Thursday, September 17, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 17 Sept, 2020

 कंगनाचे पुराण पुरे, कांद्याचे काय ते बोला!

किरण अग्रवाल

संवेदनशीलता ही आपुलकीतून तर येतेच येते, पण कधीकधी भीतीतूनही ती प्रत्ययास येते; विशेषत: सरकार व यंत्रणांच्या पातळीवर तर ती अधिकतर दुसऱ्या कारणातून म्हणजे भीतीपोटीच प्रदर्शित होत असते. इतिहासात केंद्रातील वाजपेयींचे व दिल्लीसह अन्य काही राज्य सरकारे उलथण्यास कारणीभूत ठरलेल्या कांद्याच्या वाढत्या दराविषयी केंद्र सरकार म्हणूनच संवेदनशील राहात आले आहे. आता लादण्यात आलेली कांदा निर्यातबंदी यातूनच उद्भवली असून, ती केवळ कांदा उत्पादकांसाठीच नव्हे, तर देशाला लाभणा-या परकीय चलनाच्या दृष्टीनेही नुकसानकारच ठरणार आहे.



अर्थव्यवस्थेची घसरगुंडी, बेरोजगारी, चीनची नेहमीची होऊन बसलेली कुरापत व कोरोनाच्या महामारीचे भयाण संकट यांसारख्या गंभीर विषयांची तितकीशी काळजी न वाहता सध्या देशात कंगना व सुशांतसिंहचे प्रकरण अधिक चर्चित ठरले आहे हे खरे तर दुर्दैवच म्हणायला हवे. शासन असेल किंवा सामान्यजन, सर्वच पातळीवर कसा गांभीर्याचा अभाव आहे हेच यातून दिसून यावे. यातही शासनाचे म्हणायचे तर, त्यांना अडचणीच्या ठरू शकणाºया मुद्द्यांवर विषयांतर घडून आलेले हवेच आहे. कंगना प्रकरण सध्या माध्यमांमध्येही ‘टीआरपी’ मिळवून आहे. संवेदनांची परिमाणे बदलल्याचाच हा परिपाक म्हणता यावा. अशातच कोरोनाचे संकट व निसर्गाच्या लहरी फटक्यामुळे घायाळ असलेल्या कांदा उत्पादकांना जरा कुठे समाधानाचे दिवस येऊ पहात असतानाच कांद्याच्या दरवाढीमुळे चिंतित होऊन केंद्राने तडकाफडकी निर्यातबंदी जाहीर केल्याने सरकारची ही संवेदनशीलता संबंधिताना अस्वस्थ करून जाणे स्वाभाविक ठरले आहे. बरे, या निर्यातबंदीचा फटका केवळ कांदा उत्पादकांना व व्यापाऱ्यांनाच बसणारा नसून निर्यातीतून देशाला लाभणा-या परकीय चलनालाही बसणार आहे, तरी केंद्राने घिसाडघाईने निर्णय घेतला कारण त्यांची नजर बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर आहे.



तसे पाहता कांद्याच्या दरातील चढ-उतार हे काही नवीन नाहीत. वेळोवेळी त्यावर लादली जाणारी निर्यातबंदी व त्यातून होणारा उत्पादकांचा संतापदेखील दर वर्षाचे झाले आहे, तेव्हा त्यातून सरकारला समज वा शहाणपण लाभणे अपेक्षित असताना तसे होत नाही. यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी कोरोनाच्या कारणातून केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे कांदा चाळीतच साठवून ठेवण्याची वेळ शेतक-यांवर आली. यात एक तर बाजार समित्या बंद राहिल्यामुळे असे घडले, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायही बंद असल्याने तेथील मागणीही घटली व त्याच्याही परिणामी कांदा साठवून ठेवावा लागला. अशात अवकाळी पावसामुळे चाळीत साठवलेला हा कांदाही सडला त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. यातून जो विक्रीयोग्य कांदा होता तो बाजार समितीत पोहोचला व त्याला चांगला भाव मिळू लागला. म्हणजे नुकसान सोसूनही काहीशी समाधानाची स्थिती आली; परंतु नेमक्या याच टप्प्यावर केंद्र सरकारने निर्यातबंदी घोषित केल्याने पुन्हा आक्रोश करीत रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

