Thursday, August 5, 2021

EditorsView published in Online Lokmat on August 05, 2021

शिवशंकरभाऊ: माणुसकी धर्माची पूजा बांधणारा दीप निमाला... किरण अग्रवाल / आज माणसातली माणुसकी हरवत चालल्याचेच अनुभव सर्वत्र येत असतात, कुणी कुणाला विचारत नाही की, पर दुःखाबद्दल हळहळत नाही; दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे तर दूरच. अश्यात माणुसकी धर्माची पताका उंचावत आपल्या सेवाकार्याने माणसातील देव म्हणविल्या गेलेल्या शिवशंकरभाऊंच्या जाण्याने अखंड सेवेचा नंदादीप निमाला आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या अध्यात्मिक, शैक्षणिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रातील सेवा कार्याच्या लौकीकामागे या कर्मयोगी व्यक्तीचीच खरी धडपड राहिली आहे, जी या क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी आदर्शवत अशीच आहे.
वितभर करून हातभर दाखविणार्‍या आणि कौतुकासह पुरस्कारांची अभिलाषा बाळगणार्‍या समाजसेवकांच्या आजच्या चलतीच्या काळात खऱ्या अर्थाने आपल्या निष्काम सेवा, समर्पणाने आदर्श दिपस्तंभ ठरलेले जे कर्मयोगी आहेत त्यात संत श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. आभाळाएवढे काम उभे करून व राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी व्यक्तिगत स्नेह लाभूनही या व्यक्तीने कधी कोणत्या पदांचा अगर सन्मानाचा मोह बाळगला नाही, किंबहुना त्यासाठी विनम्रपणे नकारच दिला; कारण मी जे करतो ते माझे नाही तर महाराजच करवून घेतात अशी त्यांची प्रामाणिक भावना राहिली. मजेचिस्तव जाहले, परी म्या नाही केले। हे जेणे जाणिले, तो सुटला गा ।। ही संत ज्ञानोबा रायांची ओवी तंतोतंत लागू पडावी असे शिवशंकर भाऊंचे सेवाकार्य राहिले आहे. ----------------- भाऊंच्या सेवा कार्यला शिस्तप्रियतेची जोड होती हे विशेष. स्वच्छतेवर त्यांचा अधिक भर असे, त्यामुळे संस्थानच्या कुठल्याही मंदिर परिसरात नारळाच्या शेंड्या, निर्माल्य वगैरे विखुरलेले कुठेही आढळत नाही. शेगाव येथून पंढरपूर येथे प्रतिवर्षी जाणारा पालखी सोहळा म्हणजे भाऊंनी घालून दिलेल्या शिस्तीचा अनोखा अविष्कारच असतो. भजनी मंडळ, विणेकरी, दिंडीकरी, मुले, पुरुष-महिला असा सर्वांचा क्रम निश्चित असतो व त्यानुसारच पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण संपूर्ण महाराष्ट्रातून होत असते. श्री गजानन महाराज संस्थानच्या सर्व शैक्षणिक संस्था असोत, की जागोजागचे विविध उपक्रम; या प्रत्येक ठिकाणी सेवेला शिस्तीची जोड लाभलेली दिसून येते ती भाउंमुळेच. त्यांच्या शिस्तशीरपणाच्या अनुभवाचे साक्षीदार मलाही होता आले. 1991 मध्ये देशाच्या आठ राज्यांमधून महाराजा श्री अग्रसेन मैत्री, सद्भाव, समाजवाद, एकता मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन प्रारंभ झालेल्या या रॅलीची सुरुवात करताना भाऊंनी स्वतः या रॅलीतील मोटरसायकलस्वारांना रांगेत उभे केले होते व संपूर्ण रॅलीत तीच शिस्त पाळण्याची कटाक्षाने सूचना केली होती. उच्चस्थनी असूनही प्रत्येक आयोजन नियोजनात बारकाईने लक्ष देणारे असे व्यक्तिमत्व विरळच.
मंदिरे, मंदिरांचे व्यवस्थापन व तिथले अर्थकारण हा तसा नेहमी वादाचा विषय राहिला आहे, परंतु श्री गजानन महाराज संस्थान त्याबाबत कायम अपवाद राहिले ते भाऊंच्या सेवावृत्तीने व पारदर्शक कामकाजामुळे. मंदिरातील दानपेटीत चिल्लरचे प्रमाण अधिक असल्याचे पाहता, आपला भक्त तळागाळातील व सर्वसामान्य असल्याचे जाणून भाऊंनी या वर्गासाठी डोंगराएवढे काम उभे केले. सुमारे 42 विविध प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात संस्थानतर्फे राबविले जातात, ज्यात वैद्यकीय सेवेची सुरुवात अवघ्या दोन रुपये प्रति रुग्णावर करण्यात आली आहे. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी वाड्या पाड्यांवर जाऊन तेथील आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्याचे कार्य भाऊंच्या प्रेरणेने सुरू आहे. बुलडाण्याच्या तळाशी असलेल्या खामखेड या एका छोट्या गावात आगीने सारे भस्मसात केल्यावर कळवळलेल्या शिवशंकर भाऊंनी आठ दिवस या संपूर्ण गावाच्या भोजनाची व्यवस्था संस्थानमार्फत केली. किल्लारीतील भूकंप असो, की कोल्हापुरातील महापूर, प्रत्येक ठिकाणी संस्थानचे सेवेकरी धावून गेले. अगदी अलीकडच्या कोरोना संकट काळातही बुलडाणा जिल्ह्यातील असंख्य रुग्णांना प्रसाद पोहोचविला गेला व तदनंतर तर संस्थानतर्फेच कोविड सेंटर सुरू केले गेले. संवेदनशीलतेतून जी कळकळ व हळहळ आकारास येते ती शिवशंकर भाऊंच्या ठायी पदोपदी जाणवत असे आणि म्हणूनच तो सेवेचा धागा संस्थानच्या प्रत्येक कार्यात आढळून येतो, जो या संस्थानच्या सेवाकार्याचे वेगळेपण अधोरेखित करतो. सेवेने देव आकळतो, या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला आकंठ जगणारे, जोपासणारे व त्याचा वारसा पुढील पिढीला सोपविणारे शिवशंकरभाऊ पाटील यांनी संत श्री गजानन महाराज यांना अभिप्रेत माणुसकी धर्माचीच पूजा सदैव बांधली, त्यामुळे त्यांचे देहावसान या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समस्तजनांना पोरके करून गेले आहे. https://www.lokmat.com/editorial/editorial-view-over-shri-gajanan-maharaj-sansthan-shivshankarbhau-patil-a597/

No comments:

Post a Comment