नाशिककरांना संकटातही दिलासा...
शहर विकासाच्या वाटेवर वेगाने अग्रेसर
किरण अग्रवाल
संकटे ही कोणतीही व कुठल्याही स्तरावरची असोत, ती परीक्षा पाहणारीच असतात. यातही नैसर्गिक आपत्तीचे वा महामारीसारखे संकट असेल तर एकूणच समाजमन धास्तावून जाते. अशास्थितीत निराशेचे मळभ दाटून येणेही स्वाभाविक असते; पण याचकाळात जेव्हा दोन चार का होईना चांगल्या बाबीही घडून येतात तेव्हा मनाला उभारी मिळून खऱ्या अर्थाने पुनश्च हरिओमला बळ लाभून जाते. नाशिककर याच स्थितीचा सध्या अनुभव घेत आहेत. एकीकडे कोरोनाच्या संकटाने चिंता वाढवून ठेवलेली असतानाच दुसरीकडे स्वच्छताविषयक सर्वेक्षणात तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराने चांगली मजल मारल्याने आशादायी भविष्याची स्वप्ने रेखाटण्यासाठी संधी उपलब्ध होऊन गेली आहे.
कोरोनाच्या संकटाने सारे जगच धास्तावलेले आहे, त्याला आपला देश किंवा राज्यही अपवाद ठरू शकलेले नाही; किंबहुना कोरोनाबाधितांच्या प्रमाणात महाराष्ट्र अग्रेसरच आहे. यातही राज्यातील ज्या मोठ्या शहरातील परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही त्यात नाशिकचाही समावेश आहे. प्रारंभीच्या काळात जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता व नाशिक तसे सुरक्षित राहिले होते; परंतु नंतर परिस्थिती बदलत गेली व आज मालेगावमधील स्थिती आटोक्यात आलेली दिसत असताना नाशकातील अवस्था मात्र चिंता करावी अशीच आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० हजारांच्या पार गेला असून, बळींची संख्याही पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचू पाहते आहे. अर्थात, आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, बळींचा दरही कमी होत आहे हे त्यातल्या त्यात समाधानकारक म्हणावे, पण भय कमी होत नाही हे खरे. याचा परिणाम एकूणच उद्योगधंद्यांवर झाला असून, अनलॉक असतानाही व्यवसायांना चालना मिळू शकलेली नाही. एक प्रकारचे हबकलेपण आले असून, अशा स्थितीत शहराशी संबंधित चांगल्या वार्ता पुढे आल्याने मानसिक पातळीवर इम्युनिटीत वाढ होण्यास पूरक स्थिती निर्माण होऊन गेली आहे.
नाशिक शहर विकासाच्या वाटेवर वेगाने अग्रेसर होत आहे. येथील ऐतिहासिक व पौराणिक महत्तेला आल्हाददायक हवामानाची लाभून गेलेली जोड आणि मुंबईप्रमाणेच या शहरात येणाऱ्या प्रत्येकाच्या पोटापाण्याची होणारी व्यवस्था पाहता जो येतो तो नाशिकचा आशिक बनून गेल्याशिवाय राहत नाही. शासकीय पातळीवरही मुंबई-पुण्यासोबतच्या सुवर्णत्रिकोणात नाशिकला गणले गेले आहे, येथील पर्यटकीय व दळणवळणाच्या व्यवस्थाही आता खूप सुधारल्या आहेत. त्यामुळे लिव्हेबल सिटीच्या यादीत नाशिकचे नाव आलेलेच आहे, आता स्वच्छतेच्या व स्मार्ट सिटीच्या यादीतही नाशिकची धडक कामगिरी दिसून आल्याने त्याचा भविष्यकालीन वाटचालीवर सकारात्मक परिणाम होण्याची आशा बळावून गेली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात ६७वरून देशात अकराव्या क्रमांकावर नाशिक राहिले. राज्यात मुंबईनंतर नाशिकचा दुसरा क्रमांक लागला तर स्मार्ट सिटी योजनेत नाशिकने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आदी शहरांना मागे टाकत नाशिकने मिळवलेले हे यश केवळ दिलासादायीच नव्हे तर भविष्यातील येथल्या संधी अधोरेखित करणारेही म्हणता यावे.
विशेषत: कोरोनाच्या आजच्या संकटकाळात एकूणच सार्वत्रिक पातळीवर नैराश्याचे व नाउमेदीचे वातावरण असताना या सुवार्ता पुढे आल्या आहेत, आणि त्यादेखील अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने; त्यामुळे नाशिककरांसाठी आशेचे दीप लागून गेलेत म्हणायचे. या दोन्ही बाबतीत नाशिक महापालिका प्रशासनाचे परिश्रम महत्त्वाचे राहिले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली असली तरी त्यांनी अल्पावधीत प्रशासनावर मांड पक्की करून स्वच्छता व स्मार्ट सिटीच्या बाबतीतही नजरेत भरणारी प्रगती साधून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन उपक्रमांच्या बाबतीत आरंभशूरतेचाच अनुभव येतो, नंतर सारेच ढेपाळतात; परंतु गमे यांनी प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढवून त्यात सातत्य राखले. शिवाय नाशिककरांचा लोकसहभाग मिळवण्यातही ते यशस्वी ठरले, त्यामुळेच नाशिकला या संबंधातला लौकिक लाभू शकला. या लौकिकातून लाभलेली आश्वासकता व सकारात्मकता यापुढील काळात शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्यास नक्कीच लाभदायी ठरण्याची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment