱ्या अर्थाने पुनश्च हरिओमला बळ लाभून जाते. नाशिककर याच स्थितीचा सध्या अनुभव घेत आहेत. एकीकडे कोरोनाच्या संकटाने चिंता वाढवून ठेवलेली असतानाच दुसरीकडे स्वच्छताविषयक सर्वेक्षणात तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराने चांगली मजल मारल्याने आशादायी भविष्याची स्वप्ने रेखाटण्यासाठी संधी उपलब्ध होऊन गेली आहे.



कोरोनाच्या संकटाने सारे जगच धास्तावलेले आहे, त्याला आपला देश किंवा राज्यही अपवाद ठरू शकलेले नाही; किंबहुना कोरोनाबाधितांच्या प्रमाणात महाराष्ट्र अग्रेसरच आहे. यातही राज्यातील ज्या मोठ्या शहरातील परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही त्यात नाशिकचाही समावेश आहे. प्रारंभीच्या काळात जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता व नाशिक तसे सुरक्षित राहिले होते; परंतु नंतर परिस्थिती बदलत गेली व आज मालेगावमधील स्थिती आटोक्यात आलेली दिसत असताना नाशकातील अवस्था मात्र चिंता करावी अशीच आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० हजारांच्या पार गेला असून, बळींची संख्याही पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचू पाहते आहे. अर्थात, आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, बळींचा दरही कमी होत आहे हे त्यातल्या त्यात समाधानकारक म्हणावे, पण भय कमी होत नाही हे खरे. याचा परिणाम एकूणच उद्योगधंद्यांवर झाला असून, अनलॉक असतानाही व्यवसायांना चालना मिळू शकलेली नाही. एक प्रकारचे हबकलेपण आले असून, अशा स्थितीत शहराशी संबंधित चांगल्या वार्ता पुढे आल्याने मानसिक पातळीवर इम्युनिटीत वाढ होण्यास पूरक स्थिती निर्माण होऊन गेली आहे.



नाशिक शहर विकासाच्या वाटेवर वेगाने अग्रेसर होत आहे. येथील ऐतिहासिक व पौराणिक महत्तेला आल्हाददायक हवामानाची लाभून गेलेली जोड आणि मुंबईप्रमाणेच या शहरात येणाऱ्या प्रत्येकाच्या पोटापाण्याची होणारी व्यवस्था पाहता जो येतो तो नाशिकचा आशिक बनून गेल्याशिवाय राहत नाही. शासकीय पातळीवरही मुंबई-पुण्यासोबतच्या सुवर्णत्रिकोणात नाशिकला गणले गेले आहे, येथील पर्यटकीय व दळणवळणाच्या व्यवस्थाही आता खूप सुधारल्या आहेत. त्यामुळे लिव्हेबल सिटीच्या यादीत नाशिकचे नाव आलेलेच आहे, आता स्वच्छतेच्या व स्मार्ट सिटीच्या यादीतही नाशिकची धडक कामगिरी दिसून आल्याने त्याचा भविष्यकालीन वाटचालीवर सकारात्मक परिणाम होण्याची आशा बळावून गेली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात ६७वरून देशात अकराव्या क्रमांकावर नाशिक राहिले. राज्यात मुंबईनंतर नाशिकचा दुसरा क्रमांक लागला तर स्मार्ट सिटी योजनेत नाशिकने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आदी शहरांना मागे टाकत नाशिकने मिळवलेले हे यश केवळ दिलासादायीच नव्हे तर भविष्यातील येथल्या संधी अधोरेखित करणारेही म्हणता यावे.



विशेषत: कोरोनाच्या आजच्या संकटकाळात एकूणच सार्वत्रिक पातळीवर नैराश्याचे व नाउमेदीचे वातावरण असताना या सुवार्ता पुढे आल्या आहेत, आणि त्यादेखील अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने; त्यामुळे नाशिककरांसाठी आशेचे दीप लागून गेलेत म्हणायचे. या दोन्ही बाबतीत नाशिक महापालिका प्रशासनाचे परिश्रम महत्त्वाचे राहिले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली असली तरी त्यांनी अल्पावधीत प्रशासनावर मांड पक्की करून स्वच्छता व स्मार्ट सिटीच्या बाबतीतही नजरेत भरणारी प्रगती साधून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन उपक्रमांच्या बाबतीत आरंभशूरतेचाच अनुभव येतो, नंतर सारेच ढेपाळतात; परंतु गमे यांनी प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढवून त्यात सातत्य राखले. शिवाय नाशिककरांचा लोकसहभाग मिळवण्यातही ते यशस्वी ठरले, त्यामुळेच नाशिकला या संबंधातला लौकिक लाभू शकला. या लौकिकातून लाभलेली आश्वासकता व सकारात्मकता यापुढील काळात शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्यास नक्कीच लाभदायी ठरण्याची अपेक्षा आहे.  

https://www.lokmat.com/editorial/relieve-nashik-residents-even-times-crisis-rapidly-path-city-development-a629/




Thursday, August 20, 2020

Independence Day 2020

 दि 15 August 2020 · नाशिक  · 





झंडा उंचा रहे हमारा ... 

