Thursday, November 11, 2021

EditorsView published in Online Lokmat on Nov 11, 2021

corona vaccination : कवचकुंडल ! लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे ... किरण अग्रवाल / आरोग्याच्या काळजीबाबत सक्ती करावी लागणे योग्य ठरू नये, तो उपायही नाही; परंतु आपल्याकडे कसलीही बाब ऐच्छिक म्हटली की त्याबाबत गांभीर्य बाळगले जात नाही. स्वतःच्या मर्जीला संधी दिली गेली की त्यातून दुर्लक्ष घडून येते. कोरोना प्रतिबंधक लसी बाबतही तेच होताना दिसत आहे. कोरोनापासून बचावण्याचा लसीकरणाखेरीज दुसरा मार्ग अद्याप समोर आलेला नाही, शिवाय कोरोना संपलेला नाही व लवकर संपण्याची चिन्हेही नाहीत; असे असताना लसीकरणाबाबत नागरिकांकडून फारसे गांभीर्य दाखविले जाऊ नये हे म्हणूनच आत्मघातकी म्हणता यावे.
म्हणता म्हणता दिवाळी आली आणि गेलीही. दिवाळीपूर्वी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती, परंतु एकुणात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने ही लाट थोपविणे शक्य झाले; याचा अर्थ ती लाट आता येणारच नाही असे नाही. यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत जी अनिर्बंधता दाखविली गेली त्यातून या लाटेला निमंत्रणच दिले गेल्यासारखी स्थिती पाहता निर्धास्त राहून चालणारे नाही. अलीकडे बहुतेक ठिकाणचा कोरोनाचा ग्राफ खाली आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी आहे. मात्र दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात जी झुंबड उडाली व ती उडताना ना मास्क वापरले गेलेत, ना डिस्टन्सिंगविषयक निर्बंध पाळले गेलेत; त्यामुळे आता भीती दाटून येणे स्वाभाविक ठरले आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने निर्बंध शिथिल केले खरे परंतु आता संकट सरले असे गृहीत धरून वागले जात आहे त्यामुळे खरी भीती वाढून गेली आहे. --------------- केंद्र सरकार अतिशय वेगाने लसीकरण मोहिम राबवित असून भारताने गेल्याच महिन्यात कोरोनाविरोधी लढ्यातील महत्त्वाचा टप्पा पार करीत शंभर कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. राज्यातही 10 कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठण्यात राज्याच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. ही संख्या अगर वेग समाधानकारक आहेच, पण तेवढ्याने भागणारे नाही कारण राज्याचा विचार केला तर लसीच्या पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सुमारे 50 टक्के आहे. पहिल्यांदा लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे व गर्दी केल्याचे दिसून आले, मात्र दुसर्‍या लसीसाठी तेवढी उत्सुकता दाखविली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी लसींचा पुरवठा होत नव्हता तर गर्दी ऊसळे, आता लस उपलब्ध असूनही लोक त्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत कारण लोकांची भीती संपून गेली आहे व हीच बाब धोक्याची ठरु शकते. --------------- कोरोना हा संपणारा नाही व त्यावर लसीखेरीज दुसरा उपायही अजून हाती आलेला नाही, त्यादृष्टीने लस हेच त्यासंदर्भातले सुरक्षिततेचे कवच कुंडल आहे. शासनाने मिशन कवचकुंडल मोहीम हाती घेतली ती त्याचमुळे. केंद्र असो की राज्य शासन, ते आपल्यापरीने लसीकरणासाठी परिश्रम घेत आहे त्याला नागरिकांची उत्स्फूर्त साथ लाभणे गरजेचे आहे, परंतु तसे होत नसल्यानेच काही ठिकाणी सक्तीची वेळ आली आहे. एकही लस घेतली नसेल तर औरंगाबादेत पर्यटन व प्रवासास बंदी घालण्यात आली आहे, तर ठाणे येथे ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकही डोस घेतला नसेल त्यांना वेतन न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अकोल्यातील लसीकरणाचे प्रमाणही राज्यात सर्वात कमी असल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीही ठाणे पालिकेचा कित्ता गिरवला आहे. स्वेच्छेने होत नाही म्हणून ही सक्तीची वेळ आली आहे. ती योग्य की अयोग्य, हा वादविषय होऊ शकेल; परंतु आपल्या आरोग्याच्या काळजीपोटी दुसऱ्याला सक्ती करावी लागणे हेच मुळी गैर ठरावे. तेव्हा संभाव्य तिसऱ्या लाटेला अंगणातच रोखायचे तर लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे आहे. तेच कोरोनापासून बचावाचे कवचकुंडल आहे हे विसरता येऊ नये. https://www.lokmat.com/editorial/corona-vaccination-need-speed-vaccination-a309/

No comments:

Post a Comment