Thursday, May 27, 2021

EditorsView published in Online Lokmat on May 27, 2021

Coronavirus: इथे ओशाळली माणुसकी... किरण अग्रवाल / आपत्तीलाही संधी मानून तिचा लाभ उचलू पाहणारे जेव्हा आढळून येतात तेव्हा संवेदनशील मनाच्या लोकांचे हळहळणे स्वाभाविक असते, यातही व्यवसायिकतेतील पै पैशाच्या लाभापलीकडे जाऊन जेव्हा कुणाकडून निर्मम अगर संवेदनहीनतेचा प्रत्यय घडविणारे वर्तन घडून येते तेव्हा चिड वा संताप आल्याखेरीज रहात नाही. मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अश्या प्रकरणात खरे तर संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु तेही धड होत नसल्याचाच अधिकतर अनुभव येतो. सद्यस्थितीतील कोरोनाच्या संकटात अशीच काही उदाहरणे पुढे आल्याने समाजमन अस्वस्थ होणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू पाहात असल्याचे दिलासादायक वर्तमान आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून 89.26 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर पॉझिटिव्हिटी दरही 9.54 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असून, मृत्यू दरही 1.14 टक्‍क्‍यांपर्यंत घटला आहे. चेन्नईमधील गणित विज्ञान संस्थेतील संशोधक सितभ्र सिंन्हा यांनी केलेल्या संशोधनानुसार या महामारीशी संबंधित 'आर' संकेतांक प्रथमच 0.82 एवढ्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळतात. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जागोजागी लागू करावे लागलेले कडक निर्बंध हळूहळू काही प्रमाणात शिथिल केले जात आहेत. अर्थात कोरोना गेलेला नाहीच, मात्र तो आटोक्यात येत असल्याचे संकेत पाहता 'फीलगुड' म्हणता यावे अशी स्थिती आहे. जनमानसातील भीतीचे वातावरण ओसरायला यामुळे मदत व्हावी, परंतु एकीकडे असे होत असताना दुसरीकडे माणुसकीला नख लावणारे प्रकार समोर येत असल्याने भीतीची जागा अस्वस्थतेने घेणे स्वाभाविक ठरून गेले आहे. ---------------- तिकडे प्रयागराजमध्ये शेकडो शव गंगेत वाहून येत असल्याचे दूरचित्रवाणी माध्यमातून बघायला मिळाले असतांना, नदीकाठी वाळूत पुरलेल्या प्रेतांवरील चादरी व त्या भोवती रोवले गेलेले बांबू काढून नेले गेल्याचा दुर्दैवी प्रकार पुढे आला आहे. मनुष्य इतका कसा स्वार्थांध, माणुसकीशून्य व संवेदनाहिन होऊ शकतो असा प्रश्न हे चित्र पाहून पडावा. आपल्याकडचेच उदाहरण घ्या, एकीकडे रुग्णालयात दाखल झालेला एकेक जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय सेवकांचा मोठा वर्ग अविरत सेवा देत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना, दुसरीकडे अपवादात्मक संख्येत का होईना काहीजण सेवा व विश्वास या संकल्पनांशी फारकत घेत याहीस्थितीत आपला व्यवसाय मांडून बसल्याच्या तक्रारी आहेत. केवळ पैसे लाटण्यासाठी चक्क मृतदेहावर तीन दिवस उपचार केले गेल्याचा प्रकार नांदेडात पुढे आला असून, मृतकाचा चेहरा दाखविण्यासाठी म्हणजे अंतिम दर्शनासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये घडल्याची तक्रार ऐकावयास मिळाली. विदर्भातील खामगावमध्ये रुग्णाच्या शिल्लक बिलापोटी महिलेचे मंगळसूत्र ठेवून घेतले गेल्याची बाब समाज माध्यमात व्हायरल झाली, तर नाशकात मेडिक्लेमचे पैसे कंपनीकडून पदरात पडून देखील रुग्णाची अनामत रक्कम परत न दिल्यामुळे संबंधितांना रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करावे लागल्याची घटना चर्चित ठरली. ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणे, परंतु यासारखे लहान-मोठे प्रकार अनेक ठिकाणी घडले ज्यातून संधीसाधूपणाचा निर्मम व क्रूर चेहरा पुढे येऊन गेला. --------------- अशा घटनांचे प्रमाण नगण्य आहे, यापेक्षा सेवाभावाने झटणाऱ्या व आडल्या नाडल्याच्या मदतीस धावून जाणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे हे खरे, परंतु मोठ्या पांढऱ्या कॅनव्हासवरील छोटा का होईना काळा डाग हा लक्ष वेधून घेतो, तसे माणुसकीशून्यतेचा अनुभव देणाऱ्या अपवादात्मक घटनांबद्दल होते; म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. संवेदना इतक्या का ओहटीला लागल्या, की मनुष्याकडून पशुत्वाचे वर्तन घडावे; हा या संदर्भातून उपस्थित होणारा खरा प्रश्न आहे. 'नरेचि केला हीन किती नर' या उक्तीचा प्रत्यय यावा अशाच या घटना म्हणायला हव्यात. कधी ना कधी जायचे प्रत्येकालाच आहे, परंतु राहायच्या कालावधीत जगण्यासाठी इतकी वा अशी यातायात करावी लागणार असेल तर त्या जगण्याला अर्थ तो काय उरावा? पण दुर्दैवाने भावनाशून्यता वाढीस लागली आहे. कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवजातीवरचे संकट आहे, तेव्हा त्यास सामोरे जातांना माणुसकी सोडून चालणार नाही, इतकेच यानिमित्ताने सांगणे. https://www.lokmat.com/editorial/coronavirus-humanity-shame-here-a301/

