At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, November 30, 2020
Thursday, November 26, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 26 Nov, 2020
बिबटे फार झाले, बालके जपून ठेवा...
किरण अग्रवाल
मथळा काहीसा विचित्र वाटेल खरा; परंतु बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात स्थिती खरेच तशी आहे. राज्यातील बिबट्या या प्राण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचा हक्काचा अधिवास असलेल्या जंगल अगर वनांची संख्या कमी होत आहे त्यामुळे ते उसाच्या शेतात आश्रयास जातात आणि सध्याचा हंगाम ऊसतोडीचा असल्याने जागोजागी बिबट्यांकडून माणसांवर होणारे हल्ले वाढीस लागले आहेत; विशेषतः लहान बालके या बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याच्या घटना वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण होणे स्वाभाविक ठरले आहे.
राज्यात नाशिक, नगर, धुळे, अमरावती, नागपूर, सोलापूर, ठाणे आदी परिसरात बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात आहे. सर्वत्रच जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वने भकास झालीत, परिणामी त्यातील पशू, प्राणी नागरी वस्तीकडे वळत आहेत. अर्थात त्यांचे नागरी वस्तीत येणे हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याने चिंता वाढून गेली आहे. चालू आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दोन बालकांचा बळी बिबट्याने घेतला आहे तर मागील एका महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी, केळवंडी व करडवाडी येथील तीन चिमुरड्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव येथे तर पिता-पुत्र असे दोघेजण अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले तर बीड जिल्ह्यातील एका पंचायत समिती सदस्याचा पती या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे या परिसरातील बिबटे आवरा अशी मागणी पुढे आली आहे.
----------------------------
मार्जार कुळातील अत्यंत चपळ वन्यप्राणी म्हणून बिबट्याची ओळख असून, कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात हा प्राणी नैसर्गिकरीत्या पटाईत म्हटला जातो. त्यामुळे जंगलाचा अधिवास कमी होत चालल्याचे बघून त्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात निवारा शोधल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र अधिक असलेल्या निफाड, सायखेड्याच्या गंगाथडी व नाशिकच्या दारणाकाठ परिसरात तसेच नगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगर रांगांत बिबट्यांचा वावर व तेथील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण त्यामुळेच अधिक आहे. विदर्भाच्या काही पट्ट्यातील मका पिकातही बिबट्या आढळून येतो. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने उसात लपून राहणारा बिबट्या उघड्यावर आला व त्यातून ऊसतोड करणाऱ्या मजुरांवर, त्यांच्या लहान मुलांवर होणारे त्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटना घडल्या की वनविभागाची धावाधाव होते, पिंजरे लावले जातात व बिबटे जेरबंदही होतात; परंतु एकूणच परिस्थिती बघितली तर यासंदर्भातील वनविभागाकडे असलेल्या मनुष्यबळाची तसेच यंत्रसामग्रीची कमतरता उघड व्हावी. साधे नाशिक जिल्ह्याचे उदाहरण घ्या, गेल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे सुमारे 9 महिन्यात या परिक्षेत्रात 19 बिबटे जेरबंद केले गेले; पण वनविभागाकडे रॅपिड रेस्क्यू व्हॅनच नाही. साध्या कामचलाऊ मालवाहू वाहनाद्वारे या कारवाया केल्या गेल्या. पिंजरेदेखील पुरेशा प्रमाणात नाहीत. तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बिबट्याचा सुरक्षित अधिवास धोक्यात आल्याने तो मनुष्य वस्तीकडे वळाला व त्यामुळे मनुष्य जिवाला धोका निर्माण झाला हे जितके खरे तितकेच बिबट्याचा जीवही त्यामुळे धोक्यात आला हेदेखील खरे. भारतीय वन्यजीव कायदा संरक्षक सूचीमध्ये बिबट्याला स्थान देण्यात आले आहे; परंतु बिबट्याचे बळी जाण्याचे किंवा त्याची शिकार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात 2011 ते 2019 या नऊ वर्षात तब्बल 648 बिबटे मृत्युमुखी पडले असून, त्यात 221 बिबटे ‘रोड कील’ म्हणजे अपघातात बळी गेले आहेत, तर 83 बिबट्यांची शिकार झाली आहे. तेव्हा ही वेळ ओढवू नये म्हणून वन्यप्राण्यांच्या सुरक्षित अधिवासाच्या दृष्टीने पावले उचलली जाणे अपेक्षित आहे. सरकारी मालकीच्या पडीक जागांवर गवत लागवडी केली गेली तर त्यातून बिबट्यांचा अधिवास सुरक्षित होऊ शकेल तसेच बिबट्याचे हल्ले होणाऱ्या भागात ट्रॅप कॅमेराद्वारे वॉच ठेवून पिंजरे लावले गेले तर मनुष्य हानीही टाळता येऊ शकेल. पण राजकारणातच गुंतलेल्या राज्यकर्त्यांना याबाबतची गरज व प्राथमिकता जाणवेल का हा खरा प्रश्न आहे.
