Friday, October 29, 2021

EditorsView published in Online Lokmat on Oct 28, 2021

संवेदनांचे दीप उजळूया ... किरण अग्रवाल / आनंद वाटल्याने वाढतो असे म्हणतात, पण आज आनंद कुणी वाटून घेऊ इच्छित नाही; तो 'मी' व 'माझ्या'तच ठेवून दुःख मात्र वाटून घेण्याची अपेक्षा बाळगली जाते. अर्थात सुख असो की दुःख, त्यात एकतर्फी वाटेकरी कधीच लाभत नसतात म्हणून यासंदर्भातील समतोल साधायचा तर अगोदर सुख वाटण्यापासून सुरुवात करायची असते. ते करायचे म्हणजे काय, तर आपल्या आनंदातील वाटेकरी वाढवायचे. यंदाच्या दिवाळीत तेच करता आले तर निराशेचे मळभ दूर सारून उत्साह, ऊर्जेच्या पणतीने प्रत्येक अंगण प्रकाशमान झालेले दिसून येऊ शकेल.
गत वर्षांपासून दिवाळीला कोरोनाच्या संकटाची पार्श्वभूमी लाभुन गेलेली असल्याने सण साजरा होताना दिसतो, परंतु मनातील अस्वस्थता लपता लपत नाही. यंदाच्या दिवाळीपूर्वीही कोरोनाची दुसरी लाट अनेकांना झळ पोहचवून गेली आहे. अनेक घरातील कर्ते व कमावते पुरुष कोरोनाने हिरावून घेतले आहेत, तर अनेकांच्या नोकरी, व्यापार - उद्योगांवर गंडांतर आलेले आहे. अशाही स्थितीत मन घट्ट करून सारेजण दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाजारातील गर्दी ओसंडून वाहत असून, संकटावर मात करून आयुष्याच्या मशाली पेटवण्याचा दुर्दम्य आशावाद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर झळकत आहे. कोरोनाच्या संकटातून कसे तरी बचावत बाहेर पडून स्थिरस्थावर होत नाही तोच अतिवृष्टीचा फटका बसला. बळिराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, तरी नाउमेद न होता ऋण काढून का होईना सण साधण्यासाठी धडपड सुरू आहे. काहीशी निराशा, अस्वस्थता मनात आहे खरी; पण आशेचे दीप लावून आसमंत उजळून काढण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत ही समाधानाची बाब म्हणता यावी. ----------------------------- आशेचे दीप लावण्याच्या या प्रयत्नांना सार्वत्रिक पातळीवर बळ लाभणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ज्यांच्या वाट्याला जे जे काही दुःख आले ते त्यांना विसरायला लावायचे असेल तर आपला आनंद त्यांच्याशी वाटून घ्यावा लागेल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे दोन शब्द तसेच दुःखा प्रतीच्या सहवेदनेतून हे होऊ शकणारे आहे. माणुसकीच्या ओलाव्याने ओथंबलेल्या भावना व शब्द असले, की त्रयस्थाच्या मनाशीही आपुलकीच्या तारा जुळतात. आपल्या आनंदात सहभागी करून घेतले की समोरच्याचे दुःख विसरायला मदत होते. दिवाळीला आपण आपल्या दारी आकाश कंदील लावू , आनंदाचे तोरण बांधू, घरात गोड-धोड करू, नवीन कपडे लागते घेऊ; यातून जो आनंद आपणास लाभणार आहे तो आपल्या ऐपतीप्रमाणे समाजातील वंचितांसोबत वाटून घेतला तर त्यांचीही दिवाळी आनंदाची होऊ शकेल. यातून जे आत्मिक समाधान लाभेल व आनंद होईल त्याला मोल नसेल. अर्थातच यासाठी हवी संवेदनशीलता. दुर्देवाने आज लोकांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. कोरोनाने गरीब- श्रीमंत, लहान- मोठा या भेदांच्या पलीकडे सर्वांना एका पातळीवर आणून उभे केल्याचे पाहता, निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे. यंदाच्या दिवाळीत सारे मिळून तेच करूया... https://www.lokmat.com/editorial/lets-light-lamps-emotions-a310/?fbclid=IwAR1MNZIrbaolwp8HqBdV-23WyzsHtH8496bJJsqp2_GdqmmABQ8VS8EXnFU

करवा चौथ ...

