Thursday, August 5, 2021

मल्टीआर्टिंग ...

03 August, 2021 मल्टीआर्टिंग ...
हल्ली मल्टिटास्किंग हा परवलीचा शब्द बनला आहे. त्या अनुषंगाने नोकरीच्या क्षेत्रात सर्वांना सर्व कामे आली पाहिजेत असा आग्रह धरला जातो व तो योग्यही आहे, तद्वतच कलेच्या प्रांतात एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा अनेक कला अवगत असल्याचे जेव्हा आढळून येते तेव्हा त्याकडे मल्टीआर्टिंग म्हणून पाहता यावे.
आमच्या लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड श्री अलोक कुमार शर्मा यांच्या सौभाग्यवती दीपा शर्मा या तशाच एक कलाकार. अलीकडेच त्यांच्याकडे जाणे झाले तेव्हा सौ. शर्मा यांची बहुविध कलात्मकता पाहून अचंबितच झालो. चित्रकला, शिल्पकला, कशिदा क्रोशीया, मिनाकारी, थ्रेड वर्क, बॉटल पेंटिंग, ड्रेस डिझायनींग आदी एकापेक्षा अधिक कला प्रकारात त्या निपूण आहेत.
नोएडा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये पतीच्या नोकरीनिमित्त राहावे लागलेल्या व पर्यटना निमित्त देश-विदेशातील विविध ठिकाणी फिरलेल्या सौ शर्मा भाभींनी त्या त्या ठिकाणची कलाकुसर आत्मसात केली. महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवरायांचे कॉफी पेंटिंग साकारण्याबरोबरच स्वराज्य प्रेरिका आई जिजाऊ साहेबांच्या सिंदखेड राजा येथे जाऊन त्या पुण्य भूमीतून आणलेल्या लहान शिलांनाही कलात्मकतेने सजवून ठेवण्याची त्यांची कल्पकता कोणालाही भारावून टाकल्याखेरीज राहत नाही. मधुबनी, वारली, म्युरल, लिपन - एपन, गोधना- गौन्ड, पॅरा, रेशम, कॉफी, मंडाला, सौरा, पॉप आर्ट आदी 24 प्रकारच्या चित्रकला त्यांना अवगत आहे. MARVARK Creation म्हणून स्वान्त सुखाय त्यांची ही कलोपासना सुरू असून त्यांनी साकारलेल्या विविध पेंटिंग्जस व हस्त शिल्पांमुळे त्यांचे घर जणू आर्ट गॅलरीच बनून गेले आहे. मिरर रायटिंगमध्ये पाच भाषांमध्ये त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
नोकरदार पतीच्या कार्यालयीन व्यस्ततेबद्दल सर्वच गृहिणींची ओरड व नाराजी असते, पण आनंदी जीवनासाठी अडचणींबद्दल कुरकुर न करता आनंदाच्या वाटा स्वतःलाच शोधायच्या असतात, त्यादृष्टीने 'श्रीं'च्या व्यस्त काळात 'सौं'ना आपल्यातील कलेच्या सृजनतेतुन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येऊ शकते याचा शर्मा भाभींनी घालून दिलेला आदर्श अन्य गृहिणींनाही घेता येणारा आहे. Proud of you Sharma Bhabhi ji ... #MultiArting #MarvarkCreation #DeepaSharma

No comments:

Post a Comment