https://www.lokmat.com/editorial/leopards-now-attacking-humans-their-houses-nashik-a597/
Saturday, November 21, 2020
मालेगावात कोरोनाचा कहर | Corona Virus In Malegaon | Lockdown | India News
का बनले मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ? लोकमत नाशिकचे निवासी संपादक श्री किरण अग्रवाल यांचा ग्राउंड रिपोर्ट .. (Position of April 30, 2020)
This is an old video. It has been uploaded here just for records
Diwali 2020
15 नोव्हेंबर 2020 ·
Diwali 2020..
यंदा कोरोनाचे सावट आहे, अनेक प्रिय व्यक्ती अकाली सोडून गेलेत; त्याची खंत व बोच मनात आहेच पण उत्सव नेहमीच तिमिरातून तेजाचा मार्ग प्रशस्त करतात. त्याच विश्वास व आशेने हे दीप पर्व ...
#KiranAgrawalNashik #ShrutiKruti
Thursday, November 19, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 19 Nov, 2020
तेजी टिकून राहो..!
किरण अग्रवाल
कोरोनाच्या संकटाचे भय न बाळगता दिवाळी साजरी झाल्याने यंदा बाजारात नेहमीपेक्षाही अधिक तेजी दिसून आली, या तेजीने ढासळलेली अर्थव्यवस्था सावरायला मदत होईलच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात-आठ महिन्यांपासून घोंगावलेल्या संकटाने मनामनांवर जे निराशेचे मळभ दाटून आले होते ते दूर व्हावयास मोठी मदत घडून आली आहे.
यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट नक्कीच राहिले; परंतु जनतेने त्याची कसलीही तमा न बाळगता हा सण साजरा केला. लॉकडाऊनमुळे घराघरातच अडकून पडलेली जनता दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडली. जागोजागचे बाजार गर्दीने फुलून निघाले. बंद राहिलेल्या काळात जेवढा व्यवसाय झाला असता त्यापेक्षा अधिक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या आठवडाभरात झाला. मुंबईच्या बाजार समितीमध्ये दहा दिवसांमध्ये तब्बल 3600 टन सुकामेव्याची विक्री झाली, ज्यात 135 कोटींची उलाढाल झाली. मुद्रांक शुल्क कपात व कमी व्याजदरात उपलब्ध असलेले गृहकर्ज आदी कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. एकट्या नाशकात साडेचारशे ते पाचशे फ्लॅटची बुकिंग या काळात झाली, त्यामुळे येत्या दोन-अडीच महिन्यात रेडीपझेशन फ्लॅटचा तुटवडा जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहन उद्योगातही भरभराटीचे चित्र असून, अनेक कंपन्यांच्या चारचाकी वाहनांना दीड ते दोन महिन्यांची वेटिंग आहे इतकी मागणी वाढली आहे. कमीत कमी डाऊन पेमेंट व विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या आकर्षक ऑफर्स यामुळे मध्यमवर्गीयांनी दुचाकीची खरेदीही मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दरही काहीसे घसरल्याने सोने-चांदीला चांगली मागणी राहिली. शेअर बाजारही तेजीत राहिला. एकुणात बाजारात उत्साह व आनंदासोबतच आर्थिकदृष्ट्या तेजीही राहिली.