महत्त्वाचे म्हणजे यंदा निर्यातही ब-यापैकी होऊ घातली आहे. कांदा निर्यातीच्या बाबतीत आपला स्पर्धक असलेल्या पाकिस्तानातील कांदा तेथील धुवाधार पावसामुळे निर्यातयोग्य राहिलेला नाही, तर प्रमुख स्पर्धक असलेल्या चीनचा कांदा कोरोनाच्या भीतीमुळे कोणी घेण्यास उत्सुक नाही; त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या कांद्याला चांगली मागणी व भावही आहे. त्यादृष्टीने कोट्यवधी रुपये किमतीचा लाखो टन कांदा पोर्टवर पोहोचला आहे, कंटेनरही तयार आहेत; परंतु अचानक निर्यातबंदी झाल्याने शेतकºयांबरोबरच व्यापारीही अडचणीत सापडले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची जागा इराक, इराण व अफगाणिस्तानसारख्या देशांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.


धरसोडीच्या सरकारी धोरणामुळे भारताकडे बेभरवशाचा देश म्हणून पाहिले जाऊन यापुढील काळात व्यापारासाठी अडचणी तर यातून निर्माण होऊ घातल्या आहेतच, शिवाय परकीय चलनालाही मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील याच मुद्द्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी कांदा उत्पादक पट्ट्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळे तेथील खासदारांनी व राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पक्षीय अभिनिवेश न बाळगता केंद्राकडे याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. खरेच ही वेळ कांदा निर्यातबंदीची नाही, ते व्यवहार्यही नाही. दर जास्तच वाटत होते तर हस्तक्षेप करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा पर्याय होता; पण थेट निर्यातबंदीचा वरवंटा फिरवला गेला. शेतक-यांचे अल्पसे समाधानही सरकारच्या डोळ्यात खुपते की काय, अशीच शंका यातून यावी. तेव्हा कंगना प्रकरणावरून लक्ष हटवून व त्याच्या राजकीय नफा-नुकसानीचा विचार करण्याऐवजी कांद्याच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने लक्ष पुरवणे व ही निर्यातबंदी तातडीने उठविणे गरजेचे आहे.  

https://www.lokmat.com/editorial/kanganas-purana-enough-tell-me-what-about-onion-a309/ 

https://t.co/ai67v4WtPd 

Monday, September 14, 2020

#Saraunsh published in Lokmat on 13 Sept, 2020


 


https://www.lokmat.com/nashik/there-anyone-looking-after-barbhai-administration-nashik-a587/

Thursday, September 10, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 10 Sept, 2020

 coronavirus; लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच...

किरण अग्रवाल

कोरोनापासून बचावण्यासाठी केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला व त्यातून अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, त्यामुळे नुकसानदायी अशा अर्थानेच याकडे पाहिले जात असले तरी काही बाबतीत इष्टापत्ती म्हणूनही या संकटाकडे पाहता येणारे आहे; पण कोरोनाच्या अनुषंगाने पॉझिटिव्हपणाचा इतका व असा काही धसका घेतला गेला आहे की निगेटिव्ह बाबीच जास्त लक्षात घेतल्या जाताना दिसत आहेत.




कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही, कारण बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी मनात असलेली सुरक्षेबाबतची भीती संपलेली नाही. पुनश्च हरिओम करताना कोरोनाने सारे संदर्भच बदलून ठेवलेले दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळातील अडीअडचणींचाच पाढा अधिकतर वाचला जात असला, तरी त्यातील चांगल्या बाबींकडे मात्र दुर्लक्षच घडून येते आहे म्हणायचे. या काळात सक्तीने घरात बसावे लागलेल्यांना कधी नव्हे ते कुटुंबीयांसाठी व विशेषत: रोजीरोटीच्या झगड्यात धावताना मुलाबाळांकडे व वृद्ध माता-पित्यांकडे लक्ष देता न आलेल्यांना त्यासाठी जी संधी मिळून गेली; त्याचा विचार यासंदर्भात प्रकर्षाने करता येणारा आहे.


