Thursday, April 29, 2021

EditorsView published in Online Lokmat on April 29, 2021

दिस जातील, संकट सरल; एक फोन तर करून बघा... किरण अग्रवाल / सद्य:स्थितीत कोरोनाची काजळ छाया चहूकडे दाटली असली तरी, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ हे जे काही सांगून ठेवले आहे त्याप्रमाणे उद्याच्या दिवसाचा सूर्य चांगलेच काही घेऊन उगवणार आहे याबद्दलची आश्वासकता बाळगायला हवी. संशोधकांचे संशोधन,लसीकरणाचा वाढता वेग व डॉक्टर्स, नर्सेस या वैद्यकीय क्षेत्रातील घटकांचे अविरत सुरू असलेले परिश्रम या बळावर कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार आहोतच; तेव्हा गरज आहे ती या संकटकाळात दुःख वाटून घेण्याची व उमेद जागविण्याची. पैसा-अडका, पद-प्रतिष्ठा काही कामी येत नाहीये, अशा स्थितीत फक्त दिलाशाचे व सहवेदनेचे दोन शब्द उपयोगी पडणार असल्याने त्यासाठीचा जागर वाढविण्याची भूमिका गरजेची आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या धडकेने प्रत्येकाच्याच वाट्याला काहीना काही दुःख वा वेदना आल्या आहेत, कुणी म्हणता कुणी याला अपवाद ठरू शकलेले नाही. हे संकटच असे काही आहे की भले भले त्यात उन्मळून पडले आहेत. कोरोनाबाधितांच्या व बळींच्याही संख्येत आताआतापर्यंत रोज वाढच होत असल्याचे दिसून येत होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून हा वेग ओसरत चालल्याचे दिलासादायी वर्तमान आहे. नव्या रुग्णांच्या दैनंदिन संख्येत काही प्रमाणात घट झाली असून, दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात अडीच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेषतः संशोधकांच्या संशोधनामुळे नवनव्या लसी पुढे येत असून, लसीकरणाचा वेगही वाढला आहे. १ मेपासून १८ वर्ष वयापुढील सर्वांचेच लसीकरण होऊ घातले असल्याने यात कमालीची आघाडी प्राप्त होण्याची चिन्हे आहेत, यातून मनोधैर्य उंचावून संकटाशी मुकाबला करणे सुलभ होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे शासन व प्रशासनाच्या नियोजन व प्रयत्नांखेरीज वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस व सर्वसंबंधित घटक अविरत परिश्रम घेत आहेत. अनेक ठिकाणी अनेक जण सुट्टी व रजा न घेता समर्पित भावाने आपली सेवा बजावत आहेत. यात शंभर टक्के यश कोणत्याही क्षेत्रात व कोणत्याही बाबतीत शक्य नसते, तसे काही बाबतीत काहीसे अपयशही येत असले तरी त्याने विचलित न होता संयमाने या संकटाचा सामना करणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने काही ठिकाणी रुग्णालयांवर किंवा डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत त्या सर्वथा अयोग्य आहेत. धीर सुटण्याची ही लक्षणे आहेत, मात्र अशावेळी तो सुटू नये म्हणून जाणकारांनी संबंधितांना धीर देणे गरजेचे असते. जाण्याचे वय नसणारी तरणीबांड मंडळी गमावली जातात तेव्हा त्याचे दुःख नक्कीच मोठे असते; परंतु म्हणून त्या दुःखावेगातून अनुचित वर्तन घडून येणे समर्थनीय ठरू शकत नाही. अशावेळी सहयोगी व समाज धुरिणांनी संबंधितांकडे सांत्वना व सहवेदना व्यक्त करून हिंमत देणे गरजेचे असते. संकटातून व दुःखातून बाहेर पडण्यासाठी हे धीराचे दोन शब्दच कामी येणारे असतात व तेच स्मरणात राहणारेही; तेव्हा त्यादृष्टीने चिरपरिचितांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे.
सोशल मीडियाचा बोलबाला असलेल्या आजच्या या काळात उगाच भीतिदायक वातावरण निर्माण करणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करण्यापेक्षा कोरोनाशी झुंजत असलेल्या आप्तेष्ट, मित्रांशी संपर्क करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केलेले कधीही अधिक उपयोगाचे व महत्त्वाचे. अखेर हे दिवस जातील व संकटही सरेलच; पण याकाळात आपण दाखवलेली माणुसकी व सहृदयताच कामी येणार आहे. त्यासाठी फार काही परिश्रमाची गरज नाहीये. अंतःकरण भिजलेले व डोळे ओलावलेले हवेत फक्त. त्यातून भावनेवर स्वार झालेले शब्द आपोआप संप्रेषित होतात. बऱ्याचदा काही न बोलता नि:शब्दताही खूप मोठा आधार देऊन व सांगून जाणारी असते. पण अडचण अशी असते की दुसऱ्याच्या प्रगतीबद्दलची मळमळ आपल्याला दूर सारता येत नाही, परिणामी संकटकाळात हळहळ व्यक्त करणेही जमत नाही. तेव्हा सुखात किंवा आनंदात ज्याची आठवण केली नाही अशा लांबच्या का होईना नातेवाइकाला किंवा विस्मृतीत गेलेल्या एखाद्या मित्राला फोन तर करून बघा त्याची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी. तुमच्या काळजीचे, दिलाशाचे दोन शब्द दुर्लभ ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनइतकेच परिणामकारी ठरतात की नाही ते बघा तर खरं ! https://www.lokmat.com/editorial/days-will-gone-crisis-will-end-atleast-make-one-phone-call-a607/

No comments:

Post a Comment