----------------
महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या या काळातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील भारतीय उद्योगपतींच्या राजेशाही थाटाचा मुद्दा एकीकडे चर्चेत आला असतानाच दुसरीकडे भारतातील श्रीमंतांची संख्या वाढत असल्याचीही वार्ता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या एका रिपोर्टनुसार सन 2000 मध्ये भारतातील अब्जाधीशांची जी संख्या अवघी नऊ होती ती आता 119 झाली आहे. कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाही गेल्या सहा महिन्यात पंधरा नवीन अब्जाधिश झाल्याचे फोर्ब्जच्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या एका दशकात देशातील अब्जाधीशांची संपत्ती सुमारे दहा पटीने वाढल्याचाही एक अहवाल आहे. हा वेग इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे अधिक आहे. अलीकडे आपल्याकडील अनेक उद्योगसमूहांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील समूहांशी व मान्यवर व्यक्तींसोबत करारमदार झाल्याने त्यातूनही आर्थिक चलनवलनाला यापुढील काळात आणखी मोठा हातभार लागण्याची अपेक्षा आहे. यातून श्रीमंत व गर्भ श्रीमंतांच्या यादीत होणारी लक्षणीय वाढ पाहता लवकरच आपण इतर सक्षम अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्याही पुढे गेलेलो असू. या वर्गाबद्दल असूया बाळगण्याचे कारण नाही, उलट देशाच्या समृद्धीचा दर त्यांच्यामुळे उंचावतो आहे याचा आनंद अगर समाधान बाळगता यावे. कोणताही उद्योग व्यवसाय भरभराटीस येतो तेव्हा तो अनेकांना रोजगार देऊन जातो व अर्थकारणाला अधिक गतिमानता प्रदान करून जातो हे येथे विसरता येऊ नये.
-----------------
या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बाजारात आलेली तेजी सामान्य, छोट्या व मध्यम उद्योग व्यावसायिकांनाही दिलासा देणारी व त्यांच्यातील निराशेचे वातावरण दूर करणारीच म्हणायला हवी. आर्थिक सधन संपन्नतेत खारीचा वाटा म्हणून त्याकडे नक्कीच बघता यावे, तेव्हा बाजारातील हा तेजीचा माहौल कायम ठेवायचा असेल तर कोरोनाच्या संकटाबाबतची सावधानता दुर्लक्षून चालणार नाही; कारण विदेशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याचे पाहता व दिल्लीतही ज्या वेगाने पुन्हा संसर्ग वाढल्याच्या वार्ता येत आहेत त्याकडे बघता देशातील सर्वाधिक बाधित आढळलेल्या महाराष्ट्रात गाफील वा बेफिकीर राहणे धोक्याचे ठरेल. दिवाळीच्या खरेदीसाठी ज्यापद्धतीने गर्दी उसळलेली व त्यात बेफिकीरपणा आढळून आला तो भीती वाढवणाराच ठरला आहे. शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांखेरीज कुटुंब व व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकानेच यासंदर्भाने खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
https://www.lokmat.com/editorial/keep-momentum-market-a301/
Deepotsav 2020
14 नोव्हेंबर 2020 ·
ज्ञानाचा व माहितीचा प्रकाश पेरणारा दीपोत्सव...
लोकमतचा दीपोत्सव दिवाळी अंक म्हणजे उत्सवच असतो. विविधांगी माहितीने नटलेल्या या अंकाचे प्रकाशन नगर रचना विभागाच्या सहा संचालक प्रतिभा भदाणे, सिद्धहस्त लेखिका मृदुला बेळे व ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत दीपोत्सवच्या संपादक अपर्णा वेलणकर, सहा उपाध्यक्ष बी बी चांडक
अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून त्यासाठी लोकमतची कार्यालये, जागोजागचे वार्ताहर, विक्रेत्या बांधवांकडेही मागणी नोंदविता येईल
#LokmatNashik #LokmatDipotsav
Thursday, November 12, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 12 Nov, 2020
चला, हवा स्वच्छ ठेवूया...