Tuesday, May 25, 2021

Sundarlal Bahuguna dies..

May 21, 2021
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलेले प्रख्यात पर्यावरणवादी तथा पद्मविभूषण सुंदरलाल जी बहुगुणा यांचे आज दुःखद निधन झाले. काही वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर ते आले असता पंचवटीतील कैलास मठाचे आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी संविदानंद जी सरस्वती यांच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. वैचारिक संपन्नतेत भर घालणाऱ्या ज्या मान्यवरांच्या भेटींचा मला योग आला त्यातील ते एक होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून प्रख्यात असलेले सुंदरलाल जी यांची जल, जंगल व जमिनी बाबतची मते त्या भेटीत जाणून घेता आली. वय आणि तब्येत, दोन्ही साथ देत नसतानाही पर्यावरणाच्या रक्षणाबाबत जीवनाच्या अंतापर्यंत ते कायम लढत व झुंजत राहिले. त्यांच्या जाण्याने एक आग्रही निसर्ग रक्षक आपण गमावला आहे, भावपूर्ण श्रद्धांजली ... #SundarlalBahuguna

Saraunsh Published in Akola Lokmat on May 23, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210523_7_1
https://www.lokmat.com/editorial/need-add-patches-rural-health-system-a310/

Thursday, May 20, 2021

EditorsView published in Online Lokmat on May 20, 2021

गर्दी काही हटेना! दुर्लक्षाची अगर बेपर्वाईची भूमिका घेऊन चालणार नाही, अन्यथ... किरण अग्रवाल / कोरोनाच्या दहशतीमुळे एकीकडे सर्वत्र भयाचे वातावरण दाटले असताना दुसरीकडे मात्र या भयाची कसलीही तमा न बाळगता अगर शासन प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाला ठोकरून लावत जागोजागी नागरिकांची जी गर्दी होतांना दिसत आहे, त्यातुन संबंधितांची नादानी तर उघड व्हावीच व्हावी, परंतु या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठीचे कोणतेही नियोजन न करणाऱ्या यंत्रणांची बेफिकिरी वा दुर्लक्षही अधोरेखित झाल्याखेरीज राहू नये.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने जवळपास प्रत्येकच घरात शिरकाव केल्याचे चित्र आहे. पहिल्या लाटेत केल्या गेलेल्या कम्प्लिट लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जो फटका बसला त्यातून बाहेर पडता आलेलें नसतानाच दुसरी लाट आली, ज्यात जीवितहानी मोठ्या प्रमाणात घडून येत आहे. कोरोनाच्या या लाटेत महाराष्ट्राचा नंबर प्रारंभी देशात अव्वल राहिला, परंतु आता नव्या रुग्णांमध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू पुढे असून महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारत आहे. राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही दोन कोटींचा टप्पा ओलांडला असून, एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. मुंबई-पुणे-नाशिक या अगोदर हॉटस्पॉट ठरलेल्या महानगरातील बाधितांची संख्याही कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी बेफिकीर होऊन चालणार नाही. पण दुर्दैवाने तसेच काहीसे होताना दिसत आहे. पहिल्या लाटेतून बाहेर पडत असताना जी चूक घडून आली तीच पुन्हा होताना दिसून यावे, हे चिंताजनकच म्हणायला हवे. ----------------- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या