Oct 24, 2021 करवा चौथ ...
आज करवा चौथ ... त्यानिमित्त सौ.नी त्यांना कुठून तरी हाती लागलेला फॉरवर्डेड मेसेज माझ्याकडे ढकलला. कितनी नन्हीं सी परिभाषा है जीवनसाथी की .. मैं शब्द, तुम अर्थ; तुम बिन, मैं व्यर्थ अहाहा, किती सुखावह संदेश! जमिनीवरून दोन फूट उंच उठून चालविणारा... शब्दांचे अर्थ जाणणारी व जोखणारी माझ्यासारखी व्यक्ती, पत्नीला का असेना; आपल्या नसण्याने तिचे आयुष्यच व्यर्थ असल्याइतकी महत्वाची वाटावी हे खरेतर जबाबदारीची जाणीव करून देणारीच बाब ठरावी. मग सहज मनात आले, आपण ही जबाबदारी किती पेलतो वा निभावतो? तर स्वतःचेच समाधान होऊ नये असे उत्तर मनाने दिले. **** संदेशातील शब्दाप्रमाणे मी फक्त 'अर्थ' उपलब्ध करून देतो, बाकी सर्व जबाबदाऱ्या तर सौ.च पेलत असते. मी तरी माझ्या जबाबदारीच्या अनुषंगाने कधी पुरुषार्थाची उजळणी करून जातो, परंतु 'ति'ने तिच्या जबाबदारीचा पसारा मांडलाय का कधी माझ्यापुढे; तर उत्तर आले, कधीच नाही! खूप अंतर्मुख झालो, मनाने अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. Taken as granted घेण्याची आपली जी पारंपरिक सवय असते, तिच्यामुळे घोळ होतोय असे लक्षात आले. पत्नी, प्रेयसी, मैत्रीण, माता अशा अनेक रूपातुन तिने पेललेली जबाबदारी इतकी मोठी व अवघडही आहे की, आपला 'अर्थ' त्यापुढे व्यर्थ ठरावा. सौ.च्या जबाबदारीचे, श्रमाचे व समर्पणाचेही कधी तोंडभरून कौतुक आपल्याकडून झालेच नाही याची जाणीव यानिमित्ताने झाली. असो. जागो तभी सबेरा, म्हणून मी याकडे पाहतो. इतकेच म्हणावेसे वाटते... जिंदगी मे तेरा बस साथ ही काफी है, दूर हो या पास, तेरा एहसास ही काफी है।। #KirananandNashik #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on Oct 24, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211024_8_1
https://www.lokmat.com/manthan/lets-bring-smile-deprived-a310/

