01 Sept, 2020
बाप्पा गेले गावाला ...
अखिल मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट घेऊन जा म्हणत यंदा प्रथमच बाप्पांचे घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन केले. दरवर्षी आम्ही सारे कॉलनीवासी मिळून गंगेवर जातो, छान पाण्यात उभे राहून निरोपाची आरती गातो आणि श्री ना आंघोळ घालून मूर्ती महापालिका स्वयंसेवकांच्या हाती सुपूर्द करतो. आज त्या आनंदाला मुकलो असलो तरी, वेगळी आठवण गाठीशी बांधली गेली.
दरवर्षी गणरायाला घरी आणायचे म्हणजे पूर्वदिनी मी रात्री ऑफिसवरून आलो की, मुलींसह उशिरापर्यंत 17 दुकानं धुंडाळायचो. तशी मूर्ती व ती घेण्याचे ठिकाण सालाबादप्रमाणे ठरलेले असते आमचे, पण उगाच प्रत्येक दुकानातील श्रींची ना ना रूपे न्याहाळायला व मनात साठवायला ही भटकंती असते.
यंदा मुलींनी घरीच साकारले बाप्पा. त्यासाठी आठ दिवसांपासून सुरू होता उद्योग. रोज या निर्मिती प्रक्रियेवर व्हायची चर्चा आणि त्यातून आकार घ्यायचे बाप्पा.
आज त्या बाप्पांना निरोप दिला, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करून...
श्रुती, कृतीकडून झालेली मूर्तीची निर्मिती व घरच्या घरी विसर्जन यामुळे कोरोनाच्या परिणामी आत्मनिर्भरतेचा अनुभव तर आलाच, मुलींच्या जाणतेपणाचाही प्रत्यय आला म्हणायचे...
#LekLadki #ShrutiKruti #Bappa2020 #CoronaDiary



No comments:
Post a Comment