महत्त्वाचे म्हणजे सद्य:स्थितीत अनलॉक झाले असले आणि अडचणींचा सामना कायम असला तरी कोरोनामुळे घडून आलेल्या काही परिणामांकडे सकारात्मकतेने पहाता येणारेही आहे. उदाहरणादाखल चर्चा करायची तर, आगामी शिक्षण व्यवस्था ही आॅनलाइन व डिजिटल पद्धतीची राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने घरातील शाळकरी मुलांच्या हातातही मोबाइल देणे त्यांच्या पालकांना भाग पडले आहे. यात खास आॅनलाइन शिक्षणासाठी मुलांना नवीन मोबाइल घेऊन देणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा आईकडे असलेलाच मोबाइल मुलांकडून वापरला जाणाºयांचे प्रमाण अधिक आहे. यात मुलांची सोय होत असतानाच आईच्या हातातील मोबाइल गेल्याने फावल्या वेळात तिचे कॅण्डी क्रश खेळणे बंद होऊन ती कुटुंबाकडे अधिक लक्ष देऊ लागल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर मुले घरातच असल्याने व गृहिणीच्या हातातील मोबाइलही गेल्याने तिच्याकडून आता खाण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस बनविले जाऊ लागले आहेत. त्यामुळे घरात एकत्र बसून त्याचा आस्वाद घेता येऊ लागल्याने या आनंदाकडे दुर्लक्ष कसे करता यावे, तेव्हा या अशा बाबींकडे सकारात्मकतेनेच पाहता यावे.


बालपणातच मुलांवर संस्कार घडून येण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचीही वेगवेगळ्या बाबतीतली वाढती व्यस्तता चर्चिली जाते. शहरी भागांमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे सुरू झाल्याने बरेचसे ज्येष्ठ या कट्ट्यांवर आपल्या अनुभवाची शिदोरी मोकळी करण्यात समाधान मानतात, त्यात गैर आहे अशातला अजिबात भाग नाही; परंतु त्यांच्याकडून घरातील नातवंडांकडे जितके लक्ष दिले जाणे अपेक्षित असते तितकेसे ते होत नसल्याच्या तक्रारी असतात; परंतु आता कोरोनाच्या भीतीमुळे ज्येष्ठांचेही घराबाहेर पडणे बंद अगर मर्यादित झाल्यामुळे तेदेखील नातवांबरोबर वेळ घालवू लागले आहेत. त्यामुळे बालगोपाळ मंडळी आनंदात असल्याचे दिसून येते. कोरोनाने सर्वांना सारख्याच भीतीच्या छायेत आणून ठेवले आहे, त्यामुळे कौटुंबिक असो अगर सामाजिक; व्यावसायिक असो अगर अन्य कुठल्याही पातळीवरचे, सारे मतभेद व राग-लोभ विसरून प्रत्येकजण फोनवरून का होईना एकमेकांची ख्यालीखुशाली विचारू लागला आहे. यातून परस्परातील आपलेपणाचे जे भावबंध जुळून येत आहेत व सुदृढ होत आहेत ते महत्त्वाचेच नाही का म्हणायचे? विसंवादातून सुसंवादाकडे होत असलेली ही प्रक्रिया कोरोनाच्या भीतीतूनच घडून येते आहे. त्यातील चांगला परिणाम तेवढा लक्षात घ्यायला काय हरकत असावी? याकाळात सारेच काही वाईट, नकारात्मक व अडचणीचेच घडते आहे अशातला भाग नाही. भलेही मर्यादित स्वरूपात असेल; पण थोडे चांगलेही आहे, त्याकडेच आपण बघूया...  


https://www.lokmat.com/editorial/coronavirus-people-ignore-benefits-lockdown-a301/

Saturday, September 5, 2020

World Beard day..

 05 Sept, 2020  











माझी ओळख / आयडेंटिटी ... माझी दाढी

फादर्स डे, मदर्स डे, आजचा टीचर्स डे इतकेच काय व्हॅलेंटाईन डे.. 

असे काही डेज आतापर्यंत मला माहित होते, 

पण आज सकाळी सकाळी मुलींनी लक्षात आणून दिले 

Today is World Beard Day ... 

काय तर म्हणे आज दाढी दिवस

गुगल बाबा काय काय दाखवेल कुणास ठाऊक।

--- सहज दाढी कुरवाळत अंतर्मनात डोकावलो

मला दाढी आली, म्हणजे कॉलेजात पाऊल ठेवले तेव्हापासून असेल;  तिला कधी अंतर दिले नाही. इतरांची कशी ओकेजनल असते, म्हणजे कुणी श्रावणात दाढी करत नाही तर कुणाचे काही; माझी मात्र परमनंट। 

प्राण जाये पर दाढी ना जाये .... 

अगदी लग्नासाठी मुलगी बघायला गेलो तेव्हा तीलाही सांगितले, दाढी नाही काढणार। आणि खरेच दाढी शाबूत ठेऊन लग्न केलं

नाशिक व प्रयागच्या कुंभमेळ्यात वार्तांकन करतानाही दाढी कामी आली

या दाढीतील विविध रूपे मी अनुभवली... 

म्हणून ही दाढीच माझी ओळख बनून गेली. 

