बुद्धी मिळाली, आता सुबुद्धी यावी...
किरण अग्रवाल
कोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता सुरक्षितपणे घरच्या घरीच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याची बुद्धी यंदा श्री गणरायाने दिल्याने सर्वच ठिकाणच्या नद्यांमध्ये यानिमित्त होणारे प्रदूषण बरेचसे टळले; पण ही केवळ यंदाची किंवा याच कारणापुरतीची प्रासंगिकता न ठरता आता या विचाराचा धागा पुढे नेत यापुढेही अशीच काळजी घेतली गेली तर नद्यांची निर्मळता तर टिकून राहीलच शिवाय पर्यावरणालाही मोठा हातभार लाभून जाईल.
यंदा कोरोनामुळे चिंतेची स्थिती असताना गणरायाचे आगमन झाले; पण या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वच ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली गेल्याचे दिसून आले. गणरायांच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवरील बंदी तसेच मूर्तीच्या उंचीबाबतचे निर्देश शासन पातळीवरून देण्यापूर्वीच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचे निर्णय घेतलेले दिसून आले हे यात विशेष. मुंबईतील लालबागचा राजा म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटी व राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठी आदराचे व श्रद्धेचे स्थान. तेथे दर्शनासाठी उसळणारी गर्दी हीदेखील उत्सुकतेचा विषय ठरत असते; परंतु यंदा या मंडळानेही मूर्तीच स्थापन न करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो, की अन्य मानाची गणेश मंडळे; त्यांनीही नेहमीची भव्यदिव्य आरास व गर्दी टाळण्याबरोबरच सामाजिक सेवेच्या उपक्रमांवर भर दिला. एरव्ही दोन दोन दिवस चालणारी पुण्यातील विसर्जनाची मिरवणूक यंदा काढलीच गेली नाही. मुंबई, पुण्याप्रमाणेच राज्यातील नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा सर्वच शहरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी याबाबत गर्दी टाळून सुरक्षितता जपण्यावर भर दिल्याचे बघावयास मिळाले. एक प्रकारे कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यपूरक गणेशोत्सव साजरा केला गेलेला दिसून आला.
महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी परंपरेप्रमाणे मुंबईत समुद्रात व अन्य ठिकाणी नद्यांमध्ये बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने होणारे जलप्रदूषण पाहता सामाजिक संघटनांकडून मूर्ती दानाचे उपक्रम राबविले जात असतात. नद्यांमधील विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या नदी काठांवर उभे राहून नदीतले चित्र बघणे हे सश्रद्ध मनाला मानवणारे नसते. नाशकातील गोदावरी व धुळ्यातील पांझराकान सारख्या नद्या तर शहराच्या मध्य भागातून गेलेल्या असल्याने तेथे तर धूम असते; पण कोल्हापुरातील पंचगंगा असो, की नाशिक ते नांदेडपर्यंतची गोदा, पंढरपूर- सोलापूरचा भीमाकाठ असो, की नागपुरातील तेलंखडी किंवा शुक्रवारी तलाव; सर्वत्र सारखेच चित्र दिसायचे. मात्र अलीकडे मूर्ती दान किंवा संकलन मोहिमांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. यंदा सार्वजनिक मंडळांबरोबरच सोसायट्या व घराघरातील बाप्पांचेही घरच्या घरीच विसर्जन केले गेले त्यामुळे त्यांचीही नदी, तलावांवर होणारी गर्दी टळली. परिणामी त्यांची निर्मळताही बºयापैकी टिकून राहिलेली दिसून आली. म्हणजे आरोग्यपूरकतेला पर्यावरणपूरकतेचीही जोड लाभली.
अर्थात, बुद्धीची देवता म्हणवणाºया बाप्पांनीच कोरोनापासून बचावासाठी ही बुद्धी दिली म्हणायचे. आज कोरोनाशी संबंधित भयातून जी बुद्धी वापरली गेली, ती यापुढील काळातही शाबुत राहिली तर पर्यावरणास मोठाच हातभार लाभू शकेल. बाप्पांच्या विसर्जनाच्या संदर्भातच नव्हे तर अन्यही कारणातून होणारे नद्यांचे प्रदूषण टाळले जाणे गरजेचे बनले आहे. पाणीवाले बाबा म्हणून ख्यातकीर्त असलेले डॉ. राजेन्द्र सिंह व अन्यही अनेक पर्यावरणप्रेमी यासाठी परिश्रम घेत आहेत. जागोजागी नमामि गंगा, नमामि गोदा, नमामि चंद्रभागा यासारख्या मोहिमा सुरू झाल्या आहेतच. शिवाय गणेशोत्सवाचे स्वरूप अलीकडील काही वर्षात खूप बदलले आहे, तेव्हा सामाजिक भान राखत यंदा ज्या पद्धतीने आरोग्यविषयक व मदतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले, तसे यापुढील काळातही घडून येण्यासाठी बाप्पांनीच सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा करूया. आगामी काळ हा आॅनलाइन शिक्षणाचा राहणार आहे; परंतु ग्रामीण भागात अनेक कुटुंबे अशी आहेत जी मुलांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी आवश्यक ते मोबाइल किंवा टॅब घेण्याच्या आर्थिक स्थितीत नाहीत, अशांना सार्वजनिक गणेश मंडळांकडून मदत मिळू शकली तर ख-या अर्थाने बाप्पांनाही आनंदच होईल इतकेच यानिमित्ताने.
No comments:
Post a Comment