Thursday, October 21, 2021

EditorsView published in Online Lokmat on Oct 21, 2021

अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा। किरण अग्रवाल / परतीच्या पावसाने केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र दाणादाण उडवून मोठे नुकसान घडविले. या पावसाने होत्याचे नव्हते करून ठेवले. नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुढे जाण्याखेरीज पर्याय नसतो हे खरेच, पण नेहमीच्या होऊन गेलेल्या या संकटात मदतीला धावून जाण्याच्या सरकारच्याही मर्यादा लक्षात घेता, वेळी-अवेळी होणारा पाऊस व अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे खात्रीशीर संकेत नव्हे, तर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या यंत्रणांच्या सक्षमपणे उपयोगीतेचा यासंबंधाने विचार होणे अपेक्षित आहे.
कोरोनाच्या संकटात अगोदरच झालेल्या नुकसानीमुळे समाज जीवनावर निराशेचे मळभ दाटलेले असताना पावसाच्या फटक्याने त्यात भर घालून ठेवली आहे. यंदा तसा मान्सून चांगला झाल्याने पिके जोमात होती, त्यामुळे यंदाचा दसरा दिवाळी चांगली जाईल असा अंदाज होता. सुदैवाने येईन येईन म्हणून भीती बाळगली गेलेली कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात आतापर्यंत तरी यश आलेले दिसत आहे, त्यामुळेही जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातही चैतन्याचे वातावरण आहे. अशात शेत पिकेही तरारून आल्याने बळीराजा काहीसा सुखावलेला होता, परंतु निसर्गाला ते मान्य नसावे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात आलेल्या परतीच्या पावसाने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचलसह अनेक राज्यात दाणादाण उडविली. दक्षिणेत केरळमध्ये तर हाहाकार उडाला असून काही जणांचे बळीही गेले आहेत. महाराष्ट्रातही विशेषता विदर्भ, मराठवाड्याला मोठा फटका बसून गेला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, धान व मक्यासह वेचणीला आलेला कापूस या परतीच्या पावसात जमीनदोस्त झाला. इतरही पिकांची हानी झाली, त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरारले. ऐन सणावाराच्या तोंडावर हे संकट ओढवल्याने, एकातून सुटले आणि दुसऱ्यात अडकले; अशी अवस्था साऱ्यांची झाली आहे. --------------- नैसर्गिक आपत्तीला इलाज नसतो, त्यामुळे बळीराजावर ओढवलेल्या या संकटातून त्यास काहीसा आधार किंवा दिलासा देण्यासाठी सरकारही आपल्या पातळीवर जमेल ते प्रयत्न करीत आहेच; मात्र ते पुरेसे ठरू शकत नाहीत. तेव्हा रोगावर इलाज करण्यापेक्षा रोगापासूनच दूर कसे राहता येईल या अंगाने यासंदर्भात विचार होणे गरजेचे ठरले आहे. पाणी पावसाचा अंदाज वर्तवणा-या वेधशाळा व हवामान खाते आपल्याकडे आहे, त्यांचे अंदाज कधी खरे तर कधी खोटेही ठरतात; परंतु आहेत त्या यंत्रणांचा सक्षमपणे उपयोग होताना दिसत नाही. विशेषतः वातावरणातील बदलामुळे मान्सून पॅटर्न वेगाने बदलतो आहे. तासाभरात एक, एक हजार मिलिमीटर पाऊस पडू लागला आहे. 2010 पासून ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. अगदी चेरापुंजीचे रेकॉर्ड तोडणारा पाऊस अलीकडे महाराष्ट्रात होऊ लागला आहे, तेव्हा या संदर्भातील आधुनिक व अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अंदाज नव्हे, तर सुस्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था होणे अपरिहार्य बनले आहे. --------------- महत्वाचे म्हणजे, राज्याला किंवा देशालाच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाला ढगफुटीची आगाऊ माहिती देण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने भारताची नोडल एजन्सी म्हणून निवड केलेली आहे, याकरिता कोट्यवधीचा निधीही उपलब्ध करून दिला जात असतो, तेव्हा 'एक्स बँड डॉप्लर रडार' व सुपर कम्प्युटर (HPC) सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध असल्याने त्या यंत्रणेचा वापर करून 'क्लाऊड बस्ट' व 'फ्लॅश फ्लड'ची माहिती मिळवणे व ती स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन संभाव्य नुकसान टाळणे अवघड नाही. दुसरे म्हणजे, मान्सून पॅटर्न बदलत असल्याचे पाहता पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन 'क्राफ्ट पॅटर्न' बदलाचा विचार करणेही आवश्यक आहे, परंतु याहीसंदर्भात पुरेसे जनजागरण होतांना दिसत नाही. कृषी विद्यापीठांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, परंतु ती शिक्षण, संशोधन व विश्लेषणातच अधिकतर व्यस्त असतात. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत व पद्धतीने निसर्गात होत असलेले बदल व त्याप्रमाणे शेतीत करावयाचे बदल समजावून सांगणे गरजेचे झाले आहे. रासायनिक खतांच्या अतीवापराने जमिनीच्या नापिकीसारख्या समस्या ओढवत आहेत. याहीदृष्टीने बदल केला गेला तर होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. https://www.lokmat.com/editorial/accurate-observation-excess-rainfall-required-a310/