किरण अग्रवाल
--------
सामाजिक शहाणपण हे सार्वत्रिक पातळीवरून प्रदर्शित होते खरे, पण त्याची सुरुवात ही वैयक्तिक स्वरूपातच होत असते. एकाने घेतलेला शहाणपणाचा निर्णय जेव्हा अनेकांसाठी आदर्शाचा, अनुकरणाचा आणि दिशादर्शक विषय ठरून जातो तेव्हा त्यातून आपोआपच सामाजिक शहाणपण प्रस्थापित होते. कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या विषयाकडे त्याचदृष्टीने बघितले जाणे गरजेचे आहे, कारण पर्यावरण संवर्धनापुरताच नव्हे तर यंदा जीवन रक्षणाशीही त्याचा संबंध अन्योन्यपणे जोडला गेलेला आहे.
कोरोना संसर्ग बाधितांची समस्या ही प्रामुख्याने श्वसन क्रियेशी निगडित असते व त्यातील जटिलता त्यामुळेच आकारास येते. रुग्णास ऑक्सिजन लावण्याची व प्रसंगी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळही यातूनच उद्भवते. श्वसनाची सुलभता कायम राखायची असेल तर त्यासाठी हवेची शुद्धता गरजेची आहे. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. फटाक्यांच्या धुरातून श्वसनाला हानिकारक ठरणारे वायू हवेत मिसळतात व प्रदूषण घडून येते. अस्थमासारखा श्वसनाशी संबंधित विकार असलेल्यांना तर दरवर्षी दिवाळीत या संकटाचा सामना करण्याची वेळ येते. यंदा तर सर्वांचाच कोरोनाच्या महामारीशी झगडा सुरू आहे, त्यामुळे श्वसनाला बाधा ठरणारे वायुप्रदूषण कटाक्षाने टाळणे गरजेचे बनले आहे. त्याच दृष्टीने शासन-प्रशासन, वैद्यकीय व्यावसायिक व सामाजिक संघटनांकडूनही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे कळकळीचे आवाहन केले जात आहे. तेव्हा या आवाहनाला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे, कारण दिवाळीचे फटाके हा आता केवळ आपला वैयक्तिक आनंदाचा भाग उरलेला नसून आपल्या आसपासच्या व आपल्याही जिवलगांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा विषय बनला आहे.
--------
महत्त्वाचे म्हणजे, शासन-प्रशासन आपल्यापरीने काम करत असले तरी समाजमन जागृत होते तेव्हा खबरदारीची धुराही समाजाकडूनच वाहिली जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. गेल्या गणेशोत्सवाच्या पर्वातच त्याचा प्रत्यय येऊन गेला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता या उत्सवातील सार्वजनिकता टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. जनतेनेही त्याची निकड लक्षात घेऊन अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा केला. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना यंदा घराघरात मोठ्या प्रमाणावर झालीच शिवाय विसर्जनही घरच्या घरी करण्यात आले. त्यामुळे जलप्रदूषणही कमी झाले. तोच कित्ता दिवाळीत गिरविला गेल्यास वायुप्रदूषण टाळता येणे शक्य होणार आहे, जे कोरोनाबाधितांसाठी तसेच प्रत्येक घरातील वयोवृद्धांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. आपला आनंद हा इतर कोणाच्या जिवावर उठणार नाही ना याची जाणीव ठेवून दिवाळी साजरी केल्यास त्यातून फटाकेमुक्ती आपोआपच घडून येईल.