लोकमत अंबड कार्यालयात आज आय टी विभागाचे प्रमुख विनोद गायधनी यांच्या हस्ते 

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. 

याप्रसंगी सहकारींसमवेतची ही छायाचित्रे...

#LokmatNashik #LokmatIndependanceday2020

#EditorsView published in Online Lokmat on 20 August, 2020

 बाप्पा यावे, दु:ख हरावे...!

किरण अग्रवाल

खरे तर गजानना गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारात तेजीचे व उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव म्हणजे मंगलमूर्तीचा उत्सव, त्यामुळे स्वाभाविकच मांगल्याचा हा सण चराचरात आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा संचार पेरून जातो. पेरून हा शब्द येथे मुद्दाम यासाठी की, बळीराजाच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या आहेत. काळ्या मातीतली बीजे अंकुरायला लागली आहेत. नवतीच्या या आगमनाने सृष्टी तर हिरवाईने नटली व सजली आहेच; पण या नवोन्मेषी अंकुरांनी अन्नदात्याच्या मनात उज्ज्वल भविष्याची जी स्वप्नेदेखील पेरली आहेत ती उबविण्यासाठी बाप्पांच्या उत्सवातील ऊर्जेची पेरणीच साहाय्यभूत ठरणार आहे. भीतीच्या व निराशेच्या सद्यस्थितीत तेच गरजेचे आहे.

यंदा गणरायाचे आगमन एका संकट स्थितीत होत आहे. कोरोनाच्या महामारीचे हे संकट साधेसुधे नाही तर जागतिक पातळीवरचे आहे. गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून घोंगावत असलेल्या या संकटाने संपूर्ण जगाला अडचणीत आणून ठेवले आहे. जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेचे ट्रम्पसाहेबही आपल्याइतकेच परेशान आहेत. कोरोनामुळे होणारे बाधित व बळी अशा दोन्हींची वाढती संख्या भीतीत भर घालणारीच ठरली असून, त्यामुळेच निराशेचे वातावरणही दाटून येणे क्रमप्राप्त ठरले आहे. या संकटामुळे अर्थव्यवस्थेची चाके अडखळली असून, अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. पोटापाण्यासाठी बाहेर गेलेल्या असंख्य लोकांचे स्थलांतर घडून आले असून, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमिक (सीएमआयई)च्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार लॉकडाऊनच्या काळात सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांनी नोकºया गमावल्या आहेत. संकटातून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पथ्यपाणी पाळताना आॅनलाइन प्रणालीचा जागर घडून आल्याने यापुढील काळातही अनेक व्यावसायिक व व्यक्तींवर त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम घडून येण्याची चिन्हे आहेत. हाताला काम मिळणार नाही तर पोटाला घास कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित होऊ घातला आहे. समाजातील एक असा घटक नाही की ज्याला कोरोनाचा फटका बसलेला नाही, सारेच हतबल झाले आहेत. निराशेचे वातावरण आहे ते त्यामुळे.