इतकी अभिन्न की, तिच्याखेरीज मी अपूर्ण ... 

दाढी पुराणच सुरू आहे म्हणून दोन गोष्टी आठवल्या

1.. वडील गेले तेव्हा एकदाच दाढी काढली होती. तेव्हा तत्कालीन खासदार डॉ वसंतराव पवार घरी समाचाराला आले होते. मी त्यांना बघून रिसिव्ह करायला दारात गेलो, तर त्यांनी मलाच विचारले होते, ' लोकमतचे किरण अग्रवाल येथेच राहतात ना?'

सांगायचा मतलब, दाढीविना तेही ओळखू शकले नव्हते

बिगर दाढीचा जाणवलेला तो पहिला फटका म्हणता येईल. 

2.. सध्याच्या लॉकडाऊन काळात दाढी होऊ शकली नव्हती म्हणून मध्यंतरी थोरल्या मुलीने, श्रुतीने माझी घरीच दाढी करून दिली, ती घरी झालेली पहिली दाढी. 

एरव्ही घरात गृह मंत्रांकडून अधून मधून होणाऱ्या बिन पाण्याच्या दाढी खेरीजची वास्तवातली दाढी. त्यानंतर  लहान्या कृतीनेही माझ्या दाढीला हात मारून घेतला. 

---- अशी ही माझी दाढी

खास आजच्या दाढी दिवसानिमित्त हे पुराण... सहज।

#BeardDay #ShrutiKruti #CoronaDiary #LekLadki

Thursday, September 3, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 03 Sept, 2020

 बुद्धी मिळाली, आता सुबुद्धी यावी...


किरण अग्रवाल

कोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता सुरक्षितपणे घरच्या घरीच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याची बुद्धी यंदा श्री गणरायाने दिल्याने सर्वच ठिकाणच्या नद्यांमध्ये यानिमित्त होणारे प्रदूषण बरेचसे टळले; पण ही केवळ यंदाची किंवा याच कारणापुरतीची प्रासंगिकता न ठरता आता या विचाराचा धागा पुढे नेत यापुढेही अशीच काळजी घेतली गेली तर नद्यांची निर्मळता तर टिकून राहीलच शिवाय पर्यावरणालाही मोठा हातभार लाभून जाईल.

यंदा कोरोनामुळे चिंतेची स्थिती असताना गणरायाचे आगमन झाले; पण या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वच ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली गेल्याचे दिसून आले. गणरायांच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवरील बंदी तसेच मूर्तीच्या उंचीबाबतचे निर्देश शासन पातळीवरून देण्यापूर्वीच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचे निर्णय घेतलेले दिसून आले हे यात विशेष. मुंबईतील लालबागचा राजा म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटी व राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठी आदराचे व श्रद्धेचे स्थान. तेथे दर्शनासाठी उसळणारी गर्दी हीदेखील उत्सुकतेचा विषय ठरत असते; परंतु यंदा या मंडळानेही मूर्तीच स्थापन न करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो, की अन्य मानाची गणेश मंडळे; त्यांनीही नेहमीची भव्यदिव्य आरास व गर्दी टाळण्याबरोबरच सामाजिक सेवेच्या उपक्रमांवर भर दिला. एरव्ही दोन दोन दिवस चालणारी पुण्यातील विसर्जनाची मिरवणूक यंदा काढलीच गेली नाही. मुंबई, पुण्याप्रमाणेच राज्यातील नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा सर्वच शहरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी याबाबत गर्दी टाळून सुरक्षितता जपण्यावर भर दिल्याचे बघावयास मिळाले. एक प्रकारे कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यपूरक गणेशोत्सव साजरा केला गेलेला दिसून आला.




महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी परंपरेप्रमाणे मुंबईत समुद्रात व अन्य ठिकाणी नद्यांमध्ये बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने होणारे जलप्रदूषण पाहता सामाजिक संघटनांकडून मूर्ती दानाचे उपक्रम राबविले जात असतात. नद्यांमधील विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या नदी काठांवर उभे राहून नदीतले चित्र बघणे हे सश्रद्ध मनाला मानवणारे नसते. नाशकातील गोदावरी व धुळ्यातील पांझराकान सारख्या नद्या तर शहराच्या मध्य भागातून गेलेल्या असल्याने तेथे तर धूम असते; पण कोल्हापुरातील पंचगंगा असो, की नाशिक ते नांदेडपर्यंतची गोदा, पंढरपूर- सोलापूरचा भीमाकाठ असो, की नागपुरातील तेलंखडी किंवा शुक्रवारी तलाव; सर्वत्र सारखेच चित्र दिसायचे. मात्र अलीकडे मूर्ती दान किंवा संकलन मोहिमांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. यंदा सार्वजनिक मंडळांबरोबरच सोसायट्या व घराघरातील बाप्पांचेही घरच्या घरीच विसर्जन केले गेले त्यामुळे त्यांचीही नदी, तलावांवर होणारी गर्दी टळली. परिणामी त्यांची निर्मळताही बºयापैकी टिकून राहिलेली दिसून आली. म्हणजे आरोग्यपूरकतेला पर्यावरणपूरकतेचीही जोड लाभली.

अर्थात, बुद्धीची देवता म्हणवणाºया बाप्पांनीच कोरोनापासून बचावासाठी ही बुद्धी दिली म्हणायचे. आज कोरोनाशी संबंधित भयातून जी बुद्धी वापरली गेली, ती यापुढील काळातही शाबुत राहिली तर पर्यावरणास मोठाच हातभार लाभू शकेल. बाप्पांच्या विसर्जनाच्या संदर्भातच नव्हे तर अन्यही कारणातून होणारे नद्यांचे प्रदूषण टाळले जाणे गरजेचे बनले आहे. पाणीवाले बाबा म्हणून ख्यातकीर्त असलेले डॉ. राजेन्द्र सिंह व अन्यही अनेक पर्यावरणप्रेमी यासाठी परिश्रम घेत आहेत. जागोजागी नमामि गंगा, नमामि गोदा, नमामि चंद्रभागा यासारख्या मोहिमा सुरू झाल्या आहेतच. शिवाय गणेशोत्सवाचे स्वरूप अलीकडील काही वर्षात खूप बदलले आहे, तेव्हा सामाजिक भान राखत यंदा ज्या पद्धतीने आरोग्यविषयक व मदतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले, तसे यापुढील काळातही घडून येण्यासाठी बाप्पांनीच सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा करूया. आगामी काळ हा आॅनलाइन शिक्षणाचा राहणार आहे; परंतु ग्रामीण भागात अनेक कुटुंबे अशी आहेत जी मुलांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी आवश्यक ते मोबाइल किंवा टॅब घेण्याच्या आर्थिक स्थितीत नाहीत, अशांना सार्वजनिक गणेश मंडळांकडून मदत मिळू शकली तर ख-या अर्थाने बाप्पांनाही आनंदच होईल इतकेच यानिमित्ताने.

https://www.lokmat.com/editorial/article-eco-friendly-ganeshostav-got-wisdom-now-let-wisdom-come-a629/

Wednesday, September 2, 2020

Ganesh visarjan 2020

 01 Sept, 2020 










बाप्पा गेले गावाला ... 

अखिल मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट घेऊन जा म्हणत यंदा  प्रथमच बाप्पांचे घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन केले. दरवर्षी आम्ही सारे कॉलनीवासी मिळून गंगेवर जातो, छान पाण्यात उभे राहून निरोपाची आरती गातो आणि श्री ना आंघोळ घालून मूर्ती महापालिका स्वयंसेवकांच्या हाती सुपूर्द करतो.   आज त्या आनंदाला मुकलो असलो तरी, वेगळी आठवण गाठीशी बांधली गेली.

दरवर्षी गणरायाला घरी आणायचे म्हणजे पूर्वदिनी मी रात्री ऑफिसवरून आलो की, मुलींसह उशिरापर्यंत 17 दुकानं धुंडाळायचो. तशी मूर्ती व ती घेण्याचे ठिकाण सालाबादप्रमाणे ठरलेले असते आमचे, पण उगाच प्रत्येक दुकानातील श्रींची ना ना रूपे न्याहाळायला व मनात साठवायला ही भटकंती असते.  

यंदा मुलींनी घरीच साकारले बाप्पा. त्यासाठी आठ दिवसांपासून सुरू होता उद्योग. रोज या निर्मिती प्रक्रियेवर व्हायची चर्चा आणि त्यातून आकार घ्यायचे बाप्पा.

आज त्या बाप्पांना निरोप दिला, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करून... 

श्रुती, कृतीकडून झालेली मूर्तीची निर्मिती व घरच्या घरी विसर्जन यामुळे कोरोनाच्या परिणामी आत्मनिर्भरतेचा अनुभव तर आलाच, मुलींच्या जाणतेपणाचाही प्रत्यय आला म्हणायचे... 

#LekLadki #ShrutiKruti #Bappa2020 #CoronaDiary