Monday, May 10, 2021

EditorsView published in Online Lokmat on May 06, 2021

संधीसाधूपणा सोडून माणुसकी धर्म निभवूया... किरण अग्रवाल / कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी एकीकडे शासन व प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना व वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी हर एक जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे इंजेक्शनची काळाबाजारी वाढलेली दिसून यावी, हे केवळ दुर्दैवीच नसून तद्दन संधिसाधूपणा आहे. अशातून संबंधितांना भलेही दोन पैसे जास्तीचे कमविता येतील, परंतु या गोरख धंद्यातून कमावलेले धन सोबत नेता येणार नाही, ते येथेच सोडून जावे लागणार आहे हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे.
कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सध्याची दुसरी लाटच ओसरलेली नसताना किंवा त्यासंबंधीच्या भयातून सावरले नसतानाच तिसऱ्या लाटेचे अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविले जाऊ लागले असून त्यामुळे चिंतेत भर पडून जाणे स्वाभाविक ठरले आहे. कधी एकदाचे यासंबंधीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडतो असे प्रत्येकालाच झाले आहे, कारण कुठलेही व कोणतेही कुटुंब असो; काही ना काही प्रमाणात त्याला कोरोनाची झळ बसून गेली आहे. जवळपास प्रत्येकच कुटुंबात कुणी न कुणी बाधित असून कोणीतरी आप्तेष्ट गमावल्याचे दुःख आहे. बहुसंख्य उद्योग, व्यापार, व्यवसायाला खीळ बसली आहेच; परंतु त्या आर्थिक नुकसानीपेक्षाही मानसिकदृष्ट्या जे भयाचे दडपण आले आहे ते अधिक चिंतादायी ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व बाबतीत सक्षमता असणारी मंडळीही हतबल झाल्यासारखी दिसून येत आहे, त्यामुळे सामान्य नागरिक अधिकच गांगरून व घाबरून गेला आहे. आपण बाधित झालो तर आपल्याला रुग्णालयात जागा मिळेल का व उपचार करू शकू का, असे या भया मागचे कारण आहे. ----------- मुळातच आकारास आलेल्या या भयात भर घालणारी बाब ठरत आहे ती म्हणजे, इंजेक्शन व साधनसामग्रीच्या अभावाच्या किंवा त्यांच्या काळाबाजाराच्या वार्ता. तिकडे गुजरातमध्ये तर बनावट रेमडेसिविर इंजेक्शन बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून हजारो बोगस इंजेक्शन्स पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत व काही जणांना अटकही करण्यात आली आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा क्रूर प्रकार म्हणता यावा. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातही नाशिक, अकोला, गोंदिया, नांदुरा, सोलापूर आदी अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजाराच्या वार्ता पुढे येत आहेत. एकीकडे ऑक्सीजन बेड्स व व्हेंटिलेटरच्या अभावी रुग्ण तडफडत असताना दुसरीकडे इंजेक्शन सारख्या सामग्रीचा काळाबाजार होतांना दिसून यावा, हे अतिशय शोचनीय व माणुसकीच्या भावनेला नख लावणारे आहे. शेवटी संधीसाधूपणा कुठे करावा याचेही काही भान असायला हवे, जीव पणास लागला असताना तेथेही असे केले जाणार असेल तर कसे व्हायचे? दुर्दैव असे की, स्वतःच्या अगतिकतेतुन या संकट काळातही अविचारी व अविवेकी प्रकार पुढे येत आहेत. कोरोना बाधितांच्या सेवेत झोकून देऊन काम करणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंट लाईन वर्कर्ससाठी असलेल्या लसींवर विदर्भातील खामगावमध्ये काही धनाढयानी बनावट नोकऱ्या दाखवून डल्ला मारल्याचा जो प्रकार पुढे आला आहे, तोही यातीलच म्हणायला हवा. शेवटी काळा बाजाराच्या माध्यमातून असो, की अन्य कुठल्याही मार्गाने; कितीही कमाई केली तरी शेवटी जाताना ती सोबत नेता येणार नाही. कफन को जेब नही होती, हे वाक्य यासंदर्भात संबंधितांनी लक्षात ठेवायला हवे. ही वेळ माणुसकीच्या नात्याने गरजूंना किंवा अडचणीत आलेल्यांना हात व साथ देण्याची आहे, माणुसकी धर्म निभावण्याची आहे इतकेच यानिमित्ताने. https://www.lokmat.com/editorial/coronavirus-news-lets-help-needy-peoples-should-not-look-them-opportunity-make-money-a584/

No comments:

Post a Comment