बाप्पा स्वत: संकटमोचक, विघ्नहर्ता - दु:खहर्ता आहेत; पण तरी बाप्पांच्या उत्सवालाही कोरोनाच्या सावटाचा फटका बसून गेला आहे. मांडवाचे आकार कमी करावे लागत असून, मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत. मिरवणुकांना बंदी असून, या उत्सवातील सार्वजनिकता टाळून हे पर्व साजरे करण्याची वेळ आली आहे. अर्थात, असे असले तरी बाप्पांच्या आगमनापूर्वीच निराशेचे ढग दूर करणाºया गोष्टीही घडत आहेत. कोरोनाच्याच बाबतीत बोलायचे तर देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णवाढीचा दर घटून ०.५ टक्क्यांवर आला आहे. बरे होणाºयांचे म्हणजे कोरोनामुक्त होणाºयांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात रिकव्हरीचा रेट दहा टक्क्याने वाढला आहे ही समाधानाची बाब आहे. समाजमनात पसरलेली भीती ओसरायला यामुळे मदत होणार आहे. न्यू नॉर्मलच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, व्यवहार हळूहळू सुरळीत होऊ पहात आहेत. बाप्पांचे आगमन होत असतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आंतरजिल्हा बसेस सुरू होत आहेत. भय वा भीती आहे हे खरेच; परंतु किती दिवस या भयाला कवटाळून बसणार? त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ घातले आहे. अशात गणेशोत्सव आल्याने निराशा झटकून टाकत उत्साह, ऊर्जा-चैतन्याचे वातावरण निर्माण होऊ घातले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत आहेच शिवाय यंदा पाऊसही समाधानकारक झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. पूर्वोत्तर भारतात तर प्रचंड पाऊस झाल्याने तेथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशात पुरामुळे बळी जात आहेत इतका पाऊस धो धो बरसत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत सोळा टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. अपवादवगळता बहुतेक धरणांतील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचला आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचन व उद्योगांसाठीही पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होईल असे हे चित्र आहे. कधी नव्हे ते वरुणराजाने मराठवाड्यावरही कृपा केल्याने जायकवाडी धरण ६६ टक्के भरल्यामुळे तेथील जनता पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्याचे म्हणता यावे. सर्व ठिकाणच्या या पावसामुळे यंदा शेत-शिवार बहरून आल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढण्याची आशा बळावली आहे. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनापूर्वीच असे सारे मंगल मंगल वातावरण आकारास आलेले आहे. तेव्हा गणेशोत्सवाच्या दश दिनात उरलेसुरले निराशेचे मळभ दूर दूर होऊन समाजमनात चैतन्य साकारण्याची शुभचिन्हे आहेत, त्यासाठी बाप्पा यावे, आम्ही आपल्या स्वागतास आतुर आहोत!  

https://www.lokmat.com/editorial/let-bappa-come-let-sorrow-be-defeated-a642/

Thursday, August 13, 2020

#EditorsView published in Lokmat Online on 13 August, 2020

 मरणानंतरही जगूया...


किरण अग्रवाल

खरे तर हे विधान काहीसे अचंबित करणारे नक्कीच आहे, कारण मृत्यू म्हणजे अखेर वा आयुष्याची समाप्ती; तेव्हा मरणानंतर जगणे कसे शक्य आहे असा भाबडा प्रश्न यातून स्वाभाविकपणे उपस्थित व्हावा. पण, तो भाबडा अशासाठी की विज्ञानाने या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकालाच उपलब्ध करून दिले असून, आता मरणानंतरही जगणे शक्य झाले आहे. ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ या म्हणीत किंचितसा बदल करून या मृत्यूनंतरच्या जगण्याचा अनुभव घेता येणारा आहे. कुणाचीही कीर्ती ही त्याच्या सत्कार्याने पसरते. हे सत्कार्य अवयवदानाच्या रूपाने केले गेले तर ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असे म्हणता येईल. आज त्यासाठीच्याच सत्कार्याचा संकल्प सोडण्याची गरज आहे.

मरण हे अटळ आहे, याबद्दल वाद असू नये. विज्ञानाने साधलेल्या प्रगतीच्या बळावर मरण लांबवता येत असले तरी ते टाळता येणे शक्य झालेले नाही. पण या विज्ञानाने एक वरदान मात्र नक्कीच मिळाले आहे ते म्हणजे, आपल्या मृत्यूनंतर देहदान किंवा अवयवदानाच्या माध्यमातून आपण मरणानंतरही या जगात राहू शकतो. दान केलेल्या डोळ्यांनी जग पाहू शकतो, हृदयाने समाजजीवनाची स्पंदने अनुभवू शकतो; इतरही अवयवांच्या माध्यमातून कीर्तिवंत होऊ शकतो. ही खरे तर अनुभूतीची किंवा अध्यात्माचीच प्रक्रिया म्हणायला हवी. अनुभूती ही विचारातून कृतीप्रवणतेकडे नेणारी, दिव्यतेच्या जवळ जाणारी प्रक्रिया असते. अध्यात्म म्हणजे तरी काय, आत्म्याच्या शुद्धीतून घडून येणाऱ्या सत्कार्याची अगर सत्कर्माची प्रेरणाच ना! तेच तर यासंदर्भात अपेक्षित आहे. त्यामुळे संवेदनशीलता जपणाऱ्या व जाणिवा प्रगल्भ असणाऱ्यांकडून याबाबत समाजमन घडवून त्यासाठीच्या मोहिमेला गती दिली जाणे गरजेचे आहे. देहदान किंवा अवयवदानाबाबत शासनस्तरावर भरकस प्रयत्न सुरू आहेतच, राज्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आकारास आल्यानंतर या प्रयत्नांना अधिक गती मिळालेली दिसत आहे व देशात महाराष्ट्रातील स्थिती त्यातल्या त्यात समाधानकारक म्हणता यावी अशी आहे हेदेखील खरे; परंतु अवयवदानाच्या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यायचे असेल तर समाजातील जाणत्या व समाजसेवी व्यक्तींनी तसेच संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे, कारण मरणानंतरच्या मोक्षप्राप्तीचा तोच खरा मार्ग म्हणता यावा इतके ते गरजेचे झाले आहे.



भारताची १३५ कोटी लोकसंख्या बघता याबाबतीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी, अवयवदानाच्या बाबतीत आपण कमालीचे पिछाडीवर आहोत. दहा लाख लोकांमागे अवघे ०.०८ एवढेच हे प्रमाण आपल्याकडे आढळून येते. तेव्हा हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वच पातळीवरून जनजागृती होणे व त्यासंदर्भातील शास्रीय किंवा वैद्यकीय माहिती प्रसृत करून जनतेत असणारे गैरसमज दूर केले जाणे गरजेचे आहे. आधुनिक वैद्यकशास्रामुळे अवघड वाटणाऱ्या शस्रक्रियादेखील आता सुलभ झाल्या असून, देहाची विटंबना किंवा विद्रूपीकरण न होताही अनेक अवयव हे दान केले जाऊ शकतात. या अवयवांच्या माध्यमातून अनेक गरजूंचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊन ते चांगले जीवन जगू शकतात. पण यासाठी विदेशामध्ये जसा प्रतिसाद लाभताना दिसतो तसा आपल्याकडे अद्याप लाभताना दिसत नाही. आकडेवारीच द्यायची झाल्यास, उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात २०१८ मध्ये मस्तिष्क स्तंभ मृत झालेल्या अवघ्या १३५ व्यक्तींकडून अवयवदान केले गेले. कार्निया अपारदर्शक झाल्याने भारतात दरवर्षी ३० लाख लोक अंध होतात, यातील ६० टक्के प्रमाण हे मुलांचे असते. नेत्रदानाचे प्रमाण वाढले तर इतकी मुले दात्यांच्या डोळ्यांनी जग पाहू शकतील. डोळे, हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत, त्वचा आदी अवयवदान केले जाऊ शकतात व त्यासाठी अवयव प्रत्यारोपण कायदादेखील पारित केला गेला आहे. तेव्हा गरज आहे ती समाजमन घडवून अवयवदान मोहिमेला गती देण्याची.



रक्तदानाबाबत जागृती झाल्याने त्यासाठी जसा प्रतिसाद मिळतो तशीच जनजागृती अवयवदानाबाबत झाली तर अनेकांच्या आयुष्यात नवे बळ भरता येऊ शकेल. बऱ्याचदा असेही अनुभवास येते की, एखाद्या व्यक्तीकडून मृत्यूपश्चात अवयवदानाची इच्छा जाहीर केलेली असते; परंतु तशी वेळ आल्यावर कुटुंबीयांकडून रजामंदी होत नाही. अशा समयी समाजातील धुरिणांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे बनते. नेतृत्व करणारे सजग तर समाज सजग, अशादृष्टीने ही मोहीम पुढे नेता येणारी आहे. विशेषत: कोरोनाच्या संकटाने आयुष्य हे किती क्षणभंगुर आहे याची जाणीव अनेकांना होऊन गेली असावी. केव्हा काय होईल याचा भरोसा राहिलेला नाही. कोरोना टळला तरी मृत्यू काही कुणाला टळणार नाही, तेव्हा मृत्यूपश्चातही कीर्तिवंत राहायचे असेल तर सर्वांनीच यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजच्या अवयवदान दिनाच्या निमित्ताने त्यासाठीचा संकल्प आपण सारे करूया, इतकेच या निमित्ताने...

https://www.lokmat.com/editorial/lets-live-after-death-donating-organs-a584/

Thursday, August 6, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 06 August, 2020

आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची!

किरण अग्रवाल

अयोध्येत पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या राममंदिर निर्माणाच्या भूमिपूजनामुळे कोट्यवधी रामभक्तांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनात बाळगलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ झाला आहे. लवकरच निर्धारित कालावधीत मंदिर साकारलेले बघण्याची आस बळावून गेली आहेच; पण ते होताना खुद्द मोदी यांनीच यावेळी उल्लेखिलेल्या देशातील ‘रामायण सर्किट’च्या विकासाबाबतही अपेक्षा उंचावून जाणे स्वाभाविक ठरले आहे.



भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी प्रभू श्रीराम हे श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर असावे असे तमाम भाविकांचे स्वप्न राहिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने या स्वप्नाची पूर्तता होतानाचा अनुभव समस्त रामभक्त घेत आहेत. या सोहळ्यासाठी शरयू तटावरील अयोध्या नगरी तर सजलेली दिसलीच; परंतु त्याचसोबत देशभरातही जे उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण दिसले त्यातून जना-जनांच्या मनामनात वसलेल्या रामाचा प्रत्यय यावा. विशेष म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श लाभलेली देशभरातील जी काही ठिकाणे आहेत तेथील रामभक्तांचा आनंदही अवर्णनीय असा राहिला. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचा काळ जेथे व्यतीत केला त्या नाशिक पंचवटीसह नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्येही त्यांचा पदस्पर्श लाभल्याचे उल्लेख आढळतात, त्यामुळे या ठिकाणांवरही राममंदिर भूमिपूजनाचा अपूर्व आनंद व्यक्त झालेला दिसला. कोरोनाचे संकट लक्षात घेता या आनंदाला मर्यादा आलेल्या असतानाही तो ओसंडून वाहिला. अनेक ठिकाणी गुढ्या उभारल्या गेल्या तर मंदिरांमध्ये पूजा-अर्चनेसह घंटानाद व शंखध्वनी केले गेले. राज्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण असलेल्या नाशकात प्रख्यात रामकुंडावर यानिमित्त आरती करून कोरोनाच्या संकटापासून लवकर सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केली गेली.



महत्त्वाचे म्हणजे अयोध्येतील भूमिपूजनाचा सोहळा समस्त भाविक दूर चित्रवाहिन्यांच्या माध्यमातून तन्मयतेने ऐकत होते व डोळ्यात साठवत होते. त्यामुळे भूमिपूजनानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या मंदिर निर्माण बरोबरच देशातील प्रस्तावित रामायण सर्किटच्या विकासाचा मुद्दा उल्लेखिताच संबंधित ठिकाणच्या भाविकांच्या अपेक्षा उंचावून गेल्या. प्रभू श्रीरामांनी देशभरात जेथे-जेथे भेटी दिल्या ती ठिकाणे विकसित करून त्याचे पर्यटकीय महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने रामायण सर्किटची योजना आखण्यात आली आहे. अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मंदिरामुळे यापुढील काळातील तेथील अर्थकारणाला चालना मिळून जाईल, असे मोदी यांनी सांगितले, त्यानुसारच रामायण सर्किटमधील स्थानकांचा विकास केला गेल्यास त्या त्या परिसरातील अर्थकारणालाही गती मिळेल, म्हणूनच आता राममंदिर भूमिपूजनानंतर रामायण सर्किटच्या विकासाची अपेक्षा केली जात आहे.



श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान न्यासच्या यादीत प्रभू श्रीरामांनी भारत भूमीत २९० ठिकाणी भेटी दिल्याचा उल्लेख आहे. या यादीचा विचार करता यात महाराष्ट्रातील ४५ स्थानांचा उल्लेख आहे. विशेषकरून श्रीरामांनी जेथे वनवासाचा अधिक काळ व्यतीत केला व जेथून सीताहरण झाले तसेच शूर्पणखेचे लक्ष्मणाकडून नाक कापले गेल्याचे दाखले पुराणात आढळतात त्या नाशिकमध्ये यासंबंधीच्या खुणा आजही जपल्या गेल्या आहेत. सिंहस्थाचे स्नान होणारे प्रख्यात रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन, रामशेज किल्ला, सीता सरोवर, जटायू कथा जेथे घडून आली ते सर्वतीर्थ टाकेद आदी ठिकाणांचा यात उल्लेख करता येणारा आहे. त्यामुळे रामायण सर्किट अंतर्गत नाशिकमधील या खुणांच्या विकासाची आस आहे. मध्यंतरी या दृष्टीने नाशिक व नागपूरच्या विकासासाठी एका सल्लागार समितीकडून आराखडा बनविला गेला होता व त्या आधारे केंद्र सरकारकडे सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यटन विभागाकडे वारंवार पाठपुरावाही चालविला आहे, तेव्हा खुद्द पंतप्रधानांनीच आता रामायण सर्किटचा उल्लेख केल्याने रामाचा पदस्पर्श लाभलेल्या सर्वच ठिकाणांच्या विकासाला चालना लाभायला हवी. केंद्रात प्रतिनिधित्व करणा-या लोकप्रतिनिधींनी आता यासंदर्भात अधिक सक्रिय होत तगादा लावण्याची गरज आहे.