बाप्पा यावे, दु:ख हरावे...!
किरण अग्रवाल
खरे तर गजानना गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारात तेजीचे व उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव म्हणजे मंगलमूर्तीचा उत्सव, त्यामुळे स्वाभाविकच मांगल्याचा हा सण चराचरात आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा संचार पेरून जातो. पेरून हा शब्द येथे मुद्दाम यासाठी की, बळीराजाच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या आहेत. काळ्या मातीतली बीजे अंकुरायला लागली आहेत. नवतीच्या या आगमनाने सृष्टी तर हिरवाईने नटली व सजली आहेच; पण या नवोन्मेषी अंकुरांनी अन्नदात्याच्या मनात उज्ज्वल भविष्याची जी स्वप्नेदेखील पेरली आहेत ती उबविण्यासाठी बाप्पांच्या उत्सवातील ऊर्जेची पेरणीच साहाय्यभूत ठरणार आहे. भीतीच्या व निराशेच्या सद्यस्थितीत तेच गरजेचे आहे.
यंदा गणरायाचे आगमन एका संकट स्थितीत होत आहे. कोरोनाच्या महामारीचे हे संकट साधेसुधे नाही तर जागतिक पातळीवरचे आहे. गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून घोंगावत असलेल्या या संकटाने संपूर्ण जगाला अडचणीत आणून ठेवले आहे. जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेचे ट्रम्पसाहेबही आपल्याइतकेच परेशान आहेत. कोरोनामुळे होणारे बाधित व बळी अशा दोन्हींची वाढती संख्या भीतीत भर घालणारीच ठरली असून, त्यामुळेच निराशेचे वातावरणही दाटून येणे क्रमप्राप्त ठरले आहे. या संकटामुळे अर्थव्यवस्थेची चाके अडखळली असून, अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. पोटापाण्यासाठी बाहेर गेलेल्या असंख्य लोकांचे स्थलांतर घडून आले असून, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमिक (सीएमआयई)च्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार लॉकडाऊनच्या काळात सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांनी नोकºया गमावल्या आहेत. संकटातून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पथ्यपाणी पाळताना आॅनलाइन प्रणालीचा जागर घडून आल्याने यापुढील काळातही अनेक व्यावसायिक व व्यक्तींवर त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम घडून येण्याची चिन्हे आहेत. हाताला काम मिळणार नाही तर पोटाला घास कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित होऊ घातला आहे. समाजातील एक असा घटक नाही की ज्याला कोरोनाचा फटका बसलेला नाही, सारेच हतबल झाले आहेत. निराशेचे वातावरण आहे ते त्यामुळे.
बाप्पा स्वत: संकटमोचक, विघ्नहर्ता - दु:खहर्ता आहेत; पण तरी बाप्पांच्या उत्सवालाही कोरोनाच्या सावटाचा फटका बसून गेला आहे. मांडवाचे आकार कमी करावे लागत असून, मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत. मिरवणुकांना बंदी असून, या उत्सवातील सार्वजनिकता टाळून हे पर्व साजरे करण्याची वेळ आली आहे. अर्थात, असे असले तरी बाप्पांच्या आगमनापूर्वीच निराशेचे ढग दूर करणाºया गोष्टीही घडत आहेत. कोरोनाच्याच बाबतीत बोलायचे तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णवाढीचा दर घटून ०.५ टक्क्यांवर आला आहे. बरे होणाºयांचे म्हणजे कोरोनामुक्त होणाºयांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात रिकव्हरीचा रेट दहा टक्क्याने वाढला आहे ही समाधानाची बाब आहे. समाजमनात पसरलेली भीती ओसरायला यामुळे मदत होणार आहे. न्यू नॉर्मलच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, व्यवहार हळूहळू सुरळीत होऊ पहात आहेत. बाप्पांचे आगमन होत असतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आंतरजिल्हा बसेस सुरू होत आहेत. भय वा भीती आहे हे खरेच; परंतु किती दिवस या भयाला कवटाळून बसणार? त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ घातले आहे. अशात गणेशोत्सव आल्याने निराशा झटकून टाकत उत्साह, ऊर्जा-चैतन्याचे वातावरण निर्माण होऊ घातले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत आहेच शिवाय यंदा पाऊसही समाधानकारक झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. पूर्वोत्तर भारतात तर प्रचंड पाऊस झाल्याने तेथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशात पुरामुळे बळी जात आहेत इतका पाऊस धो धो बरसत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत सोळा टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. अपवादवगळता बहुतेक धरणांतील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचला आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचन व उद्योगांसाठीही पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होईल असे हे चित्र आहे. कधी नव्हे ते वरुणराजाने मराठवाड्यावरही कृपा केल्याने जायकवाडी धरण ६६ टक्के भरल्यामुळे तेथील जनता पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्याचे म्हणता यावे. सर्व ठिकाणच्या या पावसामुळे यंदा शेत-शिवार बहरून आल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढण्याची आशा बळावली आहे. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनापूर्वीच असे सारे मंगल मंगल वातावरण आकारास आलेले आहे. तेव्हा गणेशोत्सवाच्या दश दिनात उरलेसुरले निराशेचे मळभ दूर दूर होऊन समाजमनात चैतन्य साकारण्याची शुभचिन्हे आहेत, त्यासाठी बाप्पा यावे, आम्ही आपल्या स्वागतास आतुर आहोत!
https://www.lokmat.com/editorial/let-bappa-come-let-sorrow-be-defeated-a642/
No comments:
Post a Comment