किरण अग्रवाल
आपत्ती मग ती कोणतीही असो, त्रासदायक अगर नुकसानदायीच असते याबद्दल वाद नसावा; परंतु कधीकधी ती इष्टापत्तीही ठरून जाते. कोरोनाच्या बाबतीतही तेच होऊ घातले आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगातील जनजीवन प्रभावित झाले, अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम घडून आला आदी सारे खरे; परंतु हे होत असतानाच दुसरीकडे भीतीतून का होईना सावधानतेचा भाग म्हणून लोक आपल्या सवयी, व्यवहार व वर्तन बदलत आहेत, नवे तंत्र स्वीकारत आहेत; तेव्हा या बदलांकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. कोरोनाच्या काळातील गेल्या तिमाहीत देशात पाच कोटींहून अधिक स्मार्टफोन विक्री झाल्याच्या वार्तेकडेही याच दृष्टिकोनातून बघता येणारे आहे.
कोरोनाबाधितांची संख्या लाखोंच्या घरात असली व अलीकडच्या काळात ती कमी कमी होत असली तरी या संकटामुळे बेजार मात्र सर्वच जण झाले आहेत. प्रत्येकालाच त्याची काही ना काही झळ बसली आहे वा बसत आहे. शेवटी जिवाची भीती ही सार्यांनाच वठणीवर आणते, त्यातूनच अनेक सवयी बदलल्या जात आहेत. विशेषतः ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन व सरकारचे प्रयत्न जितके कामी आले नाहीत तितका कोरोना कामी आला म्हणायचा. गेल्या सुमारे सहा महिन्यांच्या कोरोनाकाळात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेच; परंतु भविष्यातही आता हीच सवय कायम होण्याची आशा आहे. नेट बँकिंग, नेट बुकिंग आदीबाबतीत तसेच खरेदीच्याही बाबतीत लोकांनी ऑनलाइनचा पर्याय स्वीकारलेला दिसतो आहे. बाजारात, गर्दीत जाण्याऐवजी घरी बसल्या व्यवहार करण्याकडे कल वाढीस लागला आहे. शिवाय विविध क्षेत्रात नित्य नवे बदल घडून येत असून, शिक्षण व्यवस्थाही ऑनलाइन होऊ पाहते आहे. त्यामुळे निगडित साधन सुविधांची मागणी वाढून गेली आहे. स्मार्टफोन तर यात सर्वाधिक प्राधान्याचे साधन ठरून गेले आहे. संपर्कापासून शिक्षणापर्यंत, बँकिंगपासून खरेदीपर्यंत सारे मोबाइलवर होते, त्यामुळे कोरोनातील नुकत्याच संपलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाही काळात देशात आजवरची विक्रमी अशी पाच कोटी स्मार्ट फोन्सची विक्री झाली आहे. गत २०१९मधील याच तिमाही काळातील विक्रीच्या तुलनेत ही आठ टक्के वाढ असल्याचे नोंदविले गेले आहे. ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’च्या दिशेनेच ही वाटचाल असल्याचे यातून स्पष्ट व्हावे.
महत्त्वाचे म्हणजे काळाशी सुसंगत व गरजेप्रमाणे डिजिटल साधनांची निर्मिती व खरेदीही वाढून गेल्याने त्यामाध्यमातून आपसूकच डिजिटल साक्षरताही घडून येणार आहे. विद्यार्थ्यांची, तरुणांची नवीन पिढी तर आता याच मार्गावर अग्रेसर होण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे साधनांद्वारे स्मार्टपणाही वाढीस लागणे अपेक्षित आहे. अर्थात कधीकधी साधने असूनही ती समाधान देऊ शकत नाहीत किंवा ती समस्यांना निमंत्रणे देणारीही ठरतात हा भाग वेगळा. स्मार्टफोनच्या बाबतीतच घ्या, फोन हाती असला तरी कनेक्टिव्हिटी नसेल तर तो उपयोगाचा ठरत नाही. ग्रामीण भागात अनेकजण याचा अनुभव घेत आहेत. शिक्षणासाठी म्हणून स्मार्ट फोन घेतला; परंतु रेंज मिळत नसल्याने विद्यार्थ्याला डोंगरावर जाऊन बसावे लागत असल्याच्या वार्ता त्यातूनच वाचावयास मिळतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा संगणकीकृत व डिजिटल करण्यात आल्या; परंतु त्यांना विद्युत पुरवठाच नसल्याची वास्तविकताही अनेक ठिकाणी उजेडात आलेली पहावयास मिळाली; तेव्हा केवळ साधन असून उपयोगाचे नाही तर त्यासाठीच्या आवश्यक गरजांची पूर्तता होणेही अपेक्षित असते. आपल्याकडे त्या बाबतीतच वानवा आढळून येते.
पण अडचणी अनंत असल्या तरी त्यातून मार्ग काढता आल्यास यशाचे किंवा समाधानाचे शिखर गाठता येणे अवघड नसते. कोरोनानेही अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा करून ठेवला आहे; परंतु त्यातून मार्ग काढत सुरक्षितता व सावधानता बाळगत आता सारे काही पूर्वपदावर येऊ पाहात आहे. शासनानेही टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत विविध सेवा व आस्थापनांना सुरळीत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तेव्हा अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्स राखून सुरक्षितता बाळगायची तर डिजिटल साधनांचा वापर व व्यवहार वाढवावेच लागतील. त्यासाठीचे महत्त्वाचे साधन ठरणाऱ्या स्मार्टफोनच्या विक्रीत त्यामुळेच वाढ झालेली दिसून आली आहे, तेव्हा कोरोनाने सर्व उत्पातकारीच घडविले असा निराशेचा सूर न लावता, त्यानिमित्त नवे काही करायला व स्मार्ट व्हायला संधीही दिली, असा विचार करीत सकारात्मकतेने भविष्यातील वाटचाल करायला हवी.
https://www.lokmat.com/editorial/corona-gave-smartness-chance-we-need-move-forward-positive-way-a629/
No comments:
Post a Comment