अधिक आढळत होती तेथे प्रारंभी काही निर्बंध घालण्यात आले होते, त्याचे पुरेसे पालन न झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू करण्यात आले; आता त्या निर्बंधात काहीशी शिथिलता आणली जात असताना पुन्हा बाजारातील गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. बँका उघडताच मर्यादित वेळेत व्यवहार करण्यासाठी अशी काही तोबा गर्दी उडत आहे की ते चित्र पाहूनच धडकी भरावी. विशेषतः दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांखेरीज पेन्शन घेण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिकही रांगेत गर्दी करून उभे राहिलेले पहावयास मिळाले. निगुतीने संसाराचा गाडा ओढणाऱ्यांची यातील अपरिहार्यता समजून घेता येणारी असली तरी, ही गर्दी संसर्गाला निमंत्रण देणारी ठरली तर आश्चर्य वाटू नये. लसीकरणाच्या ठिकाणीही अशीच गर्दी उसळत आहे, त्यामुळे पोलिसांना तैनात करून त्यावर नियंत्रण मिळवण्याची वेळ आली आहे. या गर्दीतील गरजूंची मानसिकता लक्षात घेता यावी, पण यंत्रणांना यात काही सुसूत्रता आणून फिजिकल डिस्टंसिंग साधता येऊ नये का, हा यातील खरा प्रश्न आहे.
सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी येणाऱ्यांकडून बादल्या व हंडा कळशीच्या रांगा लावल्या जातात किंवा पूर्वी रॉकेलच्या दुकानासमोर कॅनच्या रांगा लावल्या गेलेल्या दिसत, तसे आता लसीकरणासाठी काही ठिकाणी पादत्राणांच्या रांगा लावून संबंधित नागरिक झाडाखाली सावलीत बसल्याची चित्रे पहावयास मिळत आहेत. या सावलीतही डिस्टनसिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहे. मास्क वापरला म्हणजे फिजिकल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर बसविला तरी चालेल असा गैरसमज अनेकांनी करून घेतलेला दिसतो. कोरोनाच्या संसर्गाला यातून निमंत्रण मिळून जाण्याचाच धोका आहे, तेव्हा यंत्रणांनी यासंदर्भात उपाय योजणे गरजेचे बनले आहे. एकदाचे कडक निर्बंध पाळून झाले म्हणजे त्यानंतर अनिर्बंधपणे वागायचे, वावरायचे ही भूमिकाच मुळी चुकीची आहे. निर्बंधांच्या शिथिलतेत निर्धारित कालावधीत खरेदी करायची मुभा असताना उर्वरित वेळेतही लोक बाहेर पडत आहेत व त्यांना अडवणारेही कुणी दिसत नाही; अशा ठिकाणी यंत्रणांनी आपला रोल निभावणे गरजेचे आहे. न ऐकणाऱ्या किंवा निर्बंध न पाळणाऱ्या लोकांना त्यांच्या हालवर सोडून दिल्यासारखी दुर्लक्षाची अगर बेपर्वाईची भूमिका घेऊन चालणार नाही, अन्यथा तिसरी लाट थोपविणे अवघड ठरेल. https://www.lokmat.com/editorial/editorial-government-corona-will-not-run-negligence-a629/

Monday, May 17, 2021

Kiran Agrawal Cartoon..

May 17, 2021 व्यंगचित्र...
जुने सहकारी, व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी अलीकडेच माझे एक व्यंगचित्र रेखाटून पाठविले. सुमारे बारा पंधरा वर्षांपूर्वी अवि जी माझ्या 'सारांश' या कॉलमसाठी राजकारण्यांची व्यंगचित्रे काढून देत, नंतर मी हॅलो नाशिक पुरवणीत त्यांची खट्याळकी नावाने पॉकेट कार्टून माला सुरू केली होती. त्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या. कोरोनाने व्यापलेल्या अस्वस्थ वर्तमानात तेवढीच चेहर्‍यावर एक सैल सर लकेर उमटायला मदत झाली यामुळे. Thanks Avi bhai for this lovely cartoon...