Saraunsh published in Akola Lokmat on Oct 17, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211017_8_1
https://www.lokmat.com/manthan/how-prevent-disturbance-warehouse-a310/?fbclid=IwAR0CoNsH7A1-fJszSL-bXwJVPLaoq9SDTag1Y2Tjw4FOW2kp6P6DRkckSUs

खुद के लिए इतवार नही...

Oct 17, 2021
फुरसतें सबके लिए जुटायी हमने मगर... खुद के लिए कोई इतवार नही रख पाए...!
ज्याने कुणी हे म्हटलेय, त्याच्याशी पूर्ण सहमत ... #HappySunday #KiranAgrawal

वृत्तपत्र वितरक दिन...

Oct 15, 2021 वृत्तपत्र वितरक दिन...
मानवी शरीरात रक्तवाहिन्यांचे जे महत्व, तसे वा तितकेच वृत्तपत्र क्षेत्रात ते वितरण करणाऱ्या वितरक बांधवांचे. भल्या पहाटे जेव्हा आपण साखर झोपेत असतो तेव्हा हे बांधव ऊन, वारा व पाऊसाची तमा न बाळगता आपल्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचवितात. सण, वार असो की वैयक्तिक सुख - दुःखे; न चुकता अखंडितपणे सेवा बजावतात. व्यवस्थापन व वाचक यातील वाचन प्रेरणेचा ते दुवा बनतात.
आज वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र वितरक दिनानिमित्त सकाळी सकाळी या बांधवांसोबत काही वेळ घालविला. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञतेने लोकमततर्फे त्यांचा गौरव केला. विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी अकोला लोकमतचे मुख्य वितरक अशोकराव तथा बापूसाहेब देशमुख यांच्यासह शेखर तेलंग, शिंदे काका, विनय ढेगळे, गौरव जिराफे, विनायक जपूलकर, विजय भांदिर्गे, बी संतोष, अभिजीत परळीकर, निलेश भांदिर्गे, अनंतराव धोत्रे, दिनेश ताथोड, दिनेश परळीकर, मनीष परळीकर, प्रशांत देशमुख आदी. तसेच लोकमत वितरण विभागाचे प्रमुख श्री प्रकाश वानखेडे समवेतची ही आनंदचित्रे... #NewspapersVendersDay #LokmatVendersAkola #AkolaPaperwala #LokmatAkola

