प्रत्येक क्षणाचा उत्सव करूया ...
वर्क फ्रॉम होम संपवून कार्यालयात नियमित झाल्यामुळे कसा गेला हा काळ, असा एक कॉमन प्रश्न सध्या अनेकांकडून केला जातोय.
खरं तर, नेहमी व्यस्त राहण्याची सवय असल्याने घरात काहीसं घुसमटल्यासारखं झालं खरं...
खिडकी बाहेर स्वच्छन्दीपणे उडणाऱ्या पाखरांकडे पाहून कुण्या शायराने म्हटलेले माझ्याही ओठांवर आले ,
ऐ उड़ते परिंदे...
कुछ तो दुआ दे खुले आसमान की
पिंजरे का दर्द क्या है
अब समझ चुका है इंसान भी...।
अर्थात, नित्य कर्मापासून फार दूर झालोच नाही त्यामुळे फार वेगळं काही केलं नाही, पण खूप ऐकलं हे नक्की ...
हे ऐकणं घरातल्यांचं तर होतच, पण त्याखेरीज इतर जे ऐकलं ते पूर्णतः मन प्रसन्न करणारंच होतं
सकाळी सकाळी 'उठी उठी गोपाळा..' पासून ते 'केशवा माधवा...' सारखी भक्तिगीते तल्लीनतेने ऐकली.
पंडित भीमसेनजींच्या 'इंद्रायणी काठी ..' ऐकता ऐकता कधी टाळी लागायची ते कळायचेच नाही.
जितेंद्र अभिषेकी यांचे 'हे सुरांनो चंद्र व्हा...'
आंनद भाटे व राहुल देशपांडे यांचे,' टाळ बोले चिपळीला...'
सुधीर फडके, अरुण दाते, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल असे अनेकांना ऐकलं
उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई कान देऊन ऐकली, तर हरिप्रसाद चौरसीया यांचे बासरी वादन व पंडित जसराजजींची 'गोकुल मे बाजत...'ची जुगलबंदी अवर्णनीयच।
पंडित रविशंकर यांची सितार व झाकीर हुसेन यांचा तबला मन भरेस्तोवर ऐकला.
लतादीदी, आशाताई, किशोर दा, रफी साहब यांना तर ऐकलच, येसूदासही आवर्जून ऐकलेत..
'जी करता है, मोर के पाव मे पायलिया पहना दु
कुहू कुहू गाती कोयलिया को फुलो का गहना दु...'
अहाहा, काय शब्द विलास आहे...
गुलजार यांच्या गीतांनी मनाची स्पंदने नव्याने ऐकायला मिळालीत जणू.
लहानपणी वडिलांसोबत रसलपुरच्या उरुसात अजीज नाझा कडून ऐकलेली 'चढता सुरज धिरे धिरे...' ही कव्वाली किती तरी दिवसांनी पुन्हा ऐकली.
निजामी बंधूंची, 'छाप तिलक सब छिनी रे...'
साबरी ब्रदर्सचे,' एक मुलाकात जरुरी है सनम..'
जसपिंदर नरूला यांचे,' ये जो हलका हलका सरूर है... '
राहत फतेह अली खान यांचे,' मेरे रशके कमर..'
असं खूप ऐकलं. मन हरवून जाईपर्यंत...
गीतांचे शब्द, त्यात डोकावून, डुंबून ऐकलेत..
सुरेंद्र शर्मा, हुल्लड मुरादाबादी, मूनव्वर राणा, राहत इंदोरी, कुमार विश्वास यांनाही ऐकलं...
हिंदुस्तान विश्वगुरु क्यो नही होगा, यहा के जेलो मे भी अनेक संत महात्मा जो बैठे है... यासारख्या संपत सरल यांच्या रचनांनी खरेच अंतर्मुख केले.
सर्व प्रकारच्या रस साहित्याची यात्रा केली...
झरझर वाहणाऱ्या झऱ्याकाठी पाण्यात पाय सोडून देहभान हरपून बसावे तसे बसून ऐकले सारे.
वाटलं, रोजच्या रहाटगाडग्यात राहून गेलेलं जगणंच हाती लागलं...
एरव्ही किती तांत्रिक जगणं असतं आपलं? सभोवताली किती आनंद आहे, निसर्ग आहे, शब्द आहेत; स्वर आहेत... आपण काय व किती घेतोय यातलं?
खरंच, प्रत्येकानं स्वतःला विचारून पाहायला हवं हे...
जगण्याचं ओढणं ओढण्यापेक्षा ते छान मन मस्तकी धारण करून प्रत्येक क्षणाचा उत्सव करीत जगायला कुणी रोखले आहे?
#KiranAgrawal #KirananandNashik
No comments:
Post a Comment