Sunday, May 16, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on May 16, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210516_7_1
https://www.lokmat.com/editorial/say-thank-you-so-much-doctors-nurses-and-police-a310/

Thursday, May 13, 2021

EditorsView published in Online Lokmat on May 13, 2021

यंत्रणांनी गरजूंची असहायता व अपरिहार्यतेकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे ... किरण अग्रवाल / कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून राज्यात विविध जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, पण ते करताना यंत्रणांना संवेदनहीन बनून चालणार नाही. नाईलाजास्तव बाहेर पडावे लागलेल्या अडल्या नाडलेल्या तसेच अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही चौकाचौकात अडवून व त्यांनी ओळख सांगून देखील त्यांचा छळ मांडला जाणार असेल तर कोरोना परवडला पण यंत्रणा आवरा असे म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. संसर्ग टाळण्याकरिता कडक निर्बंधांची आवश्यकता असली तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी गरजूंची असहायता व अपरिहार्यतेकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे.
कोरोनाबाबत आता आतापर्यंत देशात महाराष्ट्राचा क्रमांक एक होता. कोरोना बाधितांची अधिक संख्या असलेल्या देशातील टॉप टेन शहरांमध्येही महाराष्ट्रातील अधिक शहरांचा समावेश होता, परंतु महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्या अलीकडे घटू लागली आहे. महाराष्ट्रात प्रतिदिनी जेथे 60 ते 70 हजार बाधित आढळत होते, ती संख्या आता 45 ते पन्नास हजारापर्यंत आली आहे. सद्यस्थितीत देशात आता ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत कर्नाटक क्रमांक एक वर गेले असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही हे खरे, परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राकडून सुरू असलेली लढाई इतर राज्यांसाठी अनुकरणीय ठरू पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्द्ल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. अर्थात लढाई संपलेली नाही. निर्बंधात शिथिलता आणली तर पुन्हा कोरोनाचा ग्राफ वाढण्याची भीती आहे, त्यामुळेच राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लाकडाऊन घोषित करून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात आगामी काळात आणखी काही जिल्ह्यांची भर पडण्याची शक्यता आहे. ------------ अर्थात, संपूर्ण बंद अथवा कडक निर्बंध लागू करताना काही अत्यावश्यक सेवांना त्यातून वगळण्याचे निर्देश आहेत, मात्र दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांनाच काय, काही ठिकाणी डॉक्टरांनाही अडविले गेल्याच्या तक्रारी आहेत. लसीकरणासाठी निघालेल्या ज्येष्ठांनाही दंडुके दाखविण्याची मग्रुरी दाखविली गेल्याची ही ओरड आहे. मुळात, आज दाखविली जाते आहे तेवढी खबरदारी यापूर्वीच घेतली असती व बिनकामाचे फिरणाऱ्याना तसेच गर्दी करणाऱ्यांना अटकाव केला असता तर संपूर्ण बंद करण्याची वेळच आली नसती. पण असो, नागरिक स्वतःहून ऐकत नाही म्हटल्यावर त्यांना ऐकवण्याची वेळ यंत्रणांवर येऊन ठेपली आहे हे खरे; परंतु वास्तविकता पाहून संवेदनेने काही विचार केला जाणार आहे की नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य संबंधित मान्यवरांनीही कोरोनाच्या अटकावसाठी निर्बंध घालताना उगाच कुणाची अडवणूक होणार नाही याकडे लक्ष पुरविण्यास सांगितले आहे. जे सबळ कारणाखेरीज फिरत आहेत त्यांच्यावर दंडुका उगारायलाच हवा, परंतु दवाखान्यात अगर लसीकरणास निघालेल्यांची तसेच अत्यावश्यक सेवेतील सेवार्थीची अडवणूक व्हायला नको. काहींना असहायतेमुळे घराबाहेर पडावे लागत आहे तर काही जणांना वैद्यकीय कारणास्तव अपरिहार्यतेमुळे बाहेर पडणे भाग आहे. अशांची अडचण संवेदनशीलतेने समजून घेणे गरजेचे आहे. ------------- कडक निर्बंध घालण्यात आलेल्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेतच, मात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या यंत्रणांना हे तितकेसे ज्ञात दिसत नाही त्यामुळे तक्रारींचा सूर वाढता दिसत आहे. यंत्रणा अंगात आल्यासारखे निर्बंधांची अंमलबजावणी करू पाहात आहे. अन्यथा डॉक्टरांना, लस घेण्यासाठी निघालेल्या वृद्धांना व वृत्तपत्र विक्रेत्यांनाही अडवीले गेल्याच्या तक्रारी पुढे आल्याच नसत्या. भलेही अशा तक्रारींचे प्रमाण तुलनेने कमी असेल, परंतु असे व्हायला नको. भयामुळे बिघडलेल्या मानसिकतेत असे अनुभव अधिक वेदनादायी ठरतात. ही वेळ संकट रोखण्याची आहे, तशी संबंधितांच्या दुःखावर सहानुभूतीची व अडचणीवर सहकार्याची फुंकर घालण्याची आहे. आपण सारे मिळून ते करूया व कोरोनाला हरवूया, तूर्त इतकेच। https://www.lokmat.com/editorial/coronavirus-lockdown-systems-need-be-sensitive-helplessness-and-inevitability-needs-a309/