Thursday, October 14, 2021

EditorsView published in Online Lokmat on October 14, 2021

परिश्रमाच्या क्षमतांचे सीमोल्लंघन घडवूया... किरण अग्रवाल / रोजीरोटीच्या झगड्यात जगणे जगताना मनुष्याला अनेक संकटे, समस्या वा विवंचनांचा सामना करावा लागतो हे खरे, परंतु त्यावर मात करून जो पुढे जातो तोच सिकंदर ठरत असतो. मर्यादांच्या सीमा वाट आडवु पाहतात, परंतु त्या उल्लंघून जाण्यातच खरा पुरुषार्थ असतो. ते कसोटीचे वा धाडसाचे जरी असले तरी त्यातूनच आपल्या क्षमता सिद्ध होतात. अडचणींच्या खाचखळग्यातून मार्ग काढून यशाचे उद्दिष्ट गाठले जाते तेव्हाच त्याचा आनंद वेगळा व अवर्णनीय ठरतो. सद्यस्थितीही संकटांनी आणि अडचणींनी भरलेली व घेरलेली आहे, मात्र त्यावर मात करून पुढे जायचे तर संधी व क्षमतांच्या कक्षा रुंदावण्याचे सीमोल्लंघन करणे गरजेचे ठरावे. यंदाची विजयादशमी साजरी करताना हेच लक्षात घ्यायला हवे.
विजयादशमीच्या सीमोल्लंघनाला ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ आहेत. शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करून विजयाची गुढी उंचावण्याचा, उभारण्याचा हा दिवस अगर सण आहे. शस्त्रांची, शमीची तसेच सरस्वतीची पूजा करून तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना या दिनी करण्याचा प्रघात आहे. महिषासुरमर्दिनी दुर्गेपासून ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्याशी संबंधित अनेक दाखले व आख्यायिका या सणाशी संबंधित आहेत. थोडक्यात संकटांचे निर्दालन व समस्यांचे सीमोल्लंघन करून विजयाचा जय जयकार करण्याचा हा दिवस, त्यामुळे आजच्या संदर्भानेही मना मनांवर आलेली निराशेची धूळ झटकून यश, कीर्ती, उत्साह, ऊर्जेची गुढी उभारूया.
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने सार्वत्रिक पातळीवर हबकलेपण ओढवले आहे. व्यक्तिगत आरोग्य असो, की आर्थिक व्यवस्था; प्रत्येकालाच कोरोनाचा फटका बसला आहे. काही उद्योग व्यवसायांना या संकटातही भरभराटीचा योग लाभला हा भाग वेगळा, परंतु आरोग्याच्या संदर्भाने विचार करता कोणीही यापासून बचावू शकलेला नाही. कमी अधिक प्रमाणात, स्वतःच्या अगर आप्तांच्या निमित्ताने प्रत्येकालाच या संकटाची झळ सोसावी लागली आहे. परिणामी समाजमन दुःखी आहे. कोरोनाच्या लाटांमधून काहीसे बाहेर पडत नाही तोच निसर्गाच्या थपडा खाव्या लागल्या. शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीच्या पूरपाण्याने हिरावून नेला. कोरोनाने काळीज चर्र झाले होते, आता अतिवृष्टीने डोळ्यात पाणी साठले आहे; पण याहीस्थितीत संकटांच्या छाताडावर पाय रोवून सारेजण नव्या आयुष्याच्या लढाईला सिद्ध झाले आहेत. समस्यांना न डगमगता, 'हम होंगे कामयाब'ची जिद्द ठेऊन पुढच्या प्रवासाला लागले आहेत ही समाधानाचीच बाब म्हणता यावी.
संकटांनी ओढवलेली निराशा, निरुत्साह आता ओसरत असून आशेच्या पणत्या त्यासंबंधीचा अंधकार दूर करण्याचा व त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. शेअर मार्केटने विक्रमी पल्ला गाठला आहे. गेलेल्या नोकऱ्या परतू लागल्या असून उद्योगांच्या बंद पडलेल्या चिमण्याही आता धुरळु लागल्या आहेत. विकासाची रांगोळी रेखाटण्यासाठी सरकार, मग ते केंद्रातील असो की राज्यातील; आपापल्या पातळीने प्रयत्न करीत असून ढासळलेली अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. सारे चलन वलनच गतिमान व ऊर्जावान होत आहे. हे एकप्रकारे निराशेच्या सीमा ओलांडून आशेच्या प्रांतात मार्गस्थ होत असलेले समाजमनाचे सीमोल्लंघनच आहे. यंदाच्या विजयादशमीला याच मानसिकतेला बळ देत संकटांवर विजयाची गुढी उभारूया. 'दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा', असे आपण म्हणतोच; तर चला संकटालाही संधी मानून आपले धाडस, कल्पना व परिश्रमाच्या क्षमतांचेही सीमोल्लंघन घडवूया. आशादायी मनाने हिरव्याकंच पानांनी व उल्हासदायी रंगाच्या झेंडू फुलांनी आनंदाचे तोरण बांधूया... https://www.lokmat.com/editorial/lets-break-limits-hard-work-a310/

संत गाडगेबाबा...