--------
विशेष म्हणजे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानेही देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी लागू केली असून, त्यात महाराष्ट्रातील अठरा शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ज्या शहरांमधील हवेची गुणवत्ता घसरलेली किंवा खराब आढळून आली होती तिथे ही बंदी घालण्यात आली असून, ज्या ठिकाणी गुणवत्तेची पातळी माफक प्रमाणात घसरली आहे तिथे ग्रीन फटाक्यांना काही नियमांच्या अधीन परवानगी देण्यात आली आहे. या बंदी असलेल्या शहरांमध्ये आपल्याकडील मुंबई, पुणे, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदी शहरे असल्याचे पाहता येथील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे स्पष्ट व्हावे. तेव्हा या शहरांमधील नागरिकांची जबाबदारी तर अधिक वाढून गेल्याचे म्हणता यावे. मागे 2018 मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्यातर्फेही स्वच्छ हवा अभियान राबविण्यात येऊन त्यात राज्यातील सहा शहरांनी चांगले प्रयत्न केल्याने त्यांना कोट्यवधींचा निधी वितरित केला गेला. यात देशात सर्वाधिक 244 कोटींचा निधी मुंबई शहराला मिळाला तर शुद्ध हवेसाठी सर्वाधिक अनुदान मिळवणारे महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले होते. यंदा दिवाळी साजरी करताना हाच लौकिक अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने फटाकामुक्ती साधणे अपेक्षित आहे. ते पर्यावरणासाठीच नव्हे, तर कोरोनामुळे अडचणीत आलेले जीव वाचवण्यासाठीदेखील गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येक जण कटिबद्ध होऊया...
https://www.lokmat.com/editorial/lets-keep-air-clean-a309/
Monday, November 9, 2020
Lokmat women achievers awards 2020
09 Nov, 2020
'ती'च्या कर्तृत्वाला लोकमतचा सलाम...
स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर सर करणाऱ्या भगिनींचा लोकमततर्फे वूमेन अचिव्हर्स अवॉर्डस 2020ने गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या यशोगाथेच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व लोकमत चे सहाय्यक उपाध्यक्ष बी बी चांडक यांच्या समवेत...
@MILOKMAT initiative
#LokmatNashik #KiranAgrawalNashik
#LokmatWomenAchieversAwards2020
Thursday, November 5, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 05 Nov, 2020
फील गुड स्थिती उत्साह वाढविणारी...
सण कोणतेही असोत; ते आनंद, उत्साह व ऊर्जा प्रदान करणारेच असतात. त्यामुळे संकटांवर किंवा अडचणींवर मात करीत ते साजरे होताना दिसतात. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच अपेक्षेने बाजारात चैतन्य संचारलेले दिसत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे इतके दिवस तुंबलेले जनजीवन आता प्रवाही होताना दिसत आहे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. बाजारात दिसणारा हा उत्साह गत पाच-सहा महिन्यातील निराशादायी वातावरणावर समाधानाची फुंकर मारणाराच म्हणावयास हवा. शासनानेही हळूहळू अनेक निर्बंध हटविल्याने जनजीवन पूर्वपदावर आलेले दिसत आहे. अडखळलेली अर्थव्यवस्था रुळावर येत चालल्याचे तर संकेत यातून मिळत आहेतच, शिवाय जनतेच्या मनात जी भीतीची छाया दाटून होती ती दूर होण्यासही यामुळे हातभार लागत आहे ही सर्वात मोठी जमेची बाब म्हणता यावी.
दिवाळी अवघी आठवडाभरावर आलेली असल्याने बाजार फुलला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी व्यावसायिक क्षेत्रात सीमोल्लंघन करीत नवी व्यवस्था वा प्रणालीचा अंगीकार केलेला दिसून आला. कोरोनाने एकूणच जीवनशैली बदलून ठेवल्याचे पाहता त्याचा परिणाम व्यवसायावरही होताना दिसत आहे. संकटामुळे का होईना, काळाची गरज लक्षात घेता अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यापार-उदिमात नवीनता आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीलाही इष्टापत्ती ठरवून पुढे जाण्याचा बाणा यातून स्पष्ट झाला. कार्पोरेट पातळीवरील रिलायन्ससारख्या मोठ्या समूहांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचे जागतिक कंपन्यांशी झालेले करार-मदार या काळात पहावयास मिळालेत. व्यावसायिकदृष्ट्या या मोठ्या कंपन्यांच्या आपसी भागीदाऱ्या व त्यातील टक्केवारीची चर्चा करण्याचे हे ठिकाण नाही, मात्र यामुळे त्यांचा व्यवसाय व आवाका वाढल्याचा लाभ अंतिमतः ग्राहकांनाही होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. कोरोनाला लक्षात घेता आगामी काळातील गरजांनुसार उत्पादन तर पुढे येत आहेच, शिवाय जे आहे त्याच्या वितरणात सुलभता व अभिनवता आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, जे ग्राहकांच्याच हिताचे ठरणार आहे. यामुळे एकूणच बाजारात जे उत्साहाचे वातावरण आकारास आले आहे त्यामुळे अलीकडे निर्देशांकसुद्धा उसळी घेत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हबकलेल्या मानसिकतेला यामुळे उभारी मिळून जाणे स्वाभाविक ठरले आहे.
कोरोनाचा वेग मंदावल्याचे पाहता व त्यावर काहीसे नियंत्रण मिळवता आल्याने शासनानेही हळूहळू अनलॉक करीत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. धार्मिक स्थळे उघडण्याविषयीचे व अन्य काही बाबतीतले निर्बंध कायम आहेत हे खरे, त्यावरून शासनाला विविध आरोपांना व नाराजीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे; पण सुरक्षिततेच्या भूमिकेतून त्याकडे पाहता यावे. अनलॉक करून स्थिती पूर्वपदावर आणताना शासनाने आता अर्थव्यवस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. उद्योजकांना तारणमुक्त पत हमी मिळावी याकरिता आत्मनिर्भर भारत योजनेत आपत्कालीन पत हमी योजना घोषित करण्यात आली होती, त्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख कोटींपेक्षा जास्त वित्त पुरवठा करणाऱ्या कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येते. ही योजना आता 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली गेली असल्याने त्याचा लाभ कर्जदारांना होऊ शकेल. राज्यशासनाने स्टॅम्प ड्यूटीत कपात केल्यामुळे गृह विक्री वाढून गेली आहे. नाइट फ्रॅंक इंडियाने यासंदर्भात नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंबईत मागील आठ वर्षाच्या तुलनेत गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च गृह विक्री झाल्याचे आढळून आले आहे. एका महिन्यात 42 टक्क्यांची ही वाढ असल्याचे म्हटले गेले आहे. आयएचएस मार्किटच्या अहवालानुसार देशातील सेवा क्षेत्राचा वृद्धीदरही ऑक्टोबरमध्ये सुधारला आहे. सप्टेंबर मध्ये 49.8 अंकावर असलेला हा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये 54.1 वर गेला आहे जो वृद्धी दर्शवतो.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली; पण गुणवत्तेवर ज्यांची नोकरी शाबूत आहे अशा नोकरदारांना 2021 मध्ये वेतनवाढ देण्याची तयारी 87 टक्के कंपन्यांनी दाखविल्याचे व्यावसायिक सेवा क्षेत्रातील ‘एओन’ने सर्वेक्षणाअंती म्हटले आहे. विविध सरकारी व सहकारी नागरी बँकांनीही गृह व वाहन कर्जाचे दर कमी केल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. थोडक्यात सर्वच क्षेत्रांत ‘फील गूड’चे वातावरण आहे. ही सकारात्मकता व उत्साहाची स्थितीच यापुढे वेगाने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे, फक्त ती टिकवून ठेवायची असेल तर शासनाने म्हटल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ओळखून जनतेनेही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कोरोना रोखण्यासाठी उपचाराचा भाग म्हणून जे निर्बंध लावण्यात आले होते ते हटवण्यात येत असले तरी अनिर्बंध होऊन चालणार नाही. जागोजागी बाजारात गर्दी होत असल्याचे पाहता सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज असून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे हा सवयीचा भाग बनवून घ्यावा लागेल. तसे घडून येवो व दिवाळीच्या निमित्ताने आकारास आलेली बाजारातील उत्साहाची स्थिती यापुढे कायम टिकून व वृद्धिंगत होत राहो याच अपेक्षा.
https://www.lokmat.com/editorial/feel-good-status-exciting-a653/
Monday, November 2, 2020
Subscribe to:
Posts (Atom)