Monday, May 10, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on May 09, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210509_7_1

EditorsView published in Online Lokmat on May 06, 2021

संधीसाधूपणा सोडून माणुसकी धर्म निभवूया... किरण अग्रवाल / कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी एकीकडे शासन व प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना व वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी हर एक जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे इंजेक्शनची काळाबाजारी वाढलेली दिसून यावी, हे केवळ दुर्दैवीच नसून तद्दन संधिसाधूपणा आहे. अशातून संबंधितांना भलेही दोन पैसे जास्तीचे कमविता येतील, परंतु या गोरख धंद्यातून कमावलेले धन सोबत नेता येणार नाही, ते येथेच सोडून जावे लागणार आहे हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे.
कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सध्याची दुसरी लाटच ओसरलेली नसताना किंवा त्यासंबंधीच्या भयातून सावरले नसतानाच तिसऱ्या लाटेचे अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविले जाऊ लागले असून त्यामुळे चिंतेत भर पडून जाणे स्वाभाविक ठरले आहे. कधी एकदाचे यासंबंधीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडतो असे प्रत्येकालाच झाले आहे, कारण कुठलेही व कोणतेही कुटुंब असो; काही ना काही प्रमाणात त्याला कोरोनाची झळ बसून गेली आहे. जवळपास प्रत्येकच कुटुंबात कुणी न कुणी बाधित असून कोणीतरी आप्तेष्ट गमावल्याचे दुःख आहे. बहुसंख्य उद्योग, व्यापार, व्यवसायाला खीळ बसली आहेच; परंतु त्या आर्थिक नुकसानीपेक्षाही मानसिकदृष्ट्या जे भयाचे दडपण आले आहे ते अधिक चिंतादायी ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व बाबतीत सक्षमता असणारी मंडळीही हतबल झाल्यासारखी दिसून येत आहे, त्यामुळे सामान्य नागरिक अधिकच गांगरून व घाबरून गेला आहे. आपण बाधित झालो तर आपल्याला रुग्णालयात जागा मिळेल का व उपचार करू शकू का, असे या भया मागचे कारण आहे. ----------- मुळातच आकारास आलेल्या या भयात भर घालणारी बाब ठरत आहे ती म्हणजे, इंजेक्शन व साधनसामग्रीच्या अभावाच्या किंवा त्यांच्या काळाबाजाराच्या वार्ता. तिकडे गुजरातमध्ये तर बनावट रेमडेसिविर इंजेक्शन बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून हजारो बोगस इंजेक्शन्स पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत व काही जणांना अटकही करण्यात आली आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा क्रूर प्रकार म्हणता यावा. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातही नाशिक, अकोला, गोंदिया, नांदुरा, सोलापूर आदी अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजाराच्या वार्ता पुढे येत आहेत. एकीकडे ऑक्सीजन बेड्स व व्हेंटिलेटरच्या अभावी रुग्ण तडफडत असताना दुसरीकडे इंजेक्शन सारख्या सामग्रीचा काळाबाजार होतांना दिसून यावा, हे अतिशय शोचनीय व माणुसकीच्या भावनेला नख लावणारे आहे. शेवटी संधीसाधूपणा कुठे करावा याचेही काही भान असायला हवे, जीव पणास लागला असताना तेथेही असे केले जाणार असेल तर कसे व्हायचे? दुर्दैव असे की, स्वतःच्या अगतिकतेतुन या संकट काळातही अविचारी व अविवेकी प्रकार पुढे येत आहेत. कोरोना बाधितांच्या सेवेत झोकून देऊन काम करणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंट लाईन वर्कर्ससाठी असलेल्या लसींवर विदर्भातील खामगावमध्ये काही धनाढयानी बनावट नोकऱ्या दाखवून डल्ला मारल्याचा जो प्रकार पुढे आला आहे, तोही यातीलच म्हणायला हवा. शेवटी काळा बाजाराच्या माध्यमातून असो, की अन्य कुठल्याही मार्गाने; कितीही कमाई केली तरी शेवटी जाताना ती सोबत नेता येणार नाही. कफन को जेब नही होती, हे वाक्य यासंदर्भात संबंधितांनी लक्षात ठेवायला हवे. ही वेळ माणुसकीच्या नात्याने गरजूंना किंवा अडचणीत आलेल्यांना हात व साथ देण्याची आहे, माणुसकी धर्म निभावण्याची आहे इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/coronavirus-news-lets-help-needy-peoples-should-not-look-them-opportunity-make-money-a584/