Oct 13, 2021 संत गाडगेबाबा...
संत गाडगेबाबा... कुठल्याही शाळेची किंवा कॉलेजची पायरी चढले नाहीत. खडू-फळ्याशी कधी संबंध आला नाही, पण तरी या थोर पुरुषाने समाजातील अस्पृश्यता, अंधश्रद्धा घालवण्यासाठी व शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जी सुधारकाची भूमिका बजावली ती अद्वितीय अशीच आहे. स्वतः अशिक्षित असूनही समाजाला सुशिक्षित करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला तोडच नाही. डॉ गिरीश गांधी फाउंडेशन व प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने यवतमाळमध्ये लोकमतचे पत्रकार राहिलेले, सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड लिखित 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकावरील परीचर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ. श्रीकांत तिडके, अकोल्याच्या शिक्षणाधिकारी सौ सुचिता पाटेकर, लेखक व हास्य कलावंत किशोर बळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिचर्चेत वक्ता म्हणून सहभागी होताना गाडगेबाबा नव्याने व विविधांगाने समजून घेता आले. संत तुकाराम, कबीर, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले यांच्या विचारांचा क्रियाशील वारसा बाबांनी चालविल्याचे या पुस्तकाच्या पानापानातून अधोरेखित होते. प्रभात किड्सचे संस्थापक संचालक डॉ. गजानन नारे यांच्या आग्रहामुळे हा योग घडून आला. त्यांची आयोजन कुशलता, आदरातिथ्य व सामाजिक चळवळी तसेच साहित्याप्रतीची तळमळ यानिमित्ताने अनुभवयास मिळाली.. Great and Thanks to Dr. Nare ji #SantGadgebaba #KiranAgrawal #DrGajananNare

Monday, October 11, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Oct 10, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211010_10_1
https://www.lokmat.com/editorial/alternative-strike-akola-district-a310/

EditorsView published in Online Lokmat on Oct 07, 2021

नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ...
किरण अग्रवाल / काळाच्या ओघात जीवनमान बदलले तशा गरजा बदलल्या व त्या अनुषंगाने साधन सुविधाही उपलब्ध झाल्या. ही साधने व सुविधा जीवन सुसह्य करण्यासाठीच असल्याने त्यावरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत जाणे स्वाभाविकच होते, परंतु त्याखेरीज आपण त्याच्या आहारी जाऊ लागल्याने ते सारे गरजेचे व सवयीचे होत गेले. अशी सवय जेव्हा अतिरेकाची पातळी गाठते तेव्हा ती व्यसनाधीनता म्हणवते. संपर्क सुविधेचे साधन म्हणून आलेल्या मोबाईलचा वापर व त्यावरील सोशल मीडियाची हाताळणी हीदेखील आजच्या आधुनिक काळातील व्यसनाधीनताच बनली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. ------------- व्यसन म्हटले की प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात त्या विडी, सिगारेट, तंबाखू, मद्य आदि बाबी; अलीकडे त्यात गुटक्याचीही भर पडली आहे. आता या यादीत मोबाईलचाही समावेश करता येणार आहे, कारण साधन म्हणून तातडीच्या व सुलभ संपर्कासाठी मोबाईलचा वापर गरजेचा बनला असला तरी त्यावरील सोशल मीडियाच्या नादात विशेषता तरुणवर्ग इतका नादावला आहे की त्यातून त्याची स्वमग्नता ओढवते आहे. म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी व त्यातून नाते संबंध दृढ करण्याऐवजी चॅटिंगच्या माध्यमातून संबंध टीकवण्याकडे कल वाढला आहे. दसरा, दिवाळीला घरोघरी जाऊन होणाऱ्या स्नेहाच्या भेटी आता व्हाट्सअपवर संदेशांचे आदान-प्रदान करून होतात. दुःखद प्रसंगी रडक्या ईमोजीने काम भागू लागले आहे. स्नेह टिकतोय, पण ओलावा ओसरतोय; असेच याबाबत म्हणता यावे. ------------- महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलचा वापर करताना त्यावरील व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियावर रमण्याचे वा त्यातच गुंतून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या गोष्टीचे व्यसन जडावे तसा हा प्रकार झाला आहे. अलीकडेच व्हाट्सअप, फेसबुक 5/6 तासांसाठी बंद पडल्यावर अनेक जणांना जो अस्वस्थतेचा अनुभव आला त्यातून यासंबंधीची व्यसनाधीनता अधोरेखित होऊन गेली. घराघरात टीव्हीसमोर बसून राहणाऱ्या व मोबाईलमध्ये डोके घालून बसणाऱ्या लहान मुलांना पालकांकडून दटावले जाते, परंतु मोबाईलवरील सोशल मीडियात गुंतून पडलेल्या पालकांचा कान धरणार कोण असा प्रश्न आहे. कामाचा अगर उपयोगीतेचा भाग म्हणूनच नव्हे, तर बिनकामानेही, टाईमपास म्हणून ही माध्यमे हाताळणे अनेकांना इतके अंगवळणी पडून गेले आहे, की ते सुरू नसले की चुकचुकल्यासारखे होते. हे जे सवयीचे होऊन गेले आहे ती सवयीची गुलामगिरी घातक आहे, हा यातील चिंतेचा विषय आहे. सोशल मीडियाच्या हाताळणीची आधुनिक व्यसनाधीनता यातून पुढे आली असून, पारंपरिकतेखेरीजची ही नवी व्यसनमुक्ती साधणे आता गरजेचे होऊन गेले आहे. https://www.lokmat.com/editorial/underlining-need-new-addiction-a310/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop

Tuesday, October 5, 2021

सवयीची गुलामगिरी घातकच ...

October 05, 2021 सवयीची गुलामगिरी घातकच ...
अनुभव माणसाला शिकवून जातात हेच खरे. आपण सर्वच व विशेषत: तरुण पिढी व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदि सोशल मीडियाबाबत किती वेडावलेले अगर नादावलेले आहोत आणि त्यापासून दूर राहावे लागले की किती अस्वस्थता जाणवते हे काल अनेकांना प्रत्ययास आले असेल. काल रात्री 9.30 पासून सुमारे 5/6 तास ही माध्यमे अचानक बंद पडलीत. संदेशांचे आदान-प्रदान थांबले. सर्वांनीच मोबाईलची इंटरनेट कनेक्टिव्हिटी तपासून पाहतानाच रिस्टार्ट व पॉवर ऑफदेखील करून पाहिले, परंतु उपयोग झाला नाही. काही केल्या ते चालू होईना म्हटल्यावर अधिकच अस्वस्थता वाढली. स्क्रीनवर 'सर्व्हर एरर' दाखविले जाई, तर कुणी म्हणे चीनने सायबर हल्ला करून ते हॅक केले. अगोदर प्रत्येकालाच वाटले की हा प्रॉब्लेम केवळ आपल्या एकट्यालाच येतो आहे, नंतर लक्षात आले की सर्वांचेच तसे झालेय. कामाचा भाग म्हणून व बिनकामानेही ही माध्यमे हाताळणे इतके अंगवळणी पडून गेले, की ते सुरू नसले की चुकचुकल्यासारखे होते. सवयीची गुलामगिरी कशी घातक ठरते हेच यानिमित्ताने अनुभवयास मिळाले. अर्थात, फेसबुकच्यावतीने संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनीच सर्व युजर्सची माफी मागितली म्हटल्यावर विषय संपला, पण यानिमित्ताने यासंदर्भातील म्हणजे सोशल मीडियाच्या हाताळणीची व्यसनमुक्ती साधणे किती गरजेचे आहे हेच लक्षात आले... #KiranAgrawal #FacebookDown

Sunday, October 3, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on October 03, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211003_10_1
https://www.lokmat.com/manthan/gulab-storm-crop-loss-due-heavy-rain-a310/