Thursday, November 26, 2020

#EditorsView published in Online Lokmat on 26 Nov, 2020

िबटे फार झाले, बालके जपून ठेवा... किरण अग्रवाल मथळा काहीसा विचित्र वाटेल खरा; परंतु बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात स्थिती खरेच तशी आहे. राज्यातील बिबट्या या प्राण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचा हक्काचा अधिवास असलेल्या जंगल अगर वनांची संख्या कमी होत आहे त्यामुळे ते उसाच्या शेतात आश्रयास जातात आणि सध्याचा हंगाम ऊसतोडीचा असल्याने जागोजागी बिबट्यांकडून माणसांवर होणारे हल्ले वाढीस लागले आहेत; विशेषतः लहान बालके या बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याच्या घटना वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण होणे स्वाभाविक ठरले आहे.
राज्यात नाशिक, नगर, धुळे, अमरावती, नागपूर, सोलापूर, ठाणे आदी परिसरात बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात आहे. सर्वत्रच जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वने भकास झालीत, परिणामी त्यातील पशू, प्राणी नागरी वस्तीकडे वळत आहेत. अर्थात त्यांचे नागरी वस्तीत येणे हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याने चिंता वाढून गेली आहे. चालू आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दोन बालकांचा बळी बिबट्याने घेतला आहे तर मागील एका महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी, केळवंडी व करडवाडी येथील तीन चिमुरड्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव येथे तर पिता-पुत्र असे दोघेजण अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले तर बीड जिल्ह्यातील एका पंचायत समिती सदस्याचा पती या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे या परिसरातील बिबटे आवरा अशी मागणी पुढे आली आहे. ---------------------------- मार्जार कुळातील अत्यंत चपळ वन्यप्राणी म्हणून बिबट्याची ओळख असून, कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात हा प्राणी नैसर्गिकरीत्या पटाईत म्हटला जातो. त्यामुळे जंगलाचा अधिवास कमी होत चालल्याचे बघून त्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात निवारा शोधल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र अधिक असलेल्या निफाड, सायखेड्याच्या गंगाथडी व नाशिकच्या दारणाकाठ परिसरात तसेच नगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगर रांगांत बिबट्यांचा वावर व तेथील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण त्यामुळेच अधिक आहे. विदर्भाच्या काही पट्ट्यातील मका पिकातही बिबट्या आढळून येतो. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने उसात लपून राहणारा बिबट्या उघड्यावर आला व त्यातून ऊसतोड करणाऱ्या मजुरांवर, त्यांच्या लहान मुलांवर होणारे त्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटना घडल्या की वनविभागाची धावाधाव होते, पिंजरे लावले जातात व बिबटे जेरबंदही होतात; परंतु एकूणच परिस्थिती बघितली तर यासंदर्भातील वनविभागाकडे असलेल्या मनुष्यबळाची तसेच यंत्रसामग्रीची कमतरता उघड व्हावी. साधे नाशिक जिल्ह्याचे उदाहरण घ्या, गेल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे सुमारे 9 महिन्यात या परिक्षेत्रात 19 बिबटे जेरबंद केले गेले; पण वनविभागाकडे रॅपिड रेस्क्यू व्हॅनच नाही. साध्या कामचलाऊ मालवाहू वाहनाद्वारे या कारवाया केल्या गेल्या. पिंजरेदेखील पुरेशा प्रमाणात नाहीत. तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बिबट्याचा सुरक्षित अधिवास धोक्यात आल्याने तो मनुष्य वस्तीकडे वळाला व त्यामुळे मनुष्य जिवाला धोका निर्माण झाला हे जितके खरे तितकेच बिबट्याचा जीवही त्यामुळे धोक्यात आला हेदेखील खरे. भारतीय वन्यजीव कायदा संरक्षक सूचीमध्ये बिबट्याला स्थान देण्यात आले आहे; परंतु बिबट्याचे बळी जाण्याचे किंवा त्याची शिकार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात 2011 ते 2019 या नऊ वर्षात तब्बल 648 बिबटे मृत्युमुखी पडले असून, त्यात 221 बिबटे ‘रोड कील’ म्हणजे अपघातात बळी गेले आहेत, तर 83 बिबट्यांची शिकार झाली आहे. तेव्हा ही वेळ ओढवू नये म्हणून वन्यप्राण्यांच्या सुरक्षित अधिवासाच्या दृष्टीने पावले उचलली जाणे अपेक्षित आहे. सरकारी मालकीच्या पडीक जागांवर गवत लागवडी केली गेली तर त्यातून बिबट्यांचा अधिवास सुरक्षित होऊ शकेल तसेच बिबट्याचे हल्ले होणाऱ्या भागात ट्रॅप कॅमेराद्वारे वॉच ठेवून पिंजरे लावले गेले तर मनुष्य हानीही टाळता येऊ शकेल. पण राजकारणातच गुंतलेल्या राज्यकर्त्यांना याबाबतची गरज व प्राथमिकता जाणवेल का हा खरा प्रश्न आहे. https://www.lokmat.com/editorial/leopards-now-attacking-humans-their-houses-nashik-a597/

No